बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

संस्कार म्हणजे काय (भाग- दोन)




- डॉ. सुधीर रा. देवरे

               एखाद्या घटनेला कसे सामोरे जायचे हे अनुभवी व्यक्‍तीने नवशिक्याला समजावून सांगणे म्हणजे संस्कार, अशी संस्काराची ताप्तुरती व सुटसुटीत व्याख्या करता येईल. संस्काराची व्याख्या कोणी कशीही केली तरी मनाची पाटी कोरी घेऊन जन्मलेल्या मुलाला वाढत्या वयात त्या त्या वेळी त्याच्या आयुष्यात (आई, वडील, पालक, गुरूजी यांनी) वडीलधार्‍यांनी समाज, परंपरा, वागणे, बोलणे, राहणे, प्रतिक्षिप्ततेची जाणीव करून देणे, त्याच्या आयुष्याला वळण लावणे म्हणजे संस्कार करणे असे आपल्या सर्वांना अभिप्रेत असते.
               अलिकडे राजकारणात व समाजकारणात धार्मिक पुनरूज्जीवनवादाने तोंड वर काढले असून जिकडे तिकडे धर्म, संस्कृती, संस्कार अशा संज्ञांचे पेव फुटले आहे. रोज नवनवीन पंथ उदयास येत असून सर्व प्रमुख संत वर्षातून सरासरी अकरा महिने पाश्चात्य देशात वास्तव्य करतात व त्यांचे शिष्य भारतात जागोजागी तथाकथित संस्कारांचे सत्संग करत राहतात.
               अशा एकंदरीत वातावरणामुळे आता घराघरात संस्कार ही संज्ञा चलणी नाण्यासारखी वापरली जाते. आपल्या मुलांवर कसे चांगले संस्कार आहेत आणि अमूकच्या मुलांवर कसे वाईट संस्कार आहेत, याची चर्चा गावात दिवसभर ओट्याओट्यांवर होत असते.
                  चांगले संस्कार म्हणजे काय? कायम संस्कार संस्कार म्हणणार्या लोकांना कोणते संस्कार अभिप्रेत असतात, हे ही त्यांच्या चर्चांवरून सहज लक्षात येते.  मुलं जर एखाद्या बुवाच्या नादी लागून सत्संग करत असतील तर तो चांगला संस्कार. आपले मूल जर रोज एखाद्या मंदिरात जात असेल तर तो चांगला संस्कार. मुलं जर काही श्लोक, प्रार्थना, गीतापाठ, त्रिकालसंध्या,  पसायदान, शुभम करोती आदी तत्सम काही पाठांतर करत असतील तर ते चांगले संस्कार. आपले मूल जर रोज देवपूजा करत असेल, धार्मिकतेचे चिन्हे अंगावर मिरवीत असेल तर तो चांगला संस्कार. अशा या लोकांची संस्काराबद्दल समजूत आहे. यात संस्कार अधिक अभ्यास या त्रांगड्यात बर्‍याच मुलांची त्रेधातिरपीट उडते, ते वेगळेच.
                मात्र आपल्या मुलांसमक्ष बाप लाच घेत असेल तर आपण मुलांवर कोणता संस्कार करत आहोत याची टोचणी बापाला लागत नाही. आपण आपल्या मुलांसमक्ष एखाद्याची अकारण निंदा करत आहोत, यावर आपण आपल्या मुलांवर कोणते संस्कार करत आहोत याची बोचणी बापाला नसते. अकारण व्देष, मत्सर, पर दु:खाने आनंद होणे, कोणाच्या व्यंगावर बोट ठेवणे वा व्यंगावरून उल्लेख करणे अशा गोष्टी लहान मुलांसमक्ष सर्रास केल्या जातात. एखादे काम आपण कसे अनैतिक मार्गाने करून आणले हे सांगताना आपण मुलांवर कुसंस्कार करीत आहोत, असे पालकांना का वाटत नाही. खोटे बोलताना आपण मुलांवर वाईट संस्कार करीत आहोत याचे भान वडिलधार्‍यांना रहात नाही.
                  लाच, चोरी, लबाडी, नालस्ती, फसवणूक अशा गोष्टी करताना आपले तथाकथित संस्कार कुठे जातात? आदर्श, नैतिकता या गोष्टी चांगल्या संस्कारांशी का जोडल्या जात नाहीत?
                  कोणी चुकून एका घसरत्या क्षणी वासनेच्या आहारी जातो आणि हातून वाईट गोष्ट करून बसतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीकडून एखाद्या स्त्रीचा अनावधानाने विनयभंग होतो. काही वेळा तात्पुरत्या वासनेला शरण जाऊन जाणीवपूर्वक बलात्कार करण्याचा प्रयत्न होतो. या बाबी आक्षेपार्ह व गुन्हे आहेतच. अशा गोष्टी जगजाहीर होताच त्या व्यक्‍तीची सर्वत्रिक छी थू होते. हा विषय बातमीचा होतो. कायद्याचा होतो. विषय निषेधाच्या चर्चेचा होतो. अशा व्यक्‍तिंकडे अनैतिक म्हणून पाहिले जाते. त्याच्या- तिच्या चरित्राबद्दल खुलेआम चर्चा होते.
               उलट जी व्यक्‍ती आपल्या कार्यालयात खुलेआम गरीब लोकांना लुबाडून लाच घेतल्याशिवाय त्यांचे कामे करत नाही. दुसरीकडे शासनालाही खोटे बिले सादर करून देशाचे पैसे लुबाडत असते. अशी व्यक्‍ती मात्र शुध्द चारित्र्याची समजली जाते. त्याची सर्वत्र छी थू होत नाही. समाजात अशी कृत्ये एखादा उघडपणे करूनही तो उजळ माथ्याने वावरतो. त्याला प्रतिष्ठा असते. त्याच्या नोकरीत त्याला कशी वरची खाद आहे अशा अभिमान बाळगणार्‍या चर्चा सुरू असतात. नातलग त्याचे कौतुक करतात.
                        अशा भ्रष्ट व्यक्‍तीही धार्मिक लोकांप्रमाणेच देव देव करण्यात पुढे असतात, धर्म पाळतात, सत्यनारायण घालतात, सत्संग करतात. अशा अनैतिक पध्दतीने पैसे कमावणार्‍या एका व्यक्‍तीने मिळणार्‍या पैशांचेही धार्मिकतेआडून सहज समर्थन केले आहे, ते त्याच्याच शब्दात सांगतो, ‘मी धार्मिक वृत्तीचा माणूस आहे आणि अमूक बाबाचा परम भक्‍त आहे. म्हणून ते या मार्गाने मला लक्ष्मी प्राप्त करून देतात.’ म्हणजे आपल्या पापकर्मात विशिष्ट देव वा बुवा सामील असल्याचे ते स्वत: कबूल करतात. मात्र आधी दिलेल्या उदाहरणांच्या तुलनेने म्हणजे विवाहबाह्य संबंध, विनयभंग यांच्या पार्श्वभूमीवर लाच खाणारी व्यक्‍ती समाजात नैतिक समजली जाते.
                              खरं तर लाच घेणार्‍या व बलात्कार करणार्‍या व्यक्‍ती एकाच नैतिक लायकीच्या पंक्‍तीत बसणार्‍या असतात. बलात्कार करणारा तुरूंगात जातो तर लाच घेणारा समाजात प्रतिष्ठित होतो. आणि असे होत असेल तर आपले तथाकथित संस्कार एकदा पुन्हा तपासून घेतले पाहिजेत.
                              परंपरेने एखाद्या विशिष्ट वर्गाने आपल्यावर असे संस्कार बिंबवले असतील तर ते त्वरीत फेकून दिले पाहिजेत, त्यांतला नकलीपणा लक्षात आणून दिला पाहिजे व समाजाच्या उत्थापनेसाठी नव-संस्कार निर्माण केले पाहिजेत. अशा नवसंस्कारात सत्य, अहिंसा, सद्‍भावना, समता, बंधुभाव, सहिष्णुता, सदाचार, शुध्द आचरण, स्वच्‍छता,‍ सुशिक्षित होणे, ज्ञान संपादन करणे, जलसंस्कार, प्रदुषणाविरूध्द संस्कार, (जल, वात, ध्वनी, प्रदुषण), कर्तव्य, वाचन, कला, भाषा, परतत्व, लोकसंस्कृती जतन, प्रज्ञा, शील, करूणा आदी गोष्टींचा नवसंस्कारात समावेश करत ते शाळा कॉलेज, मंदिर, आश्रमातून शिकवले गेले पाहिजेत. अशा संस्कारांसाठी आजचे सर्व तथाकथित संत कुचकामी आहेत, असे नाईलाजाने म्हणावे लागते.
                              (याच नावाचा ब्लॉग 15 मार्च 2015 प्रकाशित झाला होता. त्याचा हा  दुसरा भाग. या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा