सोमवार, १४ नोव्हेंबर, २०१६

नाशिकची उत्सव संस्कृती


 
- डॉ. सुधीर रा. देवरे
            (महाराष्ट्र टाइम्स च्या नाशिक ‍विभागाच्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला निमंत्रित लेख.)        
            नाशिकची उत्सव संस्कृती हा विषय दिवाळी अंकातील लेखासाठी आपण सुचवला, हे योग्य केले. नाशिकची खास अशी उत्सव संस्कृती आहे, हे खरे आहे. पण नाशिक म्हणजे केवळ नाशिक शहर नव्हे तर नाशिक व परिसर आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील उत्सव संस्कृती हे स्पष्ट केल्याने विषयाची व्याप्ती वाढली. अशा वाढलेल्या व्याप्तीमुळे ग्रामीण भागातील अद्याप उजेडात न आलेल्या प्रथा परंपरांची थोडक्यात नोंद घेता येईल व या परंपरा काय आहेत हे महाराष्ट्रभर कळू शकेल. विषय नाशिक जिल्ह्यापुरता असला तरी त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. मात्र शब्दसंखेच्या अटीमुळे विषय आटोपता घ्यावा लागेल म्हणून त्याला आढाव्याचे स्वरूप प्राप्त होऊ शकतं. खरं तर विशिष्ट परंपरा या केवळ आमच्या गावाच्या आहेत वा जिल्ह्याच्या आहेत असा दावा करणं थोडं धाडसाचं ठरू शकतं. कारण परंपरा या लोकप्रिय असतात, प्रवाही असतात आणि म्हणून त्या प्रचंड वेगाने सर्वदूर पसरत जातात. त्यांचे मूळ शोधत बसणे चुकीचे ठरेल. एखाद्‍दुसरी परंपरा आज त्या गावापुरती वा विशिष्ट भूभागापुरती मर्यादित आहे असं ठामपणे सांगता येत असलं तरी डझनभर परंपरा या केवळ आमच्याच जिल्ह्यातील आहेत असं दूराग्रहाने मांडता येणार नाही.
            उत्सव या संज्ञेत सण, यात्रा, लोकपरंपरा, लोकोत्सव, विधी, विधीनाट्य, रीती, रूढी, देव-देवता, खेळ, लोकजीवन आदींचा समावेश होतो. महाराष्ट्राचा माणूस उत्सवप्रिय आहे. महाराष्ट्रात सर्वत्र विविध उत्सव साजरे केले जातात. पण आपल्याला अभिप्रेत आहे नाशिक उत्सव. म्हणून नाशिक जिल्ह्यापुरत्याच ओळखल्या जाणार्‍या काही सांस्कृतिक उत्सवांचा गोषवारा देणे इथे अभिप्रेत आहे.
            नाशिक जिल्ह्यातील ठळकपणे उल्लेख करता येतील अशा काही उत्सवांची वर्गवारी करता येईल. नाशिक शहरातून गोदावरी नदी वाहते. नाशिक पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील ब्रम्हगिरी पर्वतातून गोदावरी उगम पावते. प्रत्येक बारा वर्षांतून नाशिक आणि ‍त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभ मेळा, सिंहस्थ पर्वण्या हा प्रचंड मोठा उत्सव असून तो महाराष्ट्रात फक्‍त नाशिकलाच होतो. या कुंभमेळ्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन धार्मिक वा अध्यात्मिक नसून ही ऋषिमुनींची एक लोकपरंपराच आहे असे वाटते. या मेळाव्याकडे एक लोकोत्सव, लोकप्रथा, लोकसांस्कृतिक लोकपरंपरा म्हणूनच पहावे लागेल. (कुंभ मेळ्याला ऋषीपरंपरा वा साधू परंपरा म्हणता येईल. पण संत परंपरा म्हणता येणार नाही.) इतर लोकप्रथा- लोकपरंपरांमध्ये जो काही धार्मिक अंश सापडतो तेवढ्याच अंशात कुंभमेळ्यात धार्मिकता असल्याचे दिसेल. यापेक्षा या मेळाव्यात काहीही धार्मिक वा अध्यात्मिक असल्याचे शोधूनही सापडत नाही. 
            फक्‍त नाशिकच्या म्हणता येतील अशा ज्या काही प्रथा सांगता येण्यासारख्या आहेत त्यात कुंभमेळा आणि सिंहस्थ पर्वण्यांचा समावेश होऊ शकतो. गोदावरी ही दक्षिणेतील गंगा समजली जाते. म्हणून कुंभमेळ्याच्या सिंहस्थ पर्वणीला स्नानासाठी देशभरातून येणार्‍या साधूंचे आखाडे, या आखाड्यांना असलेली विविध नावे, आखाड्यांतील विविध धार्मिक पदव्या मिळवलेले मुखिया, त्यांच्याजवळ असलेले विविध हत्यारे, वाद्य, विविध वेषभूषेतील साधू, (नग्न साधू हे अजून एक विशेष आकर्षण), साधूंचा अहंकार आणि ठेवणीतला विक्षिप्तपणा, विविध नशांचे व्यसन, शैव- वैष्णव वाद, स्नानासाठी देशभरातून येणारे देव भोळे लोक, श्रावण महिण्यातही दूरवरून स्नानासाठी गोदावरीवर होणारी गर्दी. कुंभ उत्सवात नाशिक जिल्ह्यातील रहिवासीही मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतो.
            कालिकादेवी यात्रा, चैत्र पौर्णिमेला (एप्रिल) सप्तश्रृंग गडावरील लोकजत्रा, नाशिक पंचवटीला रामायणातील उपयोजनाची असलेली पार्श्वभूमी आणि या पार्श्वभूमीमुळे धार्मिक भावनेतून यात्रोत्सव होत असतो. (खरं तर व्यापक अर्थाने या जागा लोकश्रध्देच्या या अर्थाने लोकपरंपराच आहेत.) बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथे कोजागिरी पौर्णिमेला होणारी रासक्रिडा, मांगीतुंगी येथे जैन मुनींसह स्थानिक लोकांची भरणारी यात्रा आदी उत्सव फक्‍त नाशिक जिल्ह्यात पहायला मिळतात. अशा उत्सवांतून दिसणार्‍या प्रथा- परंपरा- लोकोत्सव अन्यत्र महाराष्ट्रात कुठेही पहायला मिळत नाहीत.
            या व्यतिरिक्‍त अजून काही लोकोत्सव फक्‍त नाशिक जिल्ह्यात पहायला मिळतात. हे लोकोत्सव महाराष्ट्रातील जनतेसाठी अजून अंधार्‍या कोपर्‍यांत आहेत असे म्हणावे लागेल. (महाराष्ट्रातील अनेक लोकोत्सवांची दखल अजून कोणी घेतलेली नाही.) त्यांचा गाजावाजा नाही. अजूनही प्रकाशात न आल्याने अशा काही लोकोत्सवांवर उजेड टाकता येईल:
             विधी: व्रत घेणे, चक्र भरणे, तोंड पाहण्याचा कार्यक्रम, सुखगाडी (सुखदेवता), मुलामुलींची नावे ठेवण्याची पध्दत, पाऊस येत नाही म्हणून वरूण देवाला प्रसन्न करून घेण्यासाटी धोंड्या काढणे, तुळशीचे लग्न लावणे, जावळं काढणे, घरभरणी करणे आदी लोकोत्सव नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा या परिसरात होत असतात. पैकी धोंड्या काढणे, तुळशीचे लग्न लावणे, घरभरणी करणे हे विधी अन्यत्र होत असले तरी त्यांचे स्वरूप वा नावे भिन्न आहे. 
            विधी- नाट्य: भोवाडा, खंडोबा आढीजागरण, अहिराणी लळित,
भील आणि कोकणा यांचा डोंगर्‍या देव उत्सव, कोकणा आदिवासी बांधवांची कन्सरा माली, एखाद्या पारंपरिक वैद्याने रोग्याची पटोळी पाहणे, लग्नाच्या विविध परंपरा, मंत्रांनी पान उतरवणे (सापाचा दंश उतरवणे), विंचू उतरवणे, मंत्र-तंत्र आदी लोकविधी- नाट्य नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा या परिसरात होत असतात. पैकी बोहाडा, खंडोबा जागरण हे नाट्य नृत्य प्रकार इतरत्र होत असले तरी त्यांचे स्वरूप वेगळे आहे.
            देव- देवता: कानबाई रानबाई बसवणे, गौराई बसवणे, काठीकवाडी काढणे, खांबदेव पुजणे (नागदेव, वाघदेव), म्हसोबा, आया, डोंगरदेव, मुंजोबा, कन्सरा माऊली आदी देव- देवता वार्षिकोत्सव नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा आणि खानदेश- अहिराणी भाषा पट्टा या परिसरात आढळतात. पैकी म्हसोबा, आसरा, मुंजोबा, काठीकवाडी या देवता इतरत्रही सापडतील पण त्यांच्या लोककथा- लोकप्रथा भिन्न आहेत.
            खेळ: आखाजीचा बार, झोका, गोफण, गलोल आदी खेळ नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा आणि खानदेश- अहिराणी भाषा पट्टा या परिसरात आढळतात. पैकी झोका, गोफण, गलोल हे महाराष्ट्रात इतरत्रही आढळत असले तरी त्यांचा हत्यार म्हणून वेगळा उपयोग होतो.
            लोकसाहित्य: आखाजी बारातल्या सामुहीक शिव्या, झोक्यावरची सामुहीक गाणी, कुटुंबात कोणाचा तरी मृत्यू झाल्याने स्त्रियांचे शोकग्रस्त पण गेय स्वरूपात शब्दबध्द सामुहीक रडणे, लोकगीतातल्या तीनशे साठ- नऊ लाख अशा लोकपरिमाण संज्ञा, उखाणे, आन्हे, लोकगीते आदी सामुदायिक लोकसाहित्य नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा आणि खानदेश- अहिराणी भाषा पट्टा या परिसरात आढळतं. इतरत्र काही प्रकार असलेत तरी भाषा आणि जीवन जाणिवातल्या भावना वेगळ्या दिसतील.
            रूढी-रिती: अहिराणी खाद्य पदार्थ, दुख टाकायला आणणे, दारावर जाणे, विवाह परंपरा, बाळाला घुगरावणे आदी लोकप्रथा नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा आणि खानदेश अहिराणी भाषा पट्टा या परिसरात आढळतात. इतरत्र त्याचे स्वरूप वेगळे दिसेल.
            वाद्य आणि नाच: खंजिरी, डफ, तुणतुणे, ढोल, ढोलकी आदी आदिवासी वाद्य प्रकार तर फेरा नाच, दबक्या नाच, शिमगा नाच, टापर्‍या गव्हार्‍याची कला आदी आदिवासी नृत्य प्रकार नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात वेगळ्या परंपरेत दिसतील. अशी काही नाशिक लोकसंस्कृतीची विविध रूपे दिसतात. त्यांचा जवळून आस्वाद, अनुभूती नवीन जीवनदृष्टी देऊन जाते.
            एखाद्या गावापुरत्या वा जिल्ह्यापुरत्या म्हणता येतील अशा क्वचित व दुर्मिळ प्रथा परंपरा असतात. लोकप्रथा, लोकपरंपरा, लोकसंस्कृती, लोकरहाटी, लोकजत्रा हे लोकोत्सव अनुकरणातून झपाट्याने सर्वदूर पसरत राहतात. म्हणून ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ जसे शोधू नये तशी अमूक लोकपरंपरा अमूक गावातून प्रचलित झाली असे म्हणणे योग्य नव्हे. विशिष्ट गावाशी निगडीत असलेली परंपरा ही दुर्मिळ आणि क्वचित एखादी असते. एका विशिष्ट गावाशी निगडीत असलेल्या लोकपरंपरा वा लोकोत्सव या काही संखेने मोजता येतील इतक्या आकडेवारीनुसार सांगता येणार नाहीत. ही मर्यादा नाशिकसाठीही आहे, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.
            (या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा