गुरुवार, १४ जानेवारी, २०१६

देह देवाचे मंदिर
- डॉ. सुधीर रा. देवरे

     देव कुठून येतात? देव कसे तयार होतात? देव हे आधी माणूस म्हणून जन्माला येतात का? चारचौघांसारखी जन्माला आलेली माणसं, देव होऊन असे कसे अजरामर होऊन जातात? देव ही प्रतिभावान माणसाची निर्मिती आहे का? देवाच्या नावाने प्रश्नच प्रश्न. पण हे प्रश्न प्रत्येकाला सतावत नाहीत, हाच खरा मोठा प्रश्न आहे.
      हा लेख लिहीत असताना एक गोष्ट माझ्या प्रकर्षाने लक्षात आली. प्रथितयश देवांनी कधीही जनसमुदायासमोर मोठमोठी प्रवचने दिली नाहीत. भाषणे केली नाहीत. खूप मोठे उपदेश कोणाला केले नाहीत. त्यांच्या घरात वा चौकात आठवडी वा मासिक सत्संगाचे कार्यक्रम आयोजित केल्याची कुठे नोंद नाही. त्यांनी स्वत: कीर्तने केली नाहीत. लेख लिहिले नाहीत. ओव्या लिहिल्या नाहीत. अभंग लिहिले नाहीत. ग्रंथ लिहिले नाहीत. (तरी ते ग्रंथांचे विषय झाले.) संस्कार शिबीरे घेतली नाहीत. आपला धर्म संकटात आहे, असे त्यांना वाटले नाही. आणि त्यांच्या मृत्यूनंतर मंदिर बांधून तिथे दानपेट्या ठेवा असेही त्यांनी सांगितले नाही. तरीही ते देवत्वाला पात्र ठरले. देवत्वाच्या पदापर्यंत पोचले. लोकांनी त्यांना देवत्व बहाल केले. लोक त्यांना देव म्हणू लागले. ते का? असे नेमके काय काय घडत गेले त्यांच्या आयुष्यात की ते माणसाचे देव झाले. त्यांच्या मृत्यूनंतर नव्हे, त्यांच्या हयातीतच ते देव झाले होते. म्हणजे हयात असतानाच लोक त्यांना देव म्हणू लागले होते, ते जेव्हा सर्वसामान्य माणसांसारखे चालते बोलते फिरते व्यक्‍तिमत्व होते. ते कुठल्या मंदिरात जाऊन राहात नव्हते. हिमालयात जाऊन राहात नव्हते की कुठे जाऊन तपश्चर्या करून परत आले नव्हते. समाधी लाऊन बसत नव्हते. यज्ञ याग करत नव्हते. भगवे कपडे परिधान करत नव्हते. दाढी- डोक्याचे केस वाढवून संतत्वाचे प्रदर्शन करत नव्हते. मग ते लोकमानसात देव का ठरावेत? काही देव अतिमाणुष असल्याचेही आढळते.
      प्रथितयश देव हे त्यांच्या दैनंदिन कृतीतून विकासपावत देव होत गेले. देव घडले.  हे खरे सत्य आहे. आपल्या कृतीतून त्यांनी लोकांना देवत्वाचा वास्तव दृष्टांत दिला. परोपकार आपल्याला देवत्वाकडे घेऊन जातो. माणसाला आपल्या आयुष्यातील काही कृतीतून देवत्वापर्यंत पोचता येते हेच त्यांनी सर्वसामान्य लोकांना आणि तथाकथित देवाचे देव्हारे माजवणार्‍यांनाही दाखवून दिले हे सत्य आहे. असे कृतीतून देव होत जाणे साधी सोपी गोष्ट नाही. (पण आपण काय केले? अशा देव माणसांचे मंदिरे बांधून मोकळे झालो. मंदिरांतून कधीही मंदी नसलेला व्यवसाय सुरू केला.)  
      माणसाला एकुलते एक आयुष्य मिळते. त्यातील जवळजवळ निम्मे आयुष्य माणूस झोपेत असतो. त्यातील काही बालपणात निघून जाते. उरलेल्या निम्या आयुष्यात माणसाला स्वार्थ स्वस्थ बसू देत नाही. काहीतरी मिळवणे हे ध्येय. उद्याचे सुख मिळवण्यासाठी रोज दुखं पचवायचे असे हे आयुष्य. मोहाने माणूस माणूसपणात राहात नाही. देव ही तर फार लांबची गोष्ट झाली. इथे देव व्हायला कोणाला वेळ आहे. वयात येताच वासना डंख मारते. अहंकार मनुष्याला स्वस्थ बसू देत नाही. कोणाला जातीचा अहंकार असतो. कोणाला धर्माचा अहंकार असतो. कोणाला सत्तेचा अहंकार असतो तर कोणाला श्रीमंतीचा अहंकार असतो. काहींना तर आपल्या ज्ञानाचा सुध्दा अहंकार असतो. अहंकार पचवणे ही साधी सोपी गोष्ट नाही. अहंकार पचवला तो देव झाला.
      व्देषावर विजय मिळवणे ही साधी सोपी गोष्ट नाही. माणूस व्देषाला पावलोपावली बळी पडू शकतो. चारचौघातल्या व्देषाविषयी मी मुळीच बोलत नाही. व्देष हा खूप आत दबा धरून बसलेला असतो आणि तो उथळ कारणानेच उफाळतो असेही नाही. अगदी आतल्या आणि सबळ कारणाने व्देष मानसिक पातळीवर फणा काढू शकतो. अशा व्देषाला बाहेर निघायला जागा सापडली नाही तर भयंकर विकृत घटना घडू शकतात. क्रोधाचेही तसेच. क्रोधाने जगात अनेक वाईट घटना घडतात. त्या आपण वर्तमानपत्रातून आणि न्यूज चॅनल्सवरूनही रोज वाचतो- पाहतो. वरवरचा असलेला क्रोध मनुष्य टाळू शकतो पण आत साचलेला क्रोध कशानेही नाही जाऊ शकत.
      या सगळ्या गोष्टींना सहज हद्दपार करणारा माणूस देव होत जातो. ही हद्द पार करणे ज्याला शक्य होते, जो मरणात जीवन जगतो. म्हणजे आपण पुढच्या क्षणाला अस्तित्वात राहणार नाही तर आपल्या खिशातले हे हजार रूपये आपल्याला काय उपयोगाचे, हा विचार करता आला पाहिजे. जो आपल्याला करता येत नाही. आपण पुढच्या क्षणाला अस्तित्वात नसणार आणि आपली मुलं कोण सांभाळेल ही चिंता ज्याला नाही. खरे तर आपल्याला पुढच्या क्षणाची शाश्वती नाही आणि आपण उद्याच्या आर्थिक व्यवहारांचा विचार का करीत असतो. माझ्याकडे जो याचक आला आहे, तो आता या क्षणाला भुकेला आहे आणि मी सेवानिवृत्तीनंतर माझ्याकडे मृत्यूपर्यंत कसे पैसे शिल्लक राहतील म्हणजे मी कोणाकडे हात न पसरता दोन वेळचे जेवण जेऊ शकेल याचे नियोजन करतोय, म्हणून मला देव होणे कदापि शक्य होणार नाही.
      राजकारण हा ही एक घटक आपल्याला देवत्वापासून रोधून धरतो. राजकारण म्हणजे काय? राजकीय पक्षांचे जे राजकारण चालते त्याबद्दल नाही बोलत. दोन माणसांच्या संबंधात जे राजकारण चालते त्या राजकारणाबाबत बोलतोय. मला एखाद्या मित्राचे वागणे पटत नाही तरी मी त्याला तोंडावर सांगतो की तुझा स्वभाव छान आहे, हे राजकारण आहे. एखाद्याचे वागणे बोलणे मला मनापासून आवडते पण मी ते कबूल करत नाही हे राजकारण आहे. एखाद्याचे यश मला हुलकावणी देते. त्याचे यश माझे दुख आहे आणि तेच यश जर मला मिळाले असते तर लोकांना ते आवडावे असे मला वाटते हे राजकारण आहे. जे मान्य करू नये ते मी मान्य करतो आणि जे मान्य करायला हवे ते मान्य करत नाही, हे राजकारण आहे. मी कोणाला दुखवू नये म्हणून त्याला नावाजत राहतो, हे राजकारण आहे. आणि ज्याला दुखवायला नको त्याला दुखावले जाते हे राजकारण आहे. या राजकारणातून माणूस देव होऊ शकत नाही. माणूस फक्‍‍त माणूस राहतो. खरे तर तो नैसर्गिक माणूसही राहत नाही मुळात. माणसाची बुध्दी ही यावेळी वरदान नव्हे तर शाप ठरत असते. बुध्दी नसलेला माणूस वा फक्‍‍त आजचाच विचार करणारा माणूस नैसर्गिक जीवन छान जगताना दिसतो. त्याच वेळी बुध्दीवान माणूस आतल्याआत आपणच दाह निर्माण करत जगताना दिसतो. ज्या गोष्टींचा कधी विचार करू नये, ज्यांचा कधी हेवा करू नये त्या गोष्टी करत राहणे हे राजकारण आहे. वासनेचेही तसेच. सारांश, काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ या षड्‍ रिपूंच्या पाशात पूर्णपणे अडकलेल्या माणसाला देव होणे कदापि शक्य नाही.
      आपल्याला झाडांत देव पाहता येतो. निसर्गात देव पाहता येतो. माणसात देव पाहता येतो. एखाद्या माणसाच्या चरित्रातही देव पाहता येतो. ऐतिहासिक पुरूषात देव दिसू शकतो. संतांच्या कृतीत तर देव असतोच. देवाच्या मुर्तीतच फक्‍‍त देव असतो असे नाही. मंदिरातच फक्‍‍त देव असतो असे नाही. पूजेतच फक्‍‍त देव असतो असेही नाही. रोज मंदिरात जाणार्‍यांना, रोज पूजा करणार्‍यांना, देवाला फुले अर्पण करणार्‍यांना- मुर्तीला अभिषेक करणार्‍यांना, पारायणे करणार्‍यांना, यज्ञ विधी करणार्‍यांना, कपाळावर गंधटिळा लाऊन मिरवणार्‍यांना, सत्यनारायण घालणार्‍यांना, चारीधाम करणार्‍यांना, वा देवाच्या दानपेटीत पैसे टाकणार्‍या आदी लोकांनाच फक्‍‍त आपण आस्तिक म्हणतो की काय? असे क्रिया- विधी करणारे लोक कदाचित आस्तिक असतीलही, पण असे कर्मकांड न करणारे लोकही आस्तिक असतात.
      दररोज कर्मकांड करत देव भजणारे लोक विशिष्ट प्रकारच्या भीतीने ग्रस्त होऊन देवपूजा करतात की काय. भीतीमुळे कोणी देव भजत असेल तर तोही एक स्वार्थच असतो. देवा मला सुखी ठेव, असे म्हणताना इतरांचे काहीही होऊ दे असा प्रतिध्वनी आपल्याला ऐकू येऊ शकतो. इथे देवाला भजणारा माणूस फक्‍‍त स्वत:साठी भजतो. लोकांसाठी नव्हे. आपण सगळ्या वरवरच्या व्यवहाराला पहात असल्याने आपल्या आस्तिकतेच्या कल्पना संकुचित झाल्या आहेत. कर्मकांडाच्या जखड्यात अडकलेल्यांना आपण आस्तिक म्हणतो आणि बाकीच्यांना नास्तिक ठरवून मोकळे होतो. संतांच्या आणि देवांच्या चमत्कारातही देवत्व नसते. देवत्व हे वागण्यातून- कृतीतून दिसत असते. एखादा थोर माणूस त्याच्या कर्माने देव पदाला पोचतो आणि नंतरचे त्याचे भजनी मंडळ आपल्या पोटासाठी त्याच्या देवपणाची जाहिरात करू लागते.
      माणूस देव होत जातो तेव्हा त्या हाडामांसाच्या माणसात काय बदल होत असतील? त्यावेळी त्याच्या मेंदूपासून हृदयापर्यंत सगळे काही ठीक नसणारच. माणूस देव होतो तेव्हा माणसाच्या त्यागाची कल्पनाही करवत नाही. सगळे माणूसपण गुंडाळून देवपणाला सामोरे जाणे ही साधीसुधी घटना नाही. अहंकार, वासना, लोभ, सत्ता, राजकारण (सूक्ष्म अर्थाने), विकार, विचार, विवेक, बौध्दीक क्षमता, प्रतिकार क्षमता यांचा त्याग करणे म्हणजे दुसरा मृत्यूच. देहात राहून विदेही होत वैदेही वावरणे हे एखाद्या शतकात कधीतरी कोणाला तरी कुठेतरी जमते. ह्या रोज रोज होणार्‍या घटना नसतात. आणि म्हणूनच अशा विशेष मानवासमोर सर्वसामान्य माणसाचे दोन हात नमस्कारासाठी आपोआप जोडले जातात. ज्याला हात जोडले जातात आणि जो हात जोडतो त्या दोघांच्या देहात देव आहे. देह देवाचे मंदिर असते.
      अशा अनेक विशेष देव माणसांचे देवपण ओळखून त्यांना देवपण देणारा या पृथ्वीतलावरचा माणूसही मनाने तितकाच थोर आहे, हे ही आपल्याला मान्य करावे लागेल.
      (लेखातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

२ टिप्पण्या: