शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१८

भारतातील भाषासमृध्दी




-    डॉ. सुधीर रा. देवरे

     2011 च्या जनगणनेच्या अहवालानुसार भाषिक आकडेवारी तब्बल सात वर्षांनी म्हणजे आत्ताच जून 2018 च्या शेवटी प्रकाशित करण्यात आली.
     भारतात एकूण बोलल्या जाणार्‍या भाषा 19,569 असल्याचं उघड झालं. (आताचे भाषाशास्त्र बोली आणि भाषा असा फरक करत नाही. जी बोली बोलली जाते ती भाषाच असते.) भारतात इतक्या भाषा बोलल्या जातात ही इतर देशांच्या तुलनेने डोळे दिपावणारीच बाब आहे. (अनेक लहान भाषा दिवसागणिक नामशेष होताहेत या पार्श्वभूमीवर ही एक चांगली बातमी. यात आतापर्यंत मेल्या त्या भाषा किती, याच्या नोंदी नाहीत.) या आधी जास्तीतजास्त 18000 आणि कमीतकमी 15000 भाषा भारतात बोलल्या जातात, असं स्थूलपणे समजलं जात होतं. पण या जनगणनेतून बोलल्या जाणार्‍या भाषांचा नक्की आकडा उपलब्‍ध झाला. (खरं तर नक्की असं म्हणता येणार नाही. पण जवळपास असं नक्की‍च.) 
     ज्या भाषांचे दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त बोलणारे भाषक असतील त्यांचीच भाषिक माहिती देण्याची प्रथा 1971 च्या जनगणनेपासून सुरू झाली. म्हणून दहा हजाराहून अधिक लोक एकच बोली बोलणारे आढळलीत, अशा भाषांची संख्या आज 121 इतकी आहे. (दहा हजारांपेक्षा जास्त लोक एका विशिष्ट मातृभाषेचे आहेत अशा 121 मातृभाषा आढळल्या. तरीही देशात 121 पैकी फक्‍त 22 भाषा अधिकृत समजल्या जातात.) देशात एखादी भाषा दहा हजारांपेक्षा जास्त लोक बोलत असतील तरच ती भाषासूचीमध्ये समाविष्ट होण्याची अट आहे. आतापर्यंत भाषासूचीत अशा फक्‍त 22 भाषा समाविष्ट करण्यात आल्या. आज भाषासूचीमध्ये समाविष्ट नसलेल्या भाषा 99 इतक्या आहेत. (22 + 99 = 121.) म्हणजे भाषा सूचीमध्ये आजच समाविष्ट होऊ शकतात अशा 99 भाषा सापडल्या. त्या लवकरात लवकर भाषासूचीच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट व्हायला हव्यात.)
     भाषासूचीतील भाषा अवगत असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण 96.71 टक्के आहे. म्हणजे 96.71 टक्के लोक भाषासूचीतील सर्व भाषा जाणतात असं मात्र नाही. भाषा सूचीतील 22 भाषांपैकी केवळ एकेक भाषा 96.71 टक्के लोक बोलतात,  लिहितात वा तिच्यात व्यवहार करतात. भारतातील 96.71 टक्के लोक 22 पैकी एकाच भाषेची‍ निवड करतात. त्यांना 22 पैकी एकच भाषा बोलता- लिहिता येते. 22 पैकी त्यांची एकचएक मातृभाषा असून त्या त्या भाषेत बोलल्या जाणार्‍या लोकसंख्येचे प्रमाण कमी जास्त असेल, पण ते दहा हजार पेक्षा जास्त असेल.
     3.29 टक्के लोक भाषासूचीतील 22 भाषांपैकी एकही भाषा बोलत नाहीत. भाषासूचीतील भाषा देशातील अनेक लोकांना माहीत नाहीत. म्हणजे भारतातील सुमारे 4 कोटी (काटेकोर लोकांची संख्या सांगायची झाली तर 39,809,000/-) लोक भाषासूचीत समाविष्ट 22 भाषांपेक्षा वेगळ्या भाषा बोलतात. त्यात दहा हजारांपेक्षा जास्त लोक ज्या मातृभाषा बोलतात, त्या 99 भाषांचाही समावेश आहे. (एकूण 990,000 पेक्षा जास्त लोक या 99 भाषांमध्ये दैनंदिन व्यवहार करतात अथवा बोलतात- लिहितात.)
     भाषासूचीमध्ये समाविष्ट असलेल्या 22 भाषा अशा आहेत: आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलगु, उर्दू, बोडो, संथाली, मैथिली आणि डोग्री. या बावीस भाषा आपल्या देशाच्या राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहेत.
     भारताची लोकसंख्या 121 कोटी आहे. एकशे एकवीस कोटी लोक 19,569 भाषा बोलतात हे आताच्या खानेसुमारीतून दिसून आले. 19,569 मधून 1369 तर्काधिष्ठित मातृभाषा मिळाल्या. तर्काधिष्ठित मातृभाषा म्हणजे ज्या भाषा ओळखू येऊ शकतात त्या नक्की करणे म्हणजे तर्काधिष्ठित.  
     1,474 बोलींचा समावेश अवर्गिकृत गटात करून भाषिक यादीतून ती नावे वगळण्यात आली. अवर्गिकृत म्हणजे ज्या भाषांची नावे ओळखू येत नाहीत, ज्या भाषेला विशिष्ट असे नाव नाही, प्रदेश नाही अथवा काही भटक्या लोकांच्या भाषा अशा अवर्गिकृत अथवा अन्य गटात टाकण्यात येतात. वगळण्यात आलेल्या भाषा बोलणार्‍यांची लोकसंख्या जवळपास साठ लाख इतकी आहे. साठ लाख लोकांच्या बोलण्याला आपण (म्हणजे शासन) काहीही‍ किंमत देत नाही, असा याचा सरळ अर्थ होतो.
     या उलट हिंदीसदृश्य भाषा बोलणार्‍या लोकांची लोकसंख्या सरसकट हिंदी भाषिक म्हणून समाविष्ट केली जाते. (उदा. राजस्थानातील अनेक बोली, भोजपुरी, मेवाडी आदी.) तसेच महाराष्ट्रात राहणार्‍या पण एखादी बोली (जशी की अहिराणी) बोलणार्‍या लोकांची भाषा सुध्दा मराठी दाखवण्याची करामत जनगणना टीम करू शकते. या जनगणनेत मराठी भाषकांची संख्या 83,026,680 एवढी दाखवण्यात आली आहे. (म्हणून भारतात मराठी भाषा बोलणार्‍या लोकांची संख्या तिसर्‍या क्रमांकावर दाखवण्यात आली. आतापर्यंत ती चौथ्या क्रंमाकावर होती.) या सर्व भाषिक संख्या जनगणनेच्या माध्यमातून आल्या. मात्र त्या काटेकोर असण्याची शक्यता कमी आहे. कारण ही गणना जे कर्मचारी करतात ते हात तटस्थ वा भाषिक प्रेमळ असतीलच असं नाही. या भाषिक जनगणनेतून देशातील भाषिक पट काही प्रमाणात स्पष्ट होत जातो. हा भाषासमृध्दीचा दस्ताऐवज हाती आल्यानंतर या सर्व भाषांच्या संवर्धनासाठी वा व्यवस्थापनासाठी शासकीय पातळीवर उदासिनता दिसून येते, हे अनास्थेचं चित्र जास्त विदारक आहे.
          (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१८

‘स्त्री – पुरूष संबंधांची गीता’

-    डॉ. सुधीर रा. देवरे
 
     भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास हे पुस्तक वाचल्याने कोणाचाही तथाकथित वंशाभिमान समूळ डळमळल्याशिवाय राहणार नाही. या विषयावरची इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांची टिपणे 1923 साली पुण्याच्या चित्रमयजगत नियतकालिकात छापली गेली. टिपणांच्या आधाराने त्यांचे या विषयावरील विस्तृत निबंध संशोधन मासिकात 1925 साली छापायला सुरूवात झाली. पुढे एका पुस्तकाच्या संदर्भान्वये कॉ. एस. ए. डांगे यांनी सुचवल्यामुळे हे पुस्तक 31 डिसेंबर 1976 ला डांगे यांच्या दीर्घ, विस्तृत, चिंतनशील आणि विवेचक प्रस्तावनेसह पुण्याच्या प्रागतिक पुस्तक प्रकाशनाने (नंतर लोकवाड्‍.मय गृहाने) प्रकाशित केले. मात्र हा ग्रंथ परिपूर्ण नाही आणि अपूर्णही नाही. राजवाडे यांनी या विषयावर लिहिलेले अजून काही मौलिक निबंध होते, परंतु ते उपलब्‍ध न झाल्याने या पुस्तकात समाविष्ट होऊ शकले नाहीत. आणि पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर ते अजूनही सापडले नाहीत.
     निबंध लिहिण्यासाठी राजवाडे यांनी काढलेली प्राथमिक टिपणे, स्त्री- पुरूष समागम संबंधातील कित्येक अतिप्राचीन चाली, स्त्रियांचे वंशप्रवर्तकत्व व प्रजापतिसंस्था, आतिथ्याची एक आर्ष चाल, अग्नि व यज्ञ, लग्नसंस्था : एक टिपण, विकार- विचार प्रदर्शनाच्या साधनांची उत्कांती आदी विषयांच्या निबंधात वैचारिक मंथन करून साधार असे योग्य ते निष्कर्ष वाचकांसमोर ठेवले आहेत. राजवाड्यांनी इतरत्रही इतिहासशास्त्र, भाषाशास्त्र, साहित्यशास्त्र, समाजशास्त्र आदीत अष्टपैलू क्रांतीकारी संशोधन केले आहे.
     आर्ष कालीन शरीर- संबंधांची मांडणी वेदसंहिता व महाभारतातील पुराव्यांवर आधारलेली आहे. अनिर्बंध शरीर संबंधांची कालांतराने पुढे प्रगती होत त्याची परिणती विवाह संस्थेत झाली, हा या ग्रंथाचा मुख्य विषय आहे. वर्ण आणि जाती- संस्था आर्यांनी का, कशा आणि कधी निर्माण केल्या असाव्यात याचे चिंतनही ग्रंथात येते, ते मुळातून वाचले पाहिजे.
     श्वेतकेतूने परपुरूषसंग निषिध्द ठरवत परस्त्रीसंग त्याग करावा असा  उठाव केला होता. यावरून विवाहमर्यादा ही प्राचीन प्रथा नाही, ती एक कृत्रिम आणि अलीकडील समाजमान्य व्यवस्था असल्याचे राजवाडे यांनी साधार दाखवून देण्याचे धाडस विसाव्या शतकाच्या सुरूवातीला केले. म्हणून भारतीय विवाह संस्थेचा स्थापक हा श्वेतकेतू ठरतो. यावरून तात्कालिक समाजाच्या जीवन- जाणिवा आजच्या काळातील जीवन जाणिवांपेक्षा पूर्णपणे विरूध्द होत्या हे अधो‍रेखित होते. आजच्या काळात कोणी एका स्त्रीने वा पुरूषाने असे वागणे म्हणजे शुध्द व्यभिचार ठरेल. 
     सरमिसळ समागम, अतिथीला स्वस्त्रीसमर्पण, पशूसमागम, गुरूपत्नीगमन, बहुपतित्व, अल्पकालीन वा अटींचे विवाह अतिप्राचीन काळात होते. दासी वा स्त्री इतरांना भेट दिली जायची. यज्ञाच्या आजूबाजूला बसून उघड्यावर यभनक्रिया केली जात होती. यज्‍न्‍ हे वाक्य होते. त्याचा अर्थ ते जमतात व यभनक्रिया करतात, असा होतो. कालांतराने यज्ञ हे नाम झाले आणि त्याचा अर्थ बदलला. पवित्र झाला.
     राजवाड्यांनी धार्मिक ग्रंथातील पुराव्यांसह लिहिलेल्या या संशोधनातील अवतरणे आज एकविसाव्या शतकात सुध्दा जसेच्या तसे उदृत करायची हिम्मत होत नाही. राजवाड्यांनी 1923 च्या आसपास हे सर्व निर्भिडपणे कसे मांडले असेल याचे आश्चर्य वाटते. या पुस्तकातले पहिले प्रकरण चित्रमयजगत मध्ये प्रकाशित होताच वाचकांत भयंकर वादळ उठले. पुढचे भाग छापाल तर छापखाना जाळून टाकू, अशी संपादकाला धमकी मिळाली होती.
     वेद आणि महाभारतातील संदर्भ देताना राजवाडे अरब, पर्शियन, टाहीटियन असे जागतिक संदर्भही सहज सांगून जातात. ग्रीक, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, पॉलिनेशिया, मोंगोलिया, युरोप आणि इतर बहुतेक सर्व देशांत- खंडात परपुरूषाला आपली स्त्री अर्पण करण्याची प्रथा होती. म्हणजे थोड्याफार फरकाने ही परिस्थिती जगात सर्वत्र होती आणि या संबंधां‍विरूध्दचे उत्थापन पायरी पायरीने होऊन आज जगात विवाह संस्था स्थिर झाली, असा निष्कर्ष निघतो. म्हणून हे पुस्तक जागतिक विवाह संस्थेचा इतिहास ठरतो. 
     आर्षसमाजात (अतिप्राचीन काली) आई, भाऊ, बहिण, बाप, मुलगी, पुतणी, मावशी, चुलता, चुलती, मामा, मामी, आत्या, चुलत बहिण इत्यादी बहुविध नाती नव्हती. मात्र आईसाठी जनि ही संज्ञा अस्तित्वात होती. जनि म्हणजे जन्म देणारी. प्राचीनकाळी अपत्यांची आई निश्चित असे. म्हणूनच मुलगा आईच्या नावावरून ओळखला जायचा. बापाच्या नव्हे. उदा. राधेय: कौंतेय:, कार्तिकेय:, दानव:, कालेया: आदी. शरीर संबंधात जसजशी उत्तरोत्तर समज येत गेली असावी तेव्हा विवाह होऊ लागल्यानंतर बाकीची नाती पायरीपायरीने निर्माण झाली असावीत.
     याच काळात स्त्रियांवर पुरूषांची सत्ता पक्की झाली. स्त्रियांचे स्वातंत्र्य टप्याटप्याने हिरावून घेतले गेले. अनेक स्त्रिया कोणाच्या तरी मालकीच्या असत. पुढे महिला पुरूषांच्या गुलाम झाल्या. विवाहाने प्राप्त झालेल्या तर काही गुलाम- दासी म्हणून पुरूषाच्या सानिध्यात राहू लागल्या असाव्यात. स्त्रियांपासून होणार्‍या अपत्यांतही वर्गवारी होऊ लागली. योनिज प्रजा आणि अयोनिज प्रजा असे ते वर्गीकरण होते. योनि म्हणजे गृह. योनिज म्हणजे घरात जन्मलेले मूल व ‍अयोनिज म्हणजे घरात न जन्मलेले, घराबाहेर जन्मलेले वा यज्ञमंडपात जन्मलेले मूल. यज्ञात ऋ‍त्विजांकडून प्रजोत्पादन झालेली मुले म्हणजे अयोनिज प्रजा. पुढे आपल्या शारीर आनंदासाठी नियोग, घटकंचुकी अशा गोष्टी चतुर पुरूषांनी शोधून काढल्या असाव्यात.
     कोणाची पर्वा न करता- भीडमुर्वत न ठेवता राजवाडेंनी वस्तुनिष्ठ सत्य आपल्यापुढे साधार मांडले आहे. आज हा ग्रंथ मानववंशशास्त्रीय, समाजशास्त्रीय आणि मानवी- लोकसंस्कृतीचा दस्ताऐवज ठरला असून याला पारंपरिक स्त्री- पुरूष संबंधाची गीताही म्हणता येईल.
     राजवाडेंचे भाषात्पत्तीच्या सदंर्भातले विस्तृत टिपणही या पुस्तकात समाविष्ट झाले आहे. ध्वनींच्या अनुकरणातून भाषात्पत्ती झाली. माणूस त्या त्या प्राण्याला त्याच्या विशिष्ट आवाजावरून नाव देऊ लागला. जसे की, कावकाव करणार्‍या पाखराला काक नाव दिले. भृंग आवाज करणार्‍या किटकाला भृंग नाव दिले. बर्‍याच प्राणीनामांचा शब्दानुकरण जन्म आहेत. विशिष्ट ध्वन्यादी आघातांवरून वस्तूंना नामे देण्याचा शोध माणसाला लाखो वर्षांपूर्वीच लागलेला आहे. (पृ. 96)
     पदार्थदर्शक शेकडो ध्वनींचा साठा मनुष्याजवळ साचतो. मनुष्याचा हाच पहिला शब्दकोश. सजीव पदार्थदर्शक ध्वनीबरोबरच धडपडणे, घोरणे, हुंगणे, फरफटणे, कुरकुरणे, थापणे, थापटणे इत्यादी ध्वनींना तो नामाथू लागतो. (पृ. 96)
     माणसाला भाषेतल्या नाम आणि क्रिया ह्यांच्या दर्शक ध्वनींचा शोध लागतो. येथेच परिपूर्ण भाषा निर्माण झाली. (पृ. 96)
     भाषा म्हणजे मुखातून निघू शकणार्‍या शब्दांनी क्रियांचे व पदार्थांचे आविष्करण करण्याची कला. (पृ.96)
     ही राजवाडे यांची भाषेसंदर्भातली मौलिक अवतरणे जशीच्यातशी मुद्दाम दिली आहेत. त्यावर वेगळे भाष्य करायची आवश्यकता वाटत नाही. भाषेसोबतच भ्रांत कला, वास्तव कला, देव कल्पना, लोकभ्रम, रेखन, हावभाव, अभिनय, भांडी, नृत्य, गान, चित्रण, काव्य, नाटक, स्थापत्य, वाद्य यांचेही‍ चिंतन राजवाडे मुळातून करतात.
     (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

मंगळवार, ३१ जुलै, २०१८

प्रवाहीत ती भाषा...




-         डॉ. सुधीर रा. देवरे

                    मराठी भाषा म्हणजे शेतीप्रधान ग्रामीण पायाभूत शब्दांची आणि बारा बलुतेदारांची सहज पारंपरिक मौखिक संपदा, जी काही शतकांपासून ग्रांथिक आणि प्रमाणभाषा झाली. मराठी भाषेचा हा पट्टा म्हणजे शेतवाडी आणि शेतीसाठी लागणार्या वस्तूंच्या उपयोजनाची भाषा. शेतीबाडीची आणि ग्रामीण राहणी साहणीची भाषा जेव्हा समजण्यापलीकडे जाईल तेव्हा कृषी प्रधान मूळ लोकसंस्कृती आणि पर्यायाने मराठी भाषेचा प्रवाह नवे वळण घेऊ लागेल.
          विशिष्ट परिसरात बोलली जाणारी भाषा एकच असते. ती विशिष्ट नावाने ओळखली जाते. जशी मराठी. (समाजात- गावगाड्यात विविध स्तरांवर काम करणार्या प्रत्येकाला भाषा आपलीच वाटते. आपापल्या विशिष्ट परिवेशात भाषा वाकवली जाते.) गावगाड्यातले हे सगळे लोक जगण्यातून आपापली भाषा सहजतेने व्यवहारात उपयोजित करीत असतात. ज्यात कुठलीही लादलेली क्‍ती नसते. ती असते आपली भाषा. अशी रोज उपयोजित होणारी भाषा कधी मरु शकत नाही. कशी मरेल? जोपर्यंत या भाषेत शिक्षण देणार्या सर्वदूर मराठी शाळा आहेत. (दुर्दैवाने आता मराठी शाळांना उतरती कळा लागली आणि शासनही मराठी शाळा बंद करण्याच्या तयारीत आहे. याचे कारण खेडोपाडी इंग्रजी शाळांचे फुटलेले पेव.) जोपर्यंत मराठीत कविता करणारे कवी आहेत. मराठीत लिहिणारे लेखक आहेत. मराठी वर्तमानपत्रे आहेत, मराठीत निघणारे नियतकालिके आहेत. मराठीत दर्जेदार चित्रपट निघताहेत. महाराष्ट्रातील मोठमोठ्या शहरात खेड्यापाड्यातून आलेल्या लोकांच्या दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्ट्या आहेत. आणि मुख्य म्हणजे मराठीशिवाय दुसरी भाषाच ज्ञात नाही अशा अनेक ग्रामीण- अडाणी लोकांमुळे मराठी भाषा जीवंत राहणार आहे. मात्र ज्या व्यक्‍तींच्या वा गटाच्या व्यवसायातले- कामातले शब्द भाषेतून कालांतराने लुप्त होतात ती भाषा त्या समुहासाठी संपत जाते. ही भाषा काळाच्या उदरात कायमची गडप झाली नाही तरी, तिचे बलस्थान डळमळते. भाषेतल्या शब्दांसोबत भाषेची वाक्यरचनाही हळूहळू संपर्कात येणार्या भाषेत वळण बदलते.  
           भाषेत आपापलं वाटणारं वा ज्याचं त्याचं असं काही नसलं की ती उरते कृत्रिम भाषा. कृत्रिम भाषा व्याकरणाने शिकावी लागते. सहज भाषा आधी बोलली जाते.‍ तिचे व्याकरण बोलणार्याला माहीत नसते. कोणतीही परकीय भाषा ही आपल्यासाठी कृत्रिम भाषाच असते. कृत्रिम भाषेला आपण घाबरतो. काही चुकलं तर नाही ना, हे पुन्हा पुन्हा तपासून घेतो. भाषेला आपण जेवढे घाबरू तेवढी ती आपल्यापासून दूर जाते. जिला आपण घाबरतो अशी परकी भाषा सहजसाध्य उत्फुर्तपणे आपल्या जिभेवर येत नाही.
          पण आपली स्वत:ची भाषा जेव्हा कृत्रिम होऊ लागते तेव्हा ती भाषा ज्ञान भांडाराची असो वा प्रचंड ग्रांथिक पांडित्याची असो, तिचा मृत्यू जवळ आलेला असतो. उदाहरणार्थ, आपण बोलत असलेल्या मराठीत जर रोज आपल्याला कोणी सांगू लागलं, की हा शब्द असा नाही, असा आहे. ह्या शब्दाचा उच्चार चुकीचा आहे. अमूक हा शब्द परका आहे वगैरे. तर चौकटीत ंदिस्त होऊ पाहणारी आपलीच भाषा आपण हरवून बसू. एखादी भाषा बोलणारा कळप त्या भाषेची दारे इतरांसाठी बंद करून घेतो अशी भाषा जास्त काळ टिकत नाही. याचे कारण ती भाषा प्रवाही रहात नाही. साचून राहते. आणि साचलेल्या पाण्याचे जसे दुर्गंधी डबके होत जाते, तशी भाषा अवजड होत तिच्यातला सर्वसमावेशक सहजपणा नष्ट होतो. भाषा ही नदीच्या प्रवाहासारखी आपल्या धारा बदलत राहते, ते स्वाभाविक आहे. 
          प्रचंड प्रमाणात वापरली जाणारी एखादी भाषा कोणत्याही लहान भाषेला संपवत नाही. जगातील एखाद्या भाषेला इतर दुसरी भाषा मारत नाही. कोणतीही भाषा एखाद्या भाषेची शत्रू असू शकत नाही. कोणतीही भाषा एखाद्या भाषेची स्पर्धक होऊ शकत नाही. उलट एक भाषा दुसर्या संपर्क भाषेला कायम सक्षम- सशक्‍त बनवीत असते. भाषा मरते ती भाषा बोलणार्यांच्या न्यूनगंडामुळे. न्यूनगंडापेक्षा अपराध गंड मोठा आहे. आपण ग्रामीण भाषा बोलतो म्हणून आपण गावंढळ समजले जाऊ, हा न्यूनगंड. आपण आपली घरातली भाषा बाहेर बोललो म्हणून अपराध केला की काय वा गुन्हा केला की काय, असं वाटणं हा अपराधगंड. केवळ न्यूनगंडामुळे भाषा मरत नाही. अपराधगंडामुळे भाषा लवकर मरायला सुरूवात होते. एखाद्या लहान क्षेत्रफळात बोलल्या जाणार्‍या भाषेचे लोक, काही कारणास्तव जेव्हा इतरत्र पण विविध ठिकाणी स्थलांतरीत होतात, अशा कारणांमुळेही ती भाषा विस्मरणात जाऊ शकते.
          भाषा मरण्याचे अजूनही काही कारणे आहेत. पूर्वी जेत्यांच्या आडमुठी भाषा प्रसारामुळे, भाषा लादण्याच्याअतिरेकामुळे, भाषेच्या आग्रही शुध्दपणामुळे, अवास्तव सोवळेपणामुळे, व्याकरणाच्या काटेकोर नियमांमुळे आणि ही भाषा आपल्या गटाबाहेर समजता कामा नये अशा गुप्त व्यवहारामुळे भाषा कृत्रिम होत मरणपंथाला लागल्या आहेत. बर्याच नामशेषही झाल्या आहेत. भाषा मरते ती भाषाभिमानाच्या श्रेष्ठ- कनिष्ठ ठरवल्या जाणार्या अशास्त्रीय स्पर्धेत. भाषेला संस्कृती असते. भाषेला लोकसंस्कृती असते असे म्हणणे जास्त सयुक्‍ती ठरेल.
                    भाषेला कोणतीही चौकट नसते, सीमा नसते. भाषा प्रवाही असते म्हणून ती प्रवाहाच्या थड्या फोडून बोलणार्यांच्या उताराला वाहत राहते. भाषा केवळ साहित्यातून नव्हे तर आपल्या मातीत मुळं खुपसत उपयोजित होत राहिली पाहिजे. म्हणजेच भाषा आपल्याच जीवन जाणिवेतून आणि परिवेशातून पारखी होता कामा नये. जगण्यातून, भौगोलिक जडणघडणीतून सहज उगणार्या वनस्पतींप्रमाणे भाषेला त्या परिवेशात श्वास घेता आला पाहिजे.
                   विशिष्ट भौगोलिक परिसरातील भाषा एक असूनही ती कालाच्या महिमानुसार निरंतर बदलत असते. मराठीचं उदाहरण बोलकं आहे. मराठीचा भाषिक प्रवास प्राचीन महारठ्ठी भाषा, मरहठ्ठी, महाराष्ट्री प्राकृत, अपभ्रंश मराठी, आजची मराठी असा झाला आहे. अलीकडची आपल्याला सहज ज्ञात असणारी मराठी म्हणजे श्रीचक्रधरकालीन, ज्ञानेश्वरकालीन, शिवकालीन, स्वातंत्र्यकालीन आणि आजची मराठी. भाषा कोणतीही असो, तिच्यात कालांतराने बदल होत असतो. ज्ञानेश्वरांच्या भाषेपेक्षा आपल्याला तुकारामांची भाषा जास्त समजते. तुकारामांच्या भाषेपेक्षा आपल्याला टिळक- रानडे- आगरकर- लोकहितवादी- परांजपे यांची भाषा जास्त समजते. आणि या सर्वांपेक्षा बोली भाषेला जवळ जाणारी जोतिराव फुल्यांची भाषा जास्त समजते. फुल्यांच्या भाषेपेक्षा आजची वर्तमानकालीन भाषा आपल्याला जशीच्या तशी समजते. याचे कारण भाषेतले तात्कालिक वास्तव संदर्भ. परंपरेतून आलेली भाषा आपलीच असून आजची भाषा आपल्याला जास्त जवळची वाटत असते.  
          भाषेला नदीची उपमा दिली की मुद्दा अधिक स्पष्ट होईल. कोणत्याही मोठ्या नदीचे उगमस्थान मनात भरणारे नसते. अतिशय छोट्या दर्‍या खोर्‍यातून वा अरूंद ओढ्यासारख्या ओहळातून ती सुरूवातीला वाहताना दिसते. नदी जसजशी प्रवाही होत पुढे जात राहते, तशा अनेक उपनद्या, ओहळ, झीळ, ओढे, लवन त्या नदीला येऊन‍ मिळतात आणि समुद्राला जाऊन मिळेपर्यंत ती विस्तृत पात्र असलेली नदी होते. भाषेचंही तसंच आहे. (अशी परिपूर्ण भाषा म्हणजे आजची इंग्रजी.) पण काही भाषांत काय होतं की इतर उपनद्या, ओहळ, झीळ भाषेपासून लांब ठेवण्याचा अट्टहास धरला जातो. का? तर मूळ भाषा अशुध्द होऊ नये म्हणून. आणि असे काही प्रवाह भाषेत सामील होऊ लागले की भाषारक्षक लोक भाषेच्या उगमाजवळ जात म्हणतात, ही खरी भाषा. अशा चुकीच्या प्रबोधनाला बळी पडून तिच्या संकुचित पात्राला आपण भाषा संबोधू लागतो. भाषेच्या उगमाजवळच बंधारे घालू पाहतो. असं झालं की भाषेच्या नदीचा पुढचा प्रवाह आटतो आणि भाषा मरण पंथाला लागते. 
     (‘भाषा आणि जीवन पावसाळा 2017, प्रकाशन जुलै 2018 या नियतकालिकात प्रकाशित झालेला लेख. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/