शनिवार, ३० जून, २०१२

सत्यमेव जयते आणि प्रसिध्दी- डॉ. सुधीर रा. देवरे

      भारताचे ब्रीद वाक्य आहे, सत्यमेव जयते. सत्यमेव जयते नावाचा रियालिटी शो एका चॅनलवर आणून अमीर खानने सगळीकडे सुप्रसिध्दीची दाणादाण उडवून दिली. आतापर्यंत या शो मध्ये जे विषय घेतले गेले, जे सामाजिक विषय हाताळले गेलेत ते नवीन आहेत असे मात्र अजिबात नाही. हे विषय सर्वसामान्यांची जुनी दुखणी आहेत. या विषयांवर आतापर्यंत कोणी बोलले नाही का? लिहिले नाही का? चित्रिकरण केलेले नाही का? या प्रश्नांची उत्तरे, हो अशीच येतील. वेळोवेळी हे विषय चर्चेला येत असूनही ही प्रजा- जनता- सत्ता त्या त्या वेळेस तात्पुरती जागी होऊन पुन्हा झोपी का जाते कळत नाही.
      या सर्व विषयांवर आतापर्यंत अनेक चॅनेल्सवर सुटे सुटे रिपोर्ट दाखवले गेले आहेत. वृत्तपत्रांतून अग्रलेख आलेले आहेत. स्पेशल स्टोरिज लिहिल्या गेल्या आहेत. अनेक डाक्युमेंटरीज आलेल्या आहेत. फिचरफिल्म्स सुध्दा आहेत. तरीही आज जो प्रतिसाद अमीर खानला मिळतो आहे, तेवढा प्रतिसाद कोणाला मिळालेला नाही. याचा अर्थ असा होतो की, प्रश्न आहेत पण ते प्रश्न कोण उपस्थित करतोय यालाही आज तेवढेच महत्व प्राप्त झाले आहे.
      असे प्रश्न याआधी उपस्थित केले गेलेत म्हणून अमीरच्या या प्रयोगाला काही अर्थ नाही असे मात्र मुळीच म्हणता येणार नाही. अमीर खान हा चांगला अभिनेता आहे, त्याच्याकडे निर्माता म्हणून सर्व प्रॉपर्टी आहे, जनमानसाची नस त्याला सापडली आहे. त्याच्याजवळ कॅमेर्याची दृष्टी आहे, मनुष्यबळ आहे, कलावंताचे बळ आहे (म्हणजे गायक, वादक, संगीतकार, प्रत्येक भागासाठी नवीन गीत आणि नवीन चाल, कॅमेरामन आदी). सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याच्याकडे सामाजिक बांधिलकी आहे.
आणि या सगळ्यांसाठी त्याला असलेले प्रसिध्दीचे वलय या सामाजिक प्रबोधनाला सहाय्यभूत ठरत आहे. त्याने आपल्या जनमानसात असलेल्या इमेजचा चांगल्याप्रकारे वापर करून हा शो तयार केला. ज्या ज्या प्रश्नांवर या शोमधून प्रकाश पडतोय त्या त्या संस्थेच्या उत्थापनासाठी ह्या शोच्या माध्यमातून चांगला निधी जमतो आहे ही सुध्दा या शोची खूप जमेची बाजू. चांगल्या उपक्रमांना आपण प्रतिसाद दिला पाहिजे मग तो उपक्रम कोणीही राबवो. म्हणून अमीरला जेवढे धन्यवाद देता येतील तेवढे कमीच पडतील. सत्यमेव जयते ।

- डॉ सुधीर रा. देवरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा