शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१८

नदी आणि गाव 
-    डॉ. सुधीर रा. देवरे

     गाव तिथं नदी होतीच. आजही ज्या गावाला नदी नाही असे फार क्वचित गावं असतील. गाव तिथं नदी नव्हती, तर जिथं नदी होती तिथं गावं वसली. नदीच्या काठांवर लोकवस्ती झाली. पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय जीवन नाही. जिथं जिथं पाणी होतं त्या पाणवठ्यांच्या काठांवर गावं वसली. म्हणून कोणतं गाव कोणत्या नदीच्या काठावर हे अजूनही मुद्दाम विचारलं जातं. अथवा कोणत्या गावाजवळून कोणती नदी वाहते याचीही उत्सुकता असते. जरी अनेक नद्या वाहता वाहता आज आटून गेल्या आहेत.
     नदी लहान असो की मोठी. आज वाहत असो की नसो. आजची गावंही नदीच्या‍ किनारीच सापडतात. जीवन देणारी नदी ही माणसाची देवता आहे. नदीला माता समजलं जातं. परंपरेने नद्या पुजल्या जातात. नदीत अनेक देवता आजही पहायला मिळतात. नदी ही स्त्रिलींगी असल्याने नदीतल्या बहुतांश देवता या महिला देवता आहेत. आसरा ह्या देवता नदीतच अस्तित्वास असतात. प्रत्येक गावाच्या आसरा ह्या नदीतच वास्तव्य करतात. त्यांचं नावही आसरा. गावाला आसरा देणार्‍या नदीतल्या देवता त्या आसरा. आसरांना बोली भाषेत आया म्हणतात. नदी आपली आई. आईचे अनेक वचन आया. नद्या ह्या सर्व प्राणीमात्रांच्या आया आहेत.
     नदीतल्या आसरांसमोर आजही ग्रामीण भागात लहान बाळाला घुगरवलं जातं. घुगरावणं म्हणजे नदीतल्या आसरांसमोर मानवी बाळाने नतमस्तक होणं. त्याच्या पुढील आयुष्यासाठी या आसरा देवतांचा (आयांचा) आशीर्वाद घेणं म्हणजे घुगरावणं. जन्म झाल्यावर बाळाला जसं नदीचं दर्शन घडवलं जातं, तसं माणसाच्या मृत्यूनंतर त्याचे सर्व‍ क्रियाकर्मही नदीतच वा नदीच्या काठांवर केले जातात. माणसाच्या अंत्ययात्रेचं वित्सर्जन नदीत होतं. माणसाची राख नदीच्या पाण्यात सोडली जाते. अस्थी नदीत बुडवल्या जातात. म्हणून उतारवयातल्या माणसाला मुद्दाम हिणवण्यासाठी तुझ्या नदीत गोवर्‍या गेल्या तरी अक्कल आली नाही असं म्हटलं जातं. लोकप्रथा आपण समजतो इतक्या अडाणी नसतात. लोकप्रथांत आदिम लोकसमज आणि लोक सजगता दडलेली असते. हे लोकसमज जगण्याला बळ देतात. आत्मशक्‍ती वाढवतात. पूर्वी माणसाची आत्मशक्ती वाढवण्याचं काम अशा लोकप्रथा करत होत्या.
     लहानपणी साथ देणारी नदी आपल्याला आयुष्यभर प्रवाहीत करीत असते. ग्रामीण नदी जी आज वाहत नसली तरी केवळ तीस- पस्तीस वर्षापूर्वीच्या छोट्या छोट्या नद्याही सुजलाम सुफलाम होत्या. आतापर्यंत सगळ्याच माणसांचं बालपण या नद्यांच्या कडेवर पोसलं जात होतं. (या पुढच्या पिढ्यांना कदाचित पूर्वी इथून नदी वाहत होती असं सांगावं लागेल.) नदीच्या दोन्ही थड्यांवर दाट आंबराई असायची. आंबराई दाट नसली तरी नदीच्या काठांवर अनेक झाडी असायची. नदी दोन्ही पात्रे भरून वहायचीच असं नाही. नदी छोटी असली तरी एका धारेने वाहताना दिसायची.
     काही लोक उन्हाळ्यात नदीत डांगरवाड्या तयार करत. डांगरवाडीत डांगरे, टरबुज, पानकाकड्या पिकायच्या. इतक्या कमी पाण्यातही काही मासेमारी करणारे लोक बारके बारके मासे पकडायचे. खडकांच्या खाचेतून खेकडे पकडायचे. लहान मुलं टोंगळ्याइतक्या वाहणार्‍या नदीच्या धारेत अंघोळ करायचे. थंडगार पाण्यात अंघोळ होताच तापल्या वाळूत अंग शेकायचं- वाळवायचं. आंब्याला लगडलेल्या कैर्‍या दगड मारून पाडायच्या. त्या तिथल्यातिथं खायच्या. वाळूत झरा तयार करून गढूळ पाणी उपसून झाल्यावर नितळ थंडगार पाणी हाताच्या ओंजळीने घटाघटा प्यायचं.
     नदीत बकरके बकर्‍यांना पाणी प्यायला आणायचे. गुराखी गायींना पाण्यावर आणायचे. शेतकरी आपल्या बैलांसह पाळीव प्राण्यांना पाणी पिण्यासाठी नदीवर आणायचे. गावात काही लोक बदकं पाळायचे. ते बदकं पाण्यात पोहण्यासाठी नदीत आणले जात. काही लोक केतकी नावाची वनस्पती नदीच्या धारेत भिजवत ठेवत. नंतर त्याचे लांब धागे काढून त्याचा दोर (आवते)‍ विनत. ही सगळी गंमत पाहण्यासाठी गावातली लहान मुलंही नदीत येत.
     घरोघरच्या गृहीणी धुणं धुण्यासाठी म्हणजे कपडे धुण्यासाठी नदीवर येत. नदीत कपडे धुवून होताच ते तापलेल्या वाळूवर वाळत घालत. वाळलेल्या कपड्यांच्या नदीतच घड्या करून कढईत ठेऊन ती कपड्यांची कढई डोक्यावर धरून घरी आणली जायची. डोक्यावर कपड्यांची पाटी घेत नदीकडे धुणं धुण्यासाठी जाणार्‍या महिला आणि नदीकडून कपडे धुवून गावात येणार्‍या महिला हे रोज दिसणारं ग्रामीण दृश्य रमणीय असायचं. मठमुंगाचे वडे असले तर दाळा धुवायला गावातल्या महिला भल्या पहाटे नदीवर जात. मट्यारं धुवायचं असलं तर नदीवर जात. अशी ही पारंपरिक नदी गावातलं सगळं भलं भुरं आपल्या पोटात घेत काठावर वस्ती करून गाव वसलेल्या लोकांना स्वच्‍छ ठेवीत असे. गावातल्या लोकांची तहान आयुष्यभर भागवत असे. आता अशा जीवंत नदीचे दृश्य गावात दिसून येत नाही.
     नद्यांच्या आजच्या वाळवंट होण्याला आपणच कारणीभूत आहोत. नदी उगमाजवळचे डोंगर, झाडं तोडून आपण उघडे नागडे केले. नदीकाठचे झाडं तोडून आपण नदीला उघडं पाडलं. (त्याचा पावसावरही परिणाम झाला.) अतोनात पाणी उपसून वा अडवून नदीचं प्रवाहीपण बंद केलं. अतोनात वाळू उपसून नदीचं खड्डं केलं. नको तिथं अतिक्रमण करून छोट्या नद्या नामशेष केल्या. गावातल्या गटारी नदीत सोडल्या. रासायनिक कारखाण्यांचे प्रदुषित पाणी नदीत सोडलं. इतकं सारं होऊनही नद्या जिवंत राहतील कशा?
     (वाघूर 2018 च्या दिवाळी अंकात लिहिलेल्या लेखाचा अतिसंक्षिप्त भाग.
या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा