शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

पुस्तकांची मांदियाळी - डॉ. सुधीर रा. देवरे

    अलीकडे प्रचंड प्रमाणात पुस्तकं प्रकाशित होत असतात. अगदी तालुक्याच्या ठिकाणी आणि गावागावातही रोज अनेक प्रका‍शन संस्था स्थापन होत असूनही त्या कमी पडतात म्हणून अनेक लेखक (लिहिणारा तो लेखक या अर्थाने) स्वखर्चाने आणि स्वत: स्थापन केलेल्या प्रकाशनाच्या नावाने पुस्तकं प्रकाशित करत आहेत. नक्की आकडा सांगता येत नसला तरी महाराष्ट्रात रोज कमीतकमी पंचवीस पुस्तकं प्रकाशित होत असावीत. या हिशोबाने महिण्याला सातशे पन्नास तर वर्षाला नऊ हजार पुस्तकं प्रकाशित होत असावीत. इतकी पुस्तकं कोणताही एक वाचक वाचू शकत नाही. एखाद्याने ही सगळी पुस्तकं वाचायचं ठरवलं व त्यासाठी दिवसातले चोवीस तास त्याने दुसरं काहीही काम केलं नाही तरी सगळी पुस्तकं आपल्या आयुष्यात वाचणं शक्य नाही.
    एकदा एका लेखकाशी अपघाताने भेट झाली तेव्हा ते म्हणाले, माझे आतापर्यंत फक्‍त पस्तीस पुस्तकं प्रकाशित आहेत. (कितीही मोठी रक्कम धनादेशावर लिहिताना रूपये फक्‍त' हा शब्द लिहितात तसं या लेखकाने फक्‍त पस्तीस असं म्हटलं.) आपल्या दृष्टीने, बापरे पस्तीस पुस्तकं? आणि त्या लेखकाच्या दृष्टीने, फक्‍त पस्तीस पुस्तकं! तरीही अजून पर्यंत त्यांचं आणि त्यांच्या कोणत्याच पुस्तकाचं नाव वाचल्याचं आपल्याला आठवत नाही. त्यामुळे आपण वाचक म्हणून किती मागे आहोत हे लक्षात येतं.
    दिनांक १२-१२-२०१२ या दिवशी माझ्या एका मित्राने स्वखर्चाने एकदम बारा पुस्तकं प्रकाशित केलीत. त्या प्रकाशन समारंभाची आधी कार्यक्रम पत्रिका आणि नंतर फोन आला तेव्हा अगदी मनापासून त्या मित्राचं हार्दिक अभिनंदन केलं. एकाच वेळी बारा पुस्तकं प्रकाशित करणं म्हणजे त्या आधी बारा पुस्तकं लिहून काढणं हे एव्हरेष्ट शिखर सर करण्याइतकी ऊर्जा या मित्राने नक्कीच खर्च केली असावी, हे मनातून मान्य केलं.    
    दहा- बारा वर्षांपासून हळूहळू लिहून ठेवलेली आणि पाच वर्षांपासून एका प्रकाशकाकडे दिलेली माझी चार पुस्तकं एकदम अलीकडेच प्रकाशित झालीत, असं सांगायला सुध्दा संकोच वाटतो. संकोच यासाठी वाटतो, की एकाच वेळी चार पुस्तकं प्रकाशित होणं म्हणजे भविष्यातली आपली जबाबदारीही वाढलीच. या पार्श्वभूमीवर एकाच लेखकाची एकदम बारा पुस्तकं प्रकाशित होण्याची घटना एक रेकॉर्ड असेल हे  नक्की.
    अशा प्रचंड प्रमाणात साहित्य छापलं जात असेल तर मग वाचकाने काय करावं? कोणती पुस्तकं वाचावीत आणि कोणती वाचू नयेत हे त्याने कसं ठरवायचं? खरं तर हा प्रश्न वाचक म्हणून मलाच पडलेला आहे. म्हणून मी स्वत:ला एक शिस्त लावून घेतली. पुस्तक वाचण्याची एक प्राधान्यसूची मी तयार केली आहे. ती अशी:
एक: वाचलीच पाहिजेत अशी पुस्तकं.
दोन: एकदा वाचायला हरकत नाही अशी पुस्तकं.
तीन: वाचली नाहीत तरी चालेल अशी पुस्तकं.
    अशा पध्दतीने एक आणि दोन क्रमांकाची पुस्तकं वाचत असतो. इथं इतर वाचकांनाही गृहीत धरून वरील तीन पर्याय सगळ्यांसाठी सुचवतो.
    पुस्तकांची अशी यादी केली की वाचणं सोपं होईल हे खरं असलं तरी यासाठी निकष कोणता लावायचा हा सुध्दा यक्ष प्रश्न आहेच. कोणती पुस्तकं वाचावीत आणि कोणती वाचू नयेत, हे कोणाला विचारावं हे त्यापेक्षा कठीण.
(ब्लॉगवर टाकण्यासाठी हा लेख 2013 सालीच लिहून ठेवलेला. अद्याप अप्रकाशित. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
   ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा