- डॉ. सुधीर रा. देवरे
जगातील प्रत्येक कोपरा बोलीभाषेने व्यापलेला आहे. प्रत्येक
कानाकोपर्यात ती बोलली जाते. मात्र यापैकी काही बोलीभाषा आज नामशेष झाल्या आहेत, तर काही बोलीभाषांचा
विकास होऊन त्या आज प्रमाणभाषा झालेल्या दिसून येतात, हा बदल आपल्याला
ज्ञातच आहे. आज व्यवहारात वापरली जाणारी हिन्दी भाषादेखील एकेकाळी केवळ बोलीभाषा
म्हणूनच वापरली जात होती. परंतु आज तीच भाषा आपली
राष्ट्रभाषा म्हणून मान्यता पावलेली दिसून येते. त्याचप्रमाणे
सिंधी, गुजराती, मराठी सारख्या अनेक भाषा ह्या सुद्धा एके काळी केवळ बोलीभाषेच्या स्वरूपातच अस्तित्वात
होत्या.
संपूर्ण भारतात आढळून येणार्या बोलीभाषांची
संख्या जवळजवळ अठराशे इतकी आहे. त्यापैकी
अनेक बोलीभाषा पूर्वीच नष्ट झालेल्या आहेत.
तर अनेक बोलीभाषा आजही नष्ट होण्याच्या
मार्गावर आहेत. अशीच एक बोलीभाषा म्हणून ‘अहिराणी’ भाषेचा नामोल्लेख करावा लागतो. अहिराणी महाराष्ट्राच्या
नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार ह्या चार जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोलली जात असूनही तिला आजपर्यंत प्रमाण भाषेचा
दर्जा प्राप्त झालेला नाही. भाषाशास्त्राने तर
‘अहिराणी’ला मराठी
भाषेची एक पोटभाषा म्हणून तिची उपेक्षाच केलेली दिसून येते.
प्राचीन काळी ‘अहिराणी’ अभिर लोकांची भाषा होती. म्हणून तिला ‘अभिराणी’ असं संबोधलं जात असे.
कालांतराने अभिरांचा अहिर अपभ्रंश झाला म्हणून
अभिराणीचाही अहिराणी अपभ्रंश झाला. आज या विशिष्ट बोलीभाषेला ‘अहिराणी’ म्हणूनच संबोधण्यात
येतं. अभिर लोकांचा अपभ्रंश अहिर आणि अहिर लोकांची भाषा ती
अहिराणी. अभिर लोकांचे संदर्भ रामायण, महाभारत कालखंडातही
आढळून येतात. भरताच्या नाट्यशास्त्र ह्या ग्रंथात अहिराणीचा उल्लेख बोलीभाषा असाच केलेला
आहे. ह्या भाषेचा उदयकाल साधारणत: इसवी सनाच्या
तिसर्या-चौथ्या शतकात
झालेला असावा, असे मानले जाते. प्रदेशाच्या नावाने अहिराणीला ‘खानदेशी’ तर राजवटीच्या
नावाने तिला ‘बागलाणी’ संबोधले जाते. मराठी, हिन्दी, गुजराती, राजस्थानी, बंगाली ह्या भाषेतील काही शब्दही अहिराणी भाषेत आढळून येतात. म्हणूनच अहिराणीला
कोणत्याही एका विशिष्ट भाषेची पोटभाषा संबोधणे सर्वस्वी चुकीचे ठरते.
बोलीभाषांच्या संदर्भात
काही अपवाद वगळता बेजबाबदार लेखनच अधिक प्रकाशित झालेले दिसून येते, जे बोलीभाषेच्या
विकासासाठी मारक ठरते. बोलीभाषेतून संवाद साधण्यासाठी लोकांना प्रेरणा मिळेल, त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळेल अशा हेतूने बोलीभाषेतील बलस्थानांचा अधिक अभ्यास
व्हायला हवा. दुय्यम प्रतीचे लेखन,
उदाहरणांचा अभाव, ढोबळ पुराव्यांच्या आधारावर केली गेलेली निश्चित विधाने, हितसंबंध, सामाजिक प्रतिष्ठेच्या आततायी कल्पना, दुसर्या भाषेच्या
संदर्भातील अज्ञान, पूर्वग्रह, दुराग्रही वृत्ती, ठोस पुराव्यांचा
अभाव, ऋण मान्य करण्याचा अभाव, पाहताक्षणी लक्षात न येणारी जोडतोड करून लिखाण करणे ह्या प्रकारांमुळेच
बोलीभाषेचा विकास खुंटलेला दिसून येतो.
सर जॉर्ज
ग्रियर्सन (1851 - 1946) यांनी भारतातील संपूर्ण भाषांचा सखोल अभ्यास केलेला आहे. क्षेत्रीय व्यापकता,
भाषांची संख्या आणि विविधतेच्या दृष्टीतून
बघितले तर त्यांचे भाषाविषयक कार्य निश्चितच महत्वाचे आहे. ह्या संदर्भातील सर्व महत्वाची माहिती ‘‘Linguistic
Survey of India’’ ह्या नावाने ग्रंथित करण्यात आलेली आहे. ह्या ग्रंथाच्या
नवव्या भागात त्यांनी अहिराणीच्या संदर्भात
आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी ‘अहिराणी’ ला भिलांची भाषा म्हटले आहे. परंतु अहिराणी ही सुद्धा हिन्दीप्रमाणे एक लोकभाषा आहे. केवळ अहिराणीचाच
असे नव्हे तर कोणत्याही भाषेचा संबंध कोणत्याही
जाती-जमातीशी लावणे, हे मानवतेच्या दृष्टीकोणातून अयोग्य आहे. भाषेने जर
व्यक्तिवर विशिष्ट जातीचा
शिक्का मारला जात असेल वा भाषेवर विशिष्ट जात लादली जात असेल तर ही गोष्ट बोलीभाषेच्या विकासाला मारक ठरते.
लोकांच्या वर्तनातून लोकसंस्कृती संक्रमित होत असते- प्रवाहित होत असते. म्हणूनच कोणत्याही बोलीभाषेचा अभ्यास हा त्या बोलीभाषेतील लोकवाड्.मयाच्या अभ्यासाशिवाय
अपूर्णच ठरत असतो. लोकवाड्.मयाच्या माध्यमातूनच आदिवासी बंधू-भगिनींच्या
श्रद्धा, रितीरिवाज, पूजा-अर्चना, संस्कृती, आशा-आकांक्षा, शेती, व्यवहार, नातेसंबंध, सण-उत्सव इत्यादींवर प्रकाश पडत असतो.
‘ऋषिंचे कुळ
आणि नदीचे मूळ’ जसे विचारले जात नाही तसे भाषांचे कुळही विचारू नये. कारण भाषा
ही केवळ भाषा असते आणि ती स्थानिक संस्कृतीतून उगम पावलेली असते. मग ती कोणतीही
भाषा असो. अगदी इंग्रजी असली तरीसुध्दा.
आदिवासी बोलींचे डाक्युमेंटेशन होणे आज आवश्यक झाले आहे. जी माणसं
निरक्षर राहिलेली आहेत, तीच केवळ बोलीभाषेतून
व्यवहार करताना दिसतात. पंरतु साक्षर झालेली माणसं मात्र लिखाणासाठी आणि व्यवहारासाठी
प्रमाणभाषेचाच वापर करताना दिसून येतात.
मग ते ‘अहिराणी’ भाषिक असोत की अजून कोणी इतर बोलीभाषक. ते मराठी, हिन्दी किंवा
इंग्रजीतच लिहिण्याचा अट्टहास दाखवतात.
मातृभाषेतून संवाद साधण्यातही जिथे त्यांना संकोच वाटू लागतो तिथे मातृभाषेतून लिखाण तर दूरची गोष्ट आहे. हा संकोच
दूर करण्यासाठीचा प्रयत्न
भाषा केंद्र बडोदा या आमच्या एनजीओ कडून सुरू आहे. जिथे जिथे बोली-भाषेसाठी न्यूनगंड दिसून येतो, तिथे ह्या बोलीभाषांना
प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू
झालेले आहेत.
आपल्या भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टात भाषिक स्वायत्ततेच्या
संदर्भात मार्गदर्शन केलेले आहे. त्या अन्वये कोणत्याही
भारतीय व्यक्तीला आपली भाषा
बोलण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. तरीही शाळा-महाविद्यालयांमध्ये बोलीभाषेतून शिकविण्यासाठी रूची दाखवली जात
नाही. लोकांना आपल्या भाषेपासून दूर ठेवणे म्हणजे त्यांची जिव्हा- जिभ कापण्यासारखेच
आहे. म्हणूनच लोकांना आपल्या भाषेपासून वंचित करणे हे लोक अधिकारांचे
उल्लंघन ठरते.
भाषा कोणतीही असो,
जर ती व्यवहारभाषा, वाड्.मयभाषा आणि
ज्ञानभाषा होत असेल तर ती प्रमाणभाषेचा दर्जा प्राप्त करू शकते. बोलीभाषांचे
संवर्धन करणे आज
आवश्यक झाले आहे. भाषा हे संस्कृतीचे
माध्यम आणि वाहन
सुध्दा असते. आपण सर्वच बोलीभाषांबाबत जागृत असू तर भारतीय
बोलीभाषांचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल आहे.
पण त्यासाठी अहिराणी वा ती ती भाषा बोलणार्या
लोकांनी आपला न्यूनगंड झटकून आपली बोलीभाषा बोलत- लिहित राहणे नितांत गरजेचे आहे.
(सदर लेख दिनांक 12-12-2015 च्या महाराष्ट्र
टाइम्स (नाशिक विभाग) मध्ये प्रकाशित झाला आहे. लेखातील मजकुराचा इतरत्र वापर
करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)
– डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
Sir, your efforts for our mother tongue Ahirani is most appreciable... Thanks a
उत्तर द्याहटवा