शनिवार, ३० जून, २०१८

वाहनं आणि प्रवास



- डॉ. सुधीर रा. देवरे

      खेड्यापाडयातला पूर्वीचा प्रवास बैलगाड्यांतून होत असे. अगदी लग्नाचे वर्‍हाड सुध्दा या गावातून त्या गावी बैलगाडीने निघायचं. घर ते शेत आणि आजूबाजूच्या चार- पाच मैलांवर असलेल्या खेड्यापाड्यात कामेकाजे जाण्यासाठी पायी चालण्याचा तो काळ होता. याच काळात इकडे कुठे कुठे सायकलीही दिसू लागल्या. त्यावेळी अनेक कर्मचारी रोज वीस- पंचवीस मैलांचा प्रवास आपल्या सायकलींनी करत असत. 30 ते 40 वर्षांपूर्वी या प्रदेशातल्या ग्रामीण भागात क्वचित मोटरसायकली सुध्दा दिसू लागल्या होत्या. जावा आणि राजधूत कंपनीच्या या मोटारसायकलींना ग्रामीण भागात फटफट्या म्हटलं जायचं. पण त्यांचं प्रमाण अतिशय नगन्य असं होतं.
     गावात केवळ एक दोघांकडे फटफट्या दिसायच्या म्हणून हे लोक गावाच्या दृष्टीने खूप श्रीमंत समजले जायचे. बाकी लोक आपला प्रवास आपापल्या मगदूराप्रमाणे करायचे. जिथं पायी जाणं शक्य आहे तिथं पायी जायचं. जिथं बैलगाडीने जाणं शक्य होईल तिथं बैलगाडीने जायचं. सायकल असली तर कोणी सायकलीने एकट्याने प्रवास करायचा. सायकलीवर डबलशीट बसून दोघांनाही प्रवास करता यायचा. ज्यांच्याकडे बैलगाडी नाही, सायकल नाही ते एस टी ने प्रवास करायचे. एस टी सुध्दा सर्वत्र उपलब्‍ध नव्हती. जिथून एसटी उपलब्ध होईल त्या ठिकाणी पायी जाऊन एसटी पकडून लोक गावाला जात. अशा अडचणींमुळे अगदी आवश्यक असलेला प्रवासच त्यावेळचे गावकरी करत असत.
     त्याकाळी गाव तिथं एसटी हा प्रकार नव्हता. प्रवासासाठी बैलगाडी प्रमाणे छकडं हा प्रकारही त्यावेळी पहायला मिळायचा. पण बैलगाडी हे सर्वसाधारण शेतकर्‍यांचं वाहन तर छकडं हे श्रीमंतीचं प्रतीक समजलं जायचं. बैलगाडी ओढायला दोन बैल लागत तर छकडं ओढायला एक घोडा पुरेसा असे. बैलगाडीत दाटीवाटीने सात-आठ लोक सहज प्रवास करू शकत तर छकडं वा टांगा हे (चालवणारा धरून) दोन जणांचं प्रवास करायचं वाहन होतं. छकडं अथवा टांग्याला वर अर्धगोलाकार कामटी आणि कापडाचं छत तयार केलेलं असे. म्हणून ऊन वा पावसापासून टांग्यात थोड्याफार संरक्षणाची सोय होती. मात्र बैलगाडीला कोणतेही छप्पर नव्हते. छप्पराची बैलगाडी अजूनही सहसा कुठे पहायला मिळत नाही. म्हणून बैलगाडीतून प्रवास करताना ऊन, पाऊस, थंडीपासून संरक्षण करता येत नव्हतं. बैलगाड्यातून उघडा वाघडा प्रवास करावा लागायचा. बैलगाडी आज लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून बैलगाडी संदर्भातले भाषेतले शब्द, म्हणी आणि वाक्प्रचारही पुढे लुप्त होणार आहेत. उदाहरणार्थ, गाड्याबरोबर नळ्याची यात्रा, जुवाडं, सावळा, जोतं, गेज, साटलं, पांजरी, चकारी, धाव, तुंबडं, आस, आरी, शेल आदी शब्द नागरी माणसाला आजच समजेनासे झाले आहेत.  
     लग्नाचे वर्‍हाड लग्नाच्या गावाला नेण्यासाठी त्याकाळी बैलगाड्या वापरल्या जात असल्या तरी लग्नाचे गाव वीस पंचवीस मैल लांब असले तर वर्‍हाडासाठी ट्रक्टर वा ट्रक भाड्याने केला जात असे. ट्रक्टरच्या ट्रॉलीत वा ट्रकमध्ये लोक दाटीवाटीने उभे राहून लग्नांना हजेरी लावत. वयस्कर माणसं ट्रकच्या मध्यभागी बसायचे.
     त्याकाळी पर्यटनाची कल्पनाही खूप भव्य दिव्य नव्हती. गावातल्या माणसाचे  पर्यटन म्हणजे जवळपासच्या लोकदेवांची जत्रा करत तो थोडाफार भटकून घ्यायचा. (उदाहरणार्थ, बागलाणातला माणूस भाक्षीची जत्रा, सटाण्याची देव मामलेदारची जत्रा, दोधेश्वर, कपालेश्वर, मांगीतुंगी, नामपूर जत्रा अशा आपल्या तालुक्यापुरती मर्यादित ठेवायचा.) जास्तीत जास्त सप्तशृंगी देवीची यात्रा आणि कुलदैवताची भेट झाली की त्याला समाधान मिळत असे. काही लोक अधून मधून पंढरीची वारीही करून येत असत. पंढरीची वारी हे त्यावेळी खूप लांबचं पर्यटन समजलं जायचं. गावातल्या लोकांचे पर्यटन हे पायी, बैलगाडी वा नंतर एसटीने होऊ लागले.
     मध्यंतरीच्या काळात इकडच्या ग्रामीण लोकांना आगगाडीचे (रेल्वेचे) खूप अप्रूप होतं. (इकडे रेल्वेचे दळणवळण नसल्यामुळे हे आकर्षण होतं.) आता स्वत:च्या (फोर व्हीलर) गाड्या जिकडे तिकडे दिसू लागल्या. गावातले अनेक लोक आता देशांतर्गत विमान प्रवासही वरच्यावर करू लागले.
     आज या भागातले अनेक तरूण मुलं परदेशात आहेत याचंही कोणाला विशेष अप्रुप वाटत नाही. कोणीही बोलता बोलता सहज सांगून जातो, परोंदिस आम्ही दिल्लीमा व्हतूत तधळ तठे पाऊस पडना. कालदिस मी मुंबईले व्हतू. रातलेच वनू. अशा पध्दतीने आजचा गावातला माणूस प्रवासातही ग्लोबल झाला आहे.
     (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा