मंगळवार, ३१ जुलै, २०१८

प्रवाहीत ती भाषा...




-         डॉ. सुधीर रा. देवरे

                    मराठी भाषा म्हणजे शेतीप्रधान ग्रामीण पायाभूत शब्दांची आणि बारा बलुतेदारांची सहज पारंपरिक मौखिक संपदा, जी काही शतकांपासून ग्रांथिक आणि प्रमाणभाषा झाली. मराठी भाषेचा हा पट्टा म्हणजे शेतवाडी आणि शेतीसाठी लागणार्या वस्तूंच्या उपयोजनाची भाषा. शेतीबाडीची आणि ग्रामीण राहणी साहणीची भाषा जेव्हा समजण्यापलीकडे जाईल तेव्हा कृषी प्रधान मूळ लोकसंस्कृती आणि पर्यायाने मराठी भाषेचा प्रवाह नवे वळण घेऊ लागेल.
          विशिष्ट परिसरात बोलली जाणारी भाषा एकच असते. ती विशिष्ट नावाने ओळखली जाते. जशी मराठी. (समाजात- गावगाड्यात विविध स्तरांवर काम करणार्या प्रत्येकाला भाषा आपलीच वाटते. आपापल्या विशिष्ट परिवेशात भाषा वाकवली जाते.) गावगाड्यातले हे सगळे लोक जगण्यातून आपापली भाषा सहजतेने व्यवहारात उपयोजित करीत असतात. ज्यात कुठलीही लादलेली क्‍ती नसते. ती असते आपली भाषा. अशी रोज उपयोजित होणारी भाषा कधी मरु शकत नाही. कशी मरेल? जोपर्यंत या भाषेत शिक्षण देणार्या सर्वदूर मराठी शाळा आहेत. (दुर्दैवाने आता मराठी शाळांना उतरती कळा लागली आणि शासनही मराठी शाळा बंद करण्याच्या तयारीत आहे. याचे कारण खेडोपाडी इंग्रजी शाळांचे फुटलेले पेव.) जोपर्यंत मराठीत कविता करणारे कवी आहेत. मराठीत लिहिणारे लेखक आहेत. मराठी वर्तमानपत्रे आहेत, मराठीत निघणारे नियतकालिके आहेत. मराठीत दर्जेदार चित्रपट निघताहेत. महाराष्ट्रातील मोठमोठ्या शहरात खेड्यापाड्यातून आलेल्या लोकांच्या दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्ट्या आहेत. आणि मुख्य म्हणजे मराठीशिवाय दुसरी भाषाच ज्ञात नाही अशा अनेक ग्रामीण- अडाणी लोकांमुळे मराठी भाषा जीवंत राहणार आहे. मात्र ज्या व्यक्‍तींच्या वा गटाच्या व्यवसायातले- कामातले शब्द भाषेतून कालांतराने लुप्त होतात ती भाषा त्या समुहासाठी संपत जाते. ही भाषा काळाच्या उदरात कायमची गडप झाली नाही तरी, तिचे बलस्थान डळमळते. भाषेतल्या शब्दांसोबत भाषेची वाक्यरचनाही हळूहळू संपर्कात येणार्या भाषेत वळण बदलते.  
           भाषेत आपापलं वाटणारं वा ज्याचं त्याचं असं काही नसलं की ती उरते कृत्रिम भाषा. कृत्रिम भाषा व्याकरणाने शिकावी लागते. सहज भाषा आधी बोलली जाते.‍ तिचे व्याकरण बोलणार्याला माहीत नसते. कोणतीही परकीय भाषा ही आपल्यासाठी कृत्रिम भाषाच असते. कृत्रिम भाषेला आपण घाबरतो. काही चुकलं तर नाही ना, हे पुन्हा पुन्हा तपासून घेतो. भाषेला आपण जेवढे घाबरू तेवढी ती आपल्यापासून दूर जाते. जिला आपण घाबरतो अशी परकी भाषा सहजसाध्य उत्फुर्तपणे आपल्या जिभेवर येत नाही.
          पण आपली स्वत:ची भाषा जेव्हा कृत्रिम होऊ लागते तेव्हा ती भाषा ज्ञान भांडाराची असो वा प्रचंड ग्रांथिक पांडित्याची असो, तिचा मृत्यू जवळ आलेला असतो. उदाहरणार्थ, आपण बोलत असलेल्या मराठीत जर रोज आपल्याला कोणी सांगू लागलं, की हा शब्द असा नाही, असा आहे. ह्या शब्दाचा उच्चार चुकीचा आहे. अमूक हा शब्द परका आहे वगैरे. तर चौकटीत ंदिस्त होऊ पाहणारी आपलीच भाषा आपण हरवून बसू. एखादी भाषा बोलणारा कळप त्या भाषेची दारे इतरांसाठी बंद करून घेतो अशी भाषा जास्त काळ टिकत नाही. याचे कारण ती भाषा प्रवाही रहात नाही. साचून राहते. आणि साचलेल्या पाण्याचे जसे दुर्गंधी डबके होत जाते, तशी भाषा अवजड होत तिच्यातला सर्वसमावेशक सहजपणा नष्ट होतो. भाषा ही नदीच्या प्रवाहासारखी आपल्या धारा बदलत राहते, ते स्वाभाविक आहे. 
          प्रचंड प्रमाणात वापरली जाणारी एखादी भाषा कोणत्याही लहान भाषेला संपवत नाही. जगातील एखाद्या भाषेला इतर दुसरी भाषा मारत नाही. कोणतीही भाषा एखाद्या भाषेची शत्रू असू शकत नाही. कोणतीही भाषा एखाद्या भाषेची स्पर्धक होऊ शकत नाही. उलट एक भाषा दुसर्या संपर्क भाषेला कायम सक्षम- सशक्‍त बनवीत असते. भाषा मरते ती भाषा बोलणार्यांच्या न्यूनगंडामुळे. न्यूनगंडापेक्षा अपराध गंड मोठा आहे. आपण ग्रामीण भाषा बोलतो म्हणून आपण गावंढळ समजले जाऊ, हा न्यूनगंड. आपण आपली घरातली भाषा बाहेर बोललो म्हणून अपराध केला की काय वा गुन्हा केला की काय, असं वाटणं हा अपराधगंड. केवळ न्यूनगंडामुळे भाषा मरत नाही. अपराधगंडामुळे भाषा लवकर मरायला सुरूवात होते. एखाद्या लहान क्षेत्रफळात बोलल्या जाणार्‍या भाषेचे लोक, काही कारणास्तव जेव्हा इतरत्र पण विविध ठिकाणी स्थलांतरीत होतात, अशा कारणांमुळेही ती भाषा विस्मरणात जाऊ शकते.
          भाषा मरण्याचे अजूनही काही कारणे आहेत. पूर्वी जेत्यांच्या आडमुठी भाषा प्रसारामुळे, भाषा लादण्याच्याअतिरेकामुळे, भाषेच्या आग्रही शुध्दपणामुळे, अवास्तव सोवळेपणामुळे, व्याकरणाच्या काटेकोर नियमांमुळे आणि ही भाषा आपल्या गटाबाहेर समजता कामा नये अशा गुप्त व्यवहारामुळे भाषा कृत्रिम होत मरणपंथाला लागल्या आहेत. बर्याच नामशेषही झाल्या आहेत. भाषा मरते ती भाषाभिमानाच्या श्रेष्ठ- कनिष्ठ ठरवल्या जाणार्या अशास्त्रीय स्पर्धेत. भाषेला संस्कृती असते. भाषेला लोकसंस्कृती असते असे म्हणणे जास्त सयुक्‍ती ठरेल.
                    भाषेला कोणतीही चौकट नसते, सीमा नसते. भाषा प्रवाही असते म्हणून ती प्रवाहाच्या थड्या फोडून बोलणार्यांच्या उताराला वाहत राहते. भाषा केवळ साहित्यातून नव्हे तर आपल्या मातीत मुळं खुपसत उपयोजित होत राहिली पाहिजे. म्हणजेच भाषा आपल्याच जीवन जाणिवेतून आणि परिवेशातून पारखी होता कामा नये. जगण्यातून, भौगोलिक जडणघडणीतून सहज उगणार्या वनस्पतींप्रमाणे भाषेला त्या परिवेशात श्वास घेता आला पाहिजे.
                   विशिष्ट भौगोलिक परिसरातील भाषा एक असूनही ती कालाच्या महिमानुसार निरंतर बदलत असते. मराठीचं उदाहरण बोलकं आहे. मराठीचा भाषिक प्रवास प्राचीन महारठ्ठी भाषा, मरहठ्ठी, महाराष्ट्री प्राकृत, अपभ्रंश मराठी, आजची मराठी असा झाला आहे. अलीकडची आपल्याला सहज ज्ञात असणारी मराठी म्हणजे श्रीचक्रधरकालीन, ज्ञानेश्वरकालीन, शिवकालीन, स्वातंत्र्यकालीन आणि आजची मराठी. भाषा कोणतीही असो, तिच्यात कालांतराने बदल होत असतो. ज्ञानेश्वरांच्या भाषेपेक्षा आपल्याला तुकारामांची भाषा जास्त समजते. तुकारामांच्या भाषेपेक्षा आपल्याला टिळक- रानडे- आगरकर- लोकहितवादी- परांजपे यांची भाषा जास्त समजते. आणि या सर्वांपेक्षा बोली भाषेला जवळ जाणारी जोतिराव फुल्यांची भाषा जास्त समजते. फुल्यांच्या भाषेपेक्षा आजची वर्तमानकालीन भाषा आपल्याला जशीच्या तशी समजते. याचे कारण भाषेतले तात्कालिक वास्तव संदर्भ. परंपरेतून आलेली भाषा आपलीच असून आजची भाषा आपल्याला जास्त जवळची वाटत असते.  
          भाषेला नदीची उपमा दिली की मुद्दा अधिक स्पष्ट होईल. कोणत्याही मोठ्या नदीचे उगमस्थान मनात भरणारे नसते. अतिशय छोट्या दर्‍या खोर्‍यातून वा अरूंद ओढ्यासारख्या ओहळातून ती सुरूवातीला वाहताना दिसते. नदी जसजशी प्रवाही होत पुढे जात राहते, तशा अनेक उपनद्या, ओहळ, झीळ, ओढे, लवन त्या नदीला येऊन‍ मिळतात आणि समुद्राला जाऊन मिळेपर्यंत ती विस्तृत पात्र असलेली नदी होते. भाषेचंही तसंच आहे. (अशी परिपूर्ण भाषा म्हणजे आजची इंग्रजी.) पण काही भाषांत काय होतं की इतर उपनद्या, ओहळ, झीळ भाषेपासून लांब ठेवण्याचा अट्टहास धरला जातो. का? तर मूळ भाषा अशुध्द होऊ नये म्हणून. आणि असे काही प्रवाह भाषेत सामील होऊ लागले की भाषारक्षक लोक भाषेच्या उगमाजवळ जात म्हणतात, ही खरी भाषा. अशा चुकीच्या प्रबोधनाला बळी पडून तिच्या संकुचित पात्राला आपण भाषा संबोधू लागतो. भाषेच्या उगमाजवळच बंधारे घालू पाहतो. असं झालं की भाषेच्या नदीचा पुढचा प्रवाह आटतो आणि भाषा मरण पंथाला लागते. 
     (‘भाषा आणि जीवन पावसाळा 2017, प्रकाशन जुलै 2018 या नियतकालिकात प्रकाशित झालेला लेख. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

शनिवार, १४ जुलै, २०१८

शेती



- डॉ. सुधीर रा. देवरे

     बाजरी, गहू, हरभरा, ऊस, कामोड्या (कापूस), मका, दादर, कांदे आणि काही प्रमाणात भाजीपाला अशी आमची उत्तर महाराष्ट्र वासियांची पारंपरिक शेतातली पिकं होती. जळगाव भागात केळी, नाशिकच्या जवळपास (निफाड, पिंपळगाव बसवंत आदी भागात) द्राक्ष, अशीही त्यातल्यात्यात विभागणी असायची. आमच्या गावात शेताच्या कडेला उभं राहिलं की नजर जाईल तिकडे एकच एक पिक दिसे. खरिपात बाजरी आणि रब्बीत गहू. गावकर्‍यांनी केलेली सामुहीक शेती म्हणजे पाट थळ आणि ज्याची त्याची खाजगी शेती अशा पिकांनी बहरलेली दिसायची. या पिकांना सेंद्रिय खते (लेंडी खत, मेंढी खत, शेण खत, गाळ खत, पुंजं खत, सोन खत, राख आदी) दिली जायची. आणि फवारेही सेंद्रिय मारले जात.
     पण अलीकडे रासायनिक खते आणि फवारे मोठ्या प्रमाणात वापरले जातात. काळाच्या ओघात इथला शेतकरी केव्हा व्यावसायिक- कमर्शियल झाला हे त्यालाही कळलं नाही, इतक्या सहज पध्दतीने तो व्यापारी पिकांकडे वळला. मध्यतंरी तीस- पस्तीस वर्षांपूवीँच्या आसपासच्या काळात इथल्या शेतकर्‍याने (द्राक्ष पिकवणार्‍या भागाव्यतिरिक्‍त) द्राक्षांची लागवड सुरू केली. हळू हळू द्राक्षांसोबत आता तो डाळींब पिकांकडे वळला. आणि अधूनमधून भरपूर पैसे कमवू लागला, असं कोणाला वाटत असलं तरी ही पिकेही बेभरवश्याची आहेत हे त्याच्या लक्षात येऊ लागलं. तेल्या या रोगापासून तर अवकाळी पाऊस आणि गारपिटींमुळे बागपिकांचे नुकसान भरून न येणारं आहे. फवारणीसह अन्य मजूरींसाठी भरपूर भांडवल शेतकर्‍याला या बागेत गुंतवावं लागतं. आता शेतकरी डाळिंबाची निर्यात करू लागला. हे शेतकर्‍याच्या आर्थिक फायद्याचं असलं तरी यातून काही वेळा शेतकर्‍याचे भांडवलही वसूल होत नाही. व्यापारी पिके घ्यावी की पारंपरिक अशा मनस्थितीत आज इथला शेतकरी सापडला. कांदा हे व्यापारी पिक असलं तरी तेही बेभरवश्याचं झालं. काळी, बैडं, थळ, चाकोले, बागायती, जिरायती, पांढरी (गाव वस्ती) आदी शेतीतले आणि गाववस्तीतले काही प्रकार आहेत. जमिनीचा कस पाहून पिकं घेतली जातात. 
     आपलं संपूर्ण शेत खरिपात बाजरीने आणि रब्बीत गव्हाने वा हरभर्‍याने उभ्या दिसणार्‍या शेतात आता बाजरीचा वा गव्हाचा दाणा पिकत नाही, हे ‍अघटीत वाटतं. ज्यांच्याकडे शेती नाही त्यांच्याप्रमाणेच शेतकरी सुध्दा आता गहू- बाजरी मार्केटमधून व्यापार्‍याकडून विकत घेताना दिसतो हे दृश्य डोळ्यांनी पाहवत नाही. (हा गहू पंजाब, मध्यप्रदेश आदी राज्यातून मागवला जातो.)
     आधी लाकडी नांगर नंतर लोखंडाचा नांगर म्हणून त्याचे लोखंड्या हे नामकरण आणि आता ट्रॅक्टरने शेतीची कामं होऊ लागली. या बदलामुळे बैल आणि बैलगाडी शेतकर्‍यांकडे दिसत नाहीत. (एक बैलगाडी लुप्त झाल्याने बैलगाडी संदर्भातले भाषेतले अनेक शब्द आणि वाक्‍प्रचार लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.) लाकडी नांगर, वखर, पांभर, कोळपणारं, फळी देण्यातली लाकडी फळी आदी औतं दिवसेंदिवस नामशेष होऊ लागली. धान्य काढायचं मशीन आल्याने कोणी शेतकरी पाथेवर बैल हाकताना दिसत नाही. म्हणून बैलाच्या तोंडावरचं मुचकंही इतिहासजमा झालं. बाजरी खुडणे, पाथ धरणे, खळे सारवणे, खळे लावणे, कणसं कांडणे, मोगरी, च्याहूर, पाट्या देणे, उपणणे, वार्‍याची वाट पहाणे, मुचकं आदी शब्दही मान टाकू लागले. बाजरीचे कणसं खुडायला माणसं लावल्याचं कुठं दिसत नाही. गावाजवळची खळवाडी दिसेनाशी झाली.
     विहिरीतून मोटेने शेतीला पाणी भरण्याच्या काळात मोटेवरची गाणीही रानात शिरताच सहज ऐकायला मिळत. नंतर रॉकेलवर चालणारी वेगवेगळ्या कंपनींची ‍इंजिनं आली आणि आता इलेक्‍ट्रीक मोटारी सगळीकडे दिसू लागल्या. दिवसेंदिवस विहिरींचं पाणी तळाला चाललं. विहिरींची खोली वाढू लागली. पाण्याचा तुटवडा पडू लागला तसं जास्त पाणी लागणारं आणि वर्षभर पोसावं लागणारं ऊसासारखं पिक घेणं कमी होऊ लागलं. शेताला म्हणजे विहिरींना जोपर्यंत महामुर पाणी होतं, तोपर्यंत विहिरीतलं पाणी मशिनने वा इलेक्ट्रीक मोटरने हौदात पडून सारंगने वहात शेतात जात असे. शेतकरी शेतातल्या वाफ्यांना वा बेल्यांना बारा देऊन पाणी भरायचे. बारा देणे हा वाक्प्रचारही कालांतराने भाषेतून लुप्त होईल. आता तुषार सिंचन वा थेंब (ठिबक) सिंचनाने शेताला पाणी दिलं जातं. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मात्र या शोधाचं स्वागतच करावं लागेल.
शेतकर्‍याला भौतिक सुख मिळावं, त्याच्या हातात दोन पैसे खेळावेत याबद्दल कोणाचंही दुमत असणार नाही. पण आपली पारंपरिक पिकं अजिबात न घेणं हे मनातल्या मनात खडळतं. व्यापारी पिकांसोबत आज थोडीफार पारंपरिक शेतीही व्हायला हवी, असं वाटत राहतं. आज शेती वाटेहिश्यांमुळे अनेक तुकड्यांत विभागली गेली. म्हणून मशीनने सलग एकाच पिकाची शेती करणे कठीण होऊन बसले.
     (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/