शुक्रवार, १५ फेब्रुवारी, २०१९

भाषा जपण्यासाठीचे प्रयत्न




-    डॉ. सुधीर रा. देवरे

      उत्तर महाराष्ट्रात- खानदेशात आणि आसपासच्या परिसरात अहिराणी बोलीभाषा बोलली जाते. अहिराणी भाषेचा इतिहास इसवी सनाच्या दुसर्‍या तिसर्‍या शतकापासून दिसून येतो. तरीही अहिराणी भाषेला स्वतंत्र लिपी नाही. कारण जगातल्या अनेक भाषा आपल्या आसपास अस्तित्वात असलेल्या लिपीचा आधार घेत आविष्कृत होत राहतात. आणि ज्या भाषा मौखिक असतात त्या प्राचीन असूनही लिपीचा अट्टहास धरत नाहीत. म्हणून काही शिलालेखात, ताम्रपटात वा लिखित काव्यात अहिराणी दिसून येत असली तरी ती स्वतंत्र लिपीत नाही. अहिराणीने देवनागरी लिपी स्वीकारली आहे. अहिराणी ही मूळ अभिर लोकांची भाषा. अहिराणी ही विशिष्ट जाती- जमातीची भाषा नसून मोठ्या क्षेत्रफळात बोलली जाणारी लोकभाषा आहे.
      200 मैल लांबी आणि 160 मैल रूंद इतक्या मोठ्या क्षेत्रफळात अहिराणीची व्याप्ती सामावलेली आहे. या पट्ट्यात जवळ जवळ एक कोटी लोक अहिराणी भाषिक आहेत. नाशिक जिल्ह्यातील उत्तर-पूर्व अर्धा भाग, जळगाव जिल्ह्यातील पश्चिम अर्धा भाग, धुळे आणि नंदुरबार अशा एकूण चार जिल्ह्यात अहिराणी बोलली जाते. परंपरेनुसार धुळ्याचा परिसर हा अहिराणीचा केंद्रवर्ती भाग समजला जातो. 
      ग्रामीण भागात अहिराणीचा व्यावहारिक वापर आजही मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. घरात, नातेवाईकांत, शेजारीपाजारी, गल्लीत, गावात, दुकानात, बाजारात, जत्रात, बसस्थानकात, प्रवासात, दैनंदिन व्यवहारात, शाळेत- महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी आपसात, शेतात, ग्रामसभेत, सार्वजनिक ठिकाणी अहिराणी बोलली जाते. लिखाणात मात्र मराठी भाषा वापरली जाते.
      गावागावात राहणारा या परिसरातला कोणताही समुह अहिराणी भाषेत व्यवहार करतो. आपल्या जवळच्या नातेवाईकांत अहिराणी भाषेत बोलल्याशिवाय प्रेम व्यक्‍त होत नाही. आपल्या माणसाशी आपल्याच भाषेत बोललं पाहिजे आणि ती भाषा त्या त्या वेळी जिभेवर आपोआप येत असते. बोलणारा कोणीही असो, कोणत्याही जाती- जमातीचा, धर्माचा असो, या परिसरात सर्वत्र अहिराणी भाषा बोलली जाते. गावातले बारा बलुतेदार असोत की परंपरेने प्रतिष्ठित वगैरे समजले जाणारे लोक असोत, शेतकरी असोत वा शेतमजूर. प्रत्येक जण संवादासाठी अहिराणी भाषा बोलतो. अहिराणी ही लोकभाषा आहे. विशिष्ट जातीय भाषा नव्हे.
       अहिराणी भाषेत पारंपरिक मौखिक आणि अलीकडे व्यक्‍त होणारे लिखित असे बरेच साहित्य उपलब्ध आहे. वर्गीकरण करता येणार नाही इतके लोकसाहित्य अहिराणी भाषेत पहायला मिळते. अहिराणी बोलणारे लोकांचे क्षेत्रफळ प्रचंड मोठे असल्याने भाषेत विविध परिवेशात स्थानिक शब्द, उच्चार, हेल बदलतात. आणि हे बदल लोकसाहित्यातून टहाळबन लक्षात येतात. श्रीचक्रधर स्वामी, संत ज्ञानदेव, जयराम पिंडे, मोरीरना भाट, जैन कवी निंबा, कमलनयन आदी पूर्वसूरींनी अहिराणी भाषा आपल्या साहित्यातून- गद्या-पद्यातून उपयोजित करत समृध्द केली आहे.
      अहिराणीतील अलीकडील साहित्यिक वा अहिराणी उपयोजित करणारे लोकही दिवसेंदिवस वाढताना दिसतात, ही अहिराणीसाठी सुखद बाब आहे. समाधान मानता येईल इतके साहित्य अहिराणीत उपयोजित होत असून आज अनेक नवोदित लेखक अहिराणीत लिहिते झाले आहेत.
      अहिराणी भाषेचं सध्याचं अस्तित्व जाणवण्याइतकं आख्ख्या महाराष्ट्रात उठून दिसतं. आज या चारही जिल्ह्यात शहरीकरण वाढत असून अहिराणीचा र्‍हास होताना दिसतो. ग्रामीण भागात शेतकरी व अन्य लोक अहिराणीतच आपला दैनंदिन व्यवहार करतात. शिक्षणाचा वारा लागलेल्या काही लोकांना अहिराणी बोलायचा कमीपणा वाटायला लागला. आपण ग्रामीण भाषा बोलत नसून मराठी, हिंदी व इंग्रजीतून व्यवहार करतो असे मुद्दाम दाखवण्याचा प्रयत्न होताना दिसतो. भाषेच्या तथाकथित न्यूनगंडामुळे अहिराणीचे प्रचंड नुकसान होत आहे.
      अहिराणी भाषा वृंध्दीगत करण्यासाठी व भाषा जपण्यासाठीचे प्रयत्न या परिसरात सातत्याने सुरू आहेत. राष्ट्रीय पातळीवर गंभीर प्रकृतीचं अहिराणी ‘ढोल’ नियतकालिक 1998 ला सुरू झालं. या नियतकालिकामुळे अहिराणीच्या संवर्धनासाठी सर्वत्र उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. परिसरातील अनेक लोक अहिराणी भाषेचा अभ्यास करू लागले. स्थानिक वृत्तपत्रे व काही नियतकालिकातून अहिराणी सदरं- साहित्य आता प्रकाशित होऊ लागलं. ‘गावशिवार’ नावाचं हलकं फुलकं का होईना मध्यंतरी एका नियतकालिकातून नवोदित लेखक- कवींना अहिराणीत लिहिण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न झाला.  
      केवळ अहिराणीच नव्हे तर सर्वच बोलीभाषा जपण्याबाबत काही पर्याय शोधले पाहिजेत. त्यापैकी काही पर्याय सांगता येतील : बोलीभाषा बोलणे गावंढळपणाचे लक्षण आहे, हा लोकांच्या मनातला न्यूनगंड काढणे हे पहिले काम. गावात- ग्रामीण भागात गेल्यावर कोणीही (मूळ इथल्या) सुशिक्षिताने- अभ्यासकाने लोकांशी मुद्दाम त्या बोलीभाषेत बोललं पाहिजे. म्हणजे समोरचा ग्रामीण माणूस मोडक्या तोडक्या प्रमाणभाषेत बोलण्याचं टाळून आपल्या नैसर्गिक बोलीत बोलू लागेल. (अर्थात आपली बोली उपयोजित करत जो कोणी प्रमाणभाषेत बोलण्याचा प्रयत्न करत असेल त्या भाषेचंही स्वागत आहेच.) आईवडिलांनी आपल्या मुलांना आपल्या बोलीभाषेच्या सौष्ठवाबद्दल गौरवाने सांगायला हवं. म्हणजे लहान मुलांच्या मनात भाषेबद्दल गैरसमज होणार नाहीत. शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्याला बोलीभाषेबद्दल विशेष माहिती सांगावी. मुलं घरी जी बोली बोलतात तो शाळेत चेष्टेचा विषय न होता खेळीमेळीच्या वातावरणात बोली आणि प्रमाण मराठी सहज बोलता येईल अशी परिस्थिती शिक्षकांनी निर्माण करावी. शाळेत भाषा शिकवताना पर्यायी शब्द देताना स्थानिक बोलीतले शब्दही मुद्दाम सांगावेत. उदाहरणार्थ, पेरूबद्दल शाळेत काही‍ शिकवायचं झालं तर शिक्षकाने विद्यार्थ्यांना सहज सांगितलं पाहिजे, की पेरू म्हणजे आपण अहिराणीत ज्याला जाम म्हणतो ते फळ. (अहिराणीसहीत अनेक बोलीभाषेत पेरूला जाम म्हणतात.) साहित्य संमेलनाच्या नावाखाली भाषेचे हिडीस उत्सव साजरे न करता ग्रामीण लोकांना (म्हणजे ग्रामीण स्त्रियांनाही) सहभागी करत त्यांचं लोकसाहित्य- मौखिक साहित्य ऐकायला जमावं. जे लोक नेहमी व्यासपीठावर असतात (भाषणं करतात) त्यांनी श्रोते व्हावं आणि लोकसाहित्य सांगणारे ग्रामीण लोक व्यासपीठावर असायला हवेत, तेव्हा भाषेचं संवर्धन होईल.  
      भाषा जपण्यासाठी अशा सगळ्या पर्यायांचा जसजसा उपयोग केला जाईल तसतश्या बोलीभाषा दिवसेंदिवस लयाला न जाता लोकांच्या भावनात (मूळ शब्द ‘भावन’) जपल्या जातील. नैसर्गिक बोली त्यातील विशिष्ट नजाकतीचे शब्द भाषेत टिकून राहिले तर प्रमाणभाषा मराठीही दिवसेंदिवस समृध्द होत राहील.
     (‘मराठी संशोधन पत्रिका’ जाने-फेब्रु-मार्च 2019 च्या अंकात प्रकाशित झालेल्या लेखाचा संपादित अंश. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  – डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

गुरुवार, ३१ जानेवारी, २०१९

एका चंद्रभासासाठी : एक आस्वाद




- डॉ. सुधीर रा. देवरे
एका चंद्रभासासाठी        

माझ्या मातीला केव्हाची निळी लागली तहान
एका चंद्रभासासाठी उभे आयुष्य गहाण
तसे रक्‍तमांसातून किती शब्द उगवले
त्यांचे तान्हेपण सुध्दा रूप- गुण ल्याले
त्यांचे जावळ हुंगले, जिणे गेले नाही व्यर्थ
आता आईपणासह बाईपणाही कृतार्थ
तशी नव्हते कृतार्थ आताआताशा कळते
जेव्हा काळजाच्या तळी निळी तहान रडते
आता एकदाच फक्‍त गाणी उराशी धरून
हाक अज्ञात भासांना देते प्राणांच्या आडून
आणि सांगते मनाला, ‘बाई असेच असते
पोर वाढावे म्हणून नाळ तोडावी लागते’
आता व्हायचीच माझी गाणी माझ्यातून दूर
त्यांना वाढता वाढता मिळो गगनबहर
त्यांनी स्वतंत्र वाढावे माझ्यापार मोठे व्हावे
देहभावाच्या पल्याड त्यांनी असीम झेलावे
माझा चंद्रभास व्हावा त्यांच्या भाळावर टिळा
तरी बाईपणासाठी, त्यांचा भरू यावा गळा
             
- अरूणा ढेरे
             (कविता-रती, दिवाळी 1987)

    ‘एका चंद्रभासासाठी’ ही कविता कविता-रती दिवाळी 1987 च्या अंकात प्रकाशित झाली होती. ही कविता त्यावेळी किमान दहा बारा वेळा तरी वाचली असेल. कविता इतकी भावली की ती माझ्याकडून आस्वादच मागू लागली. तिच्या आस्वादाची मला निळी तहानच लागली होती, असे म्हटले तरी चालेल.
    कवितेचा आस्वाद वैय‍क्‍तीक कल्पनेतून केलेला असला तरी प्रस्तुत अभ्यासकाने कवितेतील शब्दार्थांचे अनुसरण करतच अर्थ उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात कवितेचा अर्थ उलगडवण्यापेक्षा कवितेच्या ओळीओळीत अगदी सरळ अर्थ उलगडत जाईल अशी कवयित्रीचीच सहज सोपी शब्दयोजना आहे.
    या आस्वादात कवयित्रीपासून कवितेची नाळ तोडून तिच्याकडे एक स्वतंत्र निर्मिती म्हणून मी पहात आहे.
माझ्या मातीला केव्हाची निळी अदृष्ट तहान
एका चंद्रभासासाठी उभे आयुष्य गहाण
    या ओळी वाचून त्यांचा स्वतंत्रपणे अर्थ लावता येईल असे धागे सापडत नाहीत. म्हणून ‘मी’ हा अजून तो आहे की ती हे स्पष्ट व्हायचे आहे. या मी चा मातीला म्हणजेच त्याच्या नैसर्गिक प्रेरणेला- ऊर्जेला कशाची ‘निळी अदृष्ट तहान’ लागलेली आहे तेही अजून पुढील ओळींत स्पष्ट व्हायचे आहे. आणि ज्यासाठी उभे आयुष्य गहाण ठेवावे असा ‘चंद्रभास’ नक्की कशाचे प्रतीक आहे तेही अजून ठळकपणे दृगोचर होत नाही.
तसे रक्‍तमांसातून किती शब्द उगवले
त्यांचे तान्हेपण सुध्दा रूप- गुण ल्याले
    सुरूवातीच्या दोन ओळीतले काही अर्थ इथे उलगडतात. हा मी शब्दांशी खेळणारा प्रतिभावंत असला पाहिजे. आणि या शब्दांच्या कलाकृतीतल्या तान्हेपणात या मी ने माणसाच्या तान्हुल्याचे रूप गुण पाहिले आहेत.
त्यांचे जावळ हुंगले, जिणे गेले नाही व्यर्थ
आता आईपणासह बाईपणाही कृतार्थ
    आतापर्यंतच्या सर्व शब्दांर्थांचे आणि प्र‍तीकांचे अर्थ इथे कवितेतच उलगडले आहेत. हा मी म्हणजे एक स्त्री आहे, हे पहिल्यांदा इथे कळते. आणि तिची अदृष्ट निळी तहान एका अपत्यासाठी- एका चंद्रभासासाठी आहे. पण ती आपले उभे आयुष्य शब्दांशी खेळण्यात घालवत आहे. शब्दांतून प्रातिभ निर्मिती करीत आहे. आणि त्या निर्मितीलाच आपले अपत्य मानीत आहे. त्या निर्मितीलाच ती अपत्यासारखी आंजारत गोंजारत आहे. जशा एखाद्या आईने आपल्या अपत्याचे ओले जावळ हुंगावे. आपण शब्दातून निर्मिती करीत असताना आईपणाच्या गर्भवेदना सहन केलेल्या आहेत आणि आदिम परंपरेचा बाईपणाही जपला आहे. आपण कृतार्थ झालो आहोत, असे या कवितागत स्त्री ला वाटते,
    इथे तिच्या विचारांचा पहिला आघात संपतो आणि तिचं मन आता कोलांटी उडी घेतं.
तशी नव्हते कृतार्थ आताआताशा कळते
जेव्हा काळजाच्या तळी निळी तहान रडते
    पहिल्या आघातात, आपण गाण्यांनी का होईना पण गर्भधारणेच्या वेदना आणि आईपणाच्या संवेदना अनुभवतो असे ही स्त्री म्हणत असली तरी, मी तशी कृतार्थ नाही असे आता तिला वाटू लागते. तिच्यातील आदिम स्त्री जागी होताच तिच्या नैसर्गिक प्रेरणेची निळी तहान काळजाच्या तळी म्हणजे स्त्री च्या अनुबंधात रडू लागते.
आता एकदाच फक्‍त गाणी उराशी धरून
हाक अज्ञात भासांना देते प्राणांच्या आडून
    या नैसर्गिक प्रेरणेला ती वास्तवात शरण जाऊ शकत नसली तरी दिवास्वप्नांना ती आता हाका मारू लागली आहे. तिची नैसर्गिक प्रेरणा तिच्या धेयासक्‍तीपेक्षा वरचढ ठरू लागल्याचा तिला प्रत्यय येऊ लागला. या दिवास्वप्नांची पुर्तता वास्तवात करता येत नाही म्हणून आता ती गाणी उराशी कवटाळते. म्हणजे त्या गाण्यांतूनच आपल्या भासांना साद घालते. हाक मारते. तिच्या शरीराच्या संवेदना ती आपल्या गाण्यातून टिपते. आविष्कृत करते. निळ्या तहानेला कुरवाळते. थोपटते. आणि वेसनही घालण्याचा प्रयत्न करते.
आणि सांगते मनाला, ‘बाई असेच असते
पोर वाढावे म्हणून नाळ तोडावी लागते'
    अशा प्रयत्नातूनच ती मनाला बजावते, हे असेच असते मना, जर तुला कलावंत व्हायचे असेल. जर तुझे पोर म्हणजे तुझे गाणे असेच वाढवायचे असेल, त्यांना कलाकृतीचा थोरपणा मिळवून द्यायचा असेल तर तुझ्या बाईपणापासून तुझी नाळ तोडावी लागेल, तरच तुझे ध्येय सफल होईल. इथे पोराची नाळ अभिप्रेत नसावी, तर कलावंताची लौकीक जीवनापासून दूर ठेवण्याची ही नाळ आहे.
    इथे या कलावंत स्त्रीच्या विचारांचा दुसरा आघात संपतो. आणि तिसरा आघात सुरू होतो.
आता व्हायचीच माझी गाणी माझ्यातून दूर
त्यांना वाढता वाढता मिळो गगनबहर
    माझी गाणी माझी नाळ तोडून- माझ्या सीमा पार करून मोठी व्हावीत. त्यांचा लौकीक आकाशापर्यंत वाढावा. पण मी यात कुठेही असू नये असे आता या कलावंताला वाटते. मी सुध्दा या गाण्यांकडे इतरांसारखे तटस्थतेने पाहू शकेल असे बळ मला मिळावे. असे पसायदानच या तिसर्‍या भागात सुरू होते.
त्यांनी स्वतंत्र वाढावे माझ्यापार मोठे व्हावे
देहभावाच्या पल्याड त्यांनी असीम झेलावे
    माझ्या गाण्यांनी माझ्या कुबड्या टाकून द्याव्यात. स्वतंत्रपणे वाढावे. देहभावाच्या वेदना, संवेदना त्यांना माझ्यासारख्या भेडसावू नयेत. (म्हणूनच मी शब्दांची अपत्य जन्माला घातलीत.)
माझा चंद्रभास व्हावा त्यांच्या भाळावर टिळा
तरी बाईपणासाठी, त्यांचा भरू यावा गळा
    माझा चंद्रभास जो मला ग्रासतो आहे. तो चंद्रभास म्हणजे माझी गाणीच आहेत. म्हणून त्यांच्या भाळावर माझा सदैव टिळा राहणार असेल तर मी चंद्रभासासाठी वांझ आहे असे कोणी कसे म्हणू शकेल? मात्र तरीही त्यांनी आई होण्याचा बाईपणाच सोडून द्यावा असे मात्र नाही. तर त्यासाठी त्यांचा नेहमीच गळा भरून यायला हवा. तरच त्यांना माझा टिळा  मिरवण्याचा अधिकार. बाईपणासाठी जर कोणाचा गळाच भरून येणार नसेल तर त्याच अनुभूतीतून जन्मलेले माझे गाणे थोर तरी कसे होईल? असे पसायदान शेवटच्या आघातात ही कलावंत स्त्री मागू लागते.
    सहा सहा ओळींच्या तीन तीन संघातांनी कलावंताच्या लौकीक व अलौकीक भावनांचे नाट्यचित्रण करून ही कविता इथे संपते.
    (‘शब्दमल्हार’ जानेवारी 2019 च्या अरूणा ढेरे विशेषांकात प्रकाशित. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  – डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/