शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०

भाषेतले जुने आणि नवे...



-         डॉ. सुधीर रा. देवरे

          भाषेतले जुने शब्द टिकवत नव्या शब्दांसाठी आपण कायम  स्वागतशील असलं पाहिजे. मग ते नवे शब्द भाषेत अगदी नव्याने तयार होणारे असोत की इतर वा परक्या भाषेतील असोत.
          आपल्या जुन्या पारंपरिक ग्रामीण शेतीविषयक शब्द आज मोठ्या प्रमाणात हरवू लागले आहेत. त्या शब्दांचे दस्तावेजीकरण करणे गरजेचे आहे. म्हणूनच बैलांच्या सावळा, शेतीची मेर म्हणजे काय, वगैरे आपल्याला असं कोणाला कधी विचारावं लागू नये. जुवाडं, जोतं, शेल, धाव बसवणं, साटली, वंगन, झ्याप, च्याहूर, उपननं, पाथ, सारवनं, भोद, बांध, सारंग, गव्हान, बंधनी, कंबळकाच, बटवा, पिसोडी, सोला, साकरू, सरकी, तन, बोचकं, शिवळा, वैचा जायेल, लसूनचोट्टा, चोखांडभर, उल्हानं देनं, शिळागार, कडीजखडीना, वरमाड, मोचडं, गागा बसनं, डाभुर्ल, आबगा, जथापत, गेदू, डांजनं, ल्हाव करनं, व्हका घेनं, पघळनं, फसकारा, बाशी, याळ, चिपडं पडनं, आखठं करनं, दिवाबत्ती करनं, कठान, मुचकं, जुवाडं, गेज, काठोख, खुशाल आदी अहिराणी शब्दसंपदा आपण अर्धनागरी लोक आजही समजू शकतो.
          उद्या म्हणजे आपल्यानंतरची पिढी हे शब्द वापरेलच असं नाही. कोणी  हे शब्द वापरले तर नव्या‍ पिढीला ते समजतीलच असं नाही. म्हणून भाषेतले-  परंपरेतले जुने शब्द मोठ्या प्रमाणात हरवले तर मराठी भाषेचा सांगाडा ढळायला लागेल. भाषा जीवंत असणं वेगळं आणि जुन्या संचितासह अस्तित्वात असणं वेगळं. संस्कृत भाषेच्या ढळढळीत उदाहरणाने जागृत होत भाषा कशी प्रवाही आणि सर्वसमावेशकपणे टिकवता येईल याकडे आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागणार आहे.
          आजच्या भाषेत रुढ होणारे परकीय शब्द आपल्या भाषेतले भाषिक हिस्सा झालेले आहेत, ते स्वागतार्हच आहे.  इतर भाषेतून आलेल्या अनेक शब्दांना मराठी विभक्‍ती वा प्रत्यय लावून नव्याने तयार होणार्‍या शब्दांचे भाषेत स्वागत केले पाहिजे. उदाहरणार्थ, आज भाषेत सर्रास वापरला जाणारा परवडेबल हा शब्द मराठी आहे का? नुसता इंग्रजी आहे का? परवडणे या मूळ मराठी शब्दाला इंग्रजीतला एबल प्रत्यय लावलेली ही संज्ञा, संकरीत असली तरी आज तो मराठी शब्द म्हणून रुढ होऊ शकतो.
          नो उल्लू बनावींग अशा वाक्याची एक जाहिरात आहे. नो हा इंग्रजी शब्द.ल्लू हा मराठी आणि हिंदीही असलेला शब्द. बनावींग मध्ये इंग इंग्रजी प्रत्यय. बनव (बनवणे तला) मराठी आणि हिंदीतही वापरला जाणारा शब्द. ही कोणती भाषा आहे? इंग्रजी, मराठी की हिंदी? ही भाषा आपली नाही? खरं तर ही चालता बोलता सहज तयार होणारी प्रवाही लोकभाषा आहे. आपल्या रोजच्या भाषेत ही गरज असलेली भाषा आपोआप तयार होत समाजभाषेत मुरत असते. अशी भाषा कोणत्याही भाषेला मारत नाही. उलट आजची आपली भाषा अजून सजग सशक्‍त करीत असते. ऑफिसात हा शब्द आज पूर्णपणे मराठी झाला आहे. (ऑफिस या मूळ इंग्रजी शब्दाला मराठी विभक्‍ती लागून तो ऑफिसात होताना पूर्णपणे मराठी होतो.) इतर भाषेतल्या शब्दांना मराठी विभक्‍ती- प्रत्यय लावून तो भाषेत रुढ होणे ही प्रक्रिया आपोआप सुरु असते. त्यासाठी खास प्रयत्न करावा लागत नाही आणि यात वावगंही काही नाही. आजच्या जागतिक इंग्रजी भाषेतसुध्दा जगातील अनेक बोलीतले- भाषेतले शब्द रूढ झाले. अशा शब्दांची भाषेत रोज भर पडत आहे.
          आतापर्यंत अनेक भाषा मरून गेल्यात, त्यांचे उत्थापन- संवर्धन करता येणार नाही. काही मरणाच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत आणि उद्या मरण्यासाठी ज्या रांगेत उभ्या आहेत, त्या भाषा कोणत्या? असा प्रश्न कोणी उपस्थित करू शकतो. अनुमानाने या भाषा जातीय, जमातीय आणि भटक्या भाषा असू शकतात. कारण भाषा बोलणारा समाज वाटला जाणे, समाज कमी होणे, स्थलांतरीत होणे, भाषेबद्दल न्यूनगंड असणे आणि भाषेबद्दल भयगंड- अपराधगंड असणे हे त्या भाषेच्या अस्तित्वाच्या मूळावर येऊ शकते. उदाहरणार्थ म्हणून कोळी समाजाची भाषा.
          जे कोळी लोक पारंपरिक पध्दतीने मासेमारी करत आले, ते आपल्या समुहासह समुद्र काठावर आसपास वस्ती करून पिढ्यांपिंढ्यापासून राहत होते. आपल्या व्यवसाया‍शी संबधीत आपली कोळी भाषा ते बोलत होते. मात्र आज मासेमारी हा प्रचंड मोठा व्यवसाय झाला. भारतातही आपल्या कोळी समाजापुरता तो मर्यादित राहिला नाही. मोठमोठ्या बोटींनी समुद्राच्या तळापर्यंत आधुनिक पध्दतीने आज मासेमारी केली जाते. समुद्र काठावर वास्तव्य करून कोळी बांधव जो ऋतूनुसार मासेमारीचा छोटा व्यवसाय करत होते तो ही या व्यापारी हल्ल्याने संपुष्टात आला. कोळ्यांचा व्यवसाय इतरांनी पळवला. हा व्यवसाय करणारे लोक ग्लोबल व्यापारी झाले. या व्यावसायिकांशी टक्कर घेणे कोळ्यांना शक्य नाही. ते मोठ्या यंत्राशी स्पर्धा करू शकत नाहीत. इतके भांडवल आणि व्यावसायिकतेचे ज्ञानही त्यांच्याकडे नाही. पारंपरिक पध्दतीच्या विशिष्ट जाळ्याने मासे पकडण्याचा हा व्यवसाय करत ते आज जगू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आता हा समूह दुसरा व्यवसाय करणार. त्यासाठी ते समुद्र काठावरून स्थलांतरीत होणार. जसाचा तसा समूह केवळ आपली जागा बदलून विस्थापित होईल असं नाही. ते सुट्यासुट्याने कुठल्यातरी वेगवेगळ्या शहरात विस्थापित होत आपल्या रोजीरोटीसाठी विविध व्यवसायात मजूरी करणार. आजपर्यंत जो समाज समूहाने रहात होता तो फुटणार. भिन्न भिन्न व्यवसायात नव्हे, व्यवसायातील मजुरीत गुंतणार. अर्थातच यासाठी ते तडजोड करत आपली भाषा सोडून स्थानिक बोलली जाणारी अन्य भाषा मोडकी तोडकी बोलणार. मराठी, हिंदी, कन्नड, तेलगु, मल्ल्याळम वगैरे. म्हणूनच कोळी लोकांची भाषा कालांतराने संपुष्टात येऊ शकते. कोळी लोक आपली भाषा कालांतराने विसरून जाऊ शकतात. ही मांडणी करणे जीवावर जात असले तरी वस्तुस्थिती अशी आहे.
          अशा पध्दतीने कोळी भाषेला समांतर असणार्‍या अनेक भटक्या लोकांच्या भाषांचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दर पंधरा दिवसातून जगातली एक बोली मरते. लयाला जाणार्‍या बोली कोणी वाचवू शकत नाही. आपण फक्‍त अशा भाषांचे डॉक्युमेंटेशन करू शकू. असे दस्तावेजीकरण मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. भाषांच्या अस्तित्वासाठी ही काळाची गरज आहे.
     (‘मराठी संशोधन पत्रिका’ जानेवारी- फेब्रुवारी- मार्च 2020 च्या अंकात प्रकाशित झालेल्या चार लेखांपैकी हा एक. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
  ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा