शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०१५

My Blogs ग्रुपला एक वर्ष पूर्ण





- डॉ. सुधीर रा. देवरे

     आपला ब्लॉग व्हॉटस् अॅप वर पाठवत चला म्हणजे आम्हाला वाचता येईल अशी विनंती काही मित्रांनी केल्यामुळे 1 नोव्हेंबर 2014 ला व्हॉटस् अॅप वर My Blogs नावाचा ग्रुप तयार करण्यात आला. त्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. एप्रिल 2012 पासून मी सातत्याने ब्लॉग लिहितोय. सुरूवातीचे दोन वर्ष प्रत्येक आठवड्याला एक, नंतर पंधरा दिवसातून एक असे ब्लॉगवर लेख देतोय. कोणत्याही कारणाने अजून तरी ठरलेल्या दिवशी लेख देण्यात खंड पडला नाही. प्रत्येक महिण्याच्या एक आणि पंधरा तारखेला माझ्या ब्लॉग साईटसह फेसबुकवरही तोच लेख देत असतो.
      ग्रुपसाठी आधी 50 सभासद संख्या मर्यादित असल्याने निवडक मित्रांनाच My Blogs  व्हॉटस् अॅप ग्रुप वर घेता आले. आता ही सभासद संख्या वाढता वाढता शंभर झाली आहे. व्हॉटस् अॅप ग्रुपची मर्यादा आज तरी शंभर सभासदांचीच असल्याने आपल्याला या संखेवर थांबावे लागले. ब्लॉग टाकल्यानंतर दरम्यानच्या पंधरा दिवसाच्या काळात ब्लॉगवर टिपण्यांच्या स्वरूपात चर्चा करता येते. ही चर्चा लेखकावर न होता लेखाच्या विषयावर व्हावी अशी अपेक्षा असते आणि लेखावर प्रतिकूल प्रतिक्रियांचेही स्वागत होते. काही प्रतिक्रिया भाबड्या असल्या तरी त्या चर्चेत सामावल्या जातात. ग्रुपवर अनावश्यक मजकूर येत राहिला की सतत वाजत राहणार्‍या आणि आपल्या कामात व्यत्यय आणणार्‍या अलार्ममुळे अनेक मित्र कंटाळून ग्रुप सोडून जातात. म्हणून योग्य तीच चर्चा ग्रुपवर करावी अशी मी ग्रुपवरील मित्रांना कायम विनंती करत असतो. सर्व मित्रांच्या सहकार्याने असा आगळा वेगळा ग्रुप व्हॉटस् अॅप वर एका वर्षापासून सुरळीत सुरू आहे.  
      या ग्रुपवर तब्बल पंधरा दिवस एकाच विषयावर चर्चा होते. सकाळची पोष्ट संध्याकाळी जुनी होण्याच्या आजच्या गतिमान मोबाईल जमाण्यात एकाच विषयावर पंधरा दिवस चर्चा करणे ही गोष्ट काहींच्या दृष्टीने रटाळ आणि कंटाळवाणी असली तरी उठसुठ कोणतीही जुनी पोष्ट नवीन समजून फॉरवर्ड करत राहणे हे अनेक लोकांच्या दृष्टीने डोकेदुखी असते आणि नाइलाजाने त्यांना ग्रुप नकोनकोसा होतो. एकाच विषयावर बोलायचे बंधन असल्याने अनावश्यक पोष्ट ग्रुपवर येण्याचे थांबते. म्हणून अधून मधून ग्रुपवर शांतता असते. अशी शांतताही कामात व्यग्र असलेल्या माणसाला आवश्यक असते. दिलेल्या ब्लॉगच्या विषयावर पंधरा दिवस चर्चा झाली तर ती चर्चा प्रासंगिक न ठरता तिला संग्राह्य मूल्य प्राप्त होते. एकाच विषयावर महत्वाचा दस्ताऐवज तयार होतो. युज अँड थ्रो च्या जमाण्यात साहित्य आणि विचार सुध्दा वाचा नि डिलेट करा या गटात जाऊन बसू नयेत म्हणून हा प्रयत्न आहे. गटातील सभासद दिलेल्या विषयावर विचार करत त्यावर टिपण्या तयार करतात. या मंथनातून एकेका विषयाचे नवनीत बाहेर यावे ही अपेक्षा आहे. या ग्रुपवर साहित्यिक, कलावंत, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, संपादक, पत्रकार, जागरूक नागरिक आणि काही रसिक मित्र व विद्यार्थी आहेत. ग्रुपवर येण्यासाठी अनेक मित्र इच्छुक असून त्यांनाही टप्प्याटप्प्याने ग्रुपवर घेण्यात येईल.
      या ग्रुपवर संपूर्ण महाराष्ट्रातील मित्र तर आहेतच पण महाराष्ट्राबाहेरील काही मित्रही आहेत. ब्लॉगचे लिखाण आणि चर्चा मराठी भाषेत होत असल्याने हा ग्रुप देश पातळीवर नेता येत नाही. (मात्र जिथे जिथे मराठी माणूस आहे अशा ठिकाणी म्हणजे देशभरात आणि परदेशातही ब्लॉगवरील लेखन वाचले जाते.) आतापर्यंत सुमारे एकशे पन्नास ब्लॉग प्रकाशित झाले असून त्यांत विषयांची विविधता जाणून बुजून नाही तर आपोआप आली आहे. नवीन लिहिलेल्या लेखांसोबत माझ्या प्रकाशित पुस्तकांतील निवडक मुद्दे आणि विविध नियतकालिकांत प्रकाशित झालेले निवडक लेखही निमित्ताने ब्लॉग स्वरूपात देत असतो. स्थलकालाची मर्यादा आणि दैनंदिन व्यस्ततेमुळे अनेक वाचकांना वाचनाची इच्छा असूनही प्रत्येक पुस्तकापर्यंत वा नियतकालिकांपर्यंत पोचता येत नाही ही विदारक वस्तुस्थिती आहे. म्हणून माझ्या प्रकाशित पुस्तकातील प्रकरणे ब्लॉगमधून दिल्याने अनेक वाचकांची सोय झाल्याचे त्यांनी आवर्जून कळवले आहे. अनेक वाचक ब्लॉग वाचून मूळ पुस्तकापर्यंतही पोचलेत.
      My Blogs  नावाचा व्हॉटस् अॅप ग्रुप हा एक प्रयोगिक प्रयत्न आहे. व्हॉटस् अॅपचा वापर विविध बातम्या, निरोप, निमंत्रणे, फोटो, विनोद, थट्टा मस्करी, गप्पा, शुभेच्‍छा, सुविचार, छोटे चटपटीत मजकूर, कॉपी- पेष्ट फॉरवर्ड आदी कारणांसाठी सर्वत्र होत आहे. व्हॉटस् अॅप चा वापर आपण ब्लॉग सारख्या सामाजिक- वैचारिक- सांस्कृतिक गोष्टीसाठीही करून पहावा असे वाटले. आणि प्रत्येकाला स्वतंत्ररित्या ब्लॉगवरील लेख पा‍ठविण्याऐवजी एक गट तयार करून पंधरा दिवस ब्लॉगवरील एकाच विषयावर चर्चा घडवून आणली तर ती कदाचित यशश्वी होऊ शकेल, अशी आशा वाटली. असा हा प्रयत्न सफल होण्याच्या मार्गावर आहे. गटावरील लांबलचक लेख खास वेळ काढून वाचक वाचतात आणि हा प्रयोग एक वर्षभर चालला याचा विशेष आनंद होत आहे. या यशश्वीतेचे श्रेय ग्रुप मधील प्रत्येक सभासदाला द्यावे लागेल. प्रत्येक सभासदाचे हे यश आहे. ब्लॉगच्या लेखांवरील आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया (प्रतिकूल प्रतिक्रिया सुध्दा) वाचून मला खूप आनंद मिळतो. हा आनंद आपण सर्व मिळून यापुढेही घेत रहायचा का? माझ्या ब्लॉगवरील लेखांचे जवळजवळ तीन हजार वाचक आहेत पण व्हॉटस् अॅप ग्रुपच्या शंभर सभासदांच्या प्रतिक्रिया मला प्रातिनिधीक स्वरूपाच्या वाटतात. या ब्लॉग्सवरील लेखांमधून आपल्याला काही नवीन माहिती वा नवीन ज्ञान मिळते का? प्रबोधन होते का? वा तसे होत नसेल तर किमान सांस्कृतिक- सामाजिक उजळणी तरी होते का? अशा प्रश्नांचे मंथन करत आपण या पंधरा दिवसात आपली मते मांडण्याचा प्रयत्न केला तर...
 
-          डॉ. सुधीर रा. देवरे
          इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा