- डॉ. सुधीर रा. देवरे
२१ फेब्रुवारी हा ‘आंतररार्ष्टीय मातृभाषा दिवस’ तर २७ फेब्रुवारी हा महाराष्ट्रातील ‘मराठी भाषा गौरव दिवस’, या निमित्ताने ‘बोलीभाषांच्या श्रीमंतीचे जतन’ हा लेख आज १ मार्च २०२६ च्या ‘दिव्य मराठी, रसिक’ पुरवणीत प्रकाशित झाला आहे :
बोलीभाषा बोलायला आपण जिथेतिथे लाजत असतो, कारण आपल्याला आपल्या भाषेचाच कमीपणा वाटत असतो. हा न्यूनगंड आधी आपण आपल्यातून काढून घराघरात- गावात- शिवारात- शहरात आपली मातृभाषा असलेली बोली आपण सर्वांनी राजरोस बोलायला हवी.
भाषा ह्या नावातच लोकसंस्कृती, सण, जत्रा, लोकपरंपरा, लोकोत्सव, विधी, विधीनाट्य, रीती, रुढी, लोकदेव- देवता, खेळ, लोकजीवन ह्या सगळ्यांचा विचार करावा लागतो. तसे पाहिले तर लोकसंस्कृतीतल्या सगळ्या घटनांतून- घटकांतूनच स्थानिक भाषांचा जन्म झालेला असतो.
पारंपरिक लोकप्रथांमधून त्या त्या भागातल्या बोलींचा उगम झालेला आहे. त्या त्या भागात दरवर्षी ज्या वेगवेगळ्या विधी आपण करतो- पाळतो त्यातूनच पारंपरिक भाषेला संजीवनी मिळते. म्हणून आजही टिकून असलेल्या बोली ह्या आर्ष भाषा- जुन्या भाषा म्हणता येतील इतक्या त्या आदिम आहेत. अमूक ही भाषा अमूक भाषाची जननी आहे, अथवा अमूक ही बोली अमूक भाषेपासून तयार झाली अशी उलटी उत्पत्ती लावणे चूक आहे, हे इथे लक्षात घेतले पाहिजे.
उदाहरणार्थ, अहिरानी बोलीत असे आजही अदमाशे दोनेकशे शब्द तरी नक्की सहज सांगता येतील, जे शब्द दुसर्या भाषेत कुठेच दिसत नाहीत. त्या शब्दांचा इतर भाषेतले धातू कोणाला माहीत नाहीत. त्यांची स्पष्ट व्युत्पत्ती लावता येत नाही. अशा खूप कारणांनी अहिरानीला आदिम भाषा म्हणता येईल, असे म्हणायला वाव आहे. पण आपण अजून तरी तशा आदिम भाषेचा दावा कोणाकडे केलेला नाही. सरकारकडे नाही की समाजाकडे नाही. एक शक्यता इथे बोलून दाखवली.
फक्त अहिरानीतच सापडतील असे काही आठवतील ते शब्द इथे मुद्दाम देत आहे : झोऱ्या, मोचडं, मेचडं, डांजनं, खरंदगड, पांचफळक, धुतरूंग, दारुदरफडा, झुलई, दडस, वरमाड, फुरका, वडगन, पोतारा, गागा, डाभुर्ल, सरमट, मट्यारं, बंग्या, साबडं, डिर, गेदू, कुटाना, गटाना, मोगरी, पिटनी, आबगा, येकलपाई, गवांदखाल, कचकाई, फिस्क, बुचकं, फिंद्रा - फिंद्री, फुई, फुवा, जीजी, मुऱ्हाळी, हू, बुचका, सुम, फसकारा, तोहमत, किलवाना, बावच्या, बऱ्हानी, बह्याळ, पट्यारा, लग्गर, हेंगाडं, खंतड, सुकाळीना, उकतं, ताम्हा, च्याहूर, वडांग, बंगळी, किलचन, आडेकडे, कवाड, बागेबागे, आग्या, कुश्टाळं, शे, सावटा, बठ्ठा, फोत्र, सोला, साक्रू, कोंडाळं, पाटोड्या, डुबुक वडा, टहाळबन, डोंगरखाल, हेटे, वऱ्हा, रावन्या, गंगूती, आवळ्या, कोली, सोळी, सांजोरी, किलचन, सानं, सरी, आवते, नाडा, पुल्हाळ, चावळनं, ढेंगडं, ढुब्ब, आंगडं, कुरधानं, मांजन्या, तमान, साबडं, भनका, चोधडी, वैरन असे खूप शब्द सांगता येतील. आणि प्रत्येक बोलीत असे आगळेवेगळे शब्दभांडार आहे.
अशा शब्दांसोबतच शब्दगोळे म्हणजे वाक्प्रचारसुध्दा अहिरानीत खूप वेगळे दिसतात : टुमनं लावनं, ल्हाव करनं, रव करनं, ल्हनं नसनं, खिजी पडनं, हाय उफस करनं, आग पाखडनं, उजारी देनं, दनकारी देनं, डाच्च करनं, दडी मारनं, पोटमा बळी येनं, खिजी पडनं, उखाळ्या पाखाळ्या काढनं, उन्हात पाडनं, रुशी बसनं, बुरची घेनं, सरमाई जानं, हात वढाखाल ऱ्हानं, पान लागनं, चिपडं पडनं, काकडा वल्हावनं, हालकी वडांग ऱ्हानं, दिवाबत्तीनी येळ, लावदुऱ्या लावनं, उफडाई उठनं असे कित्येक. आणि सगळ्याच बोलीत असे वेगळे धन सापडेल.
अहिरानीतले पारंपरिक मौखिक साहित्याची यादी सहज वाचली तरी तिचा पसारा लक्षात येतो. तो पसारा माझ्या अनेक पुस्तकांतून याआधी आला आहे.
असे सगळे शब्द, वाक्प्रचार, म्हणी, उखाणे, आण्हे, लोकगीते, लोककथा, लोकनृत्य, त्या त्या लोकबोलीतले कीर्तन, गोंधळ, वही असे पुष्कळ वेचून जपून ठेवावे लागेल, आवरुन ठेवावे लागेल, जतन करावे लागेल. याच्या पुढे अजून कोणता काळ कसा येईल कोणाला सांगता येईल? आणि हे भाषेचे धन एकदा बुडालं ना, आणखी जसेच्यातसे बाहेर जिवंत काढता येणार नाही. चाळीस- पन्नास वर्षांपूर्वी जे शब्द सहज जीभेवर यायचे, ते आज सहजासहजी येत नाहीत, तर कल्पना करा, हजार- पंधराशे वर्षांपूर्वीच्या शब्दांचे काय झाले असेल? आपापल्या बोलीभाषेतले असे असंख्य शब्द हरवले असतील. म्हणून आतातरी जागे होऊ. आज जे हयात आहेत ते शब्द याच्यापुढे जिवंत ठेवायचे असतील, तर आजचे हयात धन आपल्याला जतन (डाक्युमेंटेशन) करावे लागेल, तरच आताच्या सर्वच बोलीभाषा पुढच्या पिढीला जिवंत दिसतील.
यापुढे (एकाच भाषा पट्ट्यातली) इथली भाषा वेगळी आणि तिथली निराळी असा भेद भाषेत करायचा नाही. कोणतीही बोली कुठेही बोलली जात असेल तरी ती जतन केली पाहिजे. एकाच भाषेत थोडाबहुत भेदभाव होतो, तो करु नका. म्हणजे इथली भाषा अस्सल आणि तिथली भाषा नक्कल, असे खाजगीतही बोलू नका. तेव्हा बोलीभाषा टिकतील. जगातल्या कोणत्याही भाषेला कमी समजू नका. आपल्या व्यक्तीगत हौसमौजसाठी भाषेचे हलके राजकारण करू नका. केवळ प्रसिध्दीसाठीच्या राजकारणामुळे बहुतेक आपले स्वत:चे भले होईल, पण बोलीभाषांचे भले होणार नाही. भाषांचे इतके नुकसान होईल की ते कधीही भरुन निघणार नाही.
भाषेचा विचार करताना त्याच्या केंद्रस्थानी माणूस आहे, हे प्रथम लक्षात घ्या. माणूस माणसासोबत जोडत गेले की समाज तयार होतो. आणि हा समाज जोडण्यासाठी भाषेची गरज लागते. हे सर्व नीट लक्षात घेऊन आपण सर्व लोक एकमेकांशी जोडू. असे इथूनतिथून सर्व लोक जोडले गेले की मग भाषाही तग धरून उभी राहील. हे फक्त एखाददुसरी प्रमाणभाषेला लागू नाही. तसेच हे फक्त एखाद्या बोलीला लागू नाही. हे एकूणएक भाषेसाठी आपण बोलत आहोत. मग ती भाषा आजच्या मराठीसारखी प्रमाणभाषा असो, अथवा जगातील कोणतीही आपल्याला बोलता न येणार्या भाषा असोत...
(‘दिव्य मराठी, रसिक’, पुरवणी १ मार्च २०२६ मधील प्रकाशित लेख. इतरत्र प्रकाशित करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर राजाराम देवरे
ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा