गुरुवार, १४ डिसेंबर, २०१७

'संस्कृती आणि समाज’


- डॉ. सुधीर रा. देवरे

          आज संस्कृती हा शब्द कोणी नुसता उच्चारला तरी आपण त्या व्यक्‍‍तीकडे चमकून पहावे अशी या शब्दाची जादू वा दहशत निर्माण झाल्याचे लक्षात येते. देशात किमान ज्या बाबींचे राजकारण होऊ नये असे वाटते त्या गोष्टींचेही राजकारण होऊ लागल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. अनेक  व्यक्‍तिगत बाबींचे राजकीयकरण होऊन त्यावर राजकारण करणे सोपे झाले आहे. आज संस्कृती या संज्ञेचेही राजकीयकरण अगदी ठरवून होत असल्याचे लक्षात येते, नव्हे संस्कृती हा राजकारणाचा प्रमुख मुद्दा होऊ पहातोय की काय अशी शंका येऊ लागते. त्यामुळे एखाद्या विचारवंताला, कलावंताला वा साहित्यिकाला हा शब्द उच्चारताना आपण प्रतिगामी तर ठरणार नाही ना अशी भीती वाटू लागली, ही वस्तुस्थिती आहे.
            जगात आज भौतिक विकास, तंत्रज्ञान आणि नवनवीन वैज्ञानिक शोध यांचे ज्या पध्दतीने झपाटीकरण होत आहे, जगातील सर्व नागरिक अशा विकासामुळे जसजसे सुखासीन होताना दिसतात त्याच वेगाने ते आपल्या कालबाह्य पूर्व परंपरांना अतोनात चिकटताना दिसतात. या मागे धार्मिक कट्टरता, मूलतत्ववादी दूराभिमान, सनातनी विचारसरणी कार्यरत आहे. अशा तथाकथित तत्वज्ञानाचा जे लोक प्रचार आणि प्रसार करतात ते सुध्दा जगातील अव्वल विकसित सायन्स आत्मसात करूनच दहशतवादाचा आसरा घेताना दिसतात. आपल्या धार्मिक, सनातनी आणि कालबाह्य विचारांचा आग्रह करताना आपण जी शास्त्रीय तंत्रासह शस्त्रास्त्रे वापरतो आहोत ती मात्र आपल्या धर्माची नाहीत - आपल्या संस्कृतीने आपल्याला ती बहाल केलेली नाहीत तरीही आपण त्याचा अंगिकार करतो याची त्यांना सुतराम जाणीव नसावी का? उलट ज्यांच्या विरूध्द आपण ही शस्त्रास्त्रे वापरतो त्यांच्यापैकी काहींची ही निर्मिती असूनही ती शस्त्रास्त्रे अशा जहालवादी संस्कृती रक्षकांची कवचकुंडले असल्यासारखी ते कायम आपल्याजवळ बाळगतात. आणि आपल्या विचारधारेच्या विरूध्द असलेल्या लोकांना अमानुषपणे मारण्यासाठी त्यांचा वापर करतात.
            ही गोष्ट उदाहरणे देऊन जास्त स्पष्ट होईल. उदाहरणार्थ, एखादी तालिबानी वा आयएसआयएस संघटना ठरवते की मुलींनी शिक्षण घेऊ नये, पाश्चात्य कपडे घालू नयेत, सार्वजनिक पार्ट्यांना जाऊ नये, मोबाईल फोन वापरू नयेत, वगैरे वगैरे. मात्र त्याचवेळी हे दहशतवादी लोक स्वत: पाश्चात्य एके 47 बंदूका वापरतात. पाश्चात्य बाँब वापरतात. अत्याधुनिक मोबाईल फोन वापरतात. प्रवासाला पाश्चात्य गाड्या वापरतात, विमाने वापरतात. हेच उदाहरण भारतातील काही सनातनी लोकांना लागू होईल. तथाकथित सनातनींचे म्हणणे आहे की भारतात वैदिक शिक्षण द्यावे. गुरूकुल पध्दत असावी. मात्र हे सनातनी स्वत: पाश्चात्य शिक्षण घेतलेले उच्चशिक्षित असतात. आपल्या आश्रमरूपी महालात एसी वापरतात. पाश्चात्य लोकांनी शोध लावलेली विजेची उपकरणे- दिव्याचा प्रकाश वापरतात. सारांश, जगाच्या पाठीवर जे तथाकथित संस्कृतीचे रक्षक म्हणून वावरतात तेच मुळात ढोंगी आणि लबाड असल्याचे लक्षात येते.
            जे वैश्विक ठरतात त्यांनाच संस्कार म्हणता येतील. तसेच ज्या संस्कृतीचे गोडवे गाताना जगातील कोणत्याही कानाकोपर्‍यात आपल्याला संकोच वाटणार नाही ती खरी संस्कृती असते. जगातील कोणतीही उदार संस्कृती कोणालाही हवीहवीशी वाटते. म्हणूनच आपण भारतीय असूनही इजिप्त आणि ‍ग्रीक संस्कृती आपल्याला परकीय वाटत नाही. मूळ भारतीय वा सिंधू- हिंदू संस्कृती अशीच सहिष्णु आहे की जगातील कोणत्याही कानाकोपर्‍यात तिचा अभ्यास करावासा वाटावा. जिथे दहशती पाशवी बळजबरी असते, ती संस्कृती नसून विकृती ठरते.
            प्रत्येक कलात्मक आविष्कारावर स्थानिक संस्कृतीचे प्रतिबिंब पडलेले असते. राजा इडिपस हे ग्रीक नाटक तत्कालीन संस्कृती, श्रध्दा, समज, चालीरीती या गोष्टींवर उभे आहे. तत्कालीन संस्कृतीचे काही मूल्य नसते तर या नाटकात दाखविल्याप्रमाणे एवढी मोठी शोकांतिका घडली नसती. सारांश, या नाटकातून तत्कालीन ग्रीक संस्कृतीवर प्रकाश पडतो. शेक्सपियर यांच्या नाटकातूनही तत्कालीन युरोपियन संस्कृती दृगोचर होते. शेक्सपियरकालीन समाजातील लोकरूढी, लोकश्रध्दा, सांस्कृतिक अंत:प्रवाह, सामाजिक स्तरभेद यांचे आकलन होते. व्हॅन गॉफ आणि गोगां या चित्रकारांच्या चित्रातून, त्यांनी ज्या आदिवासींमध्ये वास्तव्य केले त्या बेटांवरचे सांस्कृतिक दर्शन आपल्याला होते. थोडक्यात, शिल्पकला, चित्रकला, वाड्‍मय यातून त्या त्या काळातील जीवनदर्शन चिन्हांकित झालेले दिसते. ही चिन्हे उलगडली तरी त्याकाळच्या समाजजीवनाच्या सांस्कृतिक स्वभावाचे दर्शन आपल्याला घडू लागते.
            पंथ, संप्रदाय यांचा कलाविष्कारांशी येणारा संबंध फार जवळचा असतो. प्राचीन आणि अर्वाचीन कला तर कुठल्यातरी धर्म, पंथ, संप्रदाय यांच्या प्रसारासाठीच अस्तित्वात आल्या असे त्यांच्या अभ्यासावरून सहज लक्षात येते. भव्य मंदिरे, मशिदी, ताजमहाल, चर्च, स्तूप अशा वेगवेगळ्या धर्माच्या धार्मिक वास्तू या उत्कृष्ट कलाकृती वा वास्तुकला आहेत.
            भारतातील जातककथांवर आधारलेली वेगवेगळी शिल्पे पाहिलीत की त्या कशा उत्तम दर्जाच्या कलाकृती आहेत हे स्पष्ट होते. उदा. घारापूरी, अजिंठा, वेरूळ, कार्ले, अमरावती इत्यादी. ओरिसातील सूर्यमंदिर, जगन्नाथ मंदिर, मध्यप्रदेशातील खजुराहो, दक्षिण भारतातील अनेक हेमाडपंथी मंदिरे ही उत्तम कलाकृतीची उदाहरणे आहेत. तीच गोष्ट वाड्‍मयात दिसते. जगातील आद्य वाड्‍मय कुठल्यातरी मताच्या प्रचारासाठी लिहिले गेले आहे, असे म्हटले तर अतिशयोक्‍‍त होणार नाही. पण या प्रचारात उदारमतवादी दृष्टीकोन होता. रामायण, महाभारत आणि इलियड ही जागतिक महाकाव्ये आहेत. हे ग्रंथ निखळ काव्य निर्माण करण्यासाठी लिहिली गेली नाहीत. तसेच गीता, कुराण, त्रिपिटीक, बायबल, झेंद, अवेस्ता (पारशी), झेन, ताओ, अरण्यके, पिटके, जैन आगमे (जैन), गुरू ग्रंथसाहेब हे ग्रंथही केवळ काव्य नाहीत तर वास्तव जीवनाच्या तत्वज्ञानाने ते ओतप्रोत भरलेले आढळतात.
            ज्ञानेश्वरीही केवळ काव्यासाठी लिहिली गेली नाही, तुकारामाची गाथा केवळ काव्य नाही. या दोन्ही ग्रंथांत काव्य, तत्वज्ञान, तत्कालिन सामाजिकता, तत्कालिन बोली भाषेचे बळकट भान उपयोजित झाल्याचे लक्षात येते. आणि सर्वसामान्य माणसालाही ह्या संतकाव्यात देव दिसतो. लिळाचरित्र हा ग्रंथ उत्तम वाड्‍मयीन आविष्कार आहे, पण तो उदयास येण्याचे कारण महानुभाव पंथाचा प्रसार हे आहे. यातून असे स्पष्ट होते की, पंथ, संप्रदाय, धर्म, संस्कृती यांचा कलाविष्कारांशी नुसता वरवरचा संबंध नसतो तर तो खूप खोल आणि घनिष्ट असतो. आधी कलाबाह्य उद्दिष्टे आणि मग कलात्मकता प्रतीत झालेल्या अनेक कला अभ्यासांती आपल्या निदर्शनास येतात.
            जगात सर्वत्र कलावंत आणि राजकारणी यांच्यात नेहमी वैचारिक युध्दे होत असतात. राजकारणी सुसंस्कृत असतील तर ते साहित्यिकांच्या कलाने राज्यव्यवहार चालवतात. राजकारणी लोकांना कलावंतांशिवाय पुढे जाता येत नाही. राजकारणी कलावंतांना- साहित्यिकांना डावलून आपला अजेंडा राबवायला लागलेत की समजावे आपण हुकुमशाहीकडे निघालोत. विशिष्ट हेतूने संस्कृतीच्या रक्षकांनी दहशतवादाचा पुरस्कार केल्याने त्यांची संस्कृती तर वाढत नाहीच पण दुसर्‍या संस्कृतीवर दहशत निर्माण झाल्यामुळे परसंस्कृतीतील जाणकार आणि सुजान लोक ह्या संस्कृतीसाठी आपली दारे बंद करतात, अशा पाशवी वा दहशती बळाचा वापर करणार्‍या संस्कृतीपासून सुज्ञ लोक भयाने लांब जातात. आद्य कलावंतांनी, धर्मप्रसारकांनी आपल्या धर्माचा- संस्कृतीचा जगभर प्रसार व्हावा या हेतूनेच ग्रंथ निर्मिती केली, चित्रे- शिल्पे यांसारखी कला उपयोजित केली तरी ती काळाला पुरून उरून आज सर्वत्र चिरंजीव झाल्याचे दिसते. जगभरातले महत्वाचे काही चर्च, काही मशिदी, काही मंदिरे, काही स्तूप याची साक्ष देतात. काही कोरीव लेण्या, शिल्पकला आणि विविध चित्रकलाही याची साक्ष देतात. महाभारत, रामायण, इलियड, कुराण, त्रिपिटीक, ‍गीता अशी  वाड्‍मयीनदृष्ट्या श्रेष्ठ महाकाव्यही जगात वाचली जातात. याचे कारण त्यांच्यामध्ये उपयोजित झालेली विशाल मानवी संवेदनशीलता. मग वाचणारी व्यक्‍‍ती कोणत्याही धर्माची असो. दिवाळीच्या रात्री सर्वत्र प्रकाशाचा शीतल झगमगाट असतो, जो जगातील कोणत्याही कोपर्‍यातल्या माणसाला आनंद देईल. पण जाळपोळीत होरपळणार्‍या लोकांचा आक्रोश आणि अशा आगींच्या ज्वाळांचा प्रकाश जगातील कोणत्याही माणसाला आनंद देणार नाही.
            सारांश, कोणतीही संस्कृती जशी बंदूकीच्या धाकाने वाढणार नाही, तशी तत्कालीन मतांच्या फायद्याने निवडून येण्यासाठी कोणत्याही देशाच्या राजकारणात दिर्घकाळ टिकणार नाही. अशा गोष्टींचा सामान्यातल्या सामान्य माणसालाही एक दिवस उबग येईल. यापुढे अशीच संस्कृती टिकेल की जी वैश्वीक धर्माचा पुरस्कार करील. जिचा कल मानवतावादाकडे झुकेल. संस्कृतीचा जिथे जिथे संकुचित कारणासाठी कोणी आसरा घेईल तिथे तिथे ती नाकारली जाईल हे निश्चित.
            जेव्हा व्हॅटीकन सिटीतले पोप भारतातील मदर तेरेसांना संत म्हणून घोषित करतात तेव्हा ते कितपत बरोबर आहे वा चूक या फंदात आपण पडत नाही. कारण ही संत म्हणून घोषित करण्याची परंपरा त्या व्यक्‍तीच्या चमत्कारांवर अवलंबून आहे, आणि आपण चमत्कारांचे उदात्तीकरण करणार नाही की अंध्दश्रध्देचे समर्थन करणार नाही. पण मदर तेरेसांच्या सा‍माजिक कामांना आपल्याला कमी लेखता येणार नाही मग त्यांचा उद्देश कोणताही असो. म्हणून संतत्वापेक्षा त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर होते त्यावेळी आपणा सर्वांना जो आनंद झाला होता, ती खरी संस्कृती असते. ताजमहालला जगातील सात आश्चर्यांमध्ये स्थान मिळाल्यावर जो आपल्याला निखळ आनंद मिळतो ती खरी संस्कृती असते. धर्मांध दंगलीत एखादा हिंदू एखाद्या मुस्लीमाचा जीव वाचवतो वा एखादा मुस्लीम एखाद्या हिंदूचा जीव वाचवतो ती खरी मानवतावादी वैश्विक संस्कृती असते.
      (‘सावाना 2017 दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह  ब्लॉगचा  संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
  इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा