बुधवार, १ मे, २०२४

डोंगऱ्यादेवाची गोष्ट

 

 

 - डॉ. सुधीर रा. देवरे

                     नागपूरच्या विजय प्रकाशनाकडून ‘गावदवंडी’ व ‘डोंगरदेव’ ही दोन लोकसंस्कृती विषयक पुस्तकं एवढ्यात प्रकाशित झालीत. पैकी ‘डोंगरदेव’ पुस्तकातील मनोगत... 

 

                    आमच्या विरगावच्या वरच्या म्हणजे पश्चिम दिशेला कान्हेरी नदीचा उतार लागत असे, त्या उताराच्या ढेंगड्यांवर (टेकड्यांवर) भिल आदिवासी बांधवांची भिलाटी वसलेली होती. तोंड पाहण्याचा कार्यक्रम असो, कोणाचा चिरा बसवायचा असो, लग्नाचा नाच असो, होळीचा शिमगा असो की डोंगऱ्या देवाचा उत्सव असो, भिलाटीतले सर्व कार्यक्रम लहानपणी समरसून पहायचो.

                    मार्गशिर्ष महिण्यात डोगंऱ्या देवाचा उत्सव दर वर्षी भिलाटीत पंधरा दिवस चालायचा. तो कार्यक्रम मला खूप भयंकर वाटायचा. त्यांचे नाच, गाणी, अंगात येऊन घुमणारे देव- भक्‍त, वारं, त्यांचा अवतार, त्यांची शिस्त, त्यांची वाद्य, त्यांच्या आदिम आरोळ्या, हुंकार, धवळीशेवर, टापऱ्या, तोंडाने वाजायच्या पुरक्या, ठेकाने वाजवायच्या टाळ्या, या सर्वांनी जागीच हरखून जायचो. गावखळी बसवायची पध्दत, थोम गाडायची पध्दत, त्यांचे आचार, पथ्य, वेश अशा सगळ्या बारीकसारीक गोष्टींकडे माझं ध्यान रहायचं. त्यांच्या विशिष्ट भाषेतल्या बारकाव्यांसहीत आलेले उच्चार व ह्या आचरण पध्दतीतील नवे शब्द एरव्ही व्यवहारात ऐकायला मिळायचे नाहीत. या सर्व गूढ वाटणाऱ्या गोष्टींमुळं त्यांच्याकडे केव्हा ओढला गेलो हे मलाही कळलं नाही.

                    लहानपणी दोन वर्षांचा असताना घरच्यांनी माझ्यातली इडापिडा निघून जाण्यासाठी पारंपरिक लोकसमजुतीनुसार मला डोंगऱ्यादेवाच्या भक्‍तांमध्ये गल्लीत झोपवून दिलं आणि घुमरे मला पायांनी ओलांडून पुढं निघून जात होते. हंबरडा फोडून रडत हे भयानक दृश्य बालपणी स्वत: अनुभवलं. नंतर आईनं सांगितलं की असं केल्यावर अंगातील इडापिडा निघून जाते. (लोकश्रध्देचा भाग). तेव्हापासूनच मला डोंगऱ्यादेवाच्या उत्सवाच्या भितीयुक्त दराऱ्यानं बांधून ठेवलं आहे.  

                    डोंगऱ्यादेवाचा हा सगळा अनुभव लहानपणापासूनच मनात जोपासून ठेवला आहे. डोंगऱ्यादेवासारखाच कानबाई, भोवाडा, टिंगरीवाला, रायरंग, आढीजागरण, तोंड पाहण्याचा कार्यक्रम, काठीकवाडी, बार, आईभवानी, आईमरी, धोंड्या धोंड्या पाणी दे अशा सर्व प्रकारच्या लोकपरंपरांमध्ये रंगून जायचो.

                    पुढं असं समजलं, की डोंगऱ्यादेवाचा उत्सव फक्त भिल बांधवच साजरा करत नाहीत तर बागलाणच्या पश्चिमेला असलेले कोकणा बांधवही साजरा करतात आणि भिल समाजातले लोक साजरा करतात तेव्हाच- त्याच महिण्यात आणि तसाच. मग त्या दिशेनं अभ्यासाला लागलो. सुधाकर देशमुख नावाचे कोकणी मित्र होते. त्यांच्या जवळ हा विषय काढला. तर ते म्हणाले, आमच्या गावात हा उत्सव असतो. मी तुम्हाला गावाला उत्सवाच्या वेळी घेऊन जाईल.

                    कोसुर्डे हे गाव कळवण तालुक्यात दुर्गम भागात आहे. गावाच्या तिन्ही बाजूनं डोंगर व दळवटकडून कोसुर्डे गावात जाण्यासाठी ओढा ओलांडून जावं लागतं. १९९५ साली या गावात मित्राबरोबर त्यांच्या बाईकनं डबलशिट गेलो. (नाला कोरडा होता म्हणून ओलांडावा लागला नाही. अलीकडे पूल झाला आहे.) गावाला वेढलेल्या डोंगरांपैकी एका डोंगरावर मार्गशीर्ष पौर्णिमेला डोंगऱ्यादेवाची रानखळी साजरी होणार होती. त्या डोंगरावर संध्याकाळी डोंगऱ्यादेवाच्या उपासकांच्या आधीच तब्बेतीनं चालत जाऊन बसलो. कपड्यांना अनेक कुसळं चिकटून आत अंगाला टोचत होती. हात खडकांवरुन सरकत होते म्हणून हात खरचटले होते. आम्ही डोंगरावर जाऊन विसावत नाही तोच मागून डोंगऱ्यादेवाचे उपासक आले.  

                    डिसेंबरच्या थंडीत रात्रभर उघड्यावर थांबलो. त्यांच्यासोबत ‘भुज्या’ नावाचा कुठलीही चव नसलेला पदार्थ आणि नागलीची भाकर हातावर घेऊन खाल्ली. शेकोटीशेजारी बसून संपूर्ण रात्र डोंगऱ्या देवाच्या उपासकांचा नाच, अंगात घेण्याची पध्दत, काकडा आणि चिमटा उघड्या अंगावर मारुन घेण्याची रीत, त्यांचे आदिम हुंकार, नाच पहात, थाळीवरची कथा ऐकत थंडीत कुडकुडत बसलो. प्रकृतीमुळं माझं शरीर थंडीनं लवकर कुडकुडतं आणि हातापायाला मुंग्या येऊन शरीर बधीर होतं. तरीही ह्या अभ्यासासाठी मी थंडीतली पूर्ण रात्र डोंगरावर घालवली. शिवार देव, वाघ देव, नाग देव, सगळ्या प्रकारची (काल्पनिक) भूतं यांची मुळातून माहिती भक्‍तांकडून काढत होतो. गाणी ऐकली, मंत्र ऐकले आणि भक्‍तांच्या मुलाखतीही घेतल्या. त्यांचे मंत्र, काही गाणी स्वत: बैठक मारुन लिहून घेतली. नंतर जसं टेप करुन घेणं शक्य झालं ते टेप करून घेतलं. (तेव्हा मोबाईल नव्हते.)

                    १९९५ साली नाशिकला मुक्‍त विद्यापीठ आणि लोकशिबीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं कालिदास कला मंदिरात लोक शिबीर परिषदेचा कार्यक्रम झाला होता. कार्यक्रमात ‘लोकायन’  नावाची स्मरणिका प्रकाशित झाली होती. त्या स्मरणिकेसाठी माझा लेख मागितला म्हणून भिल  बांधवांवरील (१९९३ ला लिहिलेला) डोंगऱ्यादेव दैवतावरील लेख ‘लोकायन’ मध्ये छापण्यासाठी दिला. तोपर्यंत डोंगऱ्यादेवावर कुठंही काहीही लिखाण झालेलं नव्हतं. डोंगऱ्यादेवावरचं हे माझं पहिलं लिखाण होतं. हाच लेख लोकायनसह युनिक फिचर्स तर्फे तेव्हाच्या दैनिक गावकरीतही त्यांनी परस्पर छापला होता. गावकरीत हा लेख आल्यामुळं डोंगऱ्यादेव हा उत्सव लिहिण्याचाही विषय होऊ शकतो हे नवीनच इकडच्या सर्वसामान्य वाचकांना गावागावात समजलं. (हा उत्सव फक्त उत्तर महाराष्ट्रारात- अहिराणी, कोकणा, डांगी भाषा पट्ट्यात साजरा होतो. इतरत्र नाही.) याच विषयावरील माझा दुसरा लेख पुण्याच्या ‘आदिवासी संशोधन पत्रिकेत’ प्रकाशित झाला. (हे सर्व लेख मी संपादित करीत असलेल्या अहिराणी ‘ढोल’ अंकातही अहिराणी भाषेत आलेले आहेत आणि ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या ‘अहिराणी लोकपरंपरा’ या ग्रंथात त्यांचे मराठी भाषांतर अतिशय त्रोटक व थोडक्यात समाविष्ट केलं आहे. मात्र सदर पुस्तकात बऱ्याच परिष्करणांसह हे लेख सखोल- सविस्तरपणे अहिराणी भाषेत आणि मराठीतही आहेत.)

                    ‘डोंगरदेव : अनुभूतीतून अभ्यास’ हे पुस्तक म्हणजे माझ्या बालपणापासून ते २००० सालापर्यंत ‘भिल’ व ‘कोकणा’ आदिवासींच्या डोंगरदेव उपासना पध्दतीत प्रत्यक्ष स्वत: सामील होऊन स्वअनुभूतीतून- स्वअनुभवातून व नंतर अभ्यास- चिंतनातून लिहिलेलं पुस्तक. ह्या पुस्तकात आदिवासी लोकसंस्कृती, लोकश्रध्दा, आदिम उग्र पूजापध्दती, भाषेतले आदिम हुंकार अधोरेखित करत, मूळ अहिराणी भाषेत आणि मराठीतूनही अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषाशैलीतून डोंगऱ्या देवाचं आणि त्यांच्या भक्तांच्या आदिम दर्शनासह तात्कालिक जीवन जाणिवांना खोल तळमळीतून भिडण्याचा प्रयत्न केला आहे...

                    (१९ फेब्रुवारी २०२४ ला प्रकाशित झालेल्या ‘डोंगरदेव : अनुभुतीतून अभ्यास’ या पुस्तकातील मनोगत. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

 

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

सोमवार, १ एप्रिल, २०२४

ग्रामीणांची बदलती जीवनशैली

 

- डॉ. सुधीर रा. देवरे

                     नागपूरच्या विजय प्रकाशनाकडून गावदवंडीडोंगरदेव ही दोन लोकसंस्कृती विषयक पुस्तकं एवढ्यात प्रकाशित झालीत. पैकी गावदवंडी पुस्तकातील मनोगत...  

                     गावदवंडी या पुस्तकातून ग्रामीणांची बदलती जीवनशैली या विषयावर आपल्याशी हितगुज करायचे आहे. गावकुसाचे होत गेलेले स्थित्यंतर इथे अधो‍रेखित केले आहे. (लेखांमध्ये विशिष्ट परिसरातल्या गावांचा- अहिराणी पट्ट्यातला- उल्लेख जास्तकरून येत असला तरी सगळ्याच लेखांत कोणत्याही भौगौलिक क्षेत्रातल्या गावांचे प्रतिबिंब दिसावे.) गावातले केवळ भौतिक बदलच इथे नोंदवले नाहीत तर अभौतिक बदलांची दखलही लेखांत घेतली गेली. कालच्या गावांचा आज भौतिक बदल झाला तो ग्रामीण लोकांच्या मानसिकतेमुळे. मानसिकता स्थिर असली तर लोकांच्या वस्तुंचा भौतिक बदल होत नाही. अनुकरणातूनही भौतिक बदल होत असतात. आज शहरी अनुकरणातून ग्रामीण भागात भौतिक बदल झपाट्याने होत आहेत. असे मोठ्या प्रमाणात भौतिक बदल होण्याचे कारण मानवाची दिवसेंदिवस सुखाकडे जाण्याची धडपड. ती योग्य आहेच. तरीही सगळ्यात शेवटी राहून गेलेल्या माणसाची स्थिती आणि परिस्थिती यांचाही धांडोळा आवश्यक ठरतो.

                    हा गावकुसाच्या स्थित्यंतराचा विषय भावनिक असल्याने या पुस्तकाचा विषय वाचकांना रसपूर्ण व वाचनिय वाटेल. आज शहरात वास्तव्य करणारे बहुतांश लोक ग्रामीण भागातून आलेले आहेत. आपले कालचे गाव, गावातली घरे, गावाजवळचे शिवार, गावमित्र हे आपल्या काळजात रूतून बसलेले असतात. गावाशी जोडलेली नाळ तुटता तुटत नाही. आठवणीतले साधेसुधे गाव आज शहराकडे झुकलेले दिसत असले तरी बालपणातले गाव आपल्या डोळ्यापुढे जसेच्या तसे उभे राहते.

                    हे चित्रण जुने असले तरी याचा अर्थ असा नाही की आजच्या नव्या तरूण पिढीला गावाबद्दल काही जाणून घ्यायचे नाही. आपले वाडवडील खेड्यात कसे जीवन व्यतीत करत होते हे जाणून घेणे आजच्या तरूण पिढीलाही गरजेचे वाटते. म्हणून गतकाळात रमता येईल इतक्या वयाचा कोणी माणूस असो की वीस पंचवीस वर्षाचा तरूण, सर्वच जण काही विशिष्ट काळ का होईना गावाच्या स्मरणरंजनात रमून जातात. पण या पुस्तकात केवळ स्मरणरंजन आलेले नाही. यापेक्षा अनेक वस्तुनिष्ठ गाभ्याचा विचार या पुस्तकात केला आहे.

                    अमूक हा माझा प्रांत, अमूक ही माझी भूमी, अमूक ही माझी जन्मभूमी, अमूक ही कर्मभूमी आणि अमूक मातृभाषा अशा कप्यात आपण आपल्या जीवनातल्या गावांची- परिवेशाची (आणि शहरांचीही) वर्गवारी करीत असतो. ज्या गावात आपले बालपण गेले; किशोरपणाची ज्या गावात जडणघडण झाली; शिक्षणाचे गाव, कर्मभूमीचे गाव वगैरेंची आपल्या नेणिवेत नोंद घेतली जाते. आपल्या जाणिवा आज बदलल्या असल्या तरी प्रत्येकाला बालपणीच्या जीवन जाणिवा खुणावत असतात. प्रत्येक माणूस आठवणी लिहीत नसला, विशिष्ट दृष्टिकोनातून आपल्या हरवलेल्या गावाचा कायम‍ विचार करत नसला तरी मधूनच तो आपल्या हरवलेल्या गावाचे मनन- चिंतन करतो. आपल्या गावाचे कुणाकडे तरी वर्णन करतो. कुणाकडे तरी बालपणीच्या आठवणी बोलून दाखवतो. आदी बाबी म्हणजेच आपली आपल्या गावाशी जुळलेली नाळ. म्हणून आपल्या बालपणापासून तर आतापर्यंतची गावाच्या स्थित्यंतराची काही निरिक्षणे नोंदवणे ही आपली मानसिक गरज असते. जो कोणी अशा गोष्टींची दखल घेत नाही असे लोक खूप विरळा. मागील तीस- चाळीस वर्षांचा कालखंड जरी विचारात घेतला तरी ही स्थित्यंतरे ठळकपणे दिसतात.

                    या काळातील गावाची रचना, ग्रामीण वासियांचा पेहराव, निवासस्थाने (घरे), शेती, वाहने- प्रवास, करमणूक, विधी- लग्नसोहळे, भाषा, वाद्य, ग्रामीण राहणीमान, ग्रामीण आहार, लोकपरंपरा, लोकवाड्‍.मय, चावडी, गावाची शिव- दर्जा- देवडी, गावातली दवंडी, भटके लोक, श्रध्दा, लोककलाकार, मागणारे लोक, अलुते- बलुते, समाज व्यवस्था, धर्मशाळा, झोका, बार, सण, उत्सव, बाजार, ग्रामीण दैवते, आदिवासी दैवते, जत्रा, लोकरहाटी, आड, नदी, सांस्कृतिक गाव, मुलामुलींची नाव ठेवण्याची रीत, ग्रामीण पर्यावरण, ग्रामीण मापे- परिमाणे, वेळ आणि अवकाश आदी ठळक बाबी या पुस्तकाच्या माध्यमातून उपयोजित झाल्या आहेत. पुस्तक वाचताना आपल्याला या आठवणी आपल्या गावी घेऊन जातील याची शाश्वती वाटते.

                    ‘गावदवंडीहा ग्रंथ म्हणजे लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचे यथार्थ दर्शन. ग्रामीण वस्तू- वास्तू, राहणीमान, बाजार, जत्रा, सण, उत्सव, करमणूक, वाहने, विधी, दैवते, लोकभाषा, वाद्य, आहार, पेहराव आदींचे लक्षवेधी निरिक्षणे इथे नोंदवली आहेत.          प्रत्यक्ष गावाचे दर्शन घडेल अशी लेखांची शैली मुद्दाम सहज सोपी केली आहे. ग्रामीण विषयांची मांडणी करताना अनुभव अनुभूतीतून आल्याने साहजिकच संवेदनशील चिंतनशीलता आलेली आहे. ग्रामीणतेच्या वस्तुनिष्ठ गाभ्याचा विचार संपृक्‍तपणे या ग्रंथात उपयोजित करण्याचा प्रयत्न केला आहे.

                    ह्या लिखाणाकडे केवळ उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचे चित्रण- चिंतन म्हणून पाहता येणार नाही; तर स्थळकाळाच्या मर्यादा ओलांडून भारतातील कोणत्याही ग्रामीण प्रदेशाचे प्रतिबिंब या लिखाणात दिसावे. दिवसेंदिवस ग्रामीण जीवन कसे ग्लोबल होत चालले, असा ठळक निष्कर्षही अधोरेखित होतो. समाजकारण, शिक्षण, प्रबोधन, पर्यावरण, कला, भाषा, साहित्य, लोकश्रध्दा, परिमाणे आदी अंगांचाही सखोल विचार या ग्रंथातून केला आहे. ग्रामीण समाज आणि त्यांचे सहज सहजीवन टिपण्याचा हा प्रयत्न आहे. लोकसंस्कृतीचे जतन केले तर लोकभाषा प्रवाहीत राहते, असे या ग्रंथाचे एकूण सूत्र आहे.

                    गावात परंपरेने कारू- नारू लोक असत. कारू लोकांनाच बलुतदार असे दुसरे नाव होते. तर नारूंना आलुतदार म्हणूनही ओळखले जायचे. बारा प्रकारच्या जाती ह्या कारू असायच्या तर नारूंची संख्या अठरा जातीत होती. अलुते- बलुते (बारा कारू वा बलुतदार) म्हणजे काय हे नीट लक्षात येण्यासाठी त्या लोकांची यादी पुस्तकाच्या शेवटी परिशिष्ट एक मध्ये मुद्दाम दिली आहे. लोकजीवन आणि आदिवासी- ग्रामीण लोकसंस्कृतीच्या अभ्यासकांना, संशोधकांना हे पुस्तक नक्कीच योग्य वाट दाखवेल अशी आशा आहे.

                    जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ या काळात स्थित्यंतर गावकुसाचे नावाच्या पाक्षिक सदरात (पुण्यनगरी रविवार पुरवणी) हे लेख प्रकाशित झाले आहेत. या व्यतिरिक्त काही लेख भाषा आणि जीवन’, लोकप्रभा’, नवे- गाव आंदोलन अशा काही नियतकालिकांत प्रकाशित झाले आहेत.

          ताजा कलम : पुस्तकातील लेख प्रकाशित होत असताना मित्रांनी- वाचकांनी ह्यापैकी काही वा एखाद्या लेखावर खाजगीत आणि सोशल मीडियावर गंभीर चर्चा केली. त्यामुळे पुस्तक स्वरूपात प्रकाशित करताना यातील काही लेख अजून परिपूर्ण करता आले. संदर्भपुरक ठरलेल्या अशा चर्चिक मित्रांची नावे परिशिष्ट दोन मध्ये दिली आहेत... संतोष पद्माकर पवार, रविंद्र नेवाडकर, बापू व्हटकर, जनार्दन देवरे, मधुकर धाकराव, अरुण प्रभुणे, एस के पाटील, मार्मिक गोडसे, मीनाक्षी पाटील, स्वाती पाटील, वंदना भामरे, विभा सातर्डेकर, दर्शना कोलगे, भटूलाल बागूल, रमेश बोरसे विरगावकर, सुनील देवरे, पैसा, शैलेश पुंडलिक, माहितगार विजय सरदेशपांडे, नितीन मैंद, प्रदीप कुलकर्णी, धीरज जाधव, अशोक सोनार, केदा मोरे, सोमदत्त मुंजवाडकर... या सर्वांचे आणि अनेक अज्ञात वाचकांचे खूप खूप आभार.

                    (१९ फेब्रुवारी २०२४ ला प्रकाशित झालेल्या गावदवंडी पुस्तकातील मनोगत. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/