शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१९

अहिराणीचा सामाजिक अनुबंध

-    डॉ. सुधीर रा. देवरे

     अगोदर माणूस, माणसानंतर समाज आणि मग भाषा. भाषा आणि बोली हा फरक आता यापुढे करायचा नाही. जी बोली आपण बोलतो ती भाषा. मग ही भाषा आक्ख्या जगाची असो नाहीतर एखाद्या गाव-पाड्यापुरती मर्यादीत असो. बोली म्हणजे भाषाच असते. लोक एकमेकांसोबत देवाणघेवाण करताना जे काही बोलतात ती भाषा. कोणत्याच भाषेत कोणताच घटक अशुध्द नसतो. भाषा गावंढळ वा ग्राम्य नसते आणि देढगुजरी सुध्दा नसते. याचा व्यत्यास करायचा झाला तर कोणतीच भाषा शंभर टक्के शुध्दही नसते, असं म्हणता येईल.
     भाषेवर बोलताना काही लोक व्यासपीठांवरून म्हणतात, ‘आमची भाषा शुध्द आहे.’ (म्हणजे त्यांना म्हणायचं असतं की आमच्या परिसरातली भाषा सोडून बाकीच्या भाषा अशुध्द आहेत.) पण भाषेत तसं शुध्द आणि अशुध्द काही नसतं. तसं पहायला गेलं तर आजची जी जागतिक भाषा इंग्रजी आहे ती सुध्दा (अशा लोकांना अभिप्रेत असल्यासारखी) शुध्द नाही. असंच कोणीतरी अहिराणी भाषक म्हणत असतात, ‘मराठी लोकांना अहिराणी भाषा कळत नाही.’ पण असं नाही. अहिराणी भाषा वाचायला वा ऐकून समजून घ्यायला थोडा वेळ द्यावा लागतो हे खरं. मराठी माणसाला अहिराणी भाषा कळते आणि बाहेर सगळ्या महाराष्ट्रातही कळते. अहिराणी भाषेची सर्वत्र दखल सुध्दा घेतली जाते. फक्‍त काम चांगलं असायला हवं.
     दोन जणांना एकमेकांशी बोललेलं कळलं की झाली भाषा तयार. मग तु्म्ही तिला कोणतंही नाव द्या. तिला नाव दिलं नाही तरी कोणत्याही भाषेचं काहीच अडत नाही. मग अशा भाषा त्या त्या लोकांच्या गटांचं, जातीपातीचं नाव लावून लोकजीवनात तग धरून राहतात. अहिर लोकांची अहिराणी भाषाही खानदेशात अशीच तयार झाली. आजूबाजूचे लोकजीवन म्हणजे लोकांचं रोजचं जगणं, हे जगणं भाषेत आलं आणि अहिराणी भाषा तयार झाली.
     मनुष्य इथून तिथून जसा एक नाही. जमीन इथून तिथून जशी एक नाही, बाहेरची हवा-वातावरण इथून तिथून जसं एक नाही. तशा भाषाही इथून तिथून एक नाहीत, याच्या पुढेही जगाची एकच एक भाषा होऊ शकत नाही. आणि यापुढे समजा कोणी कितीही तसं करायचं ठरवलं तरी ते व्यवहारी होणार नाही. तरीही आक्ख्या जगात आज आपल्या स्वत:च्या भाषा बोलायला जे जे लोक लाजतात, त्या त्या भाषा मरायला सुरूवात झाली आहे. अशा अनेक भाषा आजपर्यंत मेल्या त्यांचा आपल्याला पत्ताही लागला नाही.
     जसं लोकजीवन असतं तशी भाषा असते. लोकजीवनात ज्या ज्या जिनसा- वस्तू असतात, जी जी झाडं झुडपं असतात. जमीन, पाणी, हवा, पीकपाणी असतात त्यामधून लोकजीवनात लोकपरंपरा, लोकगीतं, लोकवाड्मय, लोकम्हणी, लोकनाच, लोकहुंकार, लोकपरिमाणं, लोकव्यवहार, लोकवास्तु, लोकवस्तु, लोकहत्यारं आदी तयार होतात आणि या सगळ्यांतून आपोआप स्थानिक भाषा तयार होत असतात.         
     संस्कृतमधून मराठी आणि मराठीतून अहिराणी अशी जी आजपर्यंत आपल्याला कोणी अहिराणी भाषेची उत्पत्ती- व्युत्पत्ती सांगत होतं ती चूक आहे. असं आतापर्यंत उलटं संशोधन होत आहे. अहिराणीची तशी उत्पत्ती नाही. बोलीभाषांमधून प्रमाणभाषा तयार होतात. प्रमाणभाषेपासून बोली नाही तयार होणार.
     कोणत्याही भाषांमध्ये इतर भाषेतले शब्द येणं साहजिक आहे. काही टक्के दुसर्‍या भाषेतले शब्द बोलींमध्ये दिसतात म्हणून ती भाषा त्या अमूक एका प्रमाणभाषेपासून तयार झाली, असं म्हणणं म्हणजे वडाचं पान पिंपळाला लावण्यासारखं आहे. लोक जेव्हा भाषा वापरायला लागतात आणि दुसरी भाषा बोलणार्‍या लोकांसोबत व्यवहार करतात तेव्हा शब्द इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे होत राहतात. काही काळानंतर ते शब्दही आपल्या भाषेत रूजून आपल्याच भाषेचे अविभाज्य घटक बनतात आणि हे साहजिक आहे.
     लोकदेवांचं तसंच. जशी माणसं, तसे देव. विधी, विधी- नाट्य आणि देव देवता यांच्यावरही त्या त्या भागाची- परिसराची दाट सावली पडलेली दिसते. जसं माणसांचं रोजचं जगणं, राग-लोभ, काम, भीती, समजुती, भक्‍ती ह्या परंपरेने त्या त्या भागात तयार होतात; तसे त्यावरील तोडगेही काढले जातात. याच पध्दतीने असे लोकदेवही माणसाला आधार देण्यासाठी तयार झाले. या सर्व घडामोडींचा आळ- आरोप देवावर केले जातात, जो अहिराणी भागातही लागू होईल.
     लोकदेव हा भावाचा भुकेला असतो. म्हणून छोटासा कपडा, थोडासा नैवेद्य यात तो खुश होत असतो. त्याला भक्‍ताकडून कोणत्याही घबाडाची अपेक्षा रहात नाही. ज्या सुताचे कपडे इथं तयार होतात त्याच कपड्यात देव खुश होतो. ज्या झाडांची पानं इथं सहज उपलब्ध होतात त्या झाडांची पत्रीच या देवांना वाहिली जाते. जी जी फळं इथं त्या त्या ऋतूत येतात, तीच फळं इथल्या देवाला आवडतात. जे पदार्थ इथं घराघरात कमी खर्चात तयार होतात, तोच नैवेद्य या देवांना लागतो आणि त्या नैवेद्यानेच त्यांचं पोट भरतं.
      लग्नातली गाणी, झोक्यावरची गाणी, गौराईची गाणी, कानबाईची गाणी, गुलाबाईची गाणी, बारातल्या शिव्या, अहिराणी रडनं, ओव्या, घरोटवरच्या ओव्या, आन्हा, उखाना, कोडा, म्हणी अशा सर्व लोकपरंपरेतून अहिराणी बाईचं बाईपण ‍बघितलं तर ध्यानात येतं, अहिराणी बाईला दागिन्यांचा सोस जसा आहे, तसा रामाचा म्हणजे पतीचा विरह. सासरच्या सासरवासाला ती जशी कंटाळलेली आहे, तशी माहेरपणला - आईला भेटायची तिला ओढ आहे. माहेरच्या माणसांना भेटायला ती उतावीळ दिसते. पहाटेपासून काम करता करता ती इतकी थकून जाते तरी दुसर्‍या दिवशी पहाटे उठून ती घट्यावर गाणी म्हणण्याइतकी ताजीतवाणीही होताना दिसते. हे वर्णन लोकगीतांना अनुसरत परंपरेतलं आहे. आजचं नाही. लोकगितांतले शब्द आणि त्यांचे अर्थ पाहिले तर नवल वाटतं. अहिराणी किती श्रीमंत आहे हे मौखिक लोकगीतांतून सहज ध्यानात येतं. 
     अहिराणी ही मागधी, सौराष्ट्री, शौरसेनी, महाराष्ट्री, पैशाची या सर्व भाषांपासून तयार झाली का संस्कृत - मराठी – या वाटेने तयार झाली? असा विचार करण्यापेक्षा ती इथंच (म्हणजे या प्रदेशात) तयार झाली असेल असं का म्हणू नये? अहिराणी भाषा इथंच रांगली, इथंच तिला बोबडे बोल फुटलेत आणि इथंच ती चार जिल्ह्यात हात पाय पसरून तिने आपला जम बसवला असं म्हणणं अधिक योग्य आहे.
     - जगातल्या कोणत्याही भाषेत त्या त्या समाजाचं आणि तो समाज ज्या भागात राहतो त्या भागाचं चित्र दिसतं. तसं अहिराणीतही अहिराणी बोलणार्‍या लोकांचं चित्र अगदी टहाळबन- स्पष्ट दिसतं.
     (‘अक्षरदान 2019 च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेल्या दीर्घ लेखाचा काही संपादीत भाग. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर रा. देवरे
 ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा