गुरुवार, १४ मे, २०१५

सलमानला शिक्षा का पुरस्कार


-         डॉ. सुधीर रा. देवरे

          सलमान खानला नक्की शिक्षा झाली का त्याला एखादा पुरस्कार मिळाला हे समजायला कठीण जावे अशा पध्दतीचा सलमानचा आता सर्वत्र उदोउदो होताना दिसतो. ज्या दिवशी सलमानला न्यायालयाकडून पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली त्याच दिवशी त्याला ताबडतोब दोन दिवसाची सुट्टीही मिळाली (ती सुट्टी जामीन देऊन नंतर पुन्हा वाढवण्यात आली.) सुट्टी मिळताच तो घरी यायला निघाल्यावर त्याच्या वाहनाचे थेट प्रक्षेपण टीव्ही चॅनल्स करीत होते. आता सलमानची गाडी रस्त्यात कुठेपर्यंत आली. ट्रॅफिक जॅम मध्ये गाडी कशी पुढे सरकत नाही. इतका ट्रॅफिक जॅम असूनही आमचा अमूक अमूक प्रतिनिधी आपल्यापर्यंत सलमानच्या गाडीचे थेट प्रक्षेपण कसे करीत आहे. त्याचे फॅन्स त्याला पाहण्यासाठी रस्त्यांवर कशी गर्दी करताहेत, असे भरभरून कौतुक वाहिन्या करीत होत्या.
            नंतर तर वाहिन्यांनी यापेक्षा कमाल केली. सलमानला या गु्न्ह्यात पोलिसांनी कसे फसवले. अमूक अमूक साक्षिदार त्याच्या विरूध्द कसे गेले वगैरे चर्चाही वाहिन्या करू लागल्या. काही वाहिन्यांनी तर त्याचा सर्व जीवनपट दाखवायला सुरूवात केली. त्याचे वडील त्याच्यावर कसे प्रेम करतात. त्यांची त्याने कशी गळाभेट घेतली. त्याच्या बहिणीचे प्रेम.  बहिणीवरील त्याचे प्रेम. त्याचे करियर. त्याचे ‍चित्रपट वगैरे वगैरे चर्चा होऊ लागली. हे सर्व गुणगाण वातावरण पाहता सलमानला कुठला तरी पुरस्कार मिळाला असावा अशी शंका येऊ लागली. अथवा त्याने काहीतरी भव्यदिव्य काम केले असले पाहिजे अशी ही स्तुतीसमने उधळली जात होती. मिडियाला आलेला त्याचा पुळका वेगळ्याच पध्दतीचा आणि अचंबा वाटावा असा होता. पण वास्तवात त्याला तर त्याने केलेल्या गुन्ह्यामुळे शिक्षा झाली होती. त्याच्या चुकांचा प्रचार करण्याऐवजी मिडिया त्याला झालेल्या शिक्षेला सहानुभूती दाखवत होता.
            सलमान खान एका दिवशी मध्यरात्रीपर्यंत एका हॉटेलित अतोनात दारू पितो. त्यानंतरच्या अतिरेकी नशेत स्वत: भरधाव गाडी चालवत फुटपाथवर झोपलेल्या बेघर कष्टकरी गरीब लोकांवर गाडी घालतो. त्यात एक जण जागीच ठार तर बाकी ‍लोक जखमी. आणि या घटनेनंतर दहा बारा वर्षांनी सलमानला फक्‍त पाच वर्षाची शिक्षा होते. या पार्श्वभूमीवर सलमानचा जीवनपट दाखवण्यापेक्षा ज्या गरीब लोकांचे आयुष्य त्याने उध्वस्त केले, त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लोकांना कसे बरबाद केले हे मिडिया दाखवू शकत होता. कायमचे जायबंदी झालेले लोक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लोकांची परवड मिडिया लोकांना दाखवून त्याला झालेली शिक्षा योग्य असल्याचे सांगू शकत होता. मात्र तसे न होता मिडियाने सलमानची प्रसिध्दी उचलून धरली. या शिक्षेमुळे त्याचे फॅन्स कसे नाराज झाले ते दाखवले. कोणी फॅनने फाशी घेण्याचा प्रयत्न केला ती मिडियाने बातमी केली. सलमानला महिन्याचा जामीन मिळताच त्याचे फॅन्स कसे नाचून आनंद साजरा करत होते ते चॅनल्सने दाखवले. या शिक्षेने सलमानला अपमान वाटण्याऐवजी त्याला तो सत्कार वाटावा असे आपण म्हणजे समाज वागतो आहे का? ज्यांना न्याय पाहिजे होता त्या लोकांचाच फक्‍त हा अपमान नाही तर आपल्या कायद्याचाही अपमान आहे, हे आपल्या लक्षात कसे येत नाही.  
            आपण नेमके कुठे चाललो आहोत? कोणाच्या बाजूचे आहोत आपण? ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्या बाजूचे आहोत का ज्याने अन्याय केला त्याच्या बाजूचे आहोत? आपण न्यायालयाला सलमान खानचा व्हिलन ठरवतो आहोत का? आणि सलमान चित्रपटात हिरो म्हणून त्याने नशेत रस्त्यावर लोक मारले तरी तो हिरोच ठरतो का? मनुष्य केव्हढाही मोठा असो. कितीही लोकप्रिय अभिनेता असो की राजकीय नेता असो. कायद्यापुढे सर्व लोक समान पातळीचे असतात. ज्याने गुन्हा केला त्याला शिक्षा व्हायलाच हवी. अशी शिक्षा एखाद्या सामान्य पण सज्जन माणसाला झाली असती तर आपण त्याला सहानुभूती दाखवली असती का? उलट त्याच्यापासून लांब राहणेच कोणीही पसंद केले असते. म्हणून आपण आपले चारित्र्य नव्याने तपासून पाहिले पाहिजे. आपण कोणाला नावाजतो आणि कोणाला लाथाडतो?
            हा लेख जरी मी सलमानच्या शिक्षेवर लिहीत असलो तरी तो एकट्या सलमानसाठी नाही. इथे सलमान ही व्यक्‍ती नाही तर सलमान सारख्या सेलेब्रेटींची समष्टी आहे. सलमानसारख्या लोकप्रिय असलेल्या अनेक व्यक्‍ती- राजकीय नेते आपली शिक्षा सुध्दा एंजॉय करतात. अशा प्रवृत्तींवर हा लेख आहे. मग तो सलमान असो, संजय दत्त असो, जयललिता असो, अजून कोणी सेलिब्रिटी असो की एखादा राजकीय नेता असो. अशा लोकांना शिक्षा झाली तर आपण कायद्याविरूध्द आहोत हे आपण आपल्या वागण्यातून सिध्द करीत असतो. आणि त्यात लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जाणारा मिडियाही सामील असतो ही अजून दुर्दैवी बाब आहे.
  
   - डॉ. सुधीर रा. देवरे         
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा