शनिवार, १५ नोव्हेंबर, २०१४

कविता, गाणी आणि मंचीय कविता

-         डॉ. सुधीर रा. देवरे

         साठोत्तरी कवितेला मागे टाकून आज नवोदत्तरी कविता दिवसेंदिवस प्रगल्भ होऊ लागली तरी सर्वत्र दिसणारी – सादर केली जाणारी करमणूकप्रधान पारंपरीक कविता आपले मूळ सोडायला तयार नाही. ती विपुलपणे फोपवायला पोषक परिस्थिती आजही आजूबाजूच्या वातावरणात दिवसेंदिवस वाढताना दिसते. याला कारणीभूत ठरणारा पहिला घटक मला पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमात दिसतो. पुढे भविष्यात जो जो कोणी कवी होणार असतो, त्याला कविता पहिल्यांदा शालेय-महाविद्यालयीन अभ्यासक्रमात पाठयपुस्तकातून भेटते आणि ‍अशाच कवितांचा संस्कार त्यांच्यावर निर्णायक ठरतो.   
         राखीव जागांप्रमाणे कवितांना पाठ्यपुस्तकात स्थान दिले जाते. कवितेच्या गुणवत्तेप्रमाणे नाही. संत कवी इतके, पंत कवी इतके, विशिष्ट धर्मिय कवी इतके, विशिष्ट जातीय कवी इतके. त्यानंतर शेतकरी वा ग्रामीण बोली भाषेतील कवितेला जागा मिळाली तर मिळाली. असा राखीव कोटा पूर्ण करताना आणि काहींची वशिल्याने वर्णी लावताना चांगली कविता अभ्यासक्रमात कधीच येत नाही. म्हणून जिला कविता म्हटले जाते, ती अशीच असते, अशी खूणगाठ बालपणी- किशोरपणी भावी कवी आपल्या मनात बांधून ठेवतो आणि पुढे आयुष्यभर तशाच कविता पाडू लागतो. आपण अभ्यासलेल्या कवितेव्यतिरिक्‍त कविता असू शकते हे तो मान्य करायलाच तयार होत नाही. या मनस्थितीतून खूप कमी लोक बाहेर पडतात, ज्यांना वेळेवर योग्य मार्गदर्शक लाभतो.
         दुसरा घटक म्हणजे दरवर्षी गावोगावी होणारी शेकडो हौसी साहित्य संमेलने. (अशा संमेलनांतही राजकारण आणि अर्थकारण खेळत राहते.) या संमेलनांतून वाचली जाणारी मोठ्या प्रमाणातील अकविता. या अकवितेमुळे समाजात कोणालाही सहज कवी म्हणून मान्यता मिळू शकते आणि तालुका जिल्हास्तरीय वर्तमानपत्री प्रसिध्दीही मिळते. श्रोत्यांमधील कवी होऊ घातलेले शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थी याच कवितेचे अनुकरण करत कवी होऊ पाहतात. कविता करणे किती सोपे आहे, असे ही  व्यासपिठीय कविता ऐकून त्यांच्या ध्यानात येऊ लागते. तिसरा घटक म्हणजे कवितेचा व्यावसायिक धंदा करत पैसा कमवू पाहणारा कवी वर्ग. हे कवी कवितेचे कार्यक्रम करतात. गावोगावी शक्य असेल त्या व्यासपिठांवर आणि महाविद्यालयांमध्ये कविता वाचन करून पैसे कमविण्यासाठी कविता राबवतात.
         आज लिहिल्या जाणार्‍या कवितेत तीन प्रकार दिसतात. आधुनिक म्हणता येईल अशी कसदार सकस कविता, गाण्यांचा प्रभाव असलेली गेय कविता (चारोळ्या आणि गझला गृहीत.) आणि व्यासपिठावरून भाषण करावे तशी म्हटली जाणारी मंचीय भाषण कविता. मंचावरून एखाद्याने आपली गंभीर कविता सादर केली की तिला कसलीही दाद मिळत नाही. मग श्रोत्यांच्या डोक्यावरून जाईल ती पडलेली कविता, अशी वर्गवारी ठरलेली. कवीने अशी गंभीर कविता सादर करायला सुरूवात केली की एकेका शब्दांचा वा ओळींचा संदर्भ मॉबला तात्काळ लागेलच याची शाश्वती नसते. श्रोत्यांमध्ये असे जाणकार दर्दी काव्य रसिक असतातच असे नाही. परिणामी गंभीर कविता व्यासपिठावर सपशेल अयशस्वी ठरते.
         एक वेळ गाणे- गेय कविता ऐकून आपण सहन करू शकतो पण मंचावरून सांगितली जाणारी भाषण कविता ऐकणे जबरदस्त शिक्षा ठरते. अशा भाषण कवितेत विशिष्ट पध्दतीचा हेल काढून उपदेश, सुविचार, उद्‍गार, तथाकथित प्रबोधन, माहिती, चटकदार कोट्या, टोमणे, कोपरखिळ्या असे सर्व काही अगदी ठासून भरलेले असते. ‘वा वा, क्या बात है’ आणि टाळ्या असा प्रतिसाद मिळाला की कवी अजून चेकाळतो. ज्या कवितेला अशी दाद मिळाली ती गावोगाव आपोआप चांगली कविता म्हणून पुढे येते आणि त्या कवितेचा जन्मदाता सुप्रसिध्द कवी म्हणून ओळखला जातो.
         सदर लोकप्रिय कविता आपल्याला कशी सुचली याची निर्मितीप्रक्रिया सुध्दा सांगितली जाते. अनेक कवी डायसजवळ विशिष्ट पोज देणे याला सुध्दा आता कविता सादर करण्याचे अंग मानू लागलेत.  आजच्या फेसबुकच्या जमान्यात अशा भाषण कविता सादर करतानाचा फोटो तर आवश्यक बाब ठरली आहे. कविता आणि भाषण यांच्यातील पुसट रेषा अनेकांच्या लक्षात येत नाही. यात विद्यापिठीय चर्चासत्रांची भर पडली आहे. (तू मला तुझ्या कॉलेजवर बोलव आणि उसणे फेडण्यासाठी  मी पण बोलवीन. यात तू गोड मी गोड, असं सगळीकडे गोड गोड साटंलोटं चाललंय. भाषण हे विशिष्ट मुद्दे मांडण्यासाठी दिले जात नाही,  तर नेमून दिलेला समारंभाचा तास पूर्ण करण्यासाठी केले जाते. मग त्यात विनोद, चुटके, किस्से सांगत वेळ मारून नेता येते. तीच गोष्ट कवितेची.) आज कवितेची आराधना व्यावसायिक होत पैसे कमावण्याचे साधन होऊ पहात आहे हे सर्वात घातक. हौस आणि बेगडी प्रसिध्दी ही या नाण्याची दुसरी बाजू. (उदाहरणादाखल त्या त्या प्रकृतींच्या कवींची नावे इथे मुद्दाम दिलेली नाहीत.)
         गुहामानवासारखे आपल्या घराच्या कोपर्‍यात समाधी लावून कविता जगणारे कवी ह्या हमरस्त्यातून आल्हाद बाजूला फेकले जातात. ते कोणत्याच परंपरेत (पहिली, दुसरी, तिसरी परंपरा) बसत नाहीत. कोणत्याच गटात सामील होत नाहीत. समीक्षकही त्यांना अनुल्लेखाने मारतात. म्हणून असे कवी व्यासपिठांवरून तर दिसत नाहीतच पण तथाकथित चळवळीतल्या अनियतकालिकांतही छापून येत नाहीत. तिथेही गट तट असल्याचा हा परिणाम असतो. 
         कविता कशी आस्वादायची यावर एकदा विंदा करंदीकर आपल्या मुलाखतीत म्हणाले होते, ‘कविता आस्वादायची नसते. भोगायची असते, आणि ती ही अगदी कपडे काढून’. याचा अर्थ कविता ही सार्वजनिक जागेत आनंद घेता येईल अशी कलाकृती नाही. सोवळे ओवळे पाळून मखरात बसवून पूजा अर्चना करायची ती आकृती नाही. कविता ही ‍अतिशय एकांतात समाधी लावून, व्रत घेऊन म्हणजेच अभ्यास करून मेंदू आणि हृदयाने जगण्याची- लिहिण्याची- समजून घ्यायची कला आहे, असा या उद्‍गाराचा ध्वन्यार्थ काढता येईल.
         (या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या
ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

        -  डॉ. सुधीर रा. देवरे
     
           इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा