सोमवार, १४ डिसेंबर, २०१५

अहिराणीच्या निमित्ताने बोलींचे भवितव्य




- डॉ. सुधीर रा. देवरे

     जगातील प्रत्येक कोपरा बोलीभाषेने व्यापलेला आहे. प्रत्येक कानाकोपर्‍यात ती बोलली जाते. मात्र यापैकी काही बोलीभाषा आज नामशेष झाल्या आहेत, तर काही बोलीभाषांचा विकास होऊन त्या आज प्रमाणभाषा झालेल्या दिसून येतात, हा बदल आपल्याला ज्ञातच आहे. आज व्यवहारात वापरली जाणारी हिन्दी भाषादेखील एकेकाळी केवळ बोलीभाषा म्हणूनच वापरली जात होती. परंतु आज तीच भाषा आपली राष्ट्रभाषा म्हणून मान्यता पावलेली दिसून येते. त्याचप्रमाणे सिंधी, गुजराती, मराठी सारख्या अनेक भाषा ह्या सुद्धा एके काळी केवळ बोलीभाषेच्या स्वरूपातच अस्तित्वात होत्या.
      संपूर्ण भारतात आढळून येणार्‍या बोलीभाषांची संख्या जवळजवळ अठराशे इतकी आहे. त्यापैकी अनेक बोलीभाषा पूर्वीच नष्ट झालेल्या आहेत. तर अनेक बोलीभाषा आजही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशीच एक बोलीभाषा म्हणूनअहिराणी भाषेचा नामोल्लेख करावा लागतो. अहिराणी महाराष्ट्राच्या नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार ह्या चार जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोलली जात असूनही तिला आजपर्यंत प्रमाण भाषेचा दर्जा प्राप्त झालेला नाही. भाषाशास्त्राने तरअहिराणीला मराठी भाषेची एक पोटभाषा म्हणून तिची उपेक्षाच केलेली दिसून येते.
      प्राचीन काळीअहिराणीअभिर लोकांची भाषा होती. म्हणून तिलाअभिराणी असं संबोधलं जात असे. कालांतराने अभिरांचा अहिर अपभ्रंश झाला म्हणून अभिराणीचाही अहिराणी अपभ्रंश झाला. आज या विशिष्ट बोलीभाषेलाअहिराणीम्हणूनच संबोधण्यात येतं. अभिर लोकांचा अपभ्रंश अहिर आणि अहिर लोकांची भाषा ती अहिराणी. अभिर लोकांचे संदर्भ रामायण, महाभारत कालखंडातही आढळून येतात. भरताच्या नाट्यशास्त्र ह्या ग्रंथात अहिराणीचा उल्लेख बोलीभाषा असाच केलेला आहे. ह्या भाषेचा उदयकाल साधारणत: इसवी सनाच्या तिसर्‍या-चौथ्या शतकात झालेला असावा, असे मानले जाते. प्रदेशाच्या नावाने अहिराणीलाखानदेशीतर राजवटीच्या नावाने तिलाबागलाणीसंबोधले जाते. मराठी, हिन्दी, गुजराती, राजस्थानी, बंगाली ह्या भाषेतील काही शब्दही अहिराणी भाषेत आढळून येतात. म्हणूनच अहिराणीला कोणत्याही एका विशिष्ट भाषेची पोटभाषा संबोधणे सर्वस्वी चुकीचे ठरते.
      बोलीभाषांच्या संदर्भात काही अपवाद वगळता बेजबाबदार लेखनच अधिक प्रकाशित झालेले दिसून येते, जे बोलीभाषेच्या विकासासाठी मारक ठरते. बोलीभाषेतून संवाद साधण्यासाठी लोकांना प्रेरणा मिळेल, त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळेल अशा हेतूने बोलीभाषेतील बलस्थानांचा अधिक अभ्यास व्हायला हवा. दुय्यम प्रतीचे लेखन, उदाहरणांचा अभाव, ढोबळ पुराव्यांच्या आधारावर केली गेलेली निश्चित विधाने, हितसंबंध, सामाजिक प्रतिष्ठेच्या आततायी कल्पना, दुसर्‍या भाषेच्या संदर्भातील अज्ञान, पूर्वग्रह, दुराग्रही वृत्ती, ठोस पुराव्यांचा अभाव, ऋण मान्य करण्याचा अभाव, पाहताक्षणी लक्षात न येणारी जोडतोड करून लिखाण करणे ह्या प्रकारांमुळेच बोलीभाषेचा विकास खुंटलेला दिसून येतो.
सर जॉर्ज ग्रियर्सन (1851 - 1946) यांनी भारतातील संपूर्ण भाषांचा सखोल अभ्यास केलेला आहे. क्षेत्रीय व्यापकता, भाषांची संख्या आणि विविधतेच्या दृष्टीतून बघितले तर त्यांचे भाषाविषयक कार्य निश्चितच महत्वाचे आहे. ह्या संदर्भातील सर्व महत्वाची माहिती ‘‘Linguistic Survey of India’’ ह्या नावाने ग्रंथित करण्यात आलेली आहे. ह्या ग्रंथाच्या नवव्या भागात त्यांनी अहिराणीच्या संदर्भात आपले मत व्यक्‍त केले आहे. त्यांनीअहिराणी ला भिलांची भाषा म्हटले आहे. परंतु अहिराणी ही सुद्धा हिन्दीप्रमाणे एक लोकभाषा आहे. केवळ अहिराणीचाच असे नव्हे तर कोणत्याही भाषेचा संबंध कोणत्याही जाती-जमातीशी लावणे, हे मानवतेच्या दृष्टीकोणातून अयोग्य आहे. भाषेने जर व्यक्‍तिवर विशिष्ट जातीचा शिक्का मारला जात असेल वा भाषेवर विशिष्ट जात लादली जात असेल तर ही गोष्ट बोलीभाषेच्या विकासाला मारक ठरते.
      लोकांच्या वर्तनातून लोकसंस्कृती संक्रमित होत असते- प्रवाहित होत असते. म्हणूनच कोणत्याही बोलीभाषेचा अभ्यास हा त्या बोलीभाषेतील लोकवाड्.मयाच्या अभ्यासाशिवाय अपूर्णच ठरत असतो. लोकवाड्.मयाच्या माध्यमातूनच आदिवासी बंधू-भगिनींच्या श्रद्धा, रितीरिवाज, पूजा-अर्चना, संस्कृती, आशा-आकांक्षा, शेती, व्यवहार, नातेसंबंध, सण-उत्सव इत्यादींवर प्रकाश पडत असतो.
      ऋषिंचे कुळ आणि नदीचे मूळजसे विचारले जात नाही तसे भाषांचे कुळही विचारू नये. कारण भाषा ही केवळ भाषा असते आणि ती स्थानिक संस्कृतीतून उगम पावलेली असते. मग ती कोणतीही भाषा असो. अगदी इंग्रजी असली तरीसुध्दा.
      आदिवासी बोलींचे डाक्युमेंटेशन होणे आज आवश्यक झाले आहे. जी माणसं निरक्षर राहिलेली आहेत, तीच केळ बोलीभाषेतून व्यवहार करताना दिसतात. पंरतु साक्षर झालेली माणसं मात्र लिखाणासाठी आणि व्यवहारासाठी प्रमाणभाषेचाच वापर करताना दिसून येतात. मग तेअहिराणी भाषिक असोत की अजून कोणी इतर बोलीभाषक. ते मराठी, हिन्दी किंवा इंग्रजीतच लिहिण्याचा अट्टहास दाखवतात. मातृभाषेतून संवाद साधण्यातही जिथे त्यांना संकोच वाटू लागतो तिथे मातृभाषेतून लिखाण तर दूरची गोष्ट आहे. हा संकोच दूर करण्यासाठीचा प्रयत्न भाषा केंद्र बडोदा या आमच्या एनजीओ कडून सुरू आहे. जिथे जिथे बोली-भाषेसाठी न्यूनगंड दिसून येतो, तिथे ह्या बोलीभाषांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत.
      आपल्या भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टात भाषिक स्वायत्ततेच्या संदर्भात मार्गदर्शन केलेले आहे. त्या अन्वये कोणत्याही भारतीय व्यक्‍तीला आपली भाषा बोलण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. तरीही शाळा-महाविद्यालयांमध्ये बोलीभाषेतून शिकविण्यासाठी रूची दाखवली जात नाही. लोकांना आपल्या भाषेपासून दूर ठेवणे म्हणजे त्यांची जिव्हा- जिभ कापण्यासारखेच आहे. म्हणूनच लोकांना आपल्या भाषेपासून वंचित करणे हे लोक अधिकारांचे उल्लंघन ठरते.
      भाषा कोणतीही असो, जर ती व्यवहारभाषा, वाड्.मयभाषा आणि ज्ञानभाषा होत असेल तर ती प्रमाणभाषेचा दर्जा प्राप्त करू शकते. बोलीभाषांचे संवर्धन करणे आज आवश्यक झाले आहे. भाषा हे संस्कृतीचे माध्यम आणि वाहन सुध्दा असते. आपण सर्वच बोलीभाषांबाबत जागृत असू तर भारतीय बोलीभाषांचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल आहे. पण त्यासाठी अहिराणी वा ती ती भाषा बोलणार्‍या लोकांनी आपला न्यूनगंड झटकून आपली बोलीभाषा बोलत- लिहित राहणे नितांत गरजेचे आहे.
      (सदर लेख दिनांक 12-12-2015 च्या महाराष्ट्र टाइम्स (नाशिक विभाग) मध्ये प्रका‍शित झाला आहे. लेखातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
   इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

शाकाहार का मांसाहार


 
- डॉ. सुधीर रा. देवरे

      आपण काय खावं हे कोणीतरी तिसरी व्यक्‍ती ठरवणार असेल तर जगणं मुश्कील आहे. अमूक एका समूहाच्या लोकांनी आमच्या वस्तीत स्वत:चं घर बांधूनच नव्हे तर भाड्याच्या खोलीतही राहू नये असं कोणी ठरवणार असेल तर भयावह आहे. अमूक खाणार्‍यांनी आमच्या वस्तीत येऊ नये असा फतवा निघणार असेल तर ते त्याहूनही भयंकर आहे. आपल्या कळपाला मान्य नसल्यामुळे अमूक एकाकडून अमूक एक गोष्ट घडली म्हणून मार देणे वा जीवंत मारून टाकणे हे रानटी मानवी टोळ्यांचे काम होते. आजच्या सभ्य माणसांच्या समूहांचे नाही. आपण नेमके आज मानवी समाजात राहतो का आपापल्या जाती- धर्माच्या कळपात राहतो. मानवी समाजात निधर्मी सहजीवन जगता जगता आपण अंतर्गत पातळीवर आपल्या माणसांच्या हिंसक टोळ्या जमवायला लागलोत की काय?
      शाकाहार म्हणजे काय? मांसाहार म्हणजे नेमकं काय? अजून कुठूनतरी शुध्द शाकाहार अशीही व्याख्या ऐकू येते. शुध्द शाकाहारी असल्याचा दावा करणार्‍या जागोजागी हॉटेल्सही दिसतात. हा काय प्रकार आहे? भारतातल्या सर्व जनतेने मांसाहार (मासे, चिकन, मटण आदी) खाणे बंद केले तर भाजीपाला कोणालाच खायला मिळणार नाही. भाजीपाला उपलब्‍ध झाला तरी गरीबालाच काय मध्यमवर्गीय माणसालाही विकत घ्यायला परवडणार नाही. एकविसाव्या शतकाच्या आणि जगात महासत्ता होण्याच्या गमजा मारणार्‍या देशात मांसाहार करणार्‍यांचा व्देष करणे हा रानटीपणा आहे. मांसाहार करणार्‍यांकडे तुच्‍छतेने पाहणे हा सुसंस्कृतपणा असू शकतो का?
      मनुष्यप्राणी हा मिस्त्र आहारी प्राणी आहे. म्हणजे जो शाकाहार करू शकतो आणि मांसाहारही. माणसांच्या दातांची रचनाही मिश्रआहारी आहे. खरं तर कोणी कितीही दावा करत असलं तरी ते शुध्द शाकाहारी आहेत असं म्हणणं आज धारिष्ट्याचं ठरेल. शाकाहार करण्यामागे कोणत्याही जीवाची हत्त्या करू नये हा विचार असेल तर शाकाहारी लोक भ्रमात आहेत. आपण ज्या हिरव्या भाज्या (वनस्पती) खातो त्याही जीवंत असतात. त्यांच्या जीवाचा बळी देऊन आपण भाज्या खात असतो. प्राण्यांमध्ये जसं लाल रंगाचं रक्‍त असतं तसं वनस्पतींमध्ये हिरव्या रंगाचं हरितद्रव्य असतं. म्हणून रक्‍त आणि हरितद्रव्य यांच्याकडे एकाच दृष्टीने पहावं लागेल. रक्‍ताला पाहून आपण हळहळतो तसे हिरव्या हरितद्रव्याला पाहूनही आपण हळहळायला हवं. सृष्टीत भाज्या वा फळे आपल्यासाठी उगवत नाहीत. आपण त्यांचा खाण्यासाठी वापर करतो. गहू, बाजरी, तांदूळ आदींसह सर्व प्रकारच्या डाळी देणारे धान्यही बीज स्वरूपात असते. या सर्व प्रकारच्या धान्यांपासून जमिनीत रूजून नवीन जीव तयार होणार असतो. त्या बीजाला दळून- भरडून आपण पोळ्या आणि भाकर्‍यांसाठी पीठ तयार करतो. ही सुध्दा क्रूर हिंसाच आहे. आता कोणी म्हणेल की सृष्टीने वा देवाने भाजीपाला आणि धान्य आपल्याला खाण्यासाठीच उगवले आहे, तर मग इतर प्राण्यांकडेही त्याच दृष्टीने पहावे लागेल. शेवटी फिरून निसर्गाच्या अन्नसाखळीकडेच आपण येतो. दूधाला तरी आज शुध्द शाकाहार म्हणता येईल का? विज्ञान सांगतं, आजचं दूध शाकाहारी नाही. (भाकड वनस्पती आणि भाकड प्राणी यांचं काय करायचं याचा प्रश्न सृष्टीला कधीच पडला नाही. पण भाकड माणसांनी आज जो उच्‍छाद मांडला आहे तो मात्र नक्कीच चिंताजनक आहे.)  
      आता प्रश्न उरतो तो अध्यात्मिक आणि धार्मिकतेचा. खरं तर हा आज धार्मिक प्रश्न उरलाच नाही, हा सरळ सरळ राजकीय प्रश्न आहे. माणसं मारायची आणि त्यांच्यावर राजकारण खेळायचं ही मध्ययुगीन पाताळयंत्री व्यवस्था अजूनही अस्तित्वात आहे, असं नाईलाजाने म्हणावं लागतं. मध्ययुगीन हुकुमशहा राजे- राजवाड्यांनीही इतक्या टोकाचा धर्माचा गैरवापर कधीही केलेला नाही, तितका आज लोकशाही राज्य व्यवस्थेत सत्तेत येण्यासाठी धर्माचा अधर्म केला जातोय.
      सात आठ वर्षांपूर्वी बोंबीलचा वास नावाची कथा मी लिहून ठेवली आहे. ह्या कथेत बोंबीलच्या वासावरून मैत्री तुटते, हे वाचकांना पटणार नाही असं वाटल्यामुळे ती कथा मी बाजूला ठेऊन दिली होती. (आता रोखठोक 2015 च्या दिवाळी अंकात प्रकाशित.) पण आज मुंबईपासून संपूर्ण देशभर जे काही चाललंय, ते पाहून ही कथा वास्तवापेक्षा फारच गुळमुळीत आहे असं लक्षात आलं. बोंबीलचा वास ही कथा आणि देव हातात हात घालून ही कविता हे दोन्हीही माझे कलाविष्कार तसे जुनेच. पण जुन्या कथा कवितांना असे नवे दिवस या हिंस्त्र पार्श्वभूमीवर यावेत हे दु:खदायकच. पैकी देव हातात हात घालून या कवितेने या लेखाचा शेवट करतो:
आधी डुक्कर मरतं
मग माणसं
अथवा
आधी गाय मरते
मग माणसं.
आधी भगवा जळतो
मग माणसं
अथवा
आधी हिरवा जळतो
मग माणसं.
केव्हा हा ईश्वर हसतो
केव्हा तो देव टाळ्या वाजवतो.
दंगलीची मॅच संपताच
दोन्ही देव खिलाडू वृत्तीने
चेंडूंसारखी माणसं लाथाडून
हातात हात घालून
निघून जातात
आपापल्या पोथ्या पुराणात...
- माणसं
अशा देवांना कवटाळत
कडेकोट घरात लपून बसतात, की
एका अफवेच्या काडीने
घरांतल्या जीवंत माणसांसह आख्खं गाव
जसं होतं की नव्हतंच
बेचिराख...
  (दिनांक 15-10-2015 च्या महाराष्ट्र टाइम्स नाशिक विभाग- मध्ये प्रकाशित झालेला लेख सर्वांसाठी पुन्हा देतोय. या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
 
-          डॉ. सुधीर रा. देवरे
          इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

दिवाळीच्या शुभेच्‍छा नकोत




-         डॉ. सुधीर रा. देवरे


      तुम्ही एखाद्या मित्राला दिवाळीच्या शुभेच्‍छा पाठवल्या आणि पलिकडून उत्तर आले की, मला तुमच्या दिवाळीच्या शुभेच्‍छा नकोत, तर तुमच्या मनाची अवस्था काय होईल? माझ्या मनाची अवस्थाही तशीच झाली. दिवाळीच्या दिवशी मी माझ्या एका मित्राशी संवाद साधण्यासाठी काहीतरी निमित्त म्हणून दिवाळीच्या शुभेच्छांचा एसेमेस इतरांसोबत त्यालाही पाठवला. मित्राचे तिकडून जे उत्तर आले ते वाचून मी हादरलोच.
      त्याने उत्तराच्या संदेशात म्हटले होते, मी हिंदू नाही. दिवाळी हा हिंदूचा सण आहे. म्हणून मला दिवाळीच्या शुभेच्छा देऊ नयेत.
      बाप रे! उत्तर वाचून मला मुर्च्‍छा येण्याचेच बाकी राहिले. संदेश वाचून माझ्या पहिल्यांदा लक्षात आलं ते हे की, मी जन्माने हिंदू आहे आणि ज्याने हे उत्तर लिहिले तो इतर धर्मीय आहे. (सर्वच जातीधर्माचे माझे असंख्य‍ मित्र असून हा अनुभव केवळ अपवादात्मक.) दिवाळीच्या शुभेच्छांचा असाही अर्थ काढला जाऊ शकतो हे मला आयुष्यात पहिल्यांदा लक्षात आलं.
      खरं तर हा माझा नव्यानेच मित्र झालेला माणूस होता. मला जुजबी ओळखत होता. लहानपणापासून आणि विचारांनी त्याने मला ओळखले असते तर कदाचित त्याने असे उत्तर देताना शंभर वेळा विचार केला असता. माझ्या लिखाणाचे वाचन केलेला कोणीही वाचक असता तरी त्याने मला असे उत्तर दिले नसते. ते उत्तर वाचून मला राहवले नाही. मी त्याला समजावणीच्या सुरात पुन्हा एसेमेस केला: हिंदू आणि दिवाळी असा आजतरी काही संबंध मला दिसत नाही. दिवाळी आख्या जगात साजरी केली जाते. दिवाळी हा भारताचा सांस्कृतिक सण आहे. धर्माचा नाही. वगैरे. त्यानंतर त्याचे पुन्हा जे उत्तर आले ते तर अतिशय उध्दटपणाचे होते.
       या उत्तरात त्याने म्हटले होते, तुम्ही जरा नीट अभ्यास करा, वाचन करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दिवाळी का साजरी करतात. मला सल्ला देत त्याने पुढे म्हटले होते, सोबत मी तीन घटना देत आहे. त्या वाचा म्हणजे दिवाळी का साजरी करतात ते तुम्हाला कळेल. त्याने ज्या तीन गोष्टी सांगितल्या होत्या त्या अशा : अमूक एका धर्मीय भिक्षूचा अमूक ब्राम्हणाने खून केला म्हणून दिवाळी साजरी केली जाते. दुसर्‍या कथेतही त्याने असाच काहीतरी संबंध जोडून अमूक एक धर्म भारतातून हद्दपार झाला म्हणून दिवाळी साजरी करत असल्याचे म्हटले होते आणि तिसरी सर्वांना माहीत असलेली बळीराजाची कथा सांगितलेली होती... शेवटी तो म्हणाला, म्हणून बहुजनांनी दिवाळी साजरी करू नये.
      अशा अतिशय उद्दाम पध्दतीने हा अनुभव मला सामोरा आला तरी या अनुभवावर मी चिंतन करू लागलो. आपण एखाद्याला दिवाळीच्या वा कुठल्याही सणाच्या शुभेच्छा कोणत्या अर्थाने पाठवतो. अशा शुभेच्‍छा पाठवताना या मित्राला अभिप्रेत असे सर्व अर्थ गृहीत धरून वाईट गोष्टींचे मी समर्थन करत होतो का? (जे सण जनमानसात आज शुभ समजले जातात त्याच सणांच्या शुभेच्‍छा दिल्या जातात. काही सणांच्या शुभेच्‍छा दिल्या जात नाहीत. उदा. मोहरमच्या शुभेच्‍छा दिल्या जात नाहीत.) समजा मला एखाद्या सणाच्या दंतकथेची पार्श्वभूमी माहीत आहे (उदाहरणार्थ दिवाळी) आणि तरी सुध्दा मी एखाद्याला त्या सणाच्या सहज शुभेच्‍छा पाठवल्या तर मी त्या माणसाचा उपमर्द करतो का? का एखाद्या अनिष्ट परंपरेचे समर्थन करतो. एखादा सण साजरा करण्यामागे असलेली कथा, लोककथा, दंतकथा, आख्यायिका या फक्‍त सांगिवांगीतून, कल्पनेतून वा विपर्यासातून निर्माण झालेल्या असतात का तो शंभर टक्के इतिहास असतो. ख्रिसमस साजरा करण्यामागे जितका स्पष्ट इतिहास असेल त्याच्या एक शतांशही इतिहास दिवाळी साजरा करण्यामागे नाही हे इथे आवर्जून लक्षात घ्यावे लागेल.
      इतिहास असेल तर त्याला केवळ दंतकथा हा पुरावा होऊ शकत नाही. आणि तो तसा मानला तरी एकाच सणामागे तीन प्रकारच्या पार्श्वभूमी कथा कशा येऊ शकतात. मी वर ज्या मित्राचा उल्लेख केला त्याने बळीराजाच्या कथेसोबतच ज्या अजून दोन ‍विशिष्ट धर्मिय अन्याय कथा सांगितल्या त्याच त्याच्या मताच्या विरूध्द जात होत्या. दिवाळी का साजरी केली जाते यावर त्याने तीन वेगवेगळ्या कथा सांगितल्या. या ‍तीन कथांपैकी नक्की कोणत्या घटनेमुळे आधी दिवाळी साजरी झाली हे त्याला सांगता यायला हवे होते. का या तिन्ही घटना एकाच दिवसभरात घडल्या आणि या‍ तिन्ही घटनांच्या विजयासाठी दिवाळी साजरी होते. म्हणजे बळी राजाला मारले म्हणून दिवाळी साजरी केली जाते. दुसरी कथा, अमूक एका भिक्षुचा एका ब्राम्‍हणाने खून केल्यामुळे दिवाळी साजरी केली जाते. आणि तिसरी कथा, भारतातून अमूक धर्म हद्दपार केल्यामुळे दिवाळी साजरी केली जाते असे हे तर्कट. कशातच कुठलाही ताळमेळ नाही. (समजा एखाद्या दिवाळीच्या दिवशी आपल्या घरात एखादी वाईट घटना घडली. तर फक्‍त त्या वर्षापुरती आपण दिवाळी साजरी करणार नाही, का कायमस्वरूपी आयुष्यात दिवाळीच येऊ देणार नाही? आणि आपल्या घरात अमूक एका दिवाळीत अशी वाईट घटना घडली म्हण़ून लोक दिवाळी साजरी करतात, असा समज करून आपल्याला तसा प्रचार करता येईल का?) त्याचे हे तर्कट स्वत:चे नसावे. एखाद्या संशोधनात्मक अभ्यासपूर्ण संदर्भ ग्रंथामध्येही ते त्याने वाचलेले नसावे. कुठल्यातरी भडकाऊ भाषणातून वा चटपटीत मासिकातून वाचून त्याने दिवाळीबद्दल आपले मत बनवलेले दिसले.
      आज आपण दिवाळी साजरी करतो. दिवाळीला सर्वच धर्माचे लोक एकमेकांना शुभेच्‍छा देतात. आपण ख्रिसमस साजरा करतो. सर्व धर्माचे लोक एकमेकांना शुभेच्‍छा देतात. आपण रमजान ईद साजरा करतो. सर्वच धर्माचे लोक एकमेकांना शुभेच्‍छा देतात. आपण बौध्द पौर्णिमा आणि महावीर जयंतीही साजरी करतो. पैकी अनेकांना अशा सणांमागची पार्श्वभूमी माहीत असतेच असे नाही. पण आपण दिवसेंदिवस लोकपरंपरेच्या या सगळ्या सणांबाबतही सर्व धर्मिय ग्लोबल होत एकमेकांना या निमित्ताने शुभेच्‍छा देत एकमेकांच्या जवळ येऊ पहातो ही मानवतेची एक चांगली खूण आहे. माझा एक मुस्लीम धर्मिय बालमित्र आहे. तो मुस्लीम धर्मिय आहे असा उल्लेख आज मी पहिल्यांदा करतोय. कारण आमच्या मैत्रीत कधीही धर्म आडवा येत नाही. प्रत्येक रमजान ईदच्या दिवशी ईदच्या शुभेच्‍छा देण्यासाठी आधी त्याचा मला फोन वा एसेमेस येतो. नंतर मी त्याला शुभेच्‍छा देतो. त्याच्या शुभेच्‍छा आल्या तर मी मुसलमान नसूनही हा मित्र मला का एसेमेस करतो असे मला कधी वाटले नाही. कधी वाटणारही नाही. आणि कोणालाही तसे कधी वाटू नये.
      खरे तर माझ्या मते आज कोणताच सण एखाद्या धर्मापुरता धार्मिक सण राहिलेला नाही. सण साजरा करणे या आज ग्लोबल लोकपरंपरा झाल्या आहेत. निदान भारतात साजरे होणारे अनेक सण हे हिंदू धर्माचे सण आहेत असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. सण हे धार्मिक असण्यापेक्षा इथल्या अस्तित्वाच्या सांस्कृतिक खुणा आहेत, असे मला वाटते. दिवाळी ही भारताची सांस्कृतिक खूण आहे. हा प्रकाशाचा सण आहे. आपल्याला न्यूनगंडच पाळायचा झाला तर आपण बळीराजाच्या शुभ स्मृतीसाठीही तो साजरा करू शकतोच की. दिवाळी ही एकीकडे अनेक गोष्टींचे प्रतिक होताना दिसते तर दुसरीकडे अशा अनुभवाचा ठणठणीत सांस्कृतिक दुष्काळ सामोरा येताना दिसतो. मलेशिया- इंडोनिशिया हे मुस्लीम धर्मिय देश असूनही तिथे कलात्मक रामायण नाट्य साजरे केले जाते. पाकिस्तान हा मुस्लीम देश असूनही मकरसंक्रातीला अनेक ठिकाणी पंतग उडवले जातात. सारांश, आजचे सण हे लोकपरंपरेच्या सांस्कृतिक खुणा ठरत आहेत. धार्मिक उत्सव नव्हेत. धर्माच्या उन्मादाला विरोध करणे वेगळे आणि सांस्कृतिकता पाळणे या दोन्ही वेगवेळ्या गोष्टी आहेत.    
      (सदर लेख दिनांक 12-11-2015 च्या महाराष्ट्र टाइम्स (नाशिक विभाग) मध्ये प्रका‍शित झाला आहे. लेखातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

-          डॉ. सुधीर रा. देवरे                                                    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०१५

My Blogs ग्रुपला एक वर्ष पूर्ण





- डॉ. सुधीर रा. देवरे

     आपला ब्लॉग व्हॉटस् अॅप वर पाठवत चला म्हणजे आम्हाला वाचता येईल अशी विनंती काही मित्रांनी केल्यामुळे 1 नोव्हेंबर 2014 ला व्हॉटस् अॅप वर My Blogs नावाचा ग्रुप तयार करण्यात आला. त्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. एप्रिल 2012 पासून मी सातत्याने ब्लॉग लिहितोय. सुरूवातीचे दोन वर्ष प्रत्येक आठवड्याला एक, नंतर पंधरा दिवसातून एक असे ब्लॉगवर लेख देतोय. कोणत्याही कारणाने अजून तरी ठरलेल्या दिवशी लेख देण्यात खंड पडला नाही. प्रत्येक महिण्याच्या एक आणि पंधरा तारखेला माझ्या ब्लॉग साईटसह फेसबुकवरही तोच लेख देत असतो.
      ग्रुपसाठी आधी 50 सभासद संख्या मर्यादित असल्याने निवडक मित्रांनाच My Blogs  व्हॉटस् अॅप ग्रुप वर घेता आले. आता ही सभासद संख्या वाढता वाढता शंभर झाली आहे. व्हॉटस् अॅप ग्रुपची मर्यादा आज तरी शंभर सभासदांचीच असल्याने आपल्याला या संखेवर थांबावे लागले. ब्लॉग टाकल्यानंतर दरम्यानच्या पंधरा दिवसाच्या काळात ब्लॉगवर टिपण्यांच्या स्वरूपात चर्चा करता येते. ही चर्चा लेखकावर न होता लेखाच्या विषयावर व्हावी अशी अपेक्षा असते आणि लेखावर प्रतिकूल प्रतिक्रियांचेही स्वागत होते. काही प्रतिक्रिया भाबड्या असल्या तरी त्या चर्चेत सामावल्या जातात. ग्रुपवर अनावश्यक मजकूर येत राहिला की सतत वाजत राहणार्‍या आणि आपल्या कामात व्यत्यय आणणार्‍या अलार्ममुळे अनेक मित्र कंटाळून ग्रुप सोडून जातात. म्हणून योग्य तीच चर्चा ग्रुपवर करावी अशी मी ग्रुपवरील मित्रांना कायम विनंती करत असतो. सर्व मित्रांच्या सहकार्याने असा आगळा वेगळा ग्रुप व्हॉटस् अॅप वर एका वर्षापासून सुरळीत सुरू आहे.  
      या ग्रुपवर तब्बल पंधरा दिवस एकाच विषयावर चर्चा होते. सकाळची पोष्ट संध्याकाळी जुनी होण्याच्या आजच्या गतिमान मोबाईल जमाण्यात एकाच विषयावर पंधरा दिवस चर्चा करणे ही गोष्ट काहींच्या दृष्टीने रटाळ आणि कंटाळवाणी असली तरी उठसुठ कोणतीही जुनी पोष्ट नवीन समजून फॉरवर्ड करत राहणे हे अनेक लोकांच्या दृष्टीने डोकेदुखी असते आणि नाइलाजाने त्यांना ग्रुप नकोनकोसा होतो. एकाच विषयावर बोलायचे बंधन असल्याने अनावश्यक पोष्ट ग्रुपवर येण्याचे थांबते. म्हणून अधून मधून ग्रुपवर शांतता असते. अशी शांतताही कामात व्यग्र असलेल्या माणसाला आवश्यक असते. दिलेल्या ब्लॉगच्या विषयावर पंधरा दिवस चर्चा झाली तर ती चर्चा प्रासंगिक न ठरता तिला संग्राह्य मूल्य प्राप्त होते. एकाच विषयावर महत्वाचा दस्ताऐवज तयार होतो. युज अँड थ्रो च्या जमाण्यात साहित्य आणि विचार सुध्दा वाचा नि डिलेट करा या गटात जाऊन बसू नयेत म्हणून हा प्रयत्न आहे. गटातील सभासद दिलेल्या विषयावर विचार करत त्यावर टिपण्या तयार करतात. या मंथनातून एकेका विषयाचे नवनीत बाहेर यावे ही अपेक्षा आहे. या ग्रुपवर साहित्यिक, कलावंत, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, संपादक, पत्रकार, जागरूक नागरिक आणि काही रसिक मित्र व विद्यार्थी आहेत. ग्रुपवर येण्यासाठी अनेक मित्र इच्छुक असून त्यांनाही टप्प्याटप्प्याने ग्रुपवर घेण्यात येईल.
      या ग्रुपवर संपूर्ण महाराष्ट्रातील मित्र तर आहेतच पण महाराष्ट्राबाहेरील काही मित्रही आहेत. ब्लॉगचे लिखाण आणि चर्चा मराठी भाषेत होत असल्याने हा ग्रुप देश पातळीवर नेता येत नाही. (मात्र जिथे जिथे मराठी माणूस आहे अशा ठिकाणी म्हणजे देशभरात आणि परदेशातही ब्लॉगवरील लेखन वाचले जाते.) आतापर्यंत सुमारे एकशे पन्नास ब्लॉग प्रकाशित झाले असून त्यांत विषयांची विविधता जाणून बुजून नाही तर आपोआप आली आहे. नवीन लिहिलेल्या लेखांसोबत माझ्या प्रकाशित पुस्तकांतील निवडक मुद्दे आणि विविध नियतकालिकांत प्रकाशित झालेले निवडक लेखही निमित्ताने ब्लॉग स्वरूपात देत असतो. स्थलकालाची मर्यादा आणि दैनंदिन व्यस्ततेमुळे अनेक वाचकांना वाचनाची इच्छा असूनही प्रत्येक पुस्तकापर्यंत वा नियतकालिकांपर्यंत पोचता येत नाही ही विदारक वस्तुस्थिती आहे. म्हणून माझ्या प्रकाशित पुस्तकातील प्रकरणे ब्लॉगमधून दिल्याने अनेक वाचकांची सोय झाल्याचे त्यांनी आवर्जून कळवले आहे. अनेक वाचक ब्लॉग वाचून मूळ पुस्तकापर्यंतही पोचलेत.
      My Blogs  नावाचा व्हॉटस् अॅप ग्रुप हा एक प्रयोगिक प्रयत्न आहे. व्हॉटस् अॅपचा वापर विविध बातम्या, निरोप, निमंत्रणे, फोटो, विनोद, थट्टा मस्करी, गप्पा, शुभेच्‍छा, सुविचार, छोटे चटपटीत मजकूर, कॉपी- पेष्ट फॉरवर्ड आदी कारणांसाठी सर्वत्र होत आहे. व्हॉटस् अॅप चा वापर आपण ब्लॉग सारख्या सामाजिक- वैचारिक- सांस्कृतिक गोष्टीसाठीही करून पहावा असे वाटले. आणि प्रत्येकाला स्वतंत्ररित्या ब्लॉगवरील लेख पा‍ठविण्याऐवजी एक गट तयार करून पंधरा दिवस ब्लॉगवरील एकाच विषयावर चर्चा घडवून आणली तर ती कदाचित यशश्वी होऊ शकेल, अशी आशा वाटली. असा हा प्रयत्न सफल होण्याच्या मार्गावर आहे. गटावरील लांबलचक लेख खास वेळ काढून वाचक वाचतात आणि हा प्रयोग एक वर्षभर चालला याचा विशेष आनंद होत आहे. या यशश्वीतेचे श्रेय ग्रुप मधील प्रत्येक सभासदाला द्यावे लागेल. प्रत्येक सभासदाचे हे यश आहे. ब्लॉगच्या लेखांवरील आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया (प्रतिकूल प्रतिक्रिया सुध्दा) वाचून मला खूप आनंद मिळतो. हा आनंद आपण सर्व मिळून यापुढेही घेत रहायचा का? माझ्या ब्लॉगवरील लेखांचे जवळजवळ तीन हजार वाचक आहेत पण व्हॉटस् अॅप ग्रुपच्या शंभर सभासदांच्या प्रतिक्रिया मला प्रातिनिधीक स्वरूपाच्या वाटतात. या ब्लॉग्सवरील लेखांमधून आपल्याला काही नवीन माहिती वा नवीन ज्ञान मिळते का? प्रबोधन होते का? वा तसे होत नसेल तर किमान सांस्कृतिक- सामाजिक उजळणी तरी होते का? अशा प्रश्नांचे मंथन करत आपण या पंधरा दिवसात आपली मते मांडण्याचा प्रयत्न केला तर...
 
-          डॉ. सुधीर रा. देवरे
          इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

बुधवार, १४ ऑक्टोबर, २०१५

अराजक




- डॉ. सुधीर रा. देवरे

     केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या साहित्य अकादमीसह इतर संस्थांचे पुरस्कार परत करणार्‍या साहित्यिकांची- विचारवंतांची संख्या देशभरात वीस पर्यंत पोचली आहे. (महाराष्ट्रातल्या काही साहित्यिकांनीही महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार परत केले.) आणीबाणी नंतर आजची राजकीय स्थिती ही सर्वात जास्त अराजकतेकडे चालली आहे काय? कोणाला ढळढळीत अराजकता अजूनही दिसून येत नसेल तर फक्‍त एका वर्षात छुपी अराजकता नक्कीच सुरू झाली आहे. डॉ. यू. आर. अनंतमूर्ती... बोलल्याप्रमाणे केवळ देशच नव्हे, तर आख्‍खं जग सोडून निघून गेले! खरंच हे जग आज इतके वाईट आहे का? पण साहित्यिकांच्या या कृतीने सरकारवर अजून तरी साधा ओरखडाही उमटलेला दिसत नाही. राजकारणी लोकांमध्ये आता साहित्यिक- विचारवंतांचा आदर राहिला नाही. आजच्या राजकारणात सुसंस्कृतपणा दिसून येत नाही.
एम. एस. कलबुर्गी, गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोळकर या तीन विचारवंतांचा खून. या हत्त्यांमागील लोक कोण हे शोधणे फार दूरचे काम असे आपण समजून चाललो तरी ज्या मारेकर्‍यांनी त्यांना रस्त्यात गाठून हत्त्या केली ते भाडोत्री मारेकरी सुध्दा हाती लागू नयेत हे आकलनापलिकडे आहे. एखादा संशयीत मारेकरी पोलिसांच्या हाती लागला तर तो कसा निष्पाप आहे हे न्यायाधिशांच्या आधी मंत्रीमहोदय सांगतात.
      कोणी काय खावे हे दुसरा कोणी कसा ठरवू शकतो? कोणी कोणते कपडे घालावेत त्यावरून मतभेद. कोणाचे घर कोणत्या वस्तीत असावे हे तो तो कळप ठरवणार? मोहम्मद अखलाख दादरी हत्याकांडाने आक्खा देश हादरला. थरकाप उडवणारी आणि झोप उडवणारीही हिंसक घटना आहे ही. आपण मध्ययुगीन आदिम काळात जगतो आहोत की काय असा भास व्हायला लागला. आपापल्या जातीधर्माच्या कळपात राहून आपण आपले आदिम हिंसक टोळ्यांमध्ये रूपांतर करू पहात आहोत? गुजरातमध्ये मुस्लीम युवकांना गरबा नृत्य परिसरात येण्यावर बंदी घालण्यात आली. देशभरात विविध संघटनांकडून असे अनेक छोटेमोठे स्थानिक फतवे निघताहेत. हा कोणत्या प्रकारचा जमातवाद आहे.
यापुढे कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणे हे देशाच्या दृष्टीने हानीकारक ठरणार आहे का? आपण या देशाच्या विकासासाठीच नक्की सरकार निवडून दिलंय का? हा कोणत्या प्रकारचा विकास आहे? विकासाच्या आरोळ्या मारताना देशातल्या शंभरावर असलेल्या विविध नावांच्या संघटना सुप्तावस्तेत होत्या. सत्ता मिळताच त्या आपल्या खरे रूप दाखवायला लागल्या. रस्त्यांवर नंगानाच होऊ लागला. मत विभाजन होण्यासाठी एखादा नाटकी विरोधकही तसा खमक्या हवा म्हणजे आपला अजेंडा ठोसपणे राबवता येतो. आपल्या समूहावर विषारी टीका केली की आपल्यापासून थोडे दूर गेलेले लोक अजून आपल्या जवळ येतात या सिध्दांताने अगदी ठरवून एका राक्षसालाही जन्म देण्यात आला. तो जितके विषारी बोलेल तितका आपल्याला फायदा. इथे एक कळत नाही की एखाद्या नेत्यावर कोणी टीका केली तर त्या नेत्याच्या धर्माच्या लोकांचा अपमान कसा होऊ शकतो?
इतके सारे होत असूनही सिंहासनावर आरूढ झालेली व्यक्‍ती काही बोलायला तयार नाही. तेव्हाचे मौनीबाबा परवडले. आता सोयीनुसार बोलले जाते आणि सोयीनुसार दुर्लक्ष केले जाते. प्रचारसभांमध्ये आणि इतर देशांच्या दौर्‍यांवर जे बोलू नये ते बोलले जाते. रेडीओवर मनातले सगळे सोयीस्कर सांगितले जाते. पण देशांतर्गत हिंसेवर तोंडावर बोट... गडीगुप्प. उत आलेले लोक याचा फायदा उठवत आपला कार्यभाग उरकवताहेत.
      महात्मा गांधींना संपवता येत नाही तर आता महात्मा गांधींचे नाव घ्यायचे आणि होता आले तर दुसरे महात्मा व्हायला काय हरकत आहे. मंदिरे बांधता बांधता पोटातल्या पोट आपलेही एखादे मंदिर का बांधू नये आता? दोन आक्टोबरला रस्त्यांची स्वच्‍छता करता करता मनातल्या जळमटांची स्वच्‍छता मात्र अजिबात करायची नाही! भारत पंधरा महिण्यांपूर्वी अस्तित्वात होता की नव्हता, माहीत नाही. कदाचित तो आताच घडवला गेला असेल ! चमकता येईल तिथे चमकायचे मग ते फेसबुक का असेना पण जग फिरताना आपल्याच देशाची निंदा करणे गरजेचे आहे का?
      काल एका चॅनलवर ऐकले: बिहार मध्ये मुस्लीम मते नितीश आघाडीकडे किती जातील आणि भाजपकडे किती. राजपूत आणि तेल्यांची मते कुठे जातील तेही सांगू... माझी जात ज्या कोणाला मते देईल त्यालाच मी माझे मत देईल का? एक जात एक धर्म सर्व मिळून एखाद्या पक्षाला मतदान करू शकतात का? अशा जातीयवादी सर्वे करणार्‍या चॅनल्सना कोर्टात खेचले पाहिजे. कोणतं न्यूज चॅनल नेमकं कोणाला विकलं गेलंय हे सहज कळतं आता! लोकशाहीचा तिसरा स्तंभ विकला गेला आहे का!
      सावधान! देशाच्या सवोच्च स्थानी असलेल्या नेत्यांची भाषा प्रचार सभांमध्ये पार रसातळाला गेली! आपला देश फक्‍त प्रचार सभांपुरताच आणि निवडून येण्यापुरताच उरला की काय? तसे नसते तर आज प्रचार करताना जातीय धर्मिय समिकरणे जिथक्या उथळपणे वापरली जातात तशी ती वापरली गेली नसती.
      भारतात अशी अराजकता येणार असेल तर देशाच्या नुकसानासाठी दुसर्‍या शत्रू देशाला काहीच करायची गरज नाही. आपण आपल्याच कृत्यांनी देशाची एकता पोखरून काढू. अथवा शत्रू राष्ट्राला हे निमंत्रण आहे! असे म्हणावे लागेल. आपण खरंच अराजकतेकडे जात आहोत का, याचा सजगपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
      (या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
 
-          डॉ. सुधीर रा. देवरे
          इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/