शनिवार, १ ऑगस्ट, २०२६

‘पाय नसलेली माणसं’बद्दल...

 

 


 - डॉ. सुधीर रा. देवरे

                     पाय नसलेली माणसं हा माझा पाचवा कवितासंग्रह शब्दालय प्रकाशनाने १७ मार्च २०२६ ला प्रकाशित केला, त्याबद्दल...

                     आदिम तालनं संगीत हा अहिराणी तर डंख व्यालेलं अवकाश’, फुटूच लागतात पंख’, भंग अभंग आणि आताचा पाय नसलेली माणसं (मराठी) हा पाचवा कवितासंग्रह प्रकाशित. (संथ थंड संगाशी संगबद्दल १ सप्टेंबरला लिहितो). कवितांच्या कमकुवत पायांत कलाविष्काराचे पाऊलठस्से असतील तर ते स्वबळाने आधार घेत उद्याही अडखळत का होईना सावकाश चालत राहतील, अन्यथा निसर्गाच्या नियमाप्रमाणे थकून अवकाश मिळताच जमिनीवर दुबळी हाडं टाकून देतील, या स्थितीचं भान पायांना उपजतच आहे.

                    कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेत चं. प्र. देशपांडे म्हणतात, डॉ. सुधीर देवरेंसह काही कवी वर्षानुवर्षांची जुनी असणारी वैचारिक- भावनिककोंडी फोडत आहेत. उपयुक्तता’ (सामाजिक, राजकीय वा व्यक्तिगत) हे साध्य ओलांडून कविता आता मानवीहोण्याचे धाडस करू लागलेली आहे. मानवीम्हणजे विशिष्ट व्यक्ती वा समूह यांच्यापुरत्या मर्यादित नसणाऱ्या कविता. सर्वच मानवांना व्यापणाऱ्या, समावेशक कविता. सार्वत्रिक समावेशक समस्या, प्रश्न यांना सामोऱ्या जाणाऱ्या, भिडणाऱ्या कविता. डॉ. देवरे यांच्या या कविता त्यामुळे व्यापक आशयाच्या झालेल्या आहेत. अनुभवाची स्थितिशीलता सोडून प्रवाही प्रक्रियांच्या कविता झालेल्या आहेत. स्थितिशील बौध्दीक साच्यांना इथे महत्व नाही. मराठीत अजूनही जोमात आणि रूढ असणाऱ्या स्वच्छंदी (रोमँटिक) मार्गाने जाणारी ही कविता नाही. स्वप्नीलपणा, भावनिकता, अलंकरण, पुन:प्रत्ययही इथे नाही. ही अधिक सर्जक व परिपक्व कविता आहे. या कवितांच्या अभिव्यक्तीची भाषा केवळ निसर्ग- घटितांतील प्रतिमांना प्राधान्य देणारी नसून एकूणच सृष्टीतील जगण्याला खुला वाव देणारी आहे. या व अशा कारणांमुळे, मराठीत या कवितांना वेगळी मूल्यात्मकता राहील. (संक्षिप्त).

                    डॉ. मीनाक्षी पाटील म्हणतात, या कवितेतून आशय आणि अभिव्यक्तीच्या अंगानं एक कलात्मक खेळ खूप सहजतेनं खेळलेला दिसतो... आजच्या अस्वस्थ करणाऱ्या भवतालाविषयी फारच थोडे साहित्यिक आज थेट भूमिका घेतांना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर देवरे सर मात्र केवळ आपल्या कवितेतूनच नव्हे तर त्यांच्या सर्वच लेखनातून जीवन वास्तवाला थेट भिडण्याचा प्रयत्न करतांना दिसतात, आणि विशेष म्हणजे इतकं टोकदार मांडतांनाही त्यांच्या लेखनात कोणताही अभिनिवेश व्यक्त होतांना दिसत नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे त्यांची चिंतनशीलता! जीवनानुभवांकडं साक्षीभावानं पाहत असल्यामुळं त्यांच्या कवितेतून एक गंभीर चिंतन अत्यंत सहजतेनं व्यक्त होतांना दिसतं. 'पाय नसलेली माणसं' या त्यांच्या नव्या काव्यसंग्रहात अनुभवांची अर्थपूर्णता आणि वेगळेपणा व्यक्त करणाऱ्या कवितांमधून एक आगळी प्रयोगात्मकता खूप सहजतेनं आली आहे... सत्याचं दर्शन झाल्यावरही त्या वेदनेला कुरवाळत न बसता, 'वाऱ्यावर स्वार होत मरेपर्यन्त जगत रहायचं आपण' अशी विजिगीषू वृत्ती दिसून येते. या संपूर्ण संग्रहात 'पाय' ही प्रतिमा खूपच वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे आली आहे. माणसाचे 'दोन पाय' ते 'जगण्याचा पाया' या दोन बिंदूंतील तात्त्विक अधिष्ठानाला स्पर्श करणारी ही कविता वाचतांना वाचकाची एक वेगळीच सर्जनशील दमछाक होईल याची मला खात्री वाटते... जगण्याच्या वेगवेगळ्या छटा व्यक्त करतांनाही 'माणूस' होता आलं, की झालं आयुष्याचं सार्थक!' असं म्हणणारी ही कविता अगदी कमीतकमी शब्दांत जगण्याचं पसायदानच मागते! कारण आपल्या असण्या- नसण्यापेक्षाही 'माणूसपण' टिकणं महत्त्वाचं मानणारा हा कवी आहे. माणूसपणाला कुरतडणारं भौतिक वास्तव हे कवितागत निवेदकाला शारीर, मानसिक, आत्मिक अशा सर्व पातळ्यांवर अस्वस्थ करीत असतांनाही ऋतू पाहता येणं, संगीत ऐकता येणं, कविता वाचता- भोगता येणं आणि काळजातून बोलत वैश्विक प्रेम करता येणं, ही फार मोठी प्रतीती आहे असं ही कविता सांगते. या मौलिकतेमुळंच ही कविता आगळी वेगळी, अस्सल अनुभूतीची आणि आशयसंपन्न आहे. (संक्षिप्त).

                    या संग्रहाच्या पाठराखण- ब्लर्बवर कवी लोकनाथ यशवंत म्हणतात, सृष्टी ज्या वैश्विक पायांवर तगून उभी आहे, अशा पायांवर अर्थगर्भ भाष्य म्हणजे समृध्द कल्पनाविश्वातली ही समग्र कलात्मक कविता!... पाय नसलेली माणसं या संग्रहातील बहुतांश कवितांमध्ये पाय ही बहुअर्थी प्रतिमा, कुठं प्रतीक, तर कुठं रूपक होऊन येते. (कुठं जसाच्या तसा वास्तव मानवी- जैवीक अवयवही). आपल्यातल्या विविध व वेगळ्या परिप्रेक्षातल्या भौतिकी आणि अतिभौतिकी, अधू आणि तंदुरूस्त पायांवर ह्या कवितांत आदिम वेदनेचं मूल्यगर्भ चिंतन असून मुक्‍त काव्य, छंद, गूढ, अभंग, आशयघन, कलात्मकतेपासून ते अतिशय सहज सोप्या सरळ बोलीतल्या ओघवत्या शैलीतील चिंतनात्मक रचनेपर्यंतच्या संवेदनशील कविता ह्या संग्रहात वाचायला मिळतात. पाय नसूनही उंच भराऱ्या घेणारे लोक आणि सृष्टीतल्या अनेकार्थी पायांचं चित्रण ह्या प्रायोगिक नवकवितेत सतत होत राहतं.

                    या संग्रहातील ३ कविता (निवडून नव्हे) मुद्दाम रसिकांसाठी देत आहे :

 रोज नदीत जाणारी लाकडं विसरून...

 

बिळ दिसेल तिथं साप घुसेल

माहीत असुनही तुम्ही जिथं तिथं

पोखरत बसता घुशींसारखं रोज... 

हात पाय बिळाजवळ जाताच

सापाला घाबरुन पळता मागं...

तरीही उकरण्याच्या पश्चात्तापाशिवाय

मेलेल्या बैलाचं शिंगडं जाळत

स्वतःच घेत राहतात उग्र वास...

साप दूर निघून गेल्याच्या समजुतीत

आजूबाजूला नरम माती दिसताच

पोखरू लागता उंदरांसारखं पुन्हा

रोज नदीत जाणारी लाकडं विसरून...

***

 

कडेलोटाची शक्यता!

 

...निचटत्या पिरोटवर

उभे असलेले लोक

अजून तरी

शेवाळल्या सरगोंडीतच

जीव रोवून तग धरून

थरथरत्या पायांनी

निसटाळा तोल सांभाळत,

कोरा कागद निळी शाई

अजून कोणाला भिती नाही

दगड की माती?’

असं सारखं विचारलं जातंय

अंगात आरी खोचत

धक्का मारण्याआधी...

जिवंत रहायचं असेल

तर दगड वा मातीतून

निवडावंच लागेल एक

अन्यथा केव्हाही आरी ढोसून

चारी मुंड्या चित

कडेलोटाची शक्यता!

*** 

 

शत्रूच नाही कोणी

 

काहीही ऐकून

विचार करायचा नाही

काहीही पाहून

मत बनवायचं नाही

भोवतालच्या अंधारात

पणती लावायची नाही...

 

आपापल्या घरात

उबदार वातावरणात

रस्त्यानंही स्मित करत

मस्त चालायचं डौलात...

 

स्मशानातल्या निरोपाला

प्रेताभोवती गर्दी 

तशी आपल्याही हयातीत...

मृत्यू पावलेल्या व्यक्तीबद्दल

भाषणात

कोणी वांगलं बोलत नाही

म्हणून तसं पडून रहायचं,

भक्ती पंथेच‍ी सज्जन लोकांत

आपल्याला शत्रूच नाही कोणी

ही आयुष्यभर सोयीनं

आणि गर्वानं सांगायची गोष्ट...

***

                    (अप्रकाशित लेख. इतरत्र प्रकाशित करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती. पाय नसलेली माणसं कवितासंग्रहाच्या मागणीसाठी- शब्दालय प्रकाशन, मोबाईल : 9822525444)

© डॉ. सुधीर राजाराम देवरे

ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा