शनिवार, ३१ डिसेंबर, २०१६

गांझोल्यांचा पोळा

 - डॉ. सुधीर रा. देवरे

            मागच्या दारातून पुढच्या दारी येण्यासाठी एक बोळ होता. ओसरीत पाव्हणे रावळे असले तर मागच्या दाराने निघून पुढच्या दारी येता येत असे. ओसरीत आण्णा असले तर खेळायला जाण्यासाठी मागच्या दाराने मी हळूच निघून जात असे. ह्या बोळातून तसे खूप लोक वापराचे. विशेषत: स्त्रिया. बोळाच्या दोन्ही बाजूच्या भिंती मातीच्या रद्दयाच्या म्हणून त्या भिंतीना मोठमोठे नळे आणि भगदाड पडलेले होते.
      अशाच एका नळ्यात गाझोंल्यांचा (गांधील माश्यांचा) पोळा तयार झाला होता. हा नळा मोठ्या माणसांच्या डोक्याइतक्या उंचीवर होता. होता होता या गांझोल्यांचा पोळा खूपच वाढला. बोळातून वापरणार्‍यांना गांझोल्यांनी नको नको करून सोडले होते. कोणाच्या हाताला माशी चावायची तर कोणाच्या मानेला. कोणाच्या कानाला चावत असे तर कोणाच्या ओठाला. तिकडून वापरणार्‍यांची संख्याही कमी होऊन गेली. लोक फिरून फारून लांबच्या रस्त्याने वापरायला लागलेत.
      मी गोट्या गोट्या खेळण्यासाठी बोळातूनच हळूच सटकून जायचो. एकदा मलाही गांझोल्यांनी मानेवर डंख मारला. त्या डंखामुळे मी त्या दिवसापासून गांधीलमाश्यांच्या मागे लागून गेलो. त्यांना तिथून हुसकावून लावण्यासाठी येताजाता त्या नळ्याला मी दगड मारत रहायचो. एकदा शेनच मारून फेकले. पण त्या तिथून काही जात नव्हत्या. थोड्या उठायच्या. इकडे तिकडे गोल गोल उडत रहायच्या आणि पुन्हा नळ्यात येऊन बसायच्या.
      एकदा मला एक युक्‍ती सुचली. चिखलाचा गोळा तयार करून नळा हळूच बाहेरून लिंपून देऊ असे मला सुचले. मी ही युक्‍ती लगेच अमलात आणली. दुपारची वेळ होती. आजूबाजूला कोणी नव्हतं. मी चिखलाचा गोळा तयार करून नळ्याजवळ गेलो. हळूच चिखलाचा गोळा नळ्यात दाबायला लागलो. पण नळा माझ्या उंचीपेक्षा वर असल्याने माझा हात नीट पुरला नाही. अर्ध्या नळ्यापर्यंत चिखल गेला आणि वरचा अर्धा नळा उघडाच राहिला.
       काय होतंय हे कळायच्या आत सर्व गांधीलमाश्या घोंघावत झपकन बाहेर निघाल्या आणि माझ्या संपूर्ण तोंडावर येऊन बसून कडाकड चावू लागल्या. मी जोरजोरात ओरडत होतो. दोन्ही हातांनी तोंडावरच्या गांझोल्या काढून खाली फेकायला लागलो. म्हणून हातांनाही त्यांनी चावले. कोणीच मदतीला आलं नाही. दुपारची वेळ असल्याने जवळपास कोणी नव्हत. चावून चावून केव्हातरी त्या थकून उडून गेल्या. संपूर्ण तोंडाची खूप आग व्हायला लागली. तसाच धडपडत मागच्या दाराने घरी गेलो. आरश्यात तोंड पाहिल तर मी मलाच ओळखू येत नव्हतो. तोंड सुजून फुगून लाल झालं होतं. मी कोणाला दिसणार नाही असं कपड्यांच्या बंगळीवर येऊन झोपून घेतलं. मी असा का झोपलो म्हणून आईने पाहिलं. माझं सुजलेलं तोंड पाहून ती ही घाबरली. गांझोल्यांनी चावलं म्हणून आईने माठाखालचा गाळ काढून माझ्या तोंडाला लावला. तेव्हा कुठे थोडासा थंडावा वाटला. पण तोपर्यंत तोंडातून गरम वाफा बाहेर येत आहेत असं मला वाटत होतं. तीन चार दिवस शाळा बुडवली. घरीच राहिलो. चारपाच दिवसात सुज थोडी कमी होत होत उतरली.
      आता मी गांझोल्यांचा काटा काढण्यासाठी वेगळी युक्‍ती काढली होती. गोट्या गोट्या खेळण्यात मी तरबेज होतोच. गपकन नेम धरून ढाई मारून देत होतो. म्हणून माझ्याजवळ भरपूर गोट्या साचल्या होत्या. मी सर्व मित्रांना सांगितलं, जो इथल्या जितक्या गांझोल्या मारेल त्याला मी तेवढ्या गोट्या देईन. लगेच या घोषणेचा परिणाम झाला. पुढच्या दाराच्या गटाराजवळ माशा एकेक करत पाणी प्यायला यायच्या. ज्या मुलांची पोळ्याजवळ जायची हिमंत होत नव्हती, ते गटारीजवळ माशी दिसली की मारायचे आणि माझ्याकडून गोटी घ्यायचे. तेव्हापासून चारपाच दिवसातच दहा बारा माशा मित्रांनी मारल्या होत्या.
      हे माझे गांझोल्या मारण्याचे फर्मान मित्रांकडे जिकडे तिकडे होऊन गेलं होतं. हे दुसरी गल्लीतल्या कैलासच्या कानावर गेलं. आणि तो आमच्या गल्लीत आला. बोळात जाऊन तो पोळाही पाहून आला. अणि मग मला म्हणाला, मी सगळा पोळा काढी टाका ते तू माले काय दिशी बोल?
मी म्हटलं, वीस गोट्या देईल. तो म्हणाला, पंचवीस देशील का बोल? मी म्हणालो, हो. पण तो नळाही चिखलाने तुलाच बुजवून द्यावा लागेल. तो म्हणाला, हा चाल माले कबूल शे. मी थोड्या वेळात येतो असे सांगून तो निघून गेला. आम्ही गोट्या गोट्या खेळायला लागलोत. तेवढ्यात तिकडून कैल्या लगेच आला. चंद्रयाच्या फाटीला दोन तीन फडके बांधून त्यावर रॉकेल ओतून ते तो हातात घेऊन आला होता. दुसर्‍या हातात काडीपेटी होती. त्याच्या खांद्यावर फाटका टवेल होता. त्याने तो टेंभा आमच्या समोर पेटवला. तोंडावर टॉवेल टाकून घेतला आणि गेला बोळातील नळ्याजवळ. आम्ही दुरून गमंत पहात होतो. त्याने टेंभा नळ्यावर धरला आणि चर चर असा आवाज करत पोळा जळायला लागला. गांझोल्या पेटून जळत जळत खाली पडायला लागल्या. काही उडून गेल्या. कैलासने सर्व नळा टेंभ्याने शेकून काढला. खाली अर्धवट जळालेल्या आणि अर्ध्याअधिक जळून मरून पडलेल्या गांझोल्यांचा असा गंज पडला होता. हे काम आटपून कैलासने गटारमधलाच गाळ काढून त्याने तो मातीत कालवला आणि त्या चिखलाने नळा बुंजून दिला. इतके सारे त्याने एकट्याने करूनही त्याला एकही माशी चावली नाही हे पाहून मला आश्चर्य वाटलं.
      त्याला मी पंचवीस गोट्या लगेच मोजून दिल्या. आता तिथे गांझोल्यांचा पोळा नाही, असं ज्याला ज्याला कळलं तो तो त्या बोळाने पुन्हा वापरायला लागला.
      आजच्या दहशतवादी बातम्या ऐकल्या की मला तो लहानपणातला गांझोल्यांचा पोळा आठवतो. तो पोळा म्हणजे आजचा दहशतवाद. तेव्हा आमच्या गावाला ग्रामपंचायत होती. पण हा पोळा पंचायतीने काढला नाही. त्यांनी काढावा असा विचारही आमच्या मनात आला नाही. आम्ही तसा अर्ज दिला नाही. किंबहूना अस काम ग्रामपंचायतीच असत, अस माझ्या वयाएवढ्या मुलालाच काय पण मोठ्या माणसांनाही माहीत नव्हत. मी तो स्वयंस्फुर्तीने काढला. तसा आजचा दहशतवाद निपटून काढण्यासाठी सरकारवर आपण किती अवलंबून रहायच? आपल्याने जेवढ जिथे जिथे होईल तसा आपण दहशतवाद निपटण्याचा प्रयत्न करून पाहू. मग सरकारच कामही थोडेस सोप होऊन जाईल.
            (या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा