-
डॉ. सुधीर रा.
देवरे
तुम्ही
एखाद्या मित्राला दिवाळीच्या शुभेच्छा पाठवल्या आणि पलिकडून उत्तर आले की, ‘मला तुमच्या दिवाळीच्या शुभेच्छा नकोत’, तर तुमच्या मनाची अवस्था काय होईल? माझ्या मनाची अवस्थाही
तशीच झाली. दिवाळीच्या दिवशी मी माझ्या एका मित्राशी संवाद साधण्यासाठी काहीतरी
निमित्त म्हणून दिवाळीच्या शुभेच्छांचा एसेमेस इतरांसोबत त्यालाही पाठवला.
मित्राचे तिकडून जे उत्तर आले ते वाचून मी हादरलोच.
त्याने
उत्तराच्या संदेशात म्हटले होते, मी हिंदू नाही. दिवाळी हा हिंदूचा सण आहे. म्हणून
मला दिवाळीच्या शुभेच्छा देऊ नयेत.
बाप
रे! उत्तर वाचून मला मुर्च्छा येण्याचेच बाकी राहिले. संदेश वाचून माझ्या
पहिल्यांदा लक्षात आलं ते हे की, मी जन्माने हिंदू आहे आणि ज्याने हे उत्तर लिहिले
तो इतर धर्मीय आहे. (सर्वच जातीधर्माचे माझे असंख्य मित्र असून हा अनुभव केवळ
अपवादात्मक.) दिवाळीच्या शुभेच्छांचा असाही अर्थ काढला जाऊ शकतो हे मला आयुष्यात
पहिल्यांदा लक्षात आलं.
खरं
तर हा माझा नव्यानेच मित्र झालेला माणूस होता. मला जुजबी ओळखत होता. लहानपणापासून
आणि विचारांनी त्याने मला ओळखले असते तर कदाचित त्याने असे उत्तर देताना शंभर वेळा
विचार केला असता. माझ्या लिखाणाचे वाचन केलेला कोणीही वाचक असता तरी त्याने मला
असे उत्तर दिले नसते. ते उत्तर वाचून मला राहवले नाही. मी त्याला समजावणीच्या सुरात
पुन्हा एसेमेस केला: हिंदू आणि दिवाळी असा आजतरी काही संबंध मला दिसत नाही. दिवाळी
आख्या जगात साजरी केली जाते. दिवाळी हा भारताचा सांस्कृतिक सण आहे. धर्माचा नाही.
वगैरे. त्यानंतर त्याचे पुन्हा जे उत्तर आले ते तर अतिशय उध्दटपणाचे होते.
या उत्तरात त्याने म्हटले होते, तुम्ही जरा नीट
अभ्यास करा, वाचन करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दिवाळी का साजरी करतात. मला
सल्ला देत त्याने पुढे म्हटले होते, सोबत मी तीन घटना देत आहे. त्या वाचा म्हणजे
दिवाळी का साजरी करतात ते तुम्हाला कळेल. त्याने ज्या तीन गोष्टी सांगितल्या
होत्या त्या अशा : अमूक एका धर्मीय भिक्षूचा अमूक ब्राम्हणाने खून केला म्हणून
दिवाळी साजरी केली जाते. दुसर्या कथेतही त्याने असाच काहीतरी संबंध जोडून अमूक एक
धर्म भारतातून हद्दपार झाला म्हणून दिवाळी साजरी करत असल्याचे म्हटले होते आणि
तिसरी सर्वांना माहीत असलेली बळीराजाची कथा सांगितलेली होती... शेवटी तो म्हणाला,
म्हणून बहुजनांनी दिवाळी साजरी करू नये.
अशा अतिशय उद्दाम पध्दतीने हा अनुभव मला सामोरा आला तरी या
अनुभवावर मी चिंतन करू लागलो. आपण एखाद्याला दिवाळीच्या वा कुठल्याही सणाच्या
शुभेच्छा कोणत्या अर्थाने पाठवतो. अशा शुभेच्छा पाठवताना या मित्राला अभिप्रेत
असे सर्व अर्थ गृहीत धरून वाईट गोष्टींचे मी समर्थन करत होतो का? (जे सण जनमानसात
आज शुभ समजले जातात त्याच सणांच्या शुभेच्छा दिल्या जातात. काही सणांच्या शुभेच्छा
दिल्या जात नाहीत. उदा. मोहरमच्या शुभेच्छा दिल्या जात नाहीत.) समजा मला एखाद्या
सणाच्या दंतकथेची पार्श्वभूमी माहीत आहे (उदाहरणार्थ दिवाळी) आणि तरी सुध्दा मी
एखाद्याला त्या सणाच्या सहज शुभेच्छा पाठवल्या तर मी त्या माणसाचा उपमर्द करतो
का? का एखाद्या अनिष्ट परंपरेचे समर्थन करतो. एखादा सण साजरा करण्यामागे असलेली
कथा, लोककथा, दंतकथा, आख्यायिका या फक्त सांगिवांगीतून, कल्पनेतून वा
विपर्यासातून निर्माण झालेल्या असतात का तो शंभर टक्के इतिहास असतो. ख्रिसमस साजरा
करण्यामागे जितका स्पष्ट इतिहास असेल त्याच्या एक शतांशही इतिहास दिवाळी साजरा
करण्यामागे नाही हे इथे आवर्जून लक्षात घ्यावे लागेल.
इतिहास
असेल तर त्याला केवळ दंतकथा हा पुरावा होऊ शकत नाही. आणि तो तसा मानला तरी एकाच
सणामागे तीन प्रकारच्या पार्श्वभूमी कथा कशा येऊ शकतात. मी वर ज्या मित्राचा
उल्लेख केला त्याने बळीराजाच्या कथेसोबतच ज्या अजून दोन विशिष्ट धर्मिय अन्याय
कथा सांगितल्या त्याच त्याच्या मताच्या विरूध्द जात होत्या. दिवाळी का साजरी केली
जाते यावर त्याने तीन वेगवेगळ्या कथा सांगितल्या. या तीन कथांपैकी नक्की कोणत्या
घटनेमुळे आधी दिवाळी साजरी झाली हे त्याला सांगता यायला हवे होते. का या तिन्ही
घटना एकाच दिवसभरात घडल्या आणि या तिन्ही घटनांच्या विजयासाठी दिवाळी साजरी होते.
म्हणजे बळी राजाला मारले म्हणून दिवाळी साजरी केली जाते. दुसरी कथा, अमूक एका
भिक्षुचा एका ब्राम्हणाने खून केल्यामुळे दिवाळी साजरी केली जाते. आणि तिसरी कथा,
भारतातून अमूक धर्म हद्दपार केल्यामुळे दिवाळी साजरी केली जाते असे हे तर्कट.
कशातच कुठलाही ताळमेळ नाही. (समजा एखाद्या दिवाळीच्या दिवशी आपल्या घरात एखादी
वाईट घटना घडली. तर फक्त त्या वर्षापुरती आपण दिवाळी साजरी करणार नाही, का
कायमस्वरूपी आयुष्यात दिवाळीच येऊ देणार नाही? आणि आपल्या घरात अमूक एका दिवाळीत
अशी वाईट घटना घडली म्हण़ून लोक दिवाळी साजरी करतात, असा समज करून आपल्याला तसा
प्रचार करता येईल का?) त्याचे हे तर्कट स्वत:चे नसावे. एखाद्या संशोधनात्मक
अभ्यासपूर्ण संदर्भ ग्रंथामध्येही ते त्याने वाचलेले नसावे. कुठल्यातरी भडकाऊ
भाषणातून वा चटपटीत मासिकातून वाचून त्याने दिवाळीबद्दल आपले मत बनवलेले दिसले.
आज
आपण दिवाळी साजरी करतो. दिवाळीला सर्वच धर्माचे लोक एकमेकांना शुभेच्छा देतात.
आपण ख्रिसमस साजरा करतो. सर्व धर्माचे लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. आपण रमजान
ईद साजरा करतो. सर्वच धर्माचे लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. आपण बौध्द पौर्णिमा
आणि महावीर जयंतीही साजरी करतो. पैकी अनेकांना अशा सणांमागची पार्श्वभूमी माहीत
असतेच असे नाही. पण आपण दिवसेंदिवस लोकपरंपरेच्या या सगळ्या सणांबाबतही सर्व
धर्मिय ग्लोबल होत एकमेकांना या निमित्ताने शुभेच्छा देत एकमेकांच्या जवळ येऊ
पहातो ही मानवतेची एक चांगली खूण आहे. माझा एक मुस्लीम धर्मिय बालमित्र आहे. तो
मुस्लीम धर्मिय आहे असा उल्लेख आज मी पहिल्यांदा करतोय. कारण आमच्या मैत्रीत कधीही
धर्म आडवा येत नाही. प्रत्येक रमजान ईदच्या दिवशी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आधी
त्याचा मला फोन वा एसेमेस येतो. नंतर मी त्याला शुभेच्छा देतो. त्याच्या शुभेच्छा
आल्या तर मी मुसलमान नसूनही हा मित्र मला का एसेमेस करतो असे मला कधी वाटले नाही.
कधी वाटणारही नाही. आणि कोणालाही तसे कधी वाटू नये.
खरे
तर माझ्या मते आज कोणताच सण एखाद्या धर्मापुरता धार्मिक सण राहिलेला नाही. सण
साजरा करणे या आज ग्लोबल लोकपरंपरा झाल्या आहेत. निदान भारतात साजरे होणारे अनेक
सण हे हिंदू धर्माचे सण आहेत असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. सण हे धार्मिक
असण्यापेक्षा इथल्या अस्तित्वाच्या सांस्कृतिक खुणा आहेत, असे मला वाटते. दिवाळी
ही भारताची सांस्कृतिक खूण आहे. हा प्रकाशाचा सण आहे. आपल्याला न्यूनगंडच पाळायचा
झाला तर आपण बळीराजाच्या शुभ स्मृतीसाठीही तो साजरा करू शकतोच की. दिवाळी ही
एकीकडे अनेक गोष्टींचे प्रतिक होताना दिसते तर दुसरीकडे अशा अनुभवाचा ठणठणीत
सांस्कृतिक दुष्काळ सामोरा येताना दिसतो. मलेशिया- इंडोनिशिया हे मुस्लीम धर्मिय
देश असूनही तिथे कलात्मक रामायण नाट्य साजरे केले जाते. पाकिस्तान हा मुस्लीम देश
असूनही मकरसंक्रातीला अनेक ठिकाणी पंतग उडवले जातात. सारांश, आजचे सण हे
लोकपरंपरेच्या सांस्कृतिक खुणा ठरत आहेत. धार्मिक उत्सव नव्हेत. धर्माच्या
उन्मादाला विरोध करणे वेगळे आणि सांस्कृतिकता पाळणे या दोन्ही वेगवेळ्या गोष्टी
आहेत.
(सदर लेख दिनांक 12-11-2015 च्या महाराष्ट्र
टाइम्स (नाशिक विभाग) मध्ये प्रकाशित झाला आहे. लेखातील मजकुराचा इतरत्र वापर
करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा