बुधवार, १४ ऑक्टोबर, २०१५

अराजक
- डॉ. सुधीर रा. देवरे

     केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या साहित्य अकादमीसह इतर संस्थांचे पुरस्कार परत करणार्‍या साहित्यिकांची- विचारवंतांची संख्या देशभरात वीस पर्यंत पोचली आहे. (महाराष्ट्रातल्या काही साहित्यिकांनीही महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार परत केले.) आणीबाणी नंतर आजची राजकीय स्थिती ही सर्वात जास्त अराजकतेकडे चालली आहे काय? कोणाला ढळढळीत अराजकता अजूनही दिसून येत नसेल तर फक्‍त एका वर्षात छुपी अराजकता नक्कीच सुरू झाली आहे. डॉ. यू. आर. अनंतमूर्ती... बोलल्याप्रमाणे केवळ देशच नव्हे, तर आख्‍खं जग सोडून निघून गेले! खरंच हे जग आज इतके वाईट आहे का? पण साहित्यिकांच्या या कृतीने सरकारवर अजून तरी साधा ओरखडाही उमटलेला दिसत नाही. राजकारणी लोकांमध्ये आता साहित्यिक- विचारवंतांचा आदर राहिला नाही. आजच्या राजकारणात सुसंस्कृतपणा दिसून येत नाही.
एम. एस. कलबुर्गी, गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोळकर या तीन विचारवंतांचा खून. या हत्त्यांमागील लोक कोण हे शोधणे फार दूरचे काम असे आपण समजून चाललो तरी ज्या मारेकर्‍यांनी त्यांना रस्त्यात गाठून हत्त्या केली ते भाडोत्री मारेकरी सुध्दा हाती लागू नयेत हे आकलनापलिकडे आहे. एखादा संशयीत मारेकरी पोलिसांच्या हाती लागला तर तो कसा निष्पाप आहे हे न्यायाधिशांच्या आधी मंत्रीमहोदय सांगतात.
      कोणी काय खावे हे दुसरा कोणी कसा ठरवू शकतो? कोणी कोणते कपडे घालावेत त्यावरून मतभेद. कोणाचे घर कोणत्या वस्तीत असावे हे तो तो कळप ठरवणार? मोहम्मद अखलाख दादरी हत्याकांडाने आक्खा देश हादरला. थरकाप उडवणारी आणि झोप उडवणारीही हिंसक घटना आहे ही. आपण मध्ययुगीन आदिम काळात जगतो आहोत की काय असा भास व्हायला लागला. आपापल्या जातीधर्माच्या कळपात राहून आपण आपले आदिम हिंसक टोळ्यांमध्ये रूपांतर करू पहात आहोत? गुजरातमध्ये मुस्लीम युवकांना गरबा नृत्य परिसरात येण्यावर बंदी घालण्यात आली. देशभरात विविध संघटनांकडून असे अनेक छोटेमोठे स्थानिक फतवे निघताहेत. हा कोणत्या प्रकारचा जमातवाद आहे.
यापुढे कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणे हे देशाच्या दृष्टीने हानीकारक ठरणार आहे का? आपण या देशाच्या विकासासाठीच नक्की सरकार निवडून दिलंय का? हा कोणत्या प्रकारचा विकास आहे? विकासाच्या आरोळ्या मारताना देशातल्या शंभरावर असलेल्या विविध नावांच्या संघटना सुप्तावस्तेत होत्या. सत्ता मिळताच त्या आपल्या खरे रूप दाखवायला लागल्या. रस्त्यांवर नंगानाच होऊ लागला. मत विभाजन होण्यासाठी एखादा नाटकी विरोधकही तसा खमक्या हवा म्हणजे आपला अजेंडा ठोसपणे राबवता येतो. आपल्या समूहावर विषारी टीका केली की आपल्यापासून थोडे दूर गेलेले लोक अजून आपल्या जवळ येतात या सिध्दांताने अगदी ठरवून एका राक्षसालाही जन्म देण्यात आला. तो जितके विषारी बोलेल तितका आपल्याला फायदा. इथे एक कळत नाही की एखाद्या नेत्यावर कोणी टीका केली तर त्या नेत्याच्या धर्माच्या लोकांचा अपमान कसा होऊ शकतो?
इतके सारे होत असूनही सिंहासनावर आरूढ झालेली व्यक्‍ती काही बोलायला तयार नाही. तेव्हाचे मौनीबाबा परवडले. आता सोयीनुसार बोलले जाते आणि सोयीनुसार दुर्लक्ष केले जाते. प्रचारसभांमध्ये आणि इतर देशांच्या दौर्‍यांवर जे बोलू नये ते बोलले जाते. रेडीओवर मनातले सगळे सोयीस्कर सांगितले जाते. पण देशांतर्गत हिंसेवर तोंडावर बोट... गडीगुप्प. उत आलेले लोक याचा फायदा उठवत आपला कार्यभाग उरकवताहेत.
      महात्मा गांधींना संपवता येत नाही तर आता महात्मा गांधींचे नाव घ्यायचे आणि होता आले तर दुसरे महात्मा व्हायला काय हरकत आहे. मंदिरे बांधता बांधता पोटातल्या पोट आपलेही एखादे मंदिर का बांधू नये आता? दोन आक्टोबरला रस्त्यांची स्वच्‍छता करता करता मनातल्या जळमटांची स्वच्‍छता मात्र अजिबात करायची नाही! भारत पंधरा महिण्यांपूर्वी अस्तित्वात होता की नव्हता, माहीत नाही. कदाचित तो आताच घडवला गेला असेल ! चमकता येईल तिथे चमकायचे मग ते फेसबुक का असेना पण जग फिरताना आपल्याच देशाची निंदा करणे गरजेचे आहे का?
      काल एका चॅनलवर ऐकले: बिहार मध्ये मुस्लीम मते नितीश आघाडीकडे किती जातील आणि भाजपकडे किती. राजपूत आणि तेल्यांची मते कुठे जातील तेही सांगू... माझी जात ज्या कोणाला मते देईल त्यालाच मी माझे मत देईल का? एक जात एक धर्म सर्व मिळून एखाद्या पक्षाला मतदान करू शकतात का? अशा जातीयवादी सर्वे करणार्‍या चॅनल्सना कोर्टात खेचले पाहिजे. कोणतं न्यूज चॅनल नेमकं कोणाला विकलं गेलंय हे सहज कळतं आता! लोकशाहीचा तिसरा स्तंभ विकला गेला आहे का!
      सावधान! देशाच्या सवोच्च स्थानी असलेल्या नेत्यांची भाषा प्रचार सभांमध्ये पार रसातळाला गेली! आपला देश फक्‍त प्रचार सभांपुरताच आणि निवडून येण्यापुरताच उरला की काय? तसे नसते तर आज प्रचार करताना जातीय धर्मिय समिकरणे जिथक्या उथळपणे वापरली जातात तशी ती वापरली गेली नसती.
      भारतात अशी अराजकता येणार असेल तर देशाच्या नुकसानासाठी दुसर्‍या शत्रू देशाला काहीच करायची गरज नाही. आपण आपल्याच कृत्यांनी देशाची एकता पोखरून काढू. अथवा शत्रू राष्ट्राला हे निमंत्रण आहे! असे म्हणावे लागेल. आपण खरंच अराजकतेकडे जात आहोत का, याचा सजगपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
      (या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
 
-          डॉ. सुधीर रा. देवरे
          इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा