- डॉ. सुधीर रा. देवरे
३. अहिराणीसह बोली परिवेशांची लोकसंस्कृती :
अहिराणी लोकसंस्कृती वा एकूण बोली भाषांची लोकसंस्कृती म्हणजे नेमकं काय? याबाबत आपण अतिशय वरवरचा विचार करून वर्णनात्मक स्वरूपात मांडणी करत अहिराणी लोकसंस्कृतीचं स्थूल स्वरूप सांगत राहतो. लोकजीवनातल्या ठळक बाबींचा उल्लेख करत ‘अमूक अमूक या बाबी’ म्हणजे अहिराणी लोकसंस्कृती असं म्हणू लागतो. पण हा विषय आपण समजतो त्यापेक्षा खूप खोल, सूक्ष्म आणि व्यापक आहे, तो मुळातून समजून घेतला पाहिजे.
अभिर- अहिर- अहिराणी या सूत्रानुसार अभिर लोकांची भाषा अहिराणी हे आपण कधीच मान्य केलं आहे. आज नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि संभाजीनगरचा काही भाग ह्या जिल्ह्यांत अहिराणी बोलली जात असली तरी अभिर लोक पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजराथसह संपूर्ण उत्तर- वायव्य भारतात पसरलेले आहेत, आणि तिकडूनच ते बागलाणात- खान्देशात आले. ज्या त्या स्थानिक गरजेनुसार, ज्या त्या परिवेशातल्या बदलानुसार लोकांची स्थानिक भाषा बदलत गेली. आज विविध प्रांतात (महाराष्ट्राबाहेर) राहणारे अभिर त्या त्या प्रांतीय भाषा बोलतात. पण अशा सगळ्याच अभिरांत (म्हणजे आजच्या बहुजन समाजात) जी जात उतरंड तात्कालीक अभिजन वर्गानं जाणीवपूर्वक लादून बहुजनांचं शोषण सुरु केलेलं दिसतं, ते धर्मसत्तेतून कायमस्वरुपी आजही समाजसत्तेत दिसून येतं. हे शोषण फक्त अभिरांचंच झालं असं मात्र नाही, तर ते संपूर्ण भारतभर, अगदी दक्षिण द्राविड लोकांतही (स्थानिक मूळ रहिवाशांत) पुढं पध्दतशीरपणे होत राहिलं.
या विशिष्ट कारस्थानात गुपचूप अनेकसूत्री कार्यक्रम राबवला गेला. यात स्थानिक बोलीभाषा मारणं, अथवा त्या भाषांची अशुध्द, गावठी अशी बदनामी करत त्यांच्या जागी संस्कृत भाषा ग्रंथांतून ठरवून प्रस्थापित- उपयोजित करणं, अथवा त्याच भाषेवर संस्कृतचा मुलामा चढवत प्रमाणभाषा- शुध्द भाषा म्हणून मिरवणं, स्थानिक ग्रामीण लोकदैवते नष्ट करणं, लोकदैवतं नष्ट होत नसतील तर अशा लोकदैवतांच्या भाकड अनैतिक खोट्या कथा- गोष्टी पसरवणं, त्यांचं अस्तित्व भ्रष्ट करणं, त्यांना तामसी म्हणणं, त्यांना अशिष्ट भक्षण करणारे ठरवणं, त्यांच्या मुर्ती विकृत बनवणं (उदा. गणपती आणि इतर बरेच.), अशिष्ट लोकांचे देव अशिष्ट असा प्रचार करणं, इतकं करूनही ते नष्ट होत नसतील तर त्यांचेच व्यापारीकरण सुरू करत त्यांच्याच नावानं व्यवसाय सुरू करणं, पुढं बहुजनांतल्या ऐतिहासिक महापुरूषांबद्दलही हेच धोरण राबवून आडमार्गानं त्यांना कमी लेखण्याची पध्दतशीर भूमिगत चळवळ- कुजबुज मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे. समाजात आपले वर्गवर्चस्व प्रस्थापित होईल अशी व्यवस्था जाणूनबुजून निर्माण करण्याच्या अनेक गोष्टी विशिष्ट अभिजन वर्गाकडून सतत घडत राहिल्या आहेत, अजूनही होत आहेत. अगदी आधुनिक म्हणता येईल अशा आजच्या काळातही हे राजरोस सुरू आहे. या सगळ्यांचे पडसाद भाषेत पडत राहतात, मग ती शिव्यांची भाषा असो की स्तुतीची.
हे सांस्कृतिक थंड यादवी युध्द एकतर्फी असून ते प्रत्येकालाच जाणवत नाही. आपल्या अडाणीपणामुळं वा न्युनगंडामुळं अनेक लोक उच्चभ्रूंचं अनुकरण करत राहतात. असं करण्यात आपण आपल्या मूळ लोकसंस्कृतीशी प्रतारणा करतो हे त्यांच्या लक्षात येत नाही. लोकसंस्कृतीशी फारकत घेत आपल्या भाषेचीही बहुजन वर्ग नाळ तोडू पहातो. आपल्या भाषेला अभिजन लोक अशुध्द, गावढंळ म्हणतात म्हणून बहुजन त्यांच्या भाषेचंही अनुकरण करू लागतो. आपले पारंपरिक कामं करताना वा बदललेली मजूरी करताना आपण इथल्या पारंपरिक व्यवस्थेचे बळी आहोत, हेही त्यांना कळत नाही. काबाडकष्ट करूनही ते दिखाव्याच्या अनुकरणात मस्त असतात. खस्ता खात कमवलेला पैसा, तथाकथित मुक्ती मिळवण्याच्या लालसेनं वा घरबसल्या पुण्याच्या गणनेसाठी, एखाद्या पोथीतून सांगितलेल्या विधीवर दान- दक्षिणेत सहज उधळून देतात.
ही लादलेली ऐतखाऊ व्यवस्था स्वानुभवातून ज्यांच्या लक्षात येते, ते लोक अशा शोषणाची मांडणी करू लागतात, पण हे प्रबोधन एकतर अतिसामान्यांपर्यंत पोचत नाही अथवा लोकांत पध्दतशीरपणे पसरवलेले पारंपरिक तथाकथित देवसंस्कार त्यांना लुबाडू वास्तवाची जाणीव होऊ देत नाहीत. यावर उपाय म्हणजे ज्यांचं थोडंफार वाचण्यापुरतं शिक्षण झालं आहे, त्यांनी जास्तीतजास्त वास्तविक वाचन करून आधी स्थानिक आणि नंतर सर्वदूरची मानवी लोकसंस्कृती नीट समजून घ्यावी, एवढीच अपेक्षा तटस्थतेनं करता येते. कारण जो लोकसंस्कृतीत मुरतो तो स्थानिक भाषेत रमतो.
या पार्श्वभूमीवर आजच्या अहिराणी लोकसंस्कृतीचं मूळ अभिरांच्या ऐतिहासिक सत्यतेनुसारचं दर्शन रूंद होत जातं. म्हणून लोकसंस्कृतीचा विचार करताना, लोकसंस्कृतीत अनुस्युत असलेल्या बाबी व्यापक अंगानं समजून घेतल्या पाहिजेत. यात कालबाह्य ठरू पाहणाऱ्या आजच्या धंदेवाईक धार्मिक संकल्पना दूर ठेवणं, एखाद्या विशिष्ट उच्च वर्गाचं प्राबल्य निर्माण करण्याचं कारस्थान व त्यांचं वर्चस्व झुगारुन देणं, अंधश्रध्दांचं कवच दूर सारत खरी आदिम- आर्ष लोकसंस्कृती जतन करणं, देवभोळेपणा सोडणं, बाबा-बुवा संस्कृतीकडं पाठ फिरवणं, चुकीचं दान ओळखणं, आपली मूळ लोकसंस्कृती बळकवणाऱ्यांवर प्रहार करत सर्वसामान्यांना यातून जागं करणं, त्यांचं प्रबोधन करणं आदींसहीत इथल्या- खास अहिराणी पट्ट्यातल्या मानवी मूलभूत जिनसा, आपल्याला या समृध्द लोकसंस्कृतीत यापुढं पुढच्या पिढीसाठी जतन करून ठेवायच्या आहेत.
आजूबाजूचा समाज आपल्या मुठीत ठेऊ पाहणारे धर्म-वर्चस्ववादी लोक नेमकं याविरूध्द वागतात. ते स्थानिक लोकसंस्कृतीला विरोध करणारे असतात. त्यांना सर्वदूर आपलं प्राबल्य प्रस्थापित करायचं असल्यानं विविध लोकसंस्कृती, सांस्कृतिक विविधता, बहुभाषा, प्रांतियभाषा, बोलीभाषा, स्थानिक महात्म्य आदींना अशांचा सुप्त विरोध असतो. अस्तित्वात असलेल्या सगळ्याच विविध जीवन जाणिवांचे लोक त्यांना आपल्या कह्यात आणायचे असतात. अशा घटनांतून स्थानिक लोकसंस्कृतीचं सपाटीकरण सुरू होतं. म्हणून बहुजनांचे हित डोळ्याआड करणं, बहुजनांच्या भाषेला कमी लेखत आपली भाषा पेरणं, बहुजनांच्या लोकपरंपरा बाजूला सारत मुख्य धारेतल्या लोकपरंपरांचा उदोउदो करणं, बहुजनांच्या लोकदैवतांना हीन समजणं, प्रत्येक बाबतीत पुरोहिताकडून पूजा आवश्यक करणं, बाबा वाक्य प्रमाण मानणं आदी बाबी अहिराणी लोकसंस्कृतीसह सर्वदूरच्या बहुजन लोकसंस्कृतीला सुरूंग लावणाऱ्या आहेत.
या व्यतिरिक्त अहिराणीसह सर्वच लोकभाषेतील दुर्मीळ शब्द, वाक्प्रचार, उखाणे, म्हणी, ओव्या, विधी, लोककथा, लोकगीते, लोकवाद्य, लोकनाच इत्यादी पारंपरिक बाबीही अपेक्षित असल्या तरी फक्त याच गोष्टींना आपण लोकसंस्कृती म्हणू लागलो आहोत. पण आपण जे समजतो ते लोकसंस्कृतीचे काही घटक आहेत, पूर्ण लोकसंस्कृती नाही. स्थानिक लोकसंस्कृतीतून स्थानिक भाषा जन्म घेते, दुसऱ्या भाषेच्या उदरातून भाषेचा जन्म होत नाही अथवा एखाद्या भाषेचं अशुध्द- अशिष्ट रूप म्हणजे एखादी बोली, असं म्हणणं चूक आहे. अहिराणीसह सर्वच बोलीभाषा अशाच स्वयंभू आहेत. म्हणून अहिराणीसह विविध लोकसंस्कृतीतील मुळातली चौडी व्यापकता सगळ्याच अभ्यासकांनी समजून घेणं आवश्यक ठरतं.
भारतीय विविध प्रांतातील सर्वदूर असलेल्या अनेक स्थानिक लोकसंस्कृतींचा मागोवा घेत अभ्यास केला तर इतक्या प्रचंड विविधतेतील एकताही सहज लक्षात येते. अनेक तारा कुठं कुठं जुळताना दिसतात. आपल्याकडील अमूक लोकसंस्कृतीचा घटक, तिथल्या अमूक विधीशी जवळचा वाटू लागतो. म्हणून ज्यांना आपली स्वत:ची लोकसंस्कृती कळत नाही, ते स्वत:च्या परिवेशातही उपरे ठरतात आणि मूळ उपऱ्यांची गुलामगिरी करत राहतात! ह्या लोकसंस्कृतीच्या विविधतेचं सपाटीकरण होऊ न देता विविधतेची व्यापक लोकसंस्कृती जशीच्यातशी जपली पाहिजे. (उदाहरणार्थ, महाराष्ट्रात मराठीसह सर्व बोली जिवंत ठेवल्या पाहिजेत). अशा लोकसंस्कृतीतूनच स्थानिक बोलीभाषांचा नैसर्गिक प्रवाह खळाळत असतो.
(‘काव्याग्रह’, दिवाळी- भाषा विशेषांक २०२५ मधील ‘अहिराणी, एकूण बोली आणि मराठी’ या प्रकाशित दीर्घ लेखातील ‘अहिराणीसह बोली परिवेशांची लोकसंस्कृती’ हा तिसरा आणि शेवटचा भाग. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर राजाराम देवरे
ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/