रविवार, १४ जानेवारी, २०१८

लोकसंस्कृतीचा आदिम नाद (भाग पहिला)


 
-    डॉ. सुधीर रा. देवरे

                        लोकपरंपरेतून लोकसंस्कृती उदयास येत असते. लोकश्रध्देच्या सेतूंवरून मार्गक्रमणा करत ग्रामीण लोक आपले आयुष्य व्यतीत करीत असतात. हा समग्र पट म्हणजे लोकधारा.
                  गावांत सर्व जाती-जमातीचे लोक परंपरेने गुण्यागोविंदाने राहत आणि मामधरमच्या (नामधारी) नात्यागोत्याने एकमेकांशी बांधील असत. गावात कोणी आदिवासी असो की परंपरेने चुकीच्या लोकसमजूतीने नाकारलेले लोक. गावाबाहेर वस्ती करणारा कोणीही माणूस आपल्या आईला काकू म्हणत असे आपण एखाद्या आदिवासी स्त्रीला मावशी म्हणायचो. सगळ्यांच्या रीतिरिवाजांशी समरसून आपले बालपण अनुभवांनी समृध्द होत गेले.
       आमच्या घराच्या बाजूलाच उतार उतरून गेलं की कान्हेरी नदी वहायची. तेव्हा ती बाराही महिने एका धारेने का होईना वहायची. माझ्या अनेक मित्रांबरोबर मी नदीवर अंघोळीला जात असे. केव्हा बंधार्‍यात, केव्हा टाकळीत, केव्हा पाटात, केव्हा चुहेलीत तर पूर येऊन गेल्यावर नदीतच आम्ही अंघोळ करत असू. अनायासे भील लोक मासे खेकडी कसे पकडतात याचेही अवलोकन करता येत होतं.
      भोवरा, गोट्यागोट्या, टिपाटिपी, कबड्डी, चिलापाटी, लपालपी, घोडाघोडी, हत्तीची सोंड, विटीदांडू, डीबडीब, कोयीकोयी, आंधळी कोशींबीर, गो गो रानी, खोपा खोपी, आळे आळे, आळीसुळी, सरगोंडी, चकरी असे अनेक खेळ आम्ही दाराशीच खेळत असू. दारासमोर मराठी शाळा तिचे विस्तृत पटांगण होतं. त्याला लागूनच मारूतीचा पार होता. अशा प्रचंड जागेचा पुरेपुर उपयोग आम्ही मुलं खेळासाठी करीत होतो.
आमच्या गावाला भोवाडा हा लोकोत्सव सलग तीन रात्रभर चालत असे. दिवसा अजिबात झोप घेता मी सलग तीन रात्री जागून संपूर्ण भोवाडा पाहत असे. खंडोबाचा आढीजागरणाचा कार्यक्रम असाच रात्रभर चालायचा. आढीजागरणासारखंच आखाजींची गाणी, झोक्यावरची गाणी, लग्नातली गाणी आदी सर्वप्रकारची लोकगीते तोंडीपाठ असत. आषाढी अमावस्येला गावातील पद्मनाभ स्वामी समाधीत एक लळित होत असे. जेवणखावन विसरून मी तो कार्यक्रम पूर्ण पाहायचो. मन हरखून जायचं. सर्व लोककलांची अस्सलता त्या बालवयातही लक्षात येत होती.
      कानबाई, रानबाई, गौराई, काठीकवाडी, आईभवानी, आसरा, खंडोबा, आढीजागरण, म्हसोबा, रोकडोबा, वीरदेव हे लोकदेव गावाच्या आजूबाजूला पहात होतो. त्यांचे उत्सव पहात होतो. उग्र उपासना पध्दत अनुभवत होतो. गोंधळी, मरीआई, वासुदेव, रायरंग, नंदीबैलवाले, टिंगरीवाले, नाव ओळखणारे, नाथबोवा, गारूडी, डोंबारी यांच्या कला-नकला, आवाज, गाणे, वाद्य ऐकून नकळत एक स्वतंत्र दृष्टी तयार होत होती. हे विश्व वेगळे आहे, आदिम आहे आणि आपण त्यात संमोहीत होऊन आकर्षिले जात आहोत, याची जाण तेव्हाही असे.
            डोंगर्‍यादेवाचा उत्सव असो, चिरा बसवण्याचा कार्यक्रम असो, धोंड्या होऊन पाणी मागण्याचा कार्यक्रम असो, आखाजीचा बार असो, भिलांचा तोंड पाहण्याचा कार्यक्रम असो, लग्नाचा नाच असो, होळीचा शिमगा असो, कुठे भजन असो वा कीर्तन, राजकीय प्रचाराची सभा असो वा कलापथक, गावातील भारूडांचा कार्यक्रम असो की तमाशा, स्वाध्याय असो की सर्कस अशा सर्व गावसभा, गाव कार्यक्रम वा आदिवासी लोकोत्सव असो दिवसभर तहानभूक विसरून भावनिकदृष्ट्या त्यात सामील असायचो. मी भिलाटीतल्या गावातल्या सर्व कार्यक्रमांचा पहिला प्रेक्षक.
आमचं घर गावाच्या वरच्या म्हणजे पश्चिम दिशेला होतं. जिथे कान्हेरी नदीचा उतार लागत असे. उताराच्या ढेंगड्यांवर आमच्या घरापासून हाकेच्या अंतरावर भिलाटी वसलेली होती. भिलाटीत कोणताही कार्यक्रम असला की आम्हाला तो आल्हाद ऐकू यायचा आणि असा आवाज ऐकू येण्याचा उशीर मी लगेच भिलाटीत हजर व्हायचो. तेथील सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना माझी हजेरी असायची. भिलाटीत लग्न असो, डोंगर्‍या देवाचा उत्सव, थाळीवरची कथा, लग्नातील ढोलावरचे नाच पावरी गीते, भिलाटीतील रात्रभर चालणारी होळी, खंजिरी, तुणतुणे, सांबळ, ढोल, पावरी ह्या वाद्यांच्या सानिध्यात अशीच रात्र रात्र जागून नाच- वाद्य पहात- ऐकत असे. गावात डोंबांर्‍याचा खेळ आला की ते कलाकार भिलाटीत मुक्कामाला उतरत आणि दुसर्‍या दिवशी त्यांचा पहिला खेळही भिलाटीतच होत असे.
मार्गशिर्ष महिण्यात डोगंर्‍या देवाचा उत्सव दर वर्षी भिलाटीत पंधरा दिवस चालायचा. तो कार्यक्रम मला खूप भयंकर वाटायचा. त्यांचे नाच, गाणे, अंगात घेणारे देवभक्‍त, वारं, त्यांचा अवतार, त्यांची शिस्त, वाद्य, आदिम आरोळ्या, हुंकार, धवळीशेवर, टापर्‍या, तोंडाने वाजायच्या पुरक्या, ठेकाने वाजवायच्या टाळ्या, या सर्वांनी मी जागीच हरकून जायचो. गावखळी बसवायची पध्दत, थोम गाडायची पध्दत, त्यांचे आचार, पथ्य, वेश अशा सगळ्या बारीकसारीक गोष्टींकडे माझं ध्यान असायचं. ह्या आचरन पध्दतीतील नवे शब्द व्यवहारात ऐकायला मिळायचे नाहीत. या सर्व गूढ वाटणार्‍या गोष्टींमुळे मी त्यांच्याकडे कसा ओढला गेलो हे मलाही कळलं नाही. (पूर्वार्ध.)
      (महाराष्ट्र टाइम्स नाशिकच्या लोकधारा सदरात प्रकाशित झालेल्या लेखाचा संपादित अंश. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह  ब्लॉगचा  संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
   इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा