गुरुवार, १ जानेवारी, २०१५

आदर्श म्हणजे काय






-          डॉ. सुधीर रा. देवरे

 
            आदर्श म्हणजे काय? आदर्श कोणाकडून घेता येतात. आयुष्यात आपल्यापुढे एकच एक व्यक्‍तीचा आदर्श असतो का? का अनेक आदर्श असतात? देव लोक वा ऐतिहासिक पुरूष यांच्याकडून आपल्याला कोणते आदर्श घेता येतील याचीही चर्चा व्हायला हवी.
            आपले आदर्श काल्पनिक नकोत, ते व्यावहारिक असायला हवेत. कोणताही मनुष्य घडवायला फक्‍त एखादाच अनुभव- एखादाच आदर्श कामास येतो असे नाही. जिथून कुठून आदर्श घेता येईल तिथून आदर्श घेत पुढे जाता आले पाहिजे. म्हणून अनेक थोर व्यक्‍तींच्या आदर्शस्थानिय व्यक्‍ती कधीच एकच एक नसते.
            आदर्श घ्यायला खूप दूर जावे लागते असेही नाही. कोणाकडूनही काही शिकत असताना त्याचा एखादा उद्गारही आपले विचार उलटे पालटे करायला पुरेसा ठरतो. कोणाच्या एखाद्या उद्गाराचा -आपल्याला हवा तसा अर्थ घेऊन आपले जीवन आपण घडवू शकतो. आदर्श घेण्यासाठी ती व्यक्‍ती जगावेगळी वा सुप्रसिध्द असली पाहिजे असेही नाही. कोणत्याही सर्वसाधाण व्यक्‍तीकडून, लहान मुलांकडून, निसर्गाकडून, प्राण्यांकडून वा एखाद्या घटनेतूनही आपण आदर्श घेऊ शकतो. सृष्टीमधील कीटक, पशू, पक्षी याच्यांकडूनही आदर्श घेणार्‍याला घेता येतो. म्हणून आपल्या जीवनात फक्‍त एकच एक आपला आदर्श असतो, एकच एक गुरू असतो असे होत नाही.
            सामान्य माणसाचे सामान्य उद्गार, सामान्य कृती, पाहून ऐकून त्याच्याकडून आदर्श घेता येतो, अर्थात आदर्श घेणाराही तसा तोलामोलाचा असावा लागतो. नुसते विवेचन करत पुढे जाण्यापेक्षा इथं मला गौतम बुध्दाची एक गोष्ट आठवते. ती सांगतो:
            एकदा गौतम बुध्द आपल्या तत्वज्ञानाच्या प्रचारासाठी पायी भटकत होते. जंगलातून जात होते. इतक्यात एकदम मुसळधार पाऊस सुरू झाला. तम बुध्दांना रस्त्यात एक नाला आडवा आला.  नाला दोन्ही थड्या भरून वाहत होता. नाला अरूंद आणि खोल असल्यामुळे त्या नाल्याच्या धारेला जबरदस्त ओढ होती. नाल्यात त्या प्रचंड प्रवाहाच्या धारेत उतरलं तर वाहून जाण्याच्या भीतीमुळे नाल्याचे पाणी थोडे ओसरले की मग पुढे जाऊ असा विचार करून बुध्द नाल्याच्या काठी थांबले. तेवढ्यात त्यांचे लक्ष काठावरील एका झुडपावर गेले. त्या झुडपावर एक कोळी किडा आपलं जाळं विणत होता. नाल्यातील पाण्याने ते झुडुप अर्धेअधिक बुडालेले होते आणि पाण्याच्या प्रवाहामुळे ते झाड जोरजोराने मागेपुढे हेलकावे घेत हलत होते. झुडुप जसे हलायचे तसे ते कोळी किड्याचे विणलेले जाळे तुटत होते. तरीही कोळी किड्याने ते जाळं विणण्याचे आपलं काम बंद केल नाही. पुन्हा पुन्हा तुटूनही ते जाळे तो पुन्हा विणण्याचा सारखा प्रयत्न करत होता. 
            कोळीकिड्याने पाण्याच्या भितीमुळे आपले काम बंद करून आराम केला नाही, हे गतम बुद्द पहात होते. त्यांनी त्या किड्याकडून आदर्श घेतला. ते मनात म्हणाले, इतकी प्रतिकूल परिस्थिती असूनही साधा कोळी किडा आपलं काम बंद करत नाही तर मी माणसासारखा माणूस असूनही मला आराम करायचा काय अधिकार? लगेच बुध्दांनी नाल्यात उडी मारली व एवड्या प्रंचड ओढ असलेल्या पाण्यातून कसेतरी पोहत ते दुसर्‍या थडीला आले आणि धर्म प्रचाराच्या कामाला पुढे चालू लागले, म्हणजे चांगलं तत्वज्ञान शिकवण्यासाठी पुढे गेले. हा अर्थ त्या कोळी किड्याने बुध्दांना सांगितला नाही. त्या किड्याच्या हालचालीतून- धडपडीतून तो अर्थ स्वत: गौतम बुध्दांनी त्याच्या त्या कृतीतून काढला, हे सांगणे इथे महत्वाचे वाटते.
            याचं तात्पर्य काय? चांगलं काम करायचं असेल, अभ्यास करून एखादं शिखर गाठायचं असेल तर ते कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला प्रगती करता येते. प्रतिकूल परिस्थिती आपल्याला बांधून ठेवत नाही. आपणही त्याचे भांडवल न करता पुढे जात राहिले पाहिजे. दुसर्‍यांनाही चांगला रस्ता दाखवत.
            (या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.) 

-  डॉ. सुधीर रा. देवरे  
     
     इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/


२ टिप्पण्या: