बुधवार, ३१ मे, २०१७

विवाह: परंपरा आणि प्रतिष्ठा

-         डॉ. सुधीर रा. देवरे

      विवाह कसे छोटेखानी असावेत, लग्न खर्च कसा कमी असावा, हुंडा घेणे बेकायदेशीर आहे अशा चर्चा नेहमी ऐकू येतात. पण प्रत्यक्षात परंपरा टाळण्याची उदाहरणे क्वचितच पहायला मिळतात. हा लेख दुसर्‍याला सांगण्यासाठीचा केवळ उपदेश नाही. आत्मप्रौढीचा दोष पत्करून मी माझ्या मुलीच्या विवाहाबद्दल बोलतो. (आधी केले मग सांगतोय):
      माझ्या मुलीचा विवाह ठरवताना मुलीच्या संमतीने मी काही अटी घातल्या होत्या. हुंडा देणार नाही, सोने-नाणे नाही, मानपान नाही, वरमाया नाही, वाजंत्री नाही, मिरवणूक नाही, घोडा नाही, पत्रिका नाही, गर्दी नाही, आहेर नाही, फटाके नाहीत आणि लग्न साध्या पध्दतीने फक्‍त दोन कुटुंबातील माणसांत लावायचे. ज्या ज्या कोणाला ह्या अटी मान्य असायच्या त्यानांच फक्‍त घरापर्यंत येऊ दिले.
      अटी ऐकून नातेवाईक आणि मित्र म्हणायचे, असे शक्य होणार नाही. तुम्हाला माघार घेऊन तडजोड करावी लागेल. मी ठाम राहिलो. शेवटी माझ्या अटी मान्य करणारे चांगले स्थळ मिळाले. चांगली माणसं मिळालीत. मुलीने साथ दिल्यामुळेच मला असे करता आले.
      मुलीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी मी मांडव घातला नाही. म्हणून एक वा अर्धे हिरवंगार झाड वाचले. वाजंत्री लावली नाही. म्हणून आजूबाजूच्या भागात ध्वनी प्रदुषण झाले नाही. नवरदेवाकडचे लोक सायखेडं घेऊन येतात त्यांना नाही म्हणालो. त्यांची दगदग वाचली. नातेवाईकांना आणि मित्रांना मांडव आणि लग्नासाठी दोन दिवस द्यावे लागले असते. त्यांचा एक दिवसाचा वेळ वाचला. घरच्या घरी हळद लावली. (हळद लावण्याचा कार्यक्रम आता कमर्शिअल झाला आहे). अशा बारीक सारीक अनेक बाबी सागंता येतील. असो.
      पूर्वी तीन दिवसाचे लग्न असायचे. तिसर्‍या दिवशी नवरदेव- नवरी तोंड धुवायला जाणे, मांडवफळ (आहेराचा कार्यक्रम), घरोघर चहापाणीला जाणे, गावभर मिरवणूक वगैरे. लग्नातला हा तिसरा दिवस आता लुप्त झाला. त्याप्रमाणे लग्नाआधीच्या दिवसाचा मांडव कार्यक्रमही बंद व्हायला हवा.
      हुंडा विरोधी कायदा 1961 ला झाला आणि हुंडा घेणे हा कायदेशीर गुन्हा आहे, हे प्रत्येकाला माहीत असलं तरी छुप्या पध्दतीने सौदे केले जातात. (मुलीच्या विवाहानंतरही काही वर्ष प्रथेच्या नावाखाली अनेक प्रकारच्या न परवडणार्‍या बोळवणी करत रहाव्या लागतात. हा ही एक हुंड्याचाच प्रकार आहे.) वधू आणि वर यांचे सामाजिक स्थान एकच असताना वराकडील लोकांना मानपान देण्याचा प्रकार कधीपर्यंत चालणार. आज काळ बदलला. मुलींची संख्या घटली. (मुलींचीं संख्या कमी होण्यामागे अशा फालतू प्रथाच कारणीभूत आहेत!) मुलांप्रमाणे मुलींचे उच्च शिक्षण केले जाते. शिक्षणाला पैसा लागतो. स्त्रियाही आयुष्यभर पुरूषांसारख्याच नोकर्‍या- व्यवसाय करून कुटुंबासाठी पैसे कमवतात, (तरीही स्वयंपाक, धुणी, भांडी, झाडझुड, स्वच्‍छता, मुलांचे संगोपन अशी बरीच कामं फक्‍त महिलांचीच). समजा हुंड्याची प्रथा उलटी करण्यात आली. म्हणजे मुलाने मुलीला हुंडा द्यायचा, तर वधूपिता हुंडा घेईल का? नाही घेणार. त्याला ते लज्जास्पद वाटेल. तसे वराकडील लोकांना हुंडा घेणे कमीपणाचे वाटले पाहिजे. (मुलांकडून मुलीने हुंडा घेतला पाहिजे अशी टोकाची भूमिका न घेता मुलाने मुलीकडून हुंडा घेऊ नये.)
      विवाह खर्च वधूच्या वडलांनीच का करावा? लग्नात भरमसाठ खर्च करू नये. थोडाफार करायचा झाला तर तो दोन्ही कुटुंबांनी का करू नये. मुलगी आणि मुलगा असा आज भेद करायचा नसेल तर यापुढे आजपर्यंत चालत आलेल्या चुकीच्या प्रथांविरूध्द ठाम राहून बंड करायला हवे.  
      लग्नाच्या पंक्‍तीत जेवणावर प्रंचड खर्च केला जातो. पण वाया जाणार्‍या अन्नावर कोणीच बोलत नाही. पत्रावळीत मावत नाही इतके पदार्थ बनवले जातात. अन्न तसेच टाकून लोक निघून जातात. बफे जेवणामध्ये अन्न वाया जात नाही असा समज आहे. पण सर्वात जास्त अन्न बफे जेवणात वाया जाते. लोक हवे तसे प्रचंड वाढून घेऊन उरलेले अन्न टाकून देतात. भारतात वीस कोटी लोक रोज अर्धपोटी वा उपाशी झोपून जातात. या पार्श्वभूमीवर लग्नातल्या जेवणावळीकडे पहावे म्हणजे यातली भयानकता दिसून येईल.
      काही पैसेवाले लोक आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी लग्नात भरमसाठ पैसा खर्च करतात. समाजात त्यांचा कित्ता गिरवत ज्यांची ऐपत नाही ते लोकही शेती विकून- कर्ज काढून मुलींचे लग्न करतात. समाजातल्या अशा वाईट प्रथा घालवण्यासाठी प्रत्येकाने आपल्यापासून सुरूवात करायला हवी.
      (या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा