गुरुवार, ३१ मे, २०१८

लग्नविधी आणि इतर विधी (भाग: दोन)




-    डॉ. सुधीर रा. देवरे

          विधी संज्ञेचे लग्न विधी आणि इतर विधी असे भाग करावे लागतील. ग्रामीण विधींमध्ये अनेक अंधश्रध्दा आढळत असल्या तरी ग्रामीण विधींतूनच भाषेला अनेक नवीन शब्द, वाक्‍प्रचार, म्हणी मिळलेल्या आहेत. लोकपरंपरा आणि विधी जसजश्या नष्ट होऊ लागतात तशा भाषेतील अनेक संज्ञा, वाक्प्रचार, म्हणी यांचाही अस्त होऊ लागतो.
          ग्रामीण भागातील लग्न विधी परपरेत खालील गोष्टींचा समावेश होतो. यात कसमादे (नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा) पट्ट्यातील लग्न विधींचा प्रामुख्याने समावेश केला आहे : मुलगी पहायला जाणे, मुलाला आवतन द्यायला जाणे, सुपारी फोडणे, नारळ देणे, साखरपुडा, चिरामुंदी, बस्ता बांधणे, दिवट्या बुधल्या करणे, मुळ लावणे, पानसुपारी, फुलकं काढणे, बेल मांडव सांगणे, मांडव आणणे, मांडव टाकणे, आरबोर बांधणे, मांडव बेळीचे आवतन देणे, चुल्हाले आवतन देणे, भावबंदकी सांगणे, दिवटी पाजळणे, जुगूम जेवायला बसवणे,  तळी भरणे, देव घ्यायला जाणे, तेलन पाडणे, सायखेडं आणणे, फुलोरा टांगणे, देव घडवणे, देव घ्यायला जाणे, देवांचे लग्न लावणे, देव नाचवणे, हळद कांडणे, हळद लावणे, कुंवारपण फेडणे, शेवंती काढणे, रूखवत आणणे, वरमाया काढणे, पाय धुणे, वाण लावणे, वाण जिंकणे, ताट लोटी लावणे, मान देणे, साड्या नेसवणे, ओट्या भरणे, टोप्या घालणे, नवरदेव ओवाळणे, गळाभेट घेणे, मिरवणूक काढणे, कलवरी जाणे, नवरा नवरी खांद्यावर घेऊन नाचवणे, अंघोळ घालणे, नवरी वाटे लावणे, काकण पोयते बांधणे, काकण सोडणे, तोंड धुवायला जाणे, परने जाणे, खोबरे थुंकणे, गुळण्या टाकणे, वाजा वाजवत सार्वजनिक अंघोळ घालणे, नाव घेणे, मांडवफळ बसणे, सत्यनारायण घालणे, शिदोरी आणणे, शिदोरी पहायला जाणे, उलटावन पालटावन करणे, मांडवाखाली नेणे, मांडव टिपायला जाणे, चुल्ह्याला पाय लावायला जाणे, घराच्या पायर्‍या चढणे आदी परंपराचा आज लोप होताना दिसत असला तरी दुसर्‍या बाजूला अनेक अनावश्यक आणि खर्चिक परंपरा रूढ होताना दिसतात. ज्या परंपरा अनाठायी आणि पूर्णपणे व्यावसायिक झालेल्या आहेत.
          लग्न सोहळ्यांव्यतिरिक्‍तच्या अनेक लोकपरंपरा सुध्दा भाबड्या श्रध्दा आणि अंधश्रध्देतून निर्माण झालेल्या आहेत. या लोकपरंपरातूनही अनेक संज्ञा, वाक्प्रचार आणि म्हणी भाषेला मिळत असल्या तरी त्या भाषेला संपन्न करण्यासाठीच यापुढे उराव्यात. अंधश्रध्देला खतपाणी घालून त्यांचे उत्थापन होऊ नये. लोकसंग्रह आणि नाते संबध जपण्यासाठीच्या लोकपरंपरा विधी मात्र टिकून रहाव्यात असेच प्रत्येकाला वाटेल. अशी योग्य ती वर्गवारी करता येईल अशा काही‍ विधींचा उल्लेख इथे करता येईल.
          यात व्रत घेणे, चक्र भरणे, तोंड पाहण्याचा कार्यक्रम, सुखगाडी (सुखदेवता), मुलामुलींची नावे ठेवण्याची पध्दत, पाऊस येत नाही म्हणून वरूण देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी धोंड्या काढणे, तुळशीचे लग्न लावणे, जावळं काढणे, घरभरणी करणे, दिठ काढणे (दृष्ट काढणे), मर्तीक संस्कार विधी (पाणी देणे, नदीत गवर्‍या जाणे, नदीत फुलं पाठवणे, अग्नी डाग देणे, तिरडी उचलणे, खांदा देणे, राख सावडणे, अस्थि विसर्जन करणे, मयताला जाणे, वाटे लावायला जाणे, दारावर जाणे, दहावं करणे, पिंड घालणे, अकरा सवाष्णी बसवणे, दिवस घालणे, तेरावे करणे, दु:ख टाकायला आणणे वगैरे.) अंगावर गोंदून घेणे, एखाद्या वैद्याने पारंपरिक पध्दतीने रोग्याची पटोळी पाहणे, मंत्रांनी पान उतरवणे (सापाचा दंश उतरवणे), विंचू उतरवणे, इतर मंत्र- तंत्र आदी काही उग्र विधीही पहायला मिळतात. यातु विद्येचा समावेश असलेले काही अघोरी विधी आहेत.
          काही विधी वाद्याच्या चालीवर केले जातात तर काही विधी नाट्यात्मक पध्दतीने सादर केले जातात. सर्व विधीत तारतम्य दाखवून योग्य त्या पध्दतीने मध्यम मार्गाने लोकपरंपरा विधी जपता येऊ शकतात. पण अजून तरी एकतर हे टोक वा दुसरे टोक अशा पध्दतीने विधींवर भूमिका घेतली जाते. ते चुकीचे आहे. भाबड्या विधी जरूर असाव्यात पण त्यांचा बडेजाव नको.
     (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

1 टिप्पणी: