रविवार, ११ जानेवारी, २०२६

मराठी आणि महाराष्ट्र धर्म! (मुंबई-ठाणे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने)

 

 

  - डॉ. सुधीर रा. देवरे

                     हिंदीशिवाय दुसरी कोणतीही बोली मराठी भाषेची जागा घेऊ शकत नाही. म्हणूनच महाराष्ट्रात मराठीला हिंदीपासूनच जास्त धोका आहे! शब्दांचे आदान प्रदान होत भाषा प्रवाहित होतात, पण हिंदी माणसांसहीत हिंदी भाषा मराठीत एकतर्फी आदानच होत आहे, मराठीचे प्रदान कधी होणार? बाहेरची कोणतीही भाषा स्थानिक जनतेत प्रचलित असलेल्या एखाद्या भाषेला मारु शकत नाही, पण सत्तेतल्या वेगळ्या भाषिक प्रेमाच्या लोकांनी ठरवले तर ते कामकाजात जवळची भाषा बदलून (हिंदी- मराठी साम्य) स्थानिक बहुजनांची भाषा ठरवून मारू शकतात! महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांची मातृभाषा मराठी आहे की हिंदी आहे? त्यांची मातृभाषा मराठी असेल तर या सत्तेला एवढा हिंदीज्वर येण्याचे कारण काय? मराठी सत्तेत ज्यांचे हिंदीचे प्रेम उतू जात असेल, त्यांचे मराठी राज्यात काय काम आहे? त्यांनी महाराष्ट्रातून चंबुगबाळे आवरून दिल्लीत वा उत्तर भारतात सत्ताकारण करावे. आधी मराठी भाषा, महाराष्ट्र धर्म, सार्वभौम संयुक्त महाराष्ट्र प्रांत, नंतर काय ते! मराठी माणूस जसा न शिकता ऐकून हिंदी बोलू शकतो, तसा हिंदी भाषिक माणूसही ऐकून मराठी बोलू शकतो. पण तशी त्यांची इच्छाशक्ती नाही! जो इथे राहून मराठी जन्मभूमी- कर्मभूमीला होत नाही, तो दुसऱ्या प्रदेशाला वा भारताला कसा होईल? म्हणून महाराष्ट्रातील भाजपसह सर्व राजकीय पक्षांनी मराठीसाठी एक होत मराठी व महाराष्ट्र विरोधी लोकांचा सत्तेतून कडेलोट करायला हवा!  

                    आज मराठीची झाली तशी हिंदी प्रातांत हिंदी भाषेची केविलवाणी अस्था झाली असती तर मी हिंदीच्या बाजूने असेच लिहिले असते! भाषा कोणतीही असो तिचा व्देष करता कामा नये आणि एखादी भाषा मारण्याचे प्रयत्न तर खूप असमंजसपणाचे ठरतात! महाराष्ट्र म्हणजे फक्त भूगोल नाही. (परप्रांतीय लोक इथल्या जमिनी विकत घेऊन इथला भूगोलही बदलणार आहेत.) महाराष्ट्राचा इतिहास, लोकजीवन, लोकसंस्कृती आणि इथल्या अनेक घटकबोलींसह मराठी भाषा वजा केली तर शिल्लक शून्य राहील! मुंबईत मराठी भाषेत बोलायचे नाही, मग काय युपी बिहारात मराठी बोलाल का? लोकहो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यदिव्य कारकिर्दीपासून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आठवा, वाचा, अभ्यास करा. १०६ लोकांनी मराठी मुंबईसाठी हौतात्म्य पत्करले ते आठवा.   

                    एका चॅनलवर मुंबईच्या बाजारात निवडून निवडून अनेक परप्रांतीय लोकांची मुलाखत एवढ्यात पाहण्यात आली. अलीकडच्या काळात त्यांची बोलण्याची मग्रुरी, उध्दटपणा, उद्दामपणा, निलाजरेपणा लगेच लक्षात येत आहे. आम्हाला मराठी शिकायची गरज नसून यापुढेही शिकणार, बोलणार नाही असे सहज हिंदीत सांगतात. मुंबईतले वातावरण यापूर्वी इतके कधीच गढूळ झालेले नव्हते. काही परप्रांतीय लोक आतापर्यंत मराठी लोकसंस्कृतीत मिसळत नसले तरी याआधी स्थानिकांवर कुरघोडी करण्याइतके निर्ढावले नव्हते, आपण परराज्यात उपरे आहोत याची जाणीव त्यांना होती. आता मात्र ते मराठी माणसाला भाषेसह सगळ्याच क्षेत्रात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. मुंबईतल्या काही भागात मराठी लोकांना घरे विकत घेता येत नाहीत, भाड्याने मिळत नाहीत, काही आस्थापनात मराठी तरूणांना नोकऱ्या दिल्या जात नाहीत. राजरोस ‘मराठी तरुण नको’ अशा जाहिरातीही प्रकाशित होतात. परप्रांतीय लोक आम्ही भारतीय आहोत असे सांगत मुंबईत हक्काने राहू शकतात, पण आपल्याच प्रांतात मराठी लोक- तरूण परप्रांतीयांच्या कॉलनीत राहू शकत नाहीत, त्यांच्या आस्थापनात नोकऱ्या करू शकत नाहीत! या लोकांचा असा नेमका कोणता भारत आहे? कोणत्या राज्यघटनेनुसार हे सुरू आहे? मराठी माणसाच्या विरोधात त्यांच्या संघटना बांधल्या जात आहेत. महापालिका निवडणुकीत अमराठी लोक मोठ्या प्रमाणात उमेदवार असून एका राष्ट्रीय पक्षाने ४४ अमराठी उमेदवार उभे केले आहेत. मुंबई ताब्यात घेण्याच्या गोष्टी ते राजरोस करत आहेत. कोणाच्या वरदहस्ताने हे होत आहे? मराठी प्रांतीय म्हणून निवडून आलेले आपले सरकार आपल्यासोबत नसेल तर असेच होत राहील. मराठी लोकांच्या अस्मितेच्या स्वतंत्र प्रांतिक मान्यता मिळालेल्या महाराष्ट्र राज्यातल्या मराठी लोकांनी निवडून दिलेले सरकार स्थानिकांच्या बाजूने नाही?

                    मराठी भाषा, मराठी लोकसंस्कृती आणि स्थानिक अस्मितेच्या जतनासाठी महाराष्ट्राला सक्षम प्रादेशिक राजकीय पक्षाची गरज भासू लागली आहे का? मुंबईत महाराष्ट्र धर्म जिवंत ठेवायचा असेल तर अमराठी उमेदवाराला (तो माणूस तुम्हाला आवडणाऱ्या पक्षातला असला तरी) मतदान करू नका! महाराष्ट्रातले धार्मिक सत्ताधारी लोक मराठी माणसाला हिंदू समजत नाहीत का? मग सरकारी पातळीवरून मराठी- हिंदी भाषिक झुंज लावण्याचे कारण काय? स्वार्थासाठी खेळलेली ही खेळी महाराष्ट्राच्या मुळावर येऊ शकते! लोकसभा- विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही हिंदू असता, मग मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मराठी भाषिक हिंदूलोक शत्रू कसे होतात? लोकहो, डाव ओळखा आणि हाणून पाडा! मराठी सत्तेतला हिंदी टक्का जसा वाढत जाईल तसा हा मराठी प्रांत नामशेष होत जाईल! आणि ज्यांना हे मराठी स्वतंत्र अस्मितेचे प्रांतिक राज्य मान्य नसेल, त्यांना महाराष्ट्राच्या सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. कारण राज्याचा मूळ पायाच मराठी प्रांत असा आहे. तसे नसते तर एखाद्या हिंदी प्रदेशाला वा केंद्राला हे राज्य जोडले गेले असते.

                    आपली भाषा मारणारे, आपल्या भाषेतल्या शाळा बंद करणारे, मराठी शाळेच्या वास्तू उध्वस्त करणारे, पहिलीपासून त्रिभाषा सूत्राच्या नावाने हिंदी लादू पाहणारे, अमराठी लोकांना सर्व दरवाजे उघडे करुन देणारे, आपल्या लोकांना जगवणारी झाडे तोडणारे, आपणच निवडून दिलेले सरकार आपले का नाही, हा जनतेच्या मनातला प्रश्न आहे! सरकार उत्तरदेही आहे की नाही? लोकसभेला हिंदू- मुसलमान करून, विधानसभेला मराठा- ओबीसी लढवून आणि आता मुंबई महापालिकेसाठी मराठी- हिंदी भाषा वाद उकरून निवडणूक जिंकण्याचा बेत जे कोणी करत असतात, ते लोक सामाजिक बांधिलकी पाळणारे नसतात, फक्त सत्तापिपासू ठरतात. म्हणून आज मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र, हेच सत्य! बाकी सगळे असत्य! मराठी भाषा आणि मुंबई वाचवा. मुंबईत एकही परप्रांतीय निवडून यायला नको. परप्रांतियांचे, परराज्याचे लांगुलचालन करणारे आणि केंद्रात महत्वाचे पद मिळवण्यासाठी हिंदी भाषेला कुरवाळणारेही निवडून यायला नकोत. मग ते मराठी भाषिक असोत, परभाषिक असोत की कोणत्याही पक्षाचे! आपला धर्म- महाराष्ट्र धर्म! आपली अस्मिता, भाषा, लोकसंस्कृती मराठी! मुंबईत फक्त मराठी बोला!

                    संपूर्ण महाराष्ट्रातील आपापल्या गावात- शहरात (आपापल्या मातृभाषा बोलीसह) मराठी भाषा बोलली जाते. आपल्या गावातले काही नागरिक आपल्या कुटुंबात हिंदी सदृश्य भाषा बोलत असले तरी ती हिंदी नसते, त्यांची पारंपरिक बोली असते, पण हे नागरिक बाहेर आपल्याशी मराठी बोलतात, कारण ते मराठीच लोक आहेत. म्हणून त्यांच्याशी आपण हिंदीत न बोलता मराठीतच बोलावे. कोणत्याही दुकानात, हॉटेलीत, व्यवहारात, प्रवासात, फोनवर मराठीतच बोलावे. दुसऱ्या राज्यात गेल्यावर, दुसऱ्या राज्यातल्या व्यक्तीशी फोनवर अथवा काही दिवसांसाठी पर राज्यातून आलेल्या पाहुण्यांशी हिंदी बोलायला हरकत नाही.

                    आपली मुले, नातवं, पाल्य इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असतील तर त्यांनी इंग्रजीत बोलायला हरकत नाही, पण आपली स्थानिक मायबोली आणि मराठीही त्यांना चांगल्या प्रकारे बोलता यायला हवी याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मुले मराठी भाषिक असतात, शिक्षकसुध्दा मराठी भाषिक असतात, पण संवादाची भाषा मुद्दाम हिंदी वापरली जाते. असे का? पालकांनी जागरूकपणे हे शाळेला विचारले पाहिजे. एकतर शाळेत तुम्ही इंग्रजीतच बोला, इंग्रजी व्यतिरिक्त अन्य भाषेत संवाद करायचा असेल तर तो संवाद मराठीत व्हायला हवा, हिंदीत नाही. इंग्रजी बोलता येत नाही म्हणून आपल्याच भाषेचा व्देष करत हिंदी का बोलता? तुम्ही पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले आहे, हिंदी माध्यमाच्या नव्हे, हे लक्षात ठेवा.

                    मुंबई- ठाणेकरांनो आताच जागे व्हा, तुम्ही स्वत: अडचणीत सापडाल अथवा हा वणवा तुमच्या घरापर्यंत पोचेल तेव्हा तुम्हाला भविष्यात कधीतरी जाग येईल, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. म्हणून मग्रूर परप्रांतियांना आणि त्यांना पायघड्या अंथरणाऱ्यांनाही पाडा. हिंदूचे राज्य म्हणून नव्हे, मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचे महाराष्ट्र राज्य १ मे १९६० ला अस्तित्वात आले आहे, याचे (संविधानानुसार) भान ठेवा. महाराष्ट्र धर्म वाचवा.

                    (अप्रकाशित लेख. मुंबई-ठाण्यातील लोकांना पाठवा. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

दिनांक : 11-1-2026

*

गुरुवार, १ जानेवारी, २०२६

‘जीवदान’ कादंबरी आणि ‘राजहंस’ प्रकाशन अनुभव

 

 - डॉ. सुधीर रा. देवरे

                      माझी अप्रकाशित जीवदान कादंबरीची पीडिएफ फाईल नोव्हेंबर २०२३ ला ईमेलने राजहंस प्रकाशनाकडे छापण्यासाठी विचारार्थ पाठवली होती. अचानक २३-०२-२०२४ ला राजहंस प्रकाशनाकडून फोन आला की, आपली कादंबरी आम्ही प्रकाशनासाठी स्वीकारली आहे. अभिप्रायासाठी डॉ. विनया खडपेकर यांच्याकडे आपली कादंबरी पाठवली होती, कादंबरी छापण्यासाठी स्वीकारावी असे त्यांनी कळवले आहे. कादंबरीची ओपन वर्ड फाईल ईमेल करा. करारपत्र तयार करण्यासाठी आपली काही माहिती हवी आहे. तसा ईमेल पाठवला आहे. तो फॉर्म भरून आणि इतर माहितीही पाठवा. ती माहिती मिळाली की करारपत्र तयार होईल आणि पुस्तक लगेच प्रकाशित होईल.

                     ऐकून साहजिकच आनंद झाला. राजहंस प्रकाशनातर्फे अजून माझे एकही पुस्तक प्रकाशित झाले नव्हते. ईमेल पाहिला. करारासाठी हव्या असलेल्या माहितीचा विहित नमुन्यातील फॉर्म भरून त्याच दिवशी तात्काळ ईमेलने पाठवला. (लेखकाचा तपशिल, बँक तपशिल, कॅन्सल चेक, फोटो इत्यादी). तसेच जीवदान कादंबरी (संपूर्ण word open unicode file) व पीडिएफ ईमेलने त्याच दिवशी पाठवली.

                     दोन तीन महिन्यांनी शिरीष शेवाळकर यांचा फोन आला. म्हणाले, करारपत्र पाठवले आहे, वाचून सही करुन पाठवा. पाठवले. नंतर १९ जुलै २०२४ ला राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉ. सदानंद बोरसे यांचा फोन आला, आधीचे कामे साचल्यामुळे कादंबरी ऑक्टोबर २०२५ ला प्रकाशित होईल, चालेल ना आपल्याला?’ कादंबरी स्वीकृत झाल्यापासून २० महिन्यात प्रकाशित होणार होती तरीही चालेल, काही घाई नाही म्हणालो.

                     ऑक्टोबर २०२५ महिना उजाडला तरी पुस्तकाविषयी काही कळेना. म्हणून मी नोव्हेंबरला डॉ. सदानंद बोरसेंना फोन केला. ते म्हणाले, एक महिना उशीर होतोय पुस्तकाला, पण येईल एवढ्या दहा पंधरा दिवसात. दहा पंधरा दिवसाचा उल्लेख ऐकून मी चकीत होत म्हणालो, मला फायनल तपासणीला पाठवताहेत ना पुस्तक? कारण कादंबरीतला बराच भाग अहिराणी भाषेत आहे, तो नीट तपासला पाहिजे. मुखपृष्ठही पाठवा पहायला. ते म्हणाले, तशी काहीच आवश्यकता नाही. चांगली तपासणी झाली आहे. आणि मुखपृष्ठ हे आमच्याकडून लेखकाला सरप्राइज असते, म्हणून आपण लेखकाला आध‍ी पाठवत नाही. हे ऐकूनही चकीत झालो.

                     नंतर काही दिवसांनी अचानक लेखकाच्या पुस्तक प्रतींचे पार्सल आले. न पाहिलेल्या मुखपृष्ठाबद्दल उत्सुकता होती. मुखपृष्ठात ढोबळ कल्पना असली तरी ठीक आहे, आवडले. लेखकाच्या पुस्तक प्रती, संपादकांचे पत्र, मानधनाचा धनादेश आणि सोबत पेढ्यांचा पुडासुध्दा होता. याआधी काही प्रकाशकांकडून पुस्तकांसोबत मानधनाचा धनादेश मिळाला होता, पण पुस्तकांसोबत मिठाई पहिल्यांदा मिळाली होती.

           पुस्तकांसोबतचे संपादकांचे पत्र लगेच वाचले,

प्रिय डॉ. सुधीर राजाराम देवरे,

सस्नेह नमस्कार.

जीवदान ही तुमची अत्यंत अनवट कादंबरी तुमच्या हाती सोपवत आहे.

पौगंडावस्थेतील एका मुलाच्या आयुष्यात घडलेल्या भीषण घटना, घडत्या वयात सामोरे आलेले विलक्षण प्रसंग, आईवडिलांचे संरक्षक छत्रच उद्‍ध्वस्त करणारी त्याच्या वाट्याला आलेली परिस्थिती या सार्‍यांनी त्याच्या आयुष्याचा चोळामोळा करून टाकलेला.

भावनिक आंदोलने आणि मनोव्यापार यांची धक्कादायक कहाणी साकारणारी ही शोकांत कादंबरी वाचकाला चटका लावणारी ठरेल, अशी मला आशा आहे.

या कादंबरीमध्ये हृदयावर चरे पाडणारी प्रत्यक्ष आणि प्रच्छन्न हिंसा वाचकाच्या नजरेसमोर उभी करणारे मुखपृष्ठ ‘राजहंसी’ कलाकार तृप्ती देशपांडे यांनी साकारले आहे. ते तुम्हालाही भावेल, याची मला खात्री आहे.

या कादंबरीचे वेगळेपण अधोरेखित करणारी श्री. शशिकांत सावंत यांची प्रस्तावना कादंबरीला मूल्यवृध्दी देणारा वेगळा आयाम ठरते.

आपल्या दोघांच्या समान उदिष्टामुळे - कादंबरी योग्य प्रकारे प्रकाशित व्हावी - या अडचणींवर मात करता आली.

फोनवर आपल्याशी बोलणे झाले असता प्रकृतीच्या काही मर्यादांमुळे तुम्हाला सटाणा सोडणे शक्य होत नसल्याचा उल्लेख तुम्ही केला होता. नाशिकला येणे झाल्यास तुमच्याशी संपर्क साधेन. शक्य असल्यास सटाण्याला तुमची भेट घेण्याचा प्रयत्न करीन.

तुमच्या कुटुंबीयांना आणि सुहृदांना सस्नेह नमस्कार.

- डॉ. सदानंद बोरसे, संपादक, राजहंस प्रकाशन, पुणे.

                     पुस्तक प्रकाशित होताना प्रकाशनाने लेखकाला कसा सुखद धक्का दिला याबद्दलचे वरील सर्व कथन आहे. पण कादंबरीत नक्की काय आहे, तिचे कलात्मक मूल्य काय, मराठी सारस्वतात तिचे स्थान काय, याबद्दल शशिकांत सावंत प्रस्तावनेत म्हणतात,

                     ‘‘जीवदानही कादंबरी गोष्ट सांगण्याच्या प्रोसेसची गोष्ट आहे. तिचं कथासूत्र टोकदार ग्रामीण जाणिवांचं आहे. कादंबरीतला बराच भाग अहिराणी भाषेत असल्यामुळं भाषेबरोबर येणारे वाक्प्रचार, म्हणी आणि वेगळ्या शब्दांमुळं ती समृद्ध झालेली आहे. तिच्यामध्ये क्रौर्य आहे, काळा विनोद आहे, चरचरीत व्यक्तिरेखा आहेत आणि खान्देशच्या परिसरातल्या माणसांच्या स्वभावाच्या गोष्टी आहेत... नायकाच्या स्वतःच्या आणि वडिलांच्या आयुष्यातल्या कितीतरी लहान-सहान मार्मिक गोष्टींमुळं मुख्य कथानकाला प्रवाहीपणा येऊन कादंबरी कलात्मक होत जाते... या कादंबरीतील अहिराणी भाषेतील अनेक शब्द, म्हणी, वाक्प्रचार, वाक्यप्रयोग हे आपल्याला वेगळं काही देऊन जातात... या कादंबरीचे सिक्वेल होतील असे अनेक बीजं तिच्या उपकथानकांत दडले आहेत... कुठल्याही कादंबरीला जीवनदृष्टी हवी, तिनं मानवी व्यवहाराचं काहीतरी ज्ञान आपल्याला द्यायला हवं, कुणाच्या तरी जगण्यात आपण डोकावतो आहोत, हे भान द्यायला हवं. हे सगळं या कादंबरीत आहे... प्रसिद्ध कादंबरीकार आणि संपादक विल्यम मॅक्सवेल म्हणाला होता की, कथा एकावेळी एकच गोष्ट सांगत असते, कादंबरी एकावेळी अनेक गोष्टी सांगू पाहते. सुधीर देवरे यांच्या कादंबरीत अशा अनेक गोष्टी आहेत. चित्रमयता हा तिचा एक गुण आहे... यात वडील आणि मुलाचं जे नातं आलेलं आहे, ते मराठी साहित्यात कुठंच आलेलं नाही. अनेकदा ग्रामीण म्हणून म्हटल्या जाणाऱ्या कादंबरीत मानसिक आंदोलन किंवा मनोव्यापार यांचा अभाव आढळतो. इथं मात्र तसं होत नाही. मोजक्या शब्दांत व्यक्तिरेखा, प्रसंग आणि प्रदेश उभा करण्याची ताकद या लेखनात असल्यामुळं कादंबरी वाचता वाचता, कधी संपली हेच कळत नाही. कादंबरीच्या या नव्या प्रयोगानं मराठी साहित्यात मौलिक भर घातली आहे एवढं मात्र निश्चित!’’

                     राजहंस प्रकाशनासाठी कादंबरी स्वीकृत करताना संपादिका डॉ. विनया खडपेकर म्हणतात, ‘‘सुधीर देवरे यांची 'जीवदान' ही लघुकादंबरी वाचली. ग्रामीण भागातील अल्पशिक्षित समाजातील मुलगा. वडिलांचा खून करणारा हा अल्पवयीन मुलगा रिमांड होममधून आत्मकथन करतो आहे, अशी कल्पना. वडिलांनी आईला छळले, तिचा खून केला, म्हणून या मुलाने सूड उगवला. मुलाच्या वयाला झेपेलशा शैलीतले हे कथन आहे. त्यात लेखकाचा कोणत्याही प्रकारचा आवेश नाही. न्यायअन्यायावर पोपटपंची नाही. ग्रामीण भागातील कुटुंब-चित्र, गाव-चित्र  कादंबरीत प्रभावीपणे उमटले आहे. जाताजाता वास्तव चित्र आणि काल्पनिक कथा यातील भेदही लेखक दाखवून जातो.’’  

         पुस्तकात खूप मोठ्या प्रमाणात अहिराणी भाषा उपयोजित झाली असल्याने काही चुका राहून गेल्यात की काय म्हणून मी तात्काळ प्रकाशित झालेली कादंबरी पूर्ण वाचली. कादंबरीभर दोन चार किरकोळ चुका वगळता पुस्तक तपासणी चांगली झाली आहे. राजहंस प्रकाशनाने स्वीकारल्यापासून पुस्तक फक्त २१ महिन्यात प्रकाशित केले, हासुध्दा माझ्यासाठी एकूण छान आणि सुखद अनुभव होता. पुस्तक स्वीकृतीसाठी राजहंस प्रकाशनाने संपादक नेमले असले तरी कादंबरीच्या नावासह माझ्या संहितेत एका शब्दानेही त्यांनी बदल सुचवला नाही आणि परस्पर तसे काही संपादन केले नाही हेही खूप महत्वाचे वाटले.

                     शशिकांत सावंत यांनी कादंबरीला अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. श्री. दिलीप माजगावकर, डॉ. विनया खडपेकर, डॉ. सदानंद बोरसे, शिरीष शेवाळकर, तृप्ती देशपांडे (मुखपृष्ठ) आणि राजहंस प्रकाशनातील सर्वांनी ह्या पुस्तकासाठी मेहनत घेतली. खूप खूप धन्यवाद.

पुस्तकाविषयी माहिती :

पुस्तक : जीवदान (कादंबरी)

लेखक : सुधीर राजाराम देवरे

प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे

पृष्ठ : १२५, किंमत : २०० रुपये

                    (अप्रकाशित लेख. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

सोमवार, १ डिसेंबर, २०२५

अहिराणी, एकूण बोली आणि मराठी- भाग दोन

 


- डॉ. सुधीर रा. देवरे

 

. मराठीचं भवितव्य : आपली जबाबदारी 

                      जगातील प्रत्येक कोपरा आपापल्या भाषेनं संपन्न आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात त्या त्या स्थानिक भाषेतून लोकसंवाद होत असतात. तरीही काही भाषा आज नामशेष झालेल्या आहेत तर काही भाषांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर होत आहे, हे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. आज महाराष्ट्रात सर्वदूर अस्तित्वात असलेली मराठी भाषा ही पूर्वीपासून विविध ग्रामीण आवाजांची बोलीभाषा आहे. परंतु लिहित्यांनी बोलीभाषांच्या विशिष्ट संज्ञा निवडीतून व वाचकांनी वाचनातून आजची महाराष्ट्राची प्रमाणभाषा घडवली. हे प्रत्येक मुख्य भाषेत होत राहतं.

                      भारतात सर्वदूर १५०० बोलीभाषा बोलल्या जात असूनही राज्यघटनेनं मान्यता दिलेल्या केवळ २२ भाषा अधिकृत आहेत. त्या अधिकृतांतील मराठी एक. मराठी ही भाषा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तिच्या घटकबोलींसह- विविध हेल उच्चारांसह मोठ्या प्रमाणात विशेषत: ग्रामीणांकडून बोलली जाते. मराठीत व्यवहार केले जातात, संवाद होत राहतात, मराठी लिहिली जाते, छापली जाते, शिकवली जाते. महाराष्ट्राव्यतिरिक्त कर्नाटक, गुजराथ, मध्य प्रदेश, गोवा, आध्र प्रदेश, पं. बंगाल आदी राज्यातील कोलकात्ता, इंदोर, म्हैसूर, बेळगाव, बडोदा, सुरत, बँगलोर, हैद्राबाद, पणजी, धारवाड आदी शहरात व तंजावर, डांग भागातही मराठी लोक आहेत आणि ते आपसात मराठी बोलतात. (स्थानिकांशी स्थानिक भाषा बोलतात.) तरीही आज महाराष्ट्रातील शहरी भागात मराठीची मोठ्या प्रमाणात पिछेहाट आणि उपेक्षा होताना दिसते. 

                      मराठी भाषेचा उदय साधारणतः इसवी सन पूर्व पहिले- दुसरे शतक ते इसवी सनाच्या पहिल्या- दुसऱ्या शतकात झालेला असावा, असं अनेक उपोद्बलक पुराव्यांनी दिसून येतं. माहाराष्ट्री, पैशाची, पाली, अर्धमागधी, प्राकृत, शौरसेनी, संस्कृत, कन्नड, राजस्थानी, बंगाली ह्या भाषांमधील काही शब्दही मराठीत आढळून येतात. म्हणूनच मराठीला एखाद्या विशिष्ट भाषेची पोटभाषा म्हणणं पूर्णत: चुकीचं ठरतं.

                      भाषेच्या संदर्भात काही चांगले अपवाद वगळता आतापर्यंत मराठी भाषेवर सरधोपट असं लिखाण होत राहिलं. (भाषेवर. भाषेत नव्हे.) हेही एक भाषा दुर्लक्षाचं कारण आहे. मराठी भाषेतून संवाद साधण्यासाठी लोकांना प्रेरणा मिळेल, बोलण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, अशा हेतूनं मराठीतील ठोस बोलीक बलस्थानांचा अधिक अभ्यास व्हायला हवा. भाषा हलकी फुलकी आणि सहज कशी बोलता येईल, हे पाहिलं पाहिजे. भाषेच्या नैसर्गिक वाढीला मारक ठरतील अशी महाराष्ट्राच्या प्रांतीय सरकारकडून धोरणं राबवली जाऊ नयेत. (उदा. महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीची सक्ती कशाला? महाराष्ट्रात सीबीएससी बोर्ड कशाला?)

                      जाणूनबुजून बोजड मराठी भाषा उपयोजित करणं, मराठीतल्या बोलींसदर्भात असलेली काही अभ्यासकांची आकसबुध्दी, तथाकथित भाषा शुध्दीकरणाचा प्रयत्न, बोलीतल्या काही उच्चारांचा केलेला उपहास (उदा. न,,,,,, व्ह.), संस्कृतप्रचुर जड- अवघड शब्दांचा भरणा, संस्कृतप्रचुर बोलणं म्हणजे शुध्द भाषा बोलणं.. असा समज होणं, शुध्दलेखनाची अतिरिक्त चिकित्सा, टाकाऊ व कालबाह्य विशिष्ट पारिभाषिक संज्ञांचा अट्टहास, ढोबळ पुराव्यांच्या आधारावर केली गेलेली निश्चित विधानं (उदा. संस्कृत ही मराठीची जननी आहे. वगैरे), भाषेची तथाकथित उत्पत्ती- व्युत्पत्ती, हितसंबंध, सामाजिक प्रतिष्ठेत शुध्द(?) भाषा बोलण्याच्या आततायी कल्पना, दुसऱ्या भाषेच्या संदर्भातील अज्ञान, इंग्रजी शब्दांचा तथाकथित अनुवाद (उदा. रेल्वेला आगगाडी म्हणायचं सोडून भलताच अगडबंब अनुवाद करणं. अशा अनुवादात साधे सरळ मराठी शब्द सोडून संस्कृत घुसडणं.) पूर्वग्रह, दुराग्रही वृत्ती, भाषेतून वर्गवर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न, लक्षात न येणारी जोडतोड करणं, ह्या आणि अशा अनेक प्रकारांमुळंच मराठी भाषेचं जतन- संवर्धन खुंटलेलं दिसून येतं.

                     महाराष्ट्र प्रांतातल्या मराठी माणसावरून भाषेला मराठी नाव प्राप्त झालं. महाराष्ट्रात राहणारे मराठे (जात नव्हे), म्हणून मराठे जी बोलतात ती मराठी. त्यामुळं मराठी भाषेचा संबंध कोणत्याही विशिष्ट जाती- जमातीशी लावला तर मानव्य रहिवासी दृष्टीतून ते योग्य नाही. कोणत्याही भाषेमुळं जात अथवा जातीमुळं भाषा ओळखली जाऊ नये. (पण विशिष्ट जमातीची भाषा जमातीवरून उल्लेखली जात असेल, तर त्याला इलाज नाही. आदिवासींच्या बहुतांश भाषा जमा‍तीवरून उल्लेखित होतात. सोयीच्या परंपरेनुसार ते स्वीकारलं तरी अशा उल्लेखात हिनकस हेल नसावा.)

                    लोकांच्या वर्तनातून लोकसंस्कृती संक्रमित व प्रवाहित होते. स्थानिक परिवेशातील लोकसंस्कृतीतून भाषिक संज्ञा अस्तित्वात येत असतात. म्हणूनच कोणत्याही भाषेचा अभ्यास हा त्या भाषेतील लोकवाङ्मयाच्या अभ्यासाशिवाय अपूर्ण ठरतो. लोकवाङ्मयाच्या माध्यमातूनच स्थानिक लोकांच्या श्रद्धा, चालीरीती, रीतीरिवाज, पूजा-अर्चा, लोकपरंपरा, लोकसंस्कृती, आशा-आकांक्षा, शेती, व्यवहार, नातेसंबंध, सण-उत्सव इत्यादींवर प्रकाश पडत असतो. 

                     ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ विचारायचं नसतं’, असं आपण म्हणतो, तसं भाषेचं मूळसुद्धा विचारू नये. (कोणती भाषा कोणत्या भाषेचं अपत्य आहे वगैरे. असं वर्गीकरण हे भाषाशास्त्राच्या विरूध्द आहे.) भाषा ही केवळ भाषा असते आणि ती स्थानिक परिवेशाच्या लोकसंस्कृतीतून उगम पावलेली असते, मग ती कोणतीही भाषा असो. आपण जिचा जागतिक म्हणून उल्लेख करतो ती मूळ इंग्रजीही तिच्या स्थानिक परिवेशातूनच जन्मलेली आहे.

                      अशा सूत्रानुसार मराठीचं नव्यानं डॉक्युमेंटेशनयापुढं होत राहिलं पाहिजे. निरक्षर माणसं आज अहोरात्र मराठी भाषेतून व्यवहार करताना दिसतात. परंतु बहुतांश साक्षर माणसं फक्त घरातच, नातेवाईकांतच मराठी बोलतात की काय? मूळ मराठी भाषक असूनही बरेच लोक बाजारात, हॉटेलीत, प्रवासात, ऑफिसात, अनाहूत फोनवर, समोरचा मराठी पण अनोळखी दिसतो म्हणून, अगदी सहजतेनं मोठ्या प्रमाणात हिंदी वा इंग्रजीत संवाद- व्यवहार करताना दिसतात, हे चित्र मराठीच्या प्रभावी भवितव्यासाठी भयावह आहे. 

                      महाराष्ट्रात सरकारी कार्यालयांतून हिंदीत पत्रव्यवहारासाठी प्रोत्साहन दिलं जातं. त्यासाठी खास हिंदी विभागांची नियुक्ती झाली असल्यानं बहुतांश शासकीय- अशासकीय पत्रव्यवहार आज हिंदीतून होऊ लागला आहे. कार्यालयांतून अनेक लोक हिंदीत किंवा क्वचित इंग्रजीत बोलण्याचा- लिहिण्याचा अट्टहास करतात. म्हणून मराठीला सर्वात जास्त धोका हिंदीचा आहे. मराठीतून संवाद साधण्यात लोकांना संकोच वाटत असेल तर मातृभाषेसाठी लढा देण्याची त्यांच्याकडून अपेक्षा करणं दूरची गोष्ट आहे. हा संकोच दूर करण्यासाठीच मराठी माणसानं जागं होणं गरजेचं आहे. एकीकडं मराठी भाषेसह मराठीतील घटक बोलींचा न्यूनगंड दिसून येतो, तर दुसऱ्या बाजूला परप्रांतीय वा परदेशी भाषांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी राजकारणातले मराठी लोकच पुढं सरसावत आहेत. (हिंदी प्रांतात गेलात तर जरूर हिंदी बोलावं, पण आपापल्या प्रांतात आपली भाषा बोलायला हवी.)  

                     भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टात भाषिक स्वायत्ततेच्या संदर्भात भाष्य आलं आहे. त्या नुसार कोणत्याही भारतीय व्यक्तीला आपली मातृभाषा बोलण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. तरीही महाराष्ट्रातल्याच शाळा- महाविद्यालयांमध्ये मराठी भाषेतून शिकवण्यासाठी शिक्षकांमध्ये मनातून उत्साह नाही. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मराठी शिक्षक मराठी विद्यार्थ्यांशी हिंदीत संवाद साधतात. मुलांना आपल्या मातृभाषेपासून दूर ठेवणं म्हणजे त्यांची जीभ कापण्यासारखं आहे. स्वभाषेपासून वंचित करणं हे लोक-अधिकारांचं उल्लंघन ठरतं.

                      स्थानिक लोकसंस्कृतीच्या माध्यमातून भाषा प्रौढ होत असते. भाषिक विभागणीनुसार प्रांतीय उद्देश सफल होणार असेल तर महाराष्ट्रात मराठीचं भवितव्य कायम उज्वल असायला हवं होतं. पण तसं होताना दिसत नाही. त्यासाठी जागृत मराठी माणसानं यापुढं झोपेतही मराठी भाषिक असलं पाहिजे. महाराष्ट्रात मराठीची सक्ती करायला हवी. लोकप्रतिनिधी म्हणून मराठी लोकच निवडून द्यायला हवीत. राजकीय पक्षांनी मराठी लोकांनाच उमेदवारी द्यायला हवी. समोरचा माणूस हिंदी बोलला तरी आपण मुद्दाम मराठीतच बोलायला हवं. अशा गोष्टी कटाक्षानं पाळल्या जातील तरच मराठीला भवितव्य आहे, अन्यथा मराठी हळूहळू क्षीण होत राहणार...

                    (काव्याग्रह’, भाषा दिवाळी विशेषांक २०२५ मधील अहिराणी, एकूण बोली आणि मराठी या प्रकाशित दीर्घ लेखातील मराठीचं भवितव्य : आपली जबाबदारी हा दुसरा भाग. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/