बुधवार, १४ फेब्रुवारी, २०१८

ग्रामीणांचा आहार


 
- डॉ. सुधीर रा. देवरे

     बाजरीची भाकरी आणि कोणतीही भाजी हा गावातल्या लोकांचा रोजचा मुख्य आहार असायचा. भाजीला पूर्वी या परिसरात अहिराणी भाषेत शाक म्हटलं जायचं. ऋतू कोणताही असो दररोज बाजरीची भाकर जेवणात असायची. भाकर गरम पडते वा डांजते असं कधी चुकूनही कोणाकडून ऐकायला मिळायचं नाही. आणि आजारी पडल्यावर असं निदान इथल्या डॉक्टरनेही कधी केलं नाही. या परिसरात त्यावेळी बाजरी मुबलक प्रमाणात पिकत असल्यामुळे इथल्या जेवणात बाजरीच्या भाकरी शिवाय अजून काही पर्याय असू शकतो अशी कल्पनाही कोणाला नव्हती. इथं गहूही पिकायचा. पण घरचा गहू असूनही कोणी रोज चपात्या खात नव्हतं.
     अशा जेवणा व्यतिरीक्‍त कुठ वेगळं जेवण दिसलं की ती खाण्याची चैन समजली जायची. नातेवाईकांकडे- भावबंदांकडे पाहुणे आले की पाहुण्यांना जेवण सांगण्याची पध्दत होती. पाहुण्याला त्यातल्यात्यात उजवं जेवण म्हणून भजींची आमटी, भाकर, भात, लोणचं, पापड, कांदा असं ताट भरून वाढलं जायचं. ज्या पाहुण्याला जेवायला बोलवलं त्याला कोणी बाहेर विचारलं, ‘काय जेवण होतं’, तर तो पाहुणाही केवळ भजींची आमटी न म्हणता ताट भरून आलेल्या सगळ्या जीनसांची नावं सांगायचा.
     भात हा अलिकडील जेवणात नैसर्गिक पदार्थ समजला जात असला तरी, खिचडी- भात त्याकाळी इथल्या जेवणाचा भाग नव्हता. लोकांकडे केवळ सणाच्या दिवशी सार सोबत भात खावा लागतो म्हणून दुकानातून तेवढ्यापुरता बिटेभर वा चिटेभर तांदुळ मागवला जायचा. तांदळाचे वेगवेगळे प्रकार असतात आणि त्या प्रकारानुसार त्याची किंमत ठरलेली असते हे ही त्यावेळी माहीत नसायचं. दुकानदार जो काही बिटेभर तांदूळ देईल आणि जी किंमत सांगेल तो तांदुळ भातासाठी घेतला जायचा. म्हणजे गावात तांदळाच्या व्हरायट्या दुकानदाराकडे नसत.
     भाकरी सोबत आजच्या काही भाज्या त्या काळात दिसत होत्या तरी तेव्हा रानभाज्यांचे प्रमाण जेवणात जास्त प्रमाणात होतं.
     ज्याला कदान्न म्हटलं जाईल अशा प्रकारचे पदार्थ त्यावेळी नाइलाज म्हणून खावे लागत असले तरी तो एक पारंपरिक खाद्य पदार्थांचा आणि लोकजीवनाचाच अविभाज्य भाग बनून गेला होता. म्हणून ते कदान्नही आवडीने खाल्लं जायचं. यापैकी काही पदार्थांना सणसणीत चव असायची.
सोलासनं बट्ट, सोलासनं तिखं, लसुननं तिखं, कोंडाळं, घाटा, बेसन, सुघरं भुगरं, मटमुंगना वडानं बट्ट, मिरचीना खुडा, कुळीदनी घुगरी, कुळीदना मुटकळा,‍ लोंचाना खार, मिरचीना ठेचा, काळा समार, तेलगुळना काला, चिखल्या, गुळ टाकून शिजवलेले शिळ्या भाकरीचे तुकडे अशा प्रकारचे पौष्टीक नसलेले आणि काही बेचव असलेले पदार्थ कांदा तोंडी लावून भाकरी सोबत खाऊन लोक आपल्या कामाला लागायची. झिंदरं आणि वांगानं भरीत त्यातल्या त्यात चविष्ट पदार्थ असायचे.
आता सांगितलेले अनेक खाद्य पदार्थ आज एकतर नामशेष झाले आहेत वा आपल्या ‍जीवनातून हद्दपार होण्याच्या बेतात आहेत. आजचा आहार हा समतोल आहाराऐवजी गरजेपेक्षा जास्त आणि चमचमीत चवीचा आहार दैनंदिन जेवणात घेतला जातो. मात्र हा आहार दुर्गम खेड्यातले गरीब लोक अजूनही घेत आहेत. असं कदान्न खाऊनही ते अर्धपोटीच राहतात. ज्यांची स्थिती आज मध्यमवर्गीय म्हणता येईल अशी प्रगती केलेले लोक हे पदार्थ विसरून गेले आहेत.
     (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
   इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

1 टिप्पणी:

  1. लोकजीवनाचे चित्रण भोजनानेच पूर्ण होते. आपल्याकडे महानुभाव वाड्मयातून खूप चांगल्या पद्धतीने खाद्यान्न संस्कृतीचे चित्रण येते. तुलनेने शिवकाळात ते तेव्हढे नाही. मठाच्या प्रपंचात पदार्थ कसे करावे, त्याच्या जतनाच्या पद्धती आदी गोष्टी रामदास स्वामींच्या संप्रदायात नोंदल्या आहेत. मात्र शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराज काही जेवल्याचा, कुठला पदार्थ सेवन केल्याचा उल्लेख आढळत नाही, हे विशेष.
    यादवकालाच्या मानाने हा काळ अत्यंत धकाढकीचा होता, असे म्हणण्यास अधिक वाव आहे. भूमी, भोजन, भाषा, भूशा आणि भुवन हेच लोकतत्त्वीय स्वरूपाला अधिक उजागर करू शकतात. बागलाण पट्ट्यातील आहार पद्धतीवर आपण अधिक सखोल लिहू शकता.माझे आजोळ हे बागलाण भागातील एक मान्यवर असे व्यापारी कुटुंब होते. तेथील मी अनुभवलेला आहार मला माझ्या नंतरच्या आयुष्यातही मिळू शकलेला नाही, असे आता गौरवाने म्हणतो.खूप उच्च अभिरुचिसंपन्न जीवन ते त्या काळी जगत होते असे दिसते. तुम्ही याही विषयात खोलवर जाऊ शकता. हे लोक खूप निवडक आणि महागडा म्हणता येईल अशा पद्धतीचा आहार घेत असत. हे आपणास माहिती म्हणून सांगून ठेवतो...आपले लेखन आवडते, लिहीत रहा...

    उत्तर द्याहटवा