रविवार, ३१ जुलै, २०१६दहशतवादाची आग

- डॉ. सुधीर रा. देवरे


            आज सर्वात जास्त अस्वस्थ करणारी गोष्ट असेल तर ती जागतिक दहशतवाद! आज युध्दे परवडतील. अगदी तिसरे महायुध्द सुध्दा परवडेल. कारण युध्दे समोरासमोर होतात. आपल्याशी कोण लढतं, त्याचं बळ किती, हे आपल्याला कळतं. पण आजचा जागतिक दहशतवाद खूप गंभीर आहे. दहशतवादी संखेने कमी असूनही ते खूप मोठे नुकसान करू शकतात. सैन्यालाच नव्हे तर सर्वसामान्य माणसांना लक्ष्य करतात. एक दहशतवादी पन्नास साठ लोकांना मारून मग स्वत: मरतो. आपल्याला अजून जागतिक दहशतवादाचे गांभीर्य अजिबात कळल नाही हे अनेक घटनांमधून लक्षात येत. अशा अमानुष दहशतवादाने जगात माणूस शिल्लक राहणार नाही. म्हणून जगातल्या दहशतवादाचे लवकरात लवकर समूळ उच्चाटन करण्याची शपथ आज प्रत्येक देशाने घ्यायला हवी!
      छुप्या आणि उघडपणे अनेक लोक बुरहानसारख्या आतंकींना सहानुभूती दाखवतात. उदाहरणार्थ, ‘‘तो फक्‍त बावीस वर्षाचा होता. भारतीय नागरिक होता. सैनिकांनी अकारण केलेल्या छळाचा तो शिकार झाला. त्याच्यावर अन्याय झाला म्हणून तो "अतिरेकी" बनला! वगैरे.’’
            अशा मताशी कोणी सहमत होऊ शकेल काय? त्याच्यावर कितीही अन्याय झाला असेल तरी तो आपल्या देशाविरूध्द- भारताविरूध्द कसा लढू शकतो? अनेक लोकांवर अन्याय होतो. कोपर्डीला  बलात्कार करणार्‍यांना त्या मुलीच्या घरच्या लोकांनी गल्लीत स्वत: शिक्षा दिली तर आपल्याला चालणार आहे काय? कायदा नावाची गोष्ट भारतात आहे. तो कायद्याच्या मार्गाने लढू शकत होता. भारतीय राज्य घटनेवर ज्यांचा विश्वास नाही तेच लोक फक्‍त बुरहान आणि इतर दहशतवाद्यांचे समर्थन करू शकतात. ज्यांच्यावर अन्याय झाले त्यांना दहशती काम करायला समाजमान्यता देता येईल का? अशा एखाद्याने शस्त्र हातात घेतले तर ते समर्थनीय ठरेल का? महात्मा गांधीवर अन्याय झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर अन्याय झाले होते. पण ते सनद‍शीर मार्गाने पुढे गेले.
   भारताच्या सरकारला विरोध करण्याच्या भरात आपण देशाचे नुकसान तर करत नाही ना, हे पाहिले पाहिजे. सरकार कसेही असो ते लोकशाही पध्दतीने निवडून आले आहे. लोकशाही पध्दतीनेच सरकार आपल्याला पाच वर्षांनी बदलता येईल. पण भारतात यादवी वा दहशतवादी अनागोंदी माजली तर आपल्याला नंतर ती रोखता येणार नाही. आपण आज दहशतवादाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. अनेक दहशतवादी भारतात कार्यरत झाले आहेत. काही भारताच्या तोंडावर दबा धरून बसलेत. केवळ इराक- सिरियाच नव्हे तर जर्मनी, फ्रांस, अफगानिस्तान, बांगलादेश अशा मार्गाने दहशतवाद आपल्या दारावर धडका देत आहे. भारतातल्या एका राज्यात- काश्मीरात तर आपलेच काही लोक दहशतवादाचे दलाल झालेत. त्यांचे हे डाव यशस्वी झालेत तर से लिखाण करायला आपण स्वतंत्र राहणार नाही. याचा अर्थ असा होतो, एकतर दहशतवादाचे स्वरूप आपल्याला अजून नीट कळले नाही, त्याचे गांभीर्य जाणवले नाही वा आपल्या छोट्या मोठ्या राजकीय- सामाजिक स्वार्थांसाठी आपण दहशतवाद्यांचे समर्थन करीत असतो, हे स्पष्ट आहे. भारताविरूध्द वा मानवतेविरूध्द ज्याने शस्त्र हातात घेतले त्याला क्रूरपणे गोळ्या घालून ठार मारायलाच हवे! मग तो दहशतवादी असो की नक्षलवादी.
            असहिष्णुता भारताच्या परंपरेत नाही. पण ती आता कुठे कुठे डोके वर काढू लागली. जग आणि देशही सहिष्णुतेने चालतो. सहिष्णुता प्रत्येकाने डोक्यात- हृदयात भिनवली पाहिजे. जातीभेद, धर्मभेद, आहारभेद, कर्मभेद, वर्णभेद, आचारविचारभेद आदीत सहिष्णुता दिसली पाहिजे. दहशतवाद ही तर पराकोटीची असहिष्णुता आहे. म्हणून अशी असहिष्णुता आपण खपवून घेता कामा नये. पण असहिष्णुतेला विरोध करणारे काही लोक दहशवाद्यांचे समर्थन करताना दिसतात हे आकलनापलिकडे आहे.
            जगात वहाबी पंथाचे लोक दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत. हिंसेवर विश्वास असलेले कट्टर पंथीय लोक दुसर्‍यावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. सुन्नी शियांना मारताहेत. काश्मीरातल्या अमन सेतूवर भारत पाकिस्तान व्यापार चालतो. ह्या व्यापाराचा फायदा घेऊन अनेक काळे उद्योग इथे सुरू असतात. तस्करी- हवाला मार्गाने आलेला पैसा दहशतवादी कृत्यात ओतला जातो. दलाल पैदा केले जातात. पाकिस्तान काश्मीरात दहशतवाद आणण्यासाठी प्रचंड पैसा पाठवतो. म्हणून हा व्यापारमार्ग आता दहशती मार्ग होत चाललाय. सुफी पंथ हा नेमस्थ पंथ आहे या पंथाच्या उत्थापनासाठी शासनांना जाणीवपूर्वक काम करणे आवश्यक आहे.
            धर्म विकायला काढणारे लोक- धर्माचा शस्त्राप्रमाणे वापर करणारे लोक- धर्माचा खुर्चीसाठी उपयोग करणारे लोक- धर्माचे भांडवल करणारे लोक- धर्माची ढाल म्हणून उपयोग करणारे लोक- धर्माचा व्यापार करणारे लोक, काही काळ यशश्वी होतात. आयुष्यभर यशस्वी होत नाहीत, हे खरे असले तरी या दरम्यानचा काळ मानवतेसाठी फार भयानक असतो. तो खूप मोठे नुकसान करून जातो. ते नुकसान कधीही भरून निघणारे नसते.
            उत्तम इंग्रजी बोलणारे लोक ज्ञानी असतातच असे नाही, याचे उत्तम उदाहरण म्हणजे झाकीर नाईक. गोळ्या चालवणारा आतंकी परवडला पण भाषणे करणारा दहशतवादी नको. याचे तत्वज्ञान पहा: ‘‘ बायकोला मारायचा पुरूषाला हक्क आहेच. दास- दासींना मारायला हरकत नाही. लादेन आतंकवादी नव्हता. प्रत्येक मुस्लीमाने दहशतवादी व्हायला हवे. एखाद्या मुसलमानाने आपला धर्म सोडून दुसर्‍या धर्माचे गुण गायले तर त्याला मृत्यूदंड द्यावा. गणपती हा देव नाही. हिंदूंचा प्रसाद खाऊ नये, फेकून द्यावा. वाईट कामे करणार्‍यांच्या विरोधात मुस्लीमांनी दहशत दाखवावी. (वाईट कामे कोणती ती त्यांनी स्वत: ठरवावी.). अफगानिस्थानातल्या बौध्द मुर्ती फोडून तालीबान्यांनी बुध्दांना मूर्ती पूजा करू नये हे शिकवले.’’ असे ज्ञान झाकीर नाईक जगाला देत असतो. 
            धर्मासाठी माणसं मारणार्‍याला नरक निश्चित असला तरी माणसाच्या आयुष्याचा आनंदही तो या जन्मात घेऊ शकत नाही. एखाद्या पशूसारखा मरतो. माणसाच्या उत्थापनासाठी निर्माण झालेल्या धर्माला काही लोक नरक बनवून टाकतात. अमिषाने मरणानंतरच्या सुंदर आयुष्यासाठी कवडीमोल मरणार्‍या आतंकींना माहीत नसते की मेल्यानंतर त्यांना गाढवाचाही जन्म पुन्हा मिळणार नाही. चिरंजीव होणे आणि स्वर्गातल्या पर्‍या उपभोगायला मिळण्याच्या कल्पना करणारे फक्‍त मुर्खांच्या नंदनवनात सापडतील. तरीही अनेक लोकांना ब्रेनवॉश देऊन दहशतवादाचे कारखाने सर्वत्र राजरोस सुरू आहेत. त्याची आग आपल्याला बसल्या जागी दिसते. हा धुर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
            (या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा