मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१७

नवे नवे शोध
- डॉ. सुधीर रा. देवरे

      मी आठवी नववीत असेल तेव्हा. एका लहानश्या विरगाव नावाच्या खेड्यातल्या मराठी माध्यमाच्या शाळेत ‍शिकत होतो. शाळेत आम्ही काही मित्र त्यावेळी स्वत:ला हुशार समजत होतो. पहिला नंबर मिळवण्यासाठी आमच्यात स्पर्धाही असे. विज्ञानाच्या रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र या तिन्ही शाखा तसेच भूगोल, खगोल, गणित अभ्यासताना आतापर्यंत लागलेल्या विविध शोधांवर आमचं एकमेकांमध्ये बोलणं व्हायचं. अशा प्रकारची एकदा शोधांची चर्चा सुरू असताना एक मित्र सहज बोलून गेला,  आपल्या जन्माआधीच शास्त्रज्ञांनी सर्व शोध लावून ठेवलेत. एखादा शोध लावायला आपल्याला मागं काहीच शिल्लक ठेवलं नाही. असं त्या मित्राने म्हणताच आम्ही काही मित्रांनी त्याची री ओढत आमच्या हुशारीच्या समजुतीमुळे त्याच्या या सिध्दांताला दुजोरा दिला. पण दुसरा मित्र शंका घेत म्हणाला, सर्व शोध म्हणजे नक्की कोणकोणते शोध? असा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे उदाहरणार्थ आठवतील तसे काही शोध आम्हा सर्व मित्रांकडून आळीपाळीने सांगितले गेले: सूर्य मालिकेत नऊ ग्रह आहेत, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पृ्थ्वी स्वत:भोवती फिरते, गुरूत्वाकर्षण, वनस्पती सजीव असतात, पेन, कागद, सायकल, मोटार, रेल्वे, घड्याळ, रेडिओ, ‍औषधे, टाइपरायटर असे सर्व शोध आपल्या पुर्वजांनी लावून ठेवलेत. विमान आकाशातून जाताना लहान का होईना पण पाहता येत होतं. टीव्ही, टेलिफोन यांच्याबद्दल अभ्यासक्रमात उल्लेख येत असले तरी प्रत्यक्षात ते कसे असतात हे आमच्यासहीत कोणालाही गावात माहीत नव्हतं. आपल्याला माहीत असलेल्या शोधांव्यतिरिक्‍त अजून काही नवे शोध लावता येऊ शकतात हे त्यावेळी आमच्या बालबुध्दीला माहीत नव्हतं. जे शोध लावले गेले होते त्यापैकी कदाचित आपणच एखादा शोध लावला असता असा बालीश भ्रम आमच्या मनात होता. नवीन शोध लावायला पूर्वीच्या शास्त्रज्ञांनी आपल्यासाठी काही शिल्लक ठेवलं नाही, अशी आम्ही स्वत:ची समजूत करून घेत होतो. म्हणजे आता मानवजात परिपूर्ण झाली असा आमचा त्यावेळी बाल समज झाला होता.
      आमच्या या गोंडस गैरसमजुतीला पुष्टी देण्यासाठी आमच्या आजूबाजूच्या मोठ्याधाट्या वृध्द माणसांकडून सुध्दा असंच काहीतरी सुचक ऐकायला मिळत होतं. (आज भाषा बदलली आहे, बाकी सारांश तोच. सर्व जग ग्लोबल झालंय. सर्वत्र नवता आलेली आहे. तो आमच्या बालपणातला जुना रम्य काळ आता राहिला नाही. अशी ओरड आज ऐकू येते. अशा अर्थाचं आज जे बोललं जातं, तसं त्या काळीही वडीलधारी मंडळी वेगळ्या शब्दात आम्हाला त्या काळाविषयीची तक्रार ऐकवीत असत.)
      माझ्या लहानपणी म्हणजे साधारणत: पस्तीस- चाळीस वर्षांपूवी सुध्दा आजी आजोबांसारख्या वृध्दांकडून त्याकाळी असंच ऐकत होतो, की आता जग बदललं आहे. माणूस चंद्रावर पाऊल ठेऊन आला. काही खेड्यांमध्ये वीजेचे दिवे येऊ लागले होते. काही घरांमध्ये रेडिओ आले होते. मनगटावर घड्याळे चमकू लागली होती. पायी जाण्याऐवजी सायकली येऊ लागल्या होत्या. गावापासून दहा बारा किलोमीटरवरच्या तालुक्याच्या गावी चुली- स्टो ऐवजी गॅसवर स्वयंपाक होऊ लागला, असं कानावर येऊ लागलं होतं.
      आज मोटार, रेल्वे, घड्याळ, रेडिओ, ‍औषधे अशी सगळी नावं तीच असली तरी त्यात किती प्रकारचे सूक्ष्म शोध लागून ते टोकदार झालेत. शोध शॉर्प झाले. मोटारी विविध प्रकारच्या आल्यात. रेल्वे आपल्या गतीसह कितीतरी आधुनिक झाली. मेट्रो- बुलेट ट्रेन आल्यात. विमान- हॅलिकॉप्टर लांबून पहायला मिळायचे. आता आपल्यापैकी अनेक लोक त्यात प्रवास करू लागलेत. फ्रिज, टीव्ही, टेलिफोन जीवनाचे अविभाज्य भाग झालेत. आधीचे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही रंगीत झाले. मोठे झाले. वजनाने जड होते हलके झाले. एलसीडी, एलइडी अशी अनेक परिवर्तनं झालीत. टेलिफोन मॅन्युअल होता तो आता काँप्युटराइज्ड झाला. मोबाईल नावाची गोष्ट तर त्यावेळी ऐकूनही माहीत नव्हती. ती आता प्रत्येकाच्या हातात आणि खिशात आहे. आज मोबाईल हा आपल्या शरीराचा एक अविभाज्य अवयव झाला आहे. ब्लॅक मोबाईल होता तो रंगीत झाला. स्क्रिनटच झाला. अँड्रॉइड झाला. टीव्हीबद्दल शालेय जीवनात म्हणजे बालपणातच ऐकत होतो. टीव्हीचा शोध कोणी लावला याचे उत्तर एका सेंकदात आम्ही देत होतो, तरी प्रत्यक्ष टीव्ही कसा असतो हे पहायला पंच्चाऐशी साल उजाडले. त्यावेळी आम्ही युवक झालो होतो. संगणकही आम्ही शालेय जीवनात ऐकला नव्हता. महाविद्यालयीन काळात संगणक हा शब्द कानावरून जाऊ लागला पण तो पहायला मिळत नव्हता. 1985 सालानंतर भारतात संगणक कुठं कुठं येऊ लागला. 1990 नंतर मोठ्या प्रमाणात आला. आणि तालुका पातळीवर पोचायला 1995 साल उजाडले. तरी हे संगणक कॅफेमध्येच वापरता येत. संगणक घराघरात यायला एकविसावे शतक उजाडावे लागले. आता संगणकांच्या सर्व पिढ्या पहायला मिळाल्या. अगदी प्राथमिक अवस्थेपासून तर आताच्या फाष्ट युगापर्यंत. यात लॅपटॉप, टॅब आदी अनेक प्रकार आहेतच.
      इंटरनेट हे सुध्दा आम्हाला शालेय जीवनात कधी माहीत नव्हतं. त्याने आज क्रांती घडवली. पुढची पायरी वायफाय आणि आता लायफाय सुध्दा. सोशल नेटवर्कचा जन्म अलिकडचा. फेसबुकचा जन्मच मुळी 4 फेब्रुवारी 2004 सालचा. व्टिटर आलं. व्हॉटस अॅप तर अजून बाळच आहे. हे थांबणार नाही. प्रगती सुरू राहील. शोध सुरू राहतील. कोणताच शोध विशिष्ट पातळीवर थांबत नाही. त्यात प्रगती होत राहते. गती वाढत राहते.
      म्हणजे काल जे नवं वाटत होतं ते आज जुनं झालं आहे. अ‍ाणि आज जे काही नवं आहे ते उद्या जुनं होणार आहे. रोज नवे शोध लागताहेत. नवं शोधायला काही उरलं नाही अशी तक्रार करायला आज जागा राहिली नाही. अशी प्रचंड प्रमाणात जगाची भौतिक प्रगती होत राहणार, होत आहे. पण समाजातला शेवटचा माणूस कुठे आहे, यावरून आपल्या समाजाची खरी प्रगती ठरत असते. असा शेवटचा माणूस समजा उद्या ग्लोबल झालाही, तरी (आजच्या जातीय- धर्मिय संकुचित घडामोडी आणि अंधश्रध्दा पाहता) तो विचारांनी पुरोगामी होईल का? शास्त्रीय दृष्टीकोनाचा आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकार करेल का? वा पुढे कधीतरी तसा तो होण्याच्या दिशेने प्रवास करेल का? हा खरा प्रश्न आहे.
            (या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  - डॉ. सुधीर रा. देवरे          
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा