- डॉ. सुधीर रा. देवरे
आपण
काय खावं हे कोणीतरी तिसरी व्यक्ती ठरवणार असेल तर जगणं मुश्कील आहे. अमूक एका समूहाच्या
लोकांनी आमच्या वस्तीत स्वत:चं घर बांधूनच नव्हे तर भाड्याच्या खोलीतही राहू नये
असं कोणी ठरवणार असेल तर भयावह आहे. अमूक खाणार्यांनी आमच्या वस्तीत येऊ नये असा
फतवा निघणार असेल तर ते त्याहूनही भयंकर आहे. आपल्या कळपाला मान्य नसल्यामुळे अमूक
एकाकडून अमूक एक गोष्ट घडली म्हणून मार देणे वा जीवंत मारून टाकणे हे रानटी मानवी
टोळ्यांचे काम होते. आजच्या सभ्य माणसांच्या समूहांचे नाही. आपण नेमके आज मानवी समाजात
राहतो का आपापल्या जाती- धर्माच्या कळपात राहतो. मानवी समाजात निधर्मी सहजीवन जगता
जगता आपण अंतर्गत पातळीवर आपल्या माणसांच्या हिंसक टोळ्या जमवायला लागलोत की काय?
शाकाहार
म्हणजे काय? मांसाहार म्हणजे नेमकं काय? अजून कुठूनतरी शुध्द शाकाहार अशीही
व्याख्या ऐकू येते. शुध्द शाकाहारी असल्याचा दावा करणार्या जागोजागी हॉटेल्सही
दिसतात. हा काय प्रकार आहे? भारतातल्या सर्व जनतेने मांसाहार (मासे, चिकन, मटण आदी)
खाणे बंद केले तर भाजीपाला कोणालाच खायला मिळणार नाही. भाजीपाला उपलब्ध झाला तरी गरीबालाच
काय मध्यमवर्गीय माणसालाही विकत घ्यायला परवडणार नाही. एकविसाव्या शतकाच्या आणि जगात
महासत्ता होण्याच्या गमजा मारणार्या देशात मांसाहार करणार्यांचा व्देष करणे हा
रानटीपणा आहे. मांसाहार करणार्यांकडे तुच्छतेने पाहणे हा सुसंस्कृतपणा असू शकतो
का?
मनुष्यप्राणी
हा मिस्त्र आहारी प्राणी आहे. म्हणजे जो शाकाहार करू शकतो आणि मांसाहारही. माणसांच्या
दातांची रचनाही मिश्रआहारी आहे. खरं तर कोणी कितीही दावा करत असलं तरी ते शुध्द शाकाहारी
आहेत असं म्हणणं आज धारिष्ट्याचं ठरेल. शाकाहार करण्यामागे कोणत्याही जीवाची
हत्त्या करू नये हा विचार असेल तर शाकाहारी लोक भ्रमात आहेत. आपण ज्या हिरव्या भाज्या
(वनस्पती) खातो त्याही जीवंत असतात. त्यांच्या जीवाचा बळी देऊन आपण भाज्या खात
असतो. प्राण्यांमध्ये जसं लाल रंगाचं रक्त असतं तसं वनस्पतींमध्ये हिरव्या रंगाचं
हरितद्रव्य असतं. म्हणून रक्त आणि हरितद्रव्य यांच्याकडे एकाच दृष्टीने पहावं
लागेल. रक्ताला पाहून आपण हळहळतो तसे हिरव्या हरितद्रव्याला पाहूनही आपण हळहळायला
हवं. सृष्टीत भाज्या वा फळे आपल्यासाठी उगवत नाहीत. आपण त्यांचा खाण्यासाठी वापर
करतो. गहू, बाजरी, तांदूळ आदींसह सर्व प्रकारच्या डाळी देणारे धान्यही बीज
स्वरूपात असते. या सर्व प्रकारच्या धान्यांपासून जमिनीत रूजून नवीन जीव तयार होणार
असतो. त्या बीजाला दळून- भरडून आपण पोळ्या आणि भाकर्यांसाठी पीठ तयार करतो. ही
सुध्दा क्रूर हिंसाच आहे. आता कोणी म्हणेल की सृष्टीने वा देवाने भाजीपाला आणि
धान्य आपल्याला खाण्यासाठीच उगवले आहे, तर मग इतर प्राण्यांकडेही त्याच दृष्टीने पहावे
लागेल. शेवटी फिरून निसर्गाच्या अन्नसाखळीकडेच आपण येतो. दूधाला तरी आज शुध्द शाकाहार
म्हणता येईल का? विज्ञान सांगतं, आजचं दूध शाकाहारी नाही. (भाकड वनस्पती आणि भाकड
प्राणी यांचं काय करायचं याचा प्रश्न सृष्टीला कधीच पडला नाही. पण भाकड माणसांनी
आज जो उच्छाद मांडला आहे तो मात्र नक्कीच चिंताजनक आहे.)
आता
प्रश्न उरतो तो अध्यात्मिक आणि धार्मिकतेचा. खरं तर हा आज धार्मिक प्रश्न उरलाच नाही,
हा सरळ सरळ राजकीय प्रश्न आहे. माणसं मारायची आणि त्यांच्यावर राजकारण खेळायचं ही
मध्ययुगीन पाताळयंत्री व्यवस्था अजूनही अस्तित्वात आहे, असं नाईलाजाने म्हणावं
लागतं. मध्ययुगीन हुकुमशहा राजे- राजवाड्यांनीही इतक्या टोकाचा धर्माचा गैरवापर कधीही
केलेला नाही, तितका आज लोकशाही राज्य व्यवस्थेत सत्तेत येण्यासाठी धर्माचा अधर्म
केला जातोय.
सात
आठ वर्षांपूर्वी ‘बोंबीलचा वास’ नावाची कथा मी लिहून ठेवली आहे. ह्या कथेत बोंबीलच्या
वासावरून मैत्री तुटते, हे वाचकांना पटणार नाही असं वाटल्यामुळे ती कथा मी बाजूला
ठेऊन दिली होती. (आता रोखठोक 2015 च्या दिवाळी अंकात प्रकाशित.) पण आज मुंबईपासून संपूर्ण
देशभर जे काही चाललंय, ते पाहून ही कथा वास्तवापेक्षा फारच गुळमुळीत आहे असं
लक्षात आलं. ‘बोंबीलचा वास’ ही कथा आणि ‘देव
हातात हात घालून’ ही कविता हे दोन्हीही माझे
कलाविष्कार तसे जुनेच. पण जुन्या कथा कवितांना असे नवे दिवस या हिंस्त्र पार्श्वभूमीवर
यावेत हे दु:खदायकच. पैकी ‘देव
हातात हात घालून’ या कवितेने या लेखाचा शेवट करतो:
आधी डुक्कर मरतं
मग माणसं
अथवा
आधी गाय मरते
मग माणसं.
आधी भगवा जळतो
मग माणसं
अथवा
आधी हिरवा जळतो
मग माणसं.
केव्हा हा ईश्वर हसतो
केव्हा तो देव टाळ्या वाजवतो.
दंगलीची मॅच संपताच
दोन्ही देव खिलाडू वृत्तीने
चेंडूंसारखी माणसं लाथाडून
हातात हात घालून
निघून जातात
आपापल्या पोथ्या पुराणात...
- माणसं
अशा देवांना कवटाळत
कडेकोट घरात लपून बसतात, की
एका अफवेच्या काडीने
घरांतल्या जीवंत माणसांसह आख्खं गाव
जसं होतं की नव्हतंच
बेचिराख...
(दिनांक
15-10-2015 च्या महाराष्ट्र टाइम्स – नाशिक विभाग- मध्ये प्रकाशित झालेला लेख सर्वांसाठी पुन्हा
देतोय. या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा
सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
-
डॉ. सुधीर रा. देवरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा