शनिवार, ५ मे, २०१२

बुवाबाजीपासून सावधान !!!

               बुवाबाजीपासून सावधान !!!
                                             - डॉ. सुधीर रा. देवरे

      आज सर्वत्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत बुवाबाजीची बजबजपुरी माजली आहे. एकेक नवीन बुवा त्यांच्या ऐश्वर्यसंप्पनेसह उजेडात येतात आणि त्यांच्या अफाट संपत्तीचे फुटलेले पेव पाहून आपले डोळे पांढरे होतात. शिकले सवरलेले, सुशिक्षित समजले जाणारे, उच्चशिक्षित लोकही आपली सद्‍सद् विवेक बुध्दी कुठल्यातरी अडगळीत गहाण ठेऊन बुवांच्या मागे धावतात. राजकारणी, खेळाडू, अभिनेते यांच्यातील अंधश्रध्दा तर जगजाहीर आणि किळस आणणारी आहे.
फक्त एका दिवसाचेच उत्पन्न एक कोटी असणारे तथाकथित बाबा आणि आयुष्यभर इमाने इतमाने नोकरी चाकरी करून 25 लाख रूपये सुध्दा मागे न टाकणारे नोकरदार लोक. एकीकडे दिवसभर कष्ट करून आपला उदरनिर्वाह कसातरी चालवणारा छोटा शेतकरी- शेतमजूर वर्ग आणि शरीराला दिवसभर लागणाय्रा कमीतकमी अन्नाची गरज सुध्दा भागवू न शकणारे असंख्य भुकेकंगाल लोक आणि दुसरीकडे (पण याच देशात) हजारो मंदिरांतील दानपेट्या मोजण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग असावा लागतो. देवाला इतक्या सढळ हाताने लाच देणारे देशात इतके प्रचंड श्रीमंत लोक असूनही याच देशातले असंख्य बालके कुपोषणाने मरतात आणि घेतलेले कर्ज फेडता येत नाहीत म्हणून शेतकरी आत्महत्या करतात! एकीकडे इनकम टॅक्स चुकवणारे लोक देवाच्या दानपेट्या मात्र भरभरून भरतात यामागे कोणती मानसिकता असेल?
हा हिशोब कसा करायचा? ही दरी कशी बुजवायची? बँकांचे राष्र्टीयकरण झाले तसे मंदिरांचे राष्र्टीयकरण झाले पाहिले का? जे लोक नको इतक्या प्रमाणात देवांच्या आहारी जातात- बाबांच्या मागे लागतात त्यांचे मानसिक संतुलन योग्य आहे की नाही हे तपासून पाहिले पाहिजे का?
- डॉ सुधीर रा. देवरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा