मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०

एका विटीत दोन कोल्या..

 

- डॉ. सुधीर रा. देवरे

 

एकमेकाला चिकटलेलं जुळं..

इवसं वा दिव्यांग

जन्मताच कोणी मुक्‍ती देतं

गळ्याला नख लावून

रस्त्यात जीवंत हेळना

वा उसनं संगोपन करून

कोणी तिकीट लावतं जत्रेत

फक्‍त चरितार्थ नव्हे

खोर्‍याने पैसे ओढण्यासाठी...

चार हात... चार पाय.. दोन तोंडं..

पाठीलापाठ चिकटली म्हणून

मादी देह एक..

आणि दोन भिन्न 

गर्भाशयांसाठी

दोन भिन्न योन्या

संबधोत्सुक... संभोगोत्सुक...

पुन्हा इवसंच जन्माला घालण्यासाठी की काय...

- एक नर घिरट्या घालतोय!...

एका विटीत

दोन कोल्या...

(आणि जत्रेत व्यावसायिक तिसरी..)

मारता येतील म्हणून...

                             - सुधीर रा. देवरे 

                    पंचवीस वर्षांपूवी एक चांगला अभिजात हिंदी चित्रपट पहाण्यात आला होता. चित्रपटाचं नाव देबशिशु (1985) असल्याचं आठवतं. काही वर्षांपूवी दूरदर्शनवर शुक्रवारी आणि शनिवारी रात्री उशीरा विविध भाषेतील अभिजात चित्रपट दाखवले जात. त्यापैकी हा एक होता. उत्पलेंदु चक्रवर्ती यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात ओम पुरी, स्मिता पाटील आदींनी काम केलं आहे. चित्रपटाचं कथानक असं:

                    आर्थिकदृष्ट्या एका गरीब जोडप्याच्या घरी एक विचित्र बालक जन्माला येतं (तीन तोंडे, सहा हात असे काहीतरी). बालकाचा बाप घाबरुन एका मांत्रिकाकडे जातो. ते मूल घरात ठेवणं पाप आहे असं मांत्रिक सांगतो आणि त्या मांत्रिकाचा चेला ते मूल आपल्याकडे घेऊन यायला सांगतो. बालक रस्त्यावर टाकून देण्यापेक्षा कोणी मागतं म्हणून त्याला देतो.

                    काही वर्षांनी त्या बालकाला जीवंत शिशुदेव म्हणून तिकीट लावून त्याचं गावोगाव प्रदर्शन भरवत पैसे कमवण्याचं साधन केलं जातं, एकदा तो पिडीत कुटुंब प्रमुख शहरात जातो तेव्हा जागृत जीवंत देव बालकाच्या जाहिरातीची हवा त्याला मोहीत करते. तो तिकीट काढून देव पहायला भव्य अशा तंबूत शिरतो. हा देव पहायला रांगा लावून प्रंचड गर्दी होत असते. देव पहाण्यासाठी तिकीट काढून तंबूत जावं लागतं. देवापुढे असलेला पैशांचा गंज खूप लांबूनच त्याला दिसू लागतो. देव नजरेच्या टप्प्यात येताच हा देव म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आपल्या घरात जन्मलेलं विचित्र बालक असल्याचं त्याच्या लक्षात येतं. आपण कष्टाची कामं करून कसंतरी जगत आहोत आणि आपल्या अशा मुलाचा फायदा उठवून- उपयोग करून हा कोण कुठला माणूस वैभवात लोळतो, याचा साक्षात्कार त्याला त्या रांगेत होतो. मुलाच्या बदल्यात तीस रुपये देणारा इसमही तो तिथं ओळखतो. त्याच्याजवळ आपला मुलगा नाहीतर काही पैसे मागण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला चोर ठरवलं जातं. चेल्यांतर्फे त्याच्यावर हल्ला करून त्याला पिटाळलं जातं. आणि त्यानंतर या नवरा बायकोत होणारा मानसिक संघर्ष आपल्याला अंतर्मुख करून सोडतो. मानसिक संघर्षाशिवाय आणि स्वप्नात बदला घेण्याशिवाय हे जोडपं मुलाचा देव म्हणून धंदा करणार्‍याचं काहीही करु शकत नाही..

                    पण हा चित्रपट पाहून लगेच ही कविता लिहिली नाही. एक वेगळा अनुभव म्हणून हा चित्रपट मनाच्या कप्प्यात खूप दिवसांपासून पडून होता...

                    अशातच दूरदर्शनवरील सुरभी या मालिकेत एकमेकांच्या पाठीला चिकटलेल्या दोन जुळ्या तरुण बहिणी दाखवण्यात आल्या. मुलींचा उपयोग त्या मुलींचा बाप यात्रेत तिकीट लावून लोकांना दाखवत पैसा कमवण्यासाठी करत असल्याचं सांगितलं गेलं. या दोन्ही मुलींशी लग्नाला इच्‍छुक असणार्‍या एका तरुणाचीही मुलाखत दाखवली. मुलींचा बाप लग्न लावायला नकार देतो. कारण त्या मुली त्याच्या उत्पन्नाचं साधन होत्या. हा मुलगा त्या जुळ्या एकमेकाला चिकटलेल्या मुलींशी लग्न करून या मुलींचा बाप जसा पैसा कमवतो, तसाच तो स्वत:ही त्यांच्या प्रदर्शनाने पैसा कमावणार असल्याचं बोलून दाखवतो... हे ऐकून देबशिशु चित्रपटाची आठवण पुन्हा ताजी झाली... मनाच्या अशा अवस्थेतच एका विटीत दोन कोल्या ही कविता लिहिली गेली.

                    तरीही ही कविता म्हणजे चित्रपटाचा सारांश नाही आणि सुरभीत पाहिलेल्या दृश्याचे सरळ वर्णन नाही... अथवा या विवेचनाच्या आधारानेच ही कविता वाचली पाहिजे असंही नाही. वरील दोन्ही गोष्टी फक्‍त कवितेच्या निर्मितीला कारणीभूत ठरल्या म्हणून त्यांचा निर्देश. ही कविता जर कविता असेल तर तिच्यातून अजून काही अर्थ (अनेकार्थ) दृगोचर झाले पाहिजेत... आणि ते अर्थ उलगडून दाखवणं हे कवीचं काम नाही... समीक्षकाचं आहे... कवी सांगेल ती फक्‍त कवितेची निर्मिती प्रक्रिया...

                    या कवितेत अहिराणीतले दोन महत्वाचे शब्द आहेत... एक- इवसं व दोन- कोल्या... हे दोन्ही अहिराणी शब्द कवितेत प्रभावी प्रतिकांचं काम करतात...

                    ‍विचित्र बालक जन्माला आलं की त्या बालकाला ग्रामीण भागात इवसं म्हणतात. ज्या घरात ते जन्माला येतं त्या घरात ही घटना अशुभ समजली जाते... असं विचित्र बालक जन्मल्यानंतर सहसा वाचत- जगत नाही असा समज आहे. (का जाणूनबुजून जगू दिलं जात नाही?) आणि वाचलंच तर (कोणाला समजू न देता) त्या घरातील लोक त्या बाळाच्या गळ्याला नख लावून मारून टाकतात वा सुनसान रस्त्यावर नेऊन ठेवतात. ग्रामीण भागात अशा घटना नेहमीच घडत राहतात.

                    दुसरा शब्द कोल्या... कोली या शब्दाचं कोल्या हे अनेकवचन. विटीदांडू खेळतांना जमिनीवर जो छोटासा लांबट खड्डा खोदला जातो त्याला कोली म्हणतात.

                    या कवितेच्या समीक्षेसाठी आणि अनेकार्थतेसाठी या दोन संज्ञांचा आधार घेणं- विचार करणं आवश्यक ठरावं, असं प्रस्तुत कवीला वाटतं. थांबतो.

              (मार्च 2020 मध्ये प्रकाशित झालेल्या आस्वाद: भावलेल्या कवितांचा या पुस्तकात समाविष्ट असलेला लेख. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

    © डॉ. सुधीर रा. देवरे

     ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा