डॉ. सुधीर रा. देवरे
१. भाषा मरते म्हणजे...
मराठी ही इथून तिथून एकच भाषा असली तरीही या एकाच भाषेत ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व स्तरातील लोकांना आपापली भाषा दिसते. शेतकर्याला आपली स्वत:ची भाषा दिसते. मजुराला आपली भाषा दिसते. तसंच बाराबलुतेदारांनाही आपापली भाषा दिसते. याचा अर्थ एकाच भाषेच्या रस्त्यातून चालताना आपापल्या गावात आपापले घरगुती शब्द लोकभाषेत सहज उपयोजित होत असतात. आपले व्यावसायिक शब्द त्यांच्या न कळत लोक भाषेत वापरत असतात.
केव्हा केव्हा इतिहासात भाषेला धार्मिक चौकटीतही बंदिस्त करण्याचा कर्मठपणा केला गेला. धर्म- पंथ- संप्रदाय यांनी आपल्या मत प्रचारासाठी लोकभाषा वापरलेली असते. भाषेतून धर्म-पंथ निर्माण होत नाहीत. म्हणून कोणतीही भाषा कोणत्याही धर्मा- पंथाची बटीक नसते. भाषेला केवळ उपयोजित केलं जातं. अमूक भाषा ही आमच्या विशिष्ट वर्गाच्या- धर्माच्या लोकांची भाषा आहे असा अहंमन्य आग्रह सुरू झाला की त्या परीघावरचे लोक त्या भाषेपासून दूर जायला लागतात. म्हणजेच त्या चौकटीबाहेर भाषा मरायला सुरूवात होते.
भाषा तत्ज्ञांच्या मते भाषेला कुळ बीळ काही नसतं. म्हणजे अमूक भाषेची जननी अमूक भाषा आहे वगैरे. ज्या त्या भाषा ज्या त्या परिवेशात लोकजीवनातून तयार होत असतात आणि उत्तरोत्तर सक्षम होत जातात. या मांडणीत तार्कीक तथ्य आहे. आज भाषा एखाद्या विद्यापीठात शिकूनही नीट कळत नाहीत तर आदिम अज्ञानी ग्रामीण लोकांना कोणाच्या अनुकरणानं भाषा बोलता येईल असं म्हणणं धारिष्ट्याचं ठरेल. संस्कृत भाषा ग्रामीण आदिवासी वा ज्या बहुजनांना उच्चारायला सांस्कृतिक बंदी होती, ज्या ग्रामीणांना वा खालच्या तीन स्तरांवरील लोकांना ती शिकता येत नव्हती, लिहिता येत नव्हती, उच्चारता येत नव्हती; (त्यांना ती शिकवूनही शिकता येत नव्हती, असं नव्हे तर ती ऐकायला, बोलायला, वाचायलाच सांस्कृतिक मनाई होती); अशा काळात त्या भाषेच्या अपभ्रंशानं आदिवासी बोली, लोकबोली वा इतर लोकभाषा तयार झाल्या असं म्हणणं म्हणजे भाषिक चेष्टा करण्यासारखं आहे.
मात्र मोठ्या भौगोलिक परिवेशात बोलल्या जाणार्या एखाद्या प्रमाणभाषेचं कालांतरानं स्थानिक अवस्थांतरही होत जातं. उदाहरणार्थ, पूर्वी खान्देशातील चार जिल्ह्यात जी अहिराणी भाषा बोलली जायची त्याच भाषेला प्रांताच्या नावावरून ‘बागलाणी’ म्हणत आणि प्रदेशाच्या नावावरून ‘खानदेशी’ म्हणत. परंतु आता ‘बागलाणी’ ही अहिराणी भाषेचं अवस्थांतर झालेली काही तालुक्यांपुरती भाषा समजली जाते. तसंच ‘खानदेशी’ भाषेचंही विशिष्ट भौगोलिक परिसरात अवस्थांतर झालं आहे.
बोली भाषेतले अनेक जुने शब्द दिवसेंदिवस लुप्त होत आहेत. ते लगेच आठवत नाहीत. पण एखाद्या प्रसंगानुसार ते शब्द जिभेवर आपोआप येतात. परवा एका लेखात रेडिओच्या सेलसाठी असं लिहिताना लहानपणी कायम येता जाता बोललेला ‘मसाला’ शब्द अचानक जिभेवर आला. मग तो लेखात मुद्दाम जसाच्या तसा वापरला. तो वाचून अनेकांना आठवलं की बॅटरीच्या- रेडिओच्या सेलला पूर्वी बोलीभाषेत मसाला शब्द वापरला जायचा. लहानपणी ऐकलेला ‘भोद’ शब्द आज मला अनेकांना विचारून शोधून काढावा लागला. बालपणी अनेकदा स्वत: उपयोजित करत असलेला शब्द मला आठवत नव्हता. ज्या माझ्या ग्रामीण भागात तो बोलला जायचा त्या मातीतही तो आज अनेकांना माहीत नव्हता. तसाच ‘लावदुर्या लावणं’ हा वाक्प्रचार लहानपणी अनेकदा वापरला असूनही आठवत नव्हता. गावात गेल्यावर बालमित्राशी अहिराणीत बोलताना अचानक आठवला असे नाही, तर तो चक्क बोलताना माझ्याकडून उपयोजित झाला. याचा अर्थ तीस- चाळीस वर्षांपूर्वीची माझी भाषा मेली असं अधोरेखित होतं का? आज मी नवीन कात टाकलेली अहिराणी भाषा बोलतो. माझ्या भाषेचं दस्ताऐवजीकरण करण्यासाठी मला एकेक शब्द आज महत्प्रयासानं मिळवावा लागत असेल तर माझी भाषा जीवंत आहे, असं म्हणू शकतो का? भाषेचं नाव मला माहीत आहे. भाषेचा सांगाडा माझ्याकडं आहे. आणि भाषेचं क्रियापद प्रमुख म्हणून ते सुध्दा मला परंपरेनं माहीत आहे. मात्र त्या भाषेतला एकेक शब्द आठवून मला संपूर्ण वाक्य तयार करावं लागणार असेल तर माझी भाषा जीवंत आहे की नाही? असे प्रश्न उपस्थित होऊ शकतात.
भाषेच्या या अवस्थातंराला ‘भाषा मरणं’ असं म्हणण्यापेक्षा भाषेचं जुनं शब्दभांडार सुप्तावस्थेत जाणं आणि नवनवीन शब्दसंचय उदयास येणं हे भाषेचं सुप्त अंग लक्षात घेतलं पाहिजे. (नवीन शब्द उदयास येण्यापेक्षा आजूबाजूच्या भाषेतल्या संज्ञा मोठ्या प्रमाणात भाषेत आदान होत राहतात. अहिराणीत आज मोठ्या प्रमाणात मराठी, हिंदी आणि इंग्रजी शब्दांचं आदान होत आहे.) भाषेत संपर्कात येणार्या इतर भाषांचा शब्दसंग्रह वाढत जातो. आपल्या शरीरातील जुन्या पेशी जशा मरतात आणि त्यांची जागा नव्या पेशी घेतात, तसंच भाषेतील शब्दांचं आहे. भाषा कालबाह्य शब्द संज्ञाची कात टाकून नव्यानं व्यवहारात सळसळत असते. म्हणजे कोणतेच शब्द तसे कालबाह्य नसतात. पण काळाच्या आधुनिकतेच्या मागणीसाठी आपणच जुने शब्द स्टोअररूममध्ये ढकलत इतर भाषांचं- शब्दांचं अनुकरण करत असतो. कालांतरानं असे खास आपले शब्द नेणीवेत पडून राहतात आणि सहज संवादातल्या वापरातून निघून जातात.
आज सगळ्याच भाषांमध्ये इंग्रजी शब्दांची संख्या वाढताना दिसते. एखादा ब्रिटीश माणूस भारतात आला की त्याला सगळीकडं आपलीच भाषा ऐकून आपल्या घरीच आल्यासारखं वाटेल की काय, समजायला थोडी अडचण आली तरी. वाक्यातून इंग्रजी शब्द पेरत बोलण्याला हे उपरोधानं म्हटलं आहे, गांभीर्यानं नव्हे. कारण मराठी ही मराठी, इंग्रजी ही इंग्रजी आणि विशिष्ट बोली ही ती बोली म्हणूनच ओळखली जाणार आहे. (तरीही मराठीवर केवळ शब्दांचं नव्हे तर आख्ख्या हिंदी भाषेचं होत असलेलं अतिक्रमण आज चिंताजनक स्थितीत पोचलं आहे.) तिथापि अडगळीत पडलेल्या आपल्या भाषेतल्या शब्दांचं योग्य वेळी दस्तावेजीकरण झालं नाही तर आपल्या हातून बरंच काही सुटून जाणार आहे. म्हणून ‘जुनं ते सोनं’ जपत आपल्या भाषा (विशेषत: भाषेतले मूळ शब्द) जिवंत ठेऊया.
(‘काव्याग्रह’, भाषा दिवाळी विशेषांक २०२५ मधील ‘अहिराणी, एकूण बोली आणि मराठी’ या प्रकाशित दीर्घ लेखातील ‘भाषा मरते म्हणजे...’ हा पहिला भाग. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर राजाराम देवरे
ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/