- डॉ. सुधीर रा. देवरे
मागील तीन वर्षांतील ह्या ‘विशिष्ट’ जाणिवांच्या कविता निवडून आजच्या ब्लॉगसाठी घेतल्या आहेत. अराजक म्हणा, अराजकीय म्हणा, राजकीय म्हणा, धार्मिक म्हणा अथवा सामाजिक म्हणा, सोप्या शब्दांसह सोप्या आशयात आविष्कृत झालेल्या ह्या कविता वेळोवेळी आजच्या जीवन जाणिवांत आपोआप ‘सापडल्या’ आहेत, असे म्हणायलाही हरकत नाही. ह्या वर्तमान भयान काळातल्या अस्तित्वाची ही भयावह देण म्हणता येईल. सध्याचे राजकारण हे सुसंस्कृत स्वच्छ समाजकारण व्हावे आणि ह्या कविता तात्काळ भंगाव्यात; महाराष्ट्रासह भारतावर आलेले हे अमानवी घटनांचे अराजक लवकर नष्ट व्हावे, अशी प्रार्थना माझ्या धर्मातील तेहतीस कोटी देवांकडे करत आहे...
सरकारला कोणी दोष देऊ नये!
नागरिकांनी सरकारला समजून घ्यावे
सरकारच्या चुका काढू नये, टीका करू नये
सरकारला खूप कामे असतात
अनेक हिशोब चुकते करायचे असतात
लोकांपर्यंत देवधर्म पोचवायचे असतात
नवे इतिहास लिहायचे असतात, जुन्या कबरी खोदायच्या असतात
नेत्यांच्या नव्या मांडणीसाठी ‘शिव’मूर्ती भंगवायच्या असतात
ताज्या चाकू-सुर्यांचे शाकाहारी मटणाचे वाटे पोचवायचे असतात
न्यायालये ताब्यात घेऊन बुलडोजर फिरवायचे असतात
गुन्हेगार संरक्षणात लोकांवर ठोकशाह्या लादायच्या असतात...
कोणाची जीभ घसरली तर त्यांना माफ करावे
दुर्जनांना संरक्षण दिले तर त्यांचे दुखणे जाणावे
सरकार नाहीच असे समजून नागरिकांनी आपापले संरक्षण करावे
आपापले शिक्षण करावे, आपापले रोजगार शोधावे
आपापले व्यवसाय करावे, आपापले आरोग्य सांभाळावे
आपणच आपले ओझे ओढत वरून सर्व कर भरावे
पात्रता असूनही नसेलच काम मिळत
अथवा व्यवसाय दंगलीत जाळला गेला असेल
तर रेशनावर अथवा भिकेवर जगावे
आपापसात गुण्यागोविंदाने नांदत हेटस्पीचकडे दुर्लक्ष करावे
टाइमपासला आंदोलनात, दंगलीत वा मोबाईलात रमावे...
कोणी खोडी काढली तर खंडणी देऊन मोकळे व्हावे
पैसे नसतील तर हलाल होत मरायला तयार रहावे
मयताला न्याय देण्यासाठी न्यायालयीन लढाईत
प्रेमाच्या लोकांचे आख्खे आयुष्य बरबाद होऊ नये
म्हणून आत्महत्त्येच्या सोप्या मार्गाने मरावे
नागरिकांनी आपल्या सरकारला समजून घ्यावे
हस्तीदंती विमान-गाड्यांतून उतरून ते कसे धावतील बिचारे
त्यांनाही परिवार असतो, मुलेबाळे असतात, वारस असतात
आणि वारस आतापासूनच भक्कमपणे लॉन्च करायचे असतात...
बिचार्या सरकारला कोणी दोष देऊ नये!
दोष द्यायचाच झाला तर आपल्या कंगाल नशिबाला कोचावे!
*
मूळ संस्कृती पोखरून उंदीर
सगळ्यांना वामन व्हायचं आहे
वामनासारखं दिसायचं आहे
वामनासारखं बोलायचं आहे
मनुसारख्या पोथ्या लिहून कारस्थानं रचायचे आहेत
म्हणून इकडचे शूद्र, तिकडच्या शूद्रांना शिव्या देताहेत
आपापसात जातींचा उध्दार करत
वराहाच्या परशूला सिंधू धर्म समजत
घरादारांवर तुळशीपत्रांच्या प्रार्थना करताहेत
शूद्राच्या बोकांडी वैश्य बसले
आता क्षत्रिय मोठे की ओबीसी,
ठरवायला बटूने कुस्तीची पैज लावत
आर्य मेंदू वैदिक यज्ञात मुडद्यांच्या आहुत्या देताहेत
दरम्यान बहुजन महामानव
देव्हार्यातून आल्हाद हद्दपार करत
पर्शियन डिब्रे यजमानांच्या हाती परशू देत
गुरू आदेशानं सर्रास स्थानिकांना कापताहेत!
मूळ संस्कृती पोखरून उंदीर
आपलं बस्तान बसवताहेत!
बरम्यानं डेंडार्या देत ओकलेले
आळकायेल फिस्के पिचडताहेत!
*
लोक बोलत का नाहीत
आख्ख हिरवंगार शेत जळतंय
लोक हलत का नाहीत
माणूस रस्त्यात मारला गेलाय
लोक उचलत का नाहीत
पाय ठेवायला कर लागलाय
लोक खडबडत का नाहीत
खैस आयाबहिणी हासडताहेत
लोक बोलत का नाहीत
गुलाम गुमान राबताहेत
लोक बाह्या आवरून
सरसावत का नाहीत...
माणसं आंबा भरवतात
नि मशीन लिंबू दाखवतं
लोक आक्षेपत का नाहीत...
*
खंक माणूस अधू होत आहे
मंदिरात देव आहे की नाही
माहीत नाही
पण बाहेर चोर नाडत आहे
कुंभात पुण्य मिळतं की नाही
माहीत नाही
पण जगणं दुषित होत आहे
प्रार्थनेत सामर्थ्य आहे की नाही
माहीत नाही
खंक माणूस अधू होत आहे!
*
सत्तेची उबगुबीत पोळी...
मारणारा हिंदू
आणि मरणाराही हिंदू...
हिंदुत्वाचा आका
कोपऱ्यात ओबीसीला सांगतो
मराठ्याला धरा,
मराठ्याला सांगतो
ओबीसीला मारा,
आणि मनात म्हणतो
उलटंसुलटं झालं तरी
आमचाच फायदा खरा...
हिंदुनं हाल करुन मारलं
हिंदुलाच देत हाळी
जातीवंत कोंबडे झुंजवून
भडकवली हिंदुत्वाची होळी
दगाबाजीनं बळकावली
सत्तेची उबगुबीत पोळी...
*
यापुढं लोकशाही...
यापुढं नागरिकांच्या
पैपैचा हिशोब बँकेत
आणि लोकप्रतिनिधी
रोखीत टेंपो ढापतील.
यापुढं सभागृहात
मुद्द्यांवर चर्चांपेक्षा
पुढारलेले गद्दार
गल्लीत गुद्दे हाणतील.
यापुढं संविधानातली
नैतिकता भोसकून
जादूई आकड्यांत
फिटृ बसवली जाईल.
यापुढं लोकशाहीतले
चारही स्तंभ धुऊन
नव्या रोषणाईनं
लख्ख सजवले जातील!
*
आमच्यात पारंपरिक पारंगत बदनामी सेना
आम्हाला युध्दे करता येत नव्हती
म्हणून तेव्हा राजे होता येत नव्हते...
तुमच्या राजांकडे तलवारी होत्या तरी
आमच्याकडे संजीवनी लेखण्या होत्या...
प्रजेला म्हणजे तुम्हाला अडाणी ठेवण्यात
तेव्हा आमचीच मुख्य भूमिका होती...
लेखण्या आम्ही अशा चालवल्या की
तुमच्या राजांचे आम्ही गुरु होऊन बसलो...
तुमचे नियोगही आम्हीच करत होतो,
हेही आम्हीच पुराणात लिहून ठेवले...
आमच्या सोयीप्रमाणे आम्हीच तुमचा
अर्धसत्य इतिहास लिहून ठेवला...
तुमचे राजे आमचे पाय पडत-पुजत,
हेही तुम्ही आज पाहता, ऐकता, वाचता...
तेव्हा लेखणीची अमर्याद सत्ता होती,
आता मेंदूने तुम्हाला आपसात लढवून
आम्ही जिंकतो सत्ता गिळतो,
आज पुन्हा तुमचा ‘बळी’ घेऊन
आम्ही वामन राजे होऊन बसलो!...
सारांश, आम्ही पक्के जातीचेच,
तुम्ही मात्र जातीयवादी होऊ नका
आमच्यात पारंपरिक पारंगत बदनामी सेना,
म्हणून आमच्या पायांवर सपशेल झुका…
*
तुमच्या देव्हार्यात आमचे पूर्वज पुजाल!
तुमचा इतिहास प्रक्षिप्त भ्रष्ट करू
तुमचा पवित्र आदर्श कलंकीत करु
तुमची भुईमुळं समूळ उपटून टाकू
तुमची नाळ गर्भातून छाटून टाकू...
आमचे स्युडो विज्ञान मान्य कराल
आमचा स्युडो इतिहास मान्य कराल
तुमच्या देव्हार्यात आमचे पूर्वज पुजाल!
तुमच्या मेंदूला रोमडी लाऊन
आम्हाला तहहयात सत्ता बहाल
उराल फक्त पालख्यावाही कंगाल!...
*
तुम्ही सहनशील असलं पाहिजे...
खून होताहेत
होऊ दे खुन्यांची हत्त्या होईपर्यंत
बलात्कार होताहेत
होऊ दे बलात्कार्यांवर रेप होईपर्यंत
दरोडे पडताहेत
पडू दे लुटार्यांची लूट होईपर्यंत
महामानव बदनाम होताहेत
होऊ दे विकृत लोक थकेपर्यंत
इतिहास बदलताहेत
बदलू दे वर्तमान नष्ट होईपर्यंत...
पैसे वाटताहेत
मते छापताहेत
भाषणं करताहेत
शिवराळ होताहेत
मातलेले माजताहेत
माजू दे नशा उतरेपर्यंत...
लाचलुचपतीत खोर्यानं
होऊ दे भ्रष्टाचार...
ओरबाडू दे एकमेकांना
नागवं होईपर्यंत...
आपापसात देह शेकू दे
बुडाला पाय लाऊन
खुर्चीतून पळ काढेपर्यंत...
देश विकला गेला तरी
तुम्ही सहनशील असलं पाहिजे
श्वास बंद होईपर्यंत!
कायद्याच्या चौकटीशिवाय
हे यादवीनंच बंद होईल की काय!
*
राजकारणात इंटरेस्ट नाही!
मी म्हणालो,
‘मेडिसीन बंद करता येत नाही
गोडतेल परवडत नाही
असे बरेच पाडे वाचता येतील,
पण बलात्कारांचं भयानकच!
लोक बालकांनाही सोडत नाहीत,
किराणा दुकानात बंदुका मिळतात की काय
भर चौकात पोलिस संरक्षणातही
मध्ययुगीन ठेचून मर्डर होताहेत,
महापुरूषांनाही बदनाम करत
नेमका कोणता सूड उगवताहेत!’
ऐकून, तो दूर सरकत, सैरभैर भितभित म्हणाला,
‘सॉरी, मला राजकारणात
अजिबात इंटरेस्ट नाही!’
*
(ह्या सर्व कविता अप्रकाशित आहेत. इतरत्र वापर करताना कवीच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर राजाराम देवरे
ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा