शनिवार, २६ मे, २०१२

व्यंगचित्राच्या निमित्ताने

व्यंगचित्राच्या निमित्ताने

                   - डॉ सुधीर रा. देवरे

 

      आजचे राजकीय नेते नको इतके संवेदनाशील झालेले आहेत. त्यांना कोणतेही सामाजिक प्रश्न ‍नीट सोडवता आले नाहीत, दुष्काळ निवारण करता आले नाही तरी कितीही जटील भावनिक प्रश्न ते चुटकीसरशी सोडवताना दिसतात. ज्या धड्याबद्दल कोणी आक्षेप घेतला तो धाडकन काढून मोकळे होणे, ज्या पुस्तकाबद्दल कोणी आक्षेप घेतला त्यावर पटकन बंदी आणणे. ज्या चित्रावर कोणी बोट ठेवला ते चटकन मागे घेणे. इतक्या झटपट असे भावनिक निर्णय घेताना बजेट मधे तरतूदीनुसार जास्तीचा कोणताही खर्च येत नाही, नियोजनावर परिणाम होत नाही. खासदार- मंत्री निधीतून कपात होत नाही. झालाच तर फक्त फायदाच फायदा. तोही छप्पर फाडके.

अशा काळात कोणी काही चांगल्या मागण्यांकरता शांततामय आंदोलन करत असेल तर ते दुर्लक्षित होते. कोणी पिण्याला पाणी मागत असेल तर इतक्या ज्वलंत प्रश्नांवर देशात चर्चा चालली असताना पिण्यासाठी पाणी मागणे हे किती क्षुद्रपणाचे लक्षण ठरेल. अशा वेळी आतापर्यंत सरकारने काहीही चांगले काम केलेले नसले तरी असे इतिहास बदलण्याचे श्रेय फुकटात मिळते आणि निवडणूकीत त्या जातीपातीच्या मतांचीही हमखास शाश्वती मिळते.

      कोणाच्याही अचानक भावना भडकताच दगडफेक, जाळपोळ,  तोडफोड साठी सार्वजनिक क्षेत्रातील कार्यालये, वाहने, वास्तु, वस्तु, दुकाने जसे शासनच सहज उपलब्ध करून देत असते इतक्या सहजपणे हिंसा होत राहते. जनसामान्यांचे प्रश्न बाजूला पडून अशा घटनांच्या प्रतिक्रियांसाठी राजकीय नेते चॅनेल्सवर झळकू लागतात. कादंबरी कशी लिहावी हे राजकीय लोक सांगतील, कविता कशी लिहावी, लेख कसा लिहावा, कथा कशी लिहावी, नाटक कसे लिहावे हे राजकीय लोक सांगतील त्याच आशयाचे लिहायला हवे. चित्र कसे काढावेत हेही तेच सांगतील. सिनेमा कसा निर्माण करावा, कसा दाखवावा हे आधी राजकीय लोकांना तो दाखवून मंजूरी घ्यावी नंतरच सेन्सार बोर्डाकडे जावे.

      खरे तर लोककल्याणकारी राजकारण कसे करावे, पुस्तके कशी वाचावीत, व्यंगचित्रे कशी पहावीत आणि वाचावीतही, कला कशी आत्मसात करावी, कला म्हणजे नेमके काय ह्याची ज्या राजकारणी लोकांनी कलावंतांकडे शिकवणी लावली पाहिजे, तेच लोक कलावंताने काय करावे हे शिकवतात हे आपल्या देशाचे आणि या प्रजासत्ताक देशाच्या राज्यघटनेचेही दुर्दैव आहे !!!

महात्मा गांधीना दक्षिण आफ्रिकेत रेल्वेतून बाहेर फेकले असे उद्या एखाद्या पुस्तकात चित्र छापल्यावर जर कोणाच्या भावना दुखावल्यात तर काय करावे? हळू हळू इतिहास बदलून टाकावा दुसरे काय. उदा. शिवाजी महाराजांनी प्रेमाने अफझलखानाला मिठ्ठी मारल्याने अफझलखानाला मित्रत्वाच्या अतिआनंदाने हृदय विकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचे निधन झाले !!!

     

- डॉ सुधीर रा. देवरे

         sudhirdeore29@rediffmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा