रविवार, १ सप्टेंबर, २०१९

साध्वी



-    डॉ. सुधीर रा. देवरे

          लेखकाचा मोबाईल वाजला. लेखकाने स्क्रीनवर पाहिलं. नंबर होता. फोनमध्ये सेव्ह नव्हता. फोन घेत लेखक म्हणाले, ‘नमस्कार.’
‘सोनवणे साहेब, तुम्ही आश्रमात येताहेत ना. कार्यक्रम सुरू होत आहे साहेब.’ तिकडून खूप घाईत असलेली महिला बोलत होती.
लेखक म्हणाले, ‘कोण हवंय तुम्हाला?
‘मी सुमनताई बोलते. सोनवणे नगराध्यक्ष साहेबांचा फोन आहे ना?
लेखक म्हणाले, ‘नाही.’
‘कोण बोलताय आपण?
‘सुधाकर पाटील’
‘हा नंबर सोनवणे साहेबांचा नाही?
‘नाही’
‘नंबर तर सेव्ह आहे माझ्याकडे’ म्हणत फोन कट झाला.
     पाच सहा दिवसांनी लेखकाला याच नंबर वरून पुन्हा फोन आला. लेखक म्हणाले, ‘नमस्कार.’
‘मी सुमनताई बोलते सोनवणे साहेब. आश्रमात येणार आहेत का?
‘कोणत्या आश्रमात?
‘महानपंथ आश्रमात’
‘मी सोनवणे नाही’
‘असं कसं होतंय. नंबर सेव्ह आहे.’
‘कोण बोलतंय?’ फोन कट झाला.
     लेखकाने हा नंबर सुमनताई नावाने सेव्ह करून घेतला. दोन दिवसांनी लेखकाने सुमनताईला फोन केला. तिकडून ‘हॅलो’ ऐकू येताच लेखक म्हणाले, ‘सुमनताई आहेत का?
‘हो बोलते. कोण बोलतं?
‘मी लेखक सुधाकर पाटील बोलतो. दोनदा तुमचा फोन आला माझ्या नंबरवर कोणत्यातरी सोनवणे साहेबांसाठी.’
‘हो सेव्ह होता माझ्याकडे. आता मी डिलीट केला सर.’
‘कोणाकडून मिळाला हा नंबर तुम्हाला?
‘सोनवणे साहेबांनीच दिला होता. सेव्ह करतांना चुकला असेल. आपण कुठून बोलता?
‘नाशिकहून.’
‘या ना मग एखाद्या ‍दिवशी आश्रमात’
‘कसला आश्रम?
‘महानपंथाचा’
‘कुठं आहे?
‘नांदगावला’
‘आपण काय करता तिथं?
‘मी आश्रमातली साध्वी आहे’
‘ओऽहो. असं आहे का? किती आहेत साध्वी तिथं?
‘आम्ही दोघीच. मी आणि माझी एक सहकारी. माझ्यापेक्षा लहान आहे ती’
‘मला काही जाणून घ्यायचं होतं साध्वींबद्दल. कृपया मला थोडी माहिती पुरवाल का साध्वीपणाविषयी? मी काही प्रश्न विचारले तर चालतील का?
‘हो सांगेल की. पण मी आता सैंपाक करतेय. उद्या दुपारी फोन करा सर. सांगेल सर्व.’
‘धन्यवाद.’ लेखकाने फोन बंद केला.
     दुसर्‍या दिवशी दुपारी दोन वाजता लेखकाने सुमनताईंना फोन लावला. ‘हॅलो.’
लेखक म्हणाले, ‘नमस्कार’
‘नमस्कार’
‘आता वेळ आहे?
‘हो’
‘काही प्रश्न विचारायचे होते. खरं तर चर्चा करायची होती तुमच्याशी.’
‘हो बोला ना. हरकत नाही. सांगते मी.’
‘आपण साध्वी झालात. आपल्याला घरच्यांनी साध्वी बनवलं की तुम्हाला वाटलं म्हणून झालात? म्हणजे तुमच्यावर हे लादलं गेलं की काय?
‘नाही नाही. लादलं वगैरे काही नाही. मी माझ्या मनाने निर्णय घेऊन साध्वी झाले.’
‘तुम्हाला साध्वीची दीक्षा दिली गेली ना?
‘हो’
‘तेव्हा तुम्ही किती वर्षे वयाच्या होत्या?
‘आठवीत होती मी तेव्हा.’
‘आठवीत म्हणजे तेव्हा तुम्ही फक्‍त तेरा वर्षाच्या होत्या. तुम्हाला समज येण्याच्या आत दीक्षा दिली गेली, म्हणजे तुमच्यावर ते लादलं गेलं असंच ना.’
‘नाही नाही. कळत होतं मला सर्व तेव्हा. मी माझ्या मनाने घेतली दीक्षा. कोणी लादलं वगैरे नाही.’ 
‘तुम्ही अल्पवयीन होता तेव्हा. पण ते असो. मग पुढे शिक्षणाचं काय झालं?
‘शिक्षण तेवढंच. आठवी.’
‘पण का आलात तुम्ही इथं? काही ठोस कारण?
‘मला भाऊ नव्हता. आम्ही चार बहीणी. एक मुलगी देवाच्या कामाला दान केली की मुलगा होईल असं सांगितलं गेलं.’
‘तुम्हाला भाऊ व्हावा म्हणून तुमच्या वडिलांनी तुम्हाला दान केलं. म्हणजे तुमच्यावर ते लादलंच ना?
‘नाही. माझी तयारी होती. मी निर्णय घेतला. मला दान केलं आणि मला भाऊ झाला. देव लगेच प्रचिती देतो बघा.’
‘तुम्हाला दान केल्यामुळे वडिलांना मुलगा झाला, यावर तुमचा विश्वास आहे?
‘हो. सगळ्यांनाच प्रचिती आली आमच्या गावात.’
‘म्हणजे तुमच्या गावातल्या अजून मुली आहेत का साध्वी म्हणून?
‘हो. प्रत्येक घरातली एकेक आहे जवळपास?
‘कोणतं गाव तुमचं? 
‘स्टेशन जवळचं खंजिरे’
‘जात विचारू?
xxxx.’
‘जात विचारण्याचं कारण असं की, नेमकं कोणाला असं प्रवृत्त केलं जातं, ते समजून घ्यायचंय.’
‘हरकत नाही.’   
‘तुम्हाला असं नाही वाटत का आज आपला संसार राहिला असता. मैत्रिणींचा संसार पाहून असं काही वाटत असेल ना तुम्हाला?
‘अजिबात नाही. लग्न करून मुली जास्त दु:खात आहेत. ‍कुठंही जा, सगळीकडे सारखंच आहे. पळसाला तीनच पानं.’
‘बरं आता कसं असतं तुमचं रोजचं पथ्यपाणी? जगणं वगैरे’
‘काही घरं मागून शिदा आणावा लागतो सैंपाकासाठी. पण मी तसं नाही करत, घरी जाते आणि भावाकडून घेऊन येते सर्व. आपली सगळी कामं आपण स्वत: करायची असतात इथं. कुठं पंथाचे कार्यक्रम असले की जायचं तिथं. पुन्हा इथं यायचं.’
‘अच्‍छा. म्हणजे एकंदरीत तुम्ही तिथं समाधानी दिसता.’
‘हो. पूर्ण समाधानी आहे.’
‘कुठं कुठं फिरून आलात?
‘सगळा भारत म्हटला तरी चालेल. जिथं जिथं महानपंथाचे आश्रम आहेत तिथं.’
‘बरं. आज इतकंच. मी पुन्हा फोन करीन तुम्हाला अजून काही माहितीसाठी. चालेल ना?
‘हो. चालेल की. इथंच या तुम्ही आमच्या आश्रमात एकदा. आमच्या महान पंथाबद्दल जाणून घ्या. तुम्हाला आवडेल आमचा पंथ.’
‘बरं. करतो प्रयत्न.’ म्हणत लेखकाने फोन बंद केला.
     दुसर्‍या दिवशी चाळा म्हणून लेखकाने सुमनताई व्हॉटस अॅप वर आहे का, ते शोधलं. होती. डिपी पाहिला. गुलाबी साडी आणि डोक्याचा गोटा. डोक्याच्या गोट्यावरून साडीचा पदर घेतलेला. लेखकाला खूप वाईट वाटलं. इतकी छान बाई आणि डोक्याचा गोटा. डोक्यावर केस नसल्याने बाईपणाचं सौंदर्य हरवलं. लेखकाला खूप वेळ वाईट वाटत राहीलं. म्हणून लेखकाने सुमनताईला फोन केला.
‘नमस्कार.’
‘हां नमस्कार सर. बोला.’
‘व्हॉटस अॅप वरच्या डिपीतला तुमचा फोटो पाहिला, म्हणून फोन केला.’
‘काय झालं?
‘साध्वीला गुलाबी साडी नेसावी लागते का?
‘हो’
‘आणि केस काढलेले आहेत तुम्ही डोक्याचे.’
‘हो. त्यात काय एवढं.’
‘केसांमुळे सौंदर्य हरवलं.’
‘काय करायचं त्या सौंदर्याला.’
‘कोण काढतं डोक्याचे केस?
‘स्वत:च.’
‘कशाने?
‘काचेने’
‘वेदना नाही होत?
‘आता नाही लागत जास्त. प्रॅक्टीस झाली. तुम्ही कधी येताय आश्रमाला भेट द्यायला?
‘करतो प्रयत्न. तिकडे येणं झालं की नक्की येईन.’
‘आमचा पंथ समजून घ्या. त्यावर‍ लिहा तुम्ही.’
‘हो. समजून घेण्यासाठी तर माहिती घेतो तुमच्याकडून. मला सांगत जा कोणताही संकोच न करता. म्हणजे मला लिहिता येईल. तुमचा पंथ ऐकून आहे. पण त्याबद्दल जास्त माहिती नाही.’
‘सांगेल ना सर. तुम्ही या एकदा.’
लेखक आश्रमात येण्याचा विषय तोडत पुढे म्हणाले,
‘तुमची एक सहकारी आहे म्हणालात ना?
‘हो’
‘तिचा काही आवाज येत नाही तुमच्या जवळपास.’
‘ती खिंदळत असते बाहेर.’
‘म्हणजे काय? समजलं नाही मला.’ 
‘लोकांना लाईन देते.’
‘बाप रे. असं चालतं का तिथं?
‘चोरून लपून.’
‘सगळ्याच आश्रमात का इथंच.’
‘सगळीकडं असंच आहे थोड्याफार फरकाने.’
‘पुढे काही विचारलं तर गैर अर्थ घेऊ नका. विचारू?
‘हो.’
‘तुम्हाला नाही वाटत तसं?
‘कसं?
‘तुमची सहकारी करते तसं.’
‘नाही.’
‘कधी इच्‍छा होते?
‘कसली?
‘पुरूषाची.’
‘देवाच्या नामस्मरणात सर्व विसरून जाते.’
‘तुम्ही अजून कुवार्‍या आहात?
‘नाही.’
‘असं कसं?
‘हा कलीयुग आहे सर. कोणी सोडतं का आज? नाही म्हणता येत नाही.’
‘म्हणजे बलात्कार.’
‘सुरूवातीला बलात्कारच होता. आता शरणागती.’
‘एक आहे का अनेक आहेत.’
‘एकच आहे. त्याच्यासोबत होतं सगळं.’
‘कोण आहे तो.’
‘आहे एक.’   
‘तिथलाच आहे?
‘नाही. परभणीचा.’
‘इतक्या लांबचा. मग कसं काय?
‘आमच्याच पंथातला आहे ना. येतो आश्रमात. कुठं दुसरीकडंही जमून येतं भ्रमण करताना.’
‘हं. बापरे.’
‘म्हणजे देवदासींसारखंच ना. सर्वदूर पळसाला पानं तीनच.’
‘नंतर बोलते.’
फोन कट झाला. कोणीतरी आलं असावं.
     लेखकाचं चिंतन सुरू झालं... मुली देवाला सोडणं, हा एक भयानक प्रकार. देवाच्या नावाने सगळीकडे आपापली सोय केली जाते. हाक नाही. बोंब नाही. सर्व पध्दतशीरपणे पवित्र करून सुरू ठेवायचं.
     काही दिवसांपूर्वी लेखकाने वृत्तपत्रात एक बातमी वाचली होती :
     एका आश्रमातली एक पांढरं वस्त्र परिधान करणारी तरूण साध्वी, रात्री जिथं झोपायची त्या ठिकाणी आश्रमातल्या लोकांना सकाळी राखेची आकृती दिसली. म्हणजे ती साध्वी झोपेत त्याच ठिकाणी रक्षा होऊन पडली असं ते दृश्य होतं. गवगवा झाला. आश्रमात पोलिस आले. तपास सुरू झाला. तपासात समजलं, ती साध्वी एका पुरूषासोबत पळून गेली आणि त्याच्याशी तिने लगेच लग्नही उरकून घेतलं. हा तिचा निर्णय लेखकाच्या दृष्टीकोनातून चांगला असला तरी आश्रमात राहून असा निर्णय घेणं तिला शक्य नव्हतं. म्हणून ‍ती झोपल्या जागीच राख झाली, असा देवत्वाचा दृष्टांत दाखवण्याचा मार्ग तिला सोपा वाटल्याने तिने असं दृश्य निर्माण केलं असावं.
     पुढे त्या साध्वीचं काय झालं समजलं नाही. तिला गृहाश्रमात राहू दिलं की दबाव आणून पुन्हा आश्रमात खेचून आणलं ते लेखकाला कळलं नाही. पण तिने घेतलेला निर्णय लेखकाला योग्यच वाटला. ते तथाकथित साध्वीपण तिच्यावर अल्पवयात लादलं गेलं असावं. ती वयात येताच आतून बंड करून उठली. निसर्गाच्या हाका सगळ्यांनाच साद घालतात. कोवळ्या वयात हे साध्वीपण तथाकथित धार्मिक आवरणात गुंडाळून खोट्या प्रतिष्ठेसाठीही लोक मुली देवाला अर्पण करतात. देवदासी तर देवाची वा देवीची अवकृपा नको म्हणून कुटुंबाच्या अस्तित्वासाठी भयाने सोडल्या जातात. प्रतिष्ठेसाठी नव्हे.
     लेखकाला अजून एक घटना आठवली. तरूणपणात लेखक आपल्या एका मित्राच्या लग्नासाठी निमशहरीकरण झालेल्या नगरात गेला होता. त्यांच्या नातेवाईकाकडे चहा पिण्यासाठी त्याला बोलवलं. मित्राच्या त्या नातेवाईकाच्या ओसरीत एक भलं मोठं रंगीत मानपत्र सोनेरी फ्रेम मध्ये मढवून भिंतीवर दिमाखाने टांगलेलं होतं. टांगलेल्या मानपत्राजवळ उभं राहून ते संपूर्ण मानपत्र त्यावेळी लेखकाने मन लावून वाचून काढलं. या माणसाच्या समाज बांधवांतर्फे जाहीर सत्कार करून हे सन्मानपत्र त्यांना आदराने बहाल केलं होतं. त्या मानपत्रातल्या शब्दांचा सारांश लेखकाला आज आठवतो : 
     आपलं लाडकं कन्यारत्न अमूक हिला वयाच्या बाराव्या वर्षी आपण धार्मिक कार्यासाठी अर्पण केलं व साध्वीची दीक्षा दिली म्हणून आपण या सत्काराला पात्र आहात. आपण धर्माच्या महान कार्यासाठी आपल्या लाडक्या कन्यारत्नाचा त्याग करून धर्माचरणी वाहिल्याने समस्त धार्मिक पंचायत आपलं जाहीर हार्दिक अभिनंदन करीत आहे.
     मानपत्राखाली तीन माणसांच्या नावांसह ओळीने लपेटदार सह्या होत्या. या सह्यांच्या माणसांपैकी एकालाही लेखक ओळखत नव्हता. याचा अर्थ गावातल्या तथाकथित स्थानिक धर्ममार्तंडांच्या त्या सह्या असाव्यात. ज्यांना मानपत्र दिलं गेलं त्यांचं छायाचित्र एका बाजूला तर जिला साध्वी केलं गेलं होतं त्या बारा वर्षाच्या मुलीचा पांढर्‍या साडीतला फोटो दुसर्‍या बाजूला त्या मानपत्रात छापलेला होता.
     काही दिवसांनंतर लेखकाला अचानक सुमनताईंची आठवण झाली. लेखकाने एवढ्यात सुमनताईंना फोन केला नव्हता. लेखकाने आधी व्हॉटस अॅप करून पाहिलं. सुमनताईंचा डिपी नव्हता. स्टेटस नव्हतं. अॅप बंद झालं की काय, म्हणून त्यांनी फोन करून पाहिला. किंश्चित रिंग वाजून लगेच फोन कट झाला. चुकून कट झाला असेल असं वाटून लेखकाने पुन्हा कॉल केला. पहिल्यासारखाच कट झाला. तिसर्‍यांदाही केला. पुन्हा तसंच. मग लेखकाच्या लक्षात आलं की सुमनताईने आपल्याला ब्लॉक केलंय. पण ब्लॉक करण्याचं नेमकं कारण काय असावं.
     आपण त्यांच्या आश्रमाला भेट देऊन त्यांच्या पंथाविषयी आस्था दाखवत नाही, म्हणजे आपण नास्तिक आहोत, हे त्यांच्या लक्षात आलं असेल. अथवा, आपण अजून त्यांना काही भलतं सलतं विचारू नये, असंही असावं. अथवा, अंतर्गत माहिती पुरवल्यामुळे सुमनताईंच्या अस्तित्वालाही आश्रमात धोका पोचू शकतो, म्हणूनही असावं की काय... माहीत नाही.
     (मुंबई मराठी साहित्य संघाच्या ‘साहित्य’ मे-जून-जुलै 2019 च्या अंकात प्रकाशित झालेली कथा. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

   © डॉ. सुधीर रा. देवरे
  ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा