- डॉ. सुधीर रा. देवरे
आजची सर्व शहरं काही काळांपूर्वी खेडीच होती. काही काळ म्हणजे ‘खूप खूप
वर्षांपूर्वी’ इतका मोठा काळ नाही. आजच्या दोन तीन पिढ्या आधीही आजची मोठी
शहरं ही खेडीच म्हणता येतील अशी होती. फार तर या शहरांना मोठी खेडी असं आज
म्हणता येईल. आजूबाजूची अनेक खेडी पोटात घेऊन आजची ही मोठी झालेली- वाढलेली
शहरं आहेत. आजसुध्दा नाशिक- पुण्यासारख्या शहराला प्रचंड मोठं खेडं
असं म्हणता येईल, अशी परिस्थिती आहे.
पुणे– मुंबई सारखी आजची शहरं ही दोन- तीन पिढ्यांपासून खेड्यांतून
येऊन स्थायिक झालेल्या लोकसंख्येची साक्षीदार आहेत. म्हणून आज पन्नास-
साठीच्या पुढे असलेल्या या शहरातील माणसांची मानसिकता गावाकडच्या माणसाच्या
मानसिकतेशी तादात्म्य पावणारी अशी मिळती जुळती आहे. अशा सर्वसाधारण
व्यक्तींव्यतिरिक्त, शहरातील साहित्यिक असणारी व्यक्ती ग्रामीण
जीवनाच्या जीवन जाणिवा अधिक समजूतदारपणे जगत असणारी व्यक्ती असते.
शहरात
राहणारी नवीन पिढीसुध्दा लहानपणापासून आपल्या वडीलधाऱ्यांकडून आपली
गावमहात्म्ये ऐकून मोठी झालेली असते, म्हणून नव्या पिढीतील तरूणांचाही
गावाकडे पाहण्याचा दृष्टीकोन प्रेमळ आणि उदार ओढीचा असतो. अशा
पार्श्वभूमीवर लोकजीवन म्हणजे केवळ ग्रामजीवन असा जो आपण समज करून घेतलेला
असतो, त्याच्या कक्षा आपल्याला अजून विस्तृत कराव्या लागतील.
मला
‘लोक आणि अभिजात’ ही संकल्पना डॉ. अरूणा ढेरे यांनी उपयोजित केलेल्या
संकल्पनेहून खूप जास्त भावली. लोक म्हणजे केवळ लोकवाड्.मय वा लोकसंस्कृती
नव्हे. कलाकृतीतली अभिजातता ही लोकजीवनाच्या प्रतिबिंबातून अधिक लखलखीतपणे
उठून दिसते. कोणत्याही अभिजात कलाकृतीत लोकजीवनाच्या जीवन जाणिवा सखोलपणे
प्रतिबिंबीत झालेल्या असतात. मी जेव्हा लोकजीवन ही संज्ञा वापरतो, ती केवळ
ग्रामीण- लोकजीवन या अर्थाने इथं अजिबात वापरत नाही.
लोकजीवन ही संज्ञा त्या त्या स्थळीय परंतु समग्र परीवेशात राहणाऱ्या लोक
समुहाबद्दल वापरत असतो; मग हा लोकसमूह महानगरीय जीवन जाणिवांच्या
लोकजीवनाचा का भाग असेना. उदाहरणार्थ, मुंबईतल्या एखाद्या झोपडपट्टीतल्या
कलावंताचा कलाविष्कार हा त्याच्या परीवेशातल्या लोकजीवनाला अनुसरणाराच
असेल; मुंबईतल्या मध्यमवर्गीय फ्लॅट संस्कृतीत वाढलेल्या साहित्यिकाचा
साहित्य पसारा त्याच्या विशिष्ट जीवन जाणिवा आविष्कृत करणारा असेल; तर तीच
फुटपट्टी श्रीमंत वा अतिश्रीमंत कलाकाराच्या कलाकृतीतून दिसेल. गावातलं असो
की महानगरीय लोकजीवन असो, सर्वदूर हे लोकजीवन दोन्ही पात्रे भरून ओतप्रोत
वाहताना दिसतं.
कलावंत
मग तो कोणत्याही क्षेत्रातला असो, इथं साहित्यिक या अर्थानं विचार केला तर
तो ज्या परिवेशात जन्म घेतो, ज्या लोकमानसात- लोकजीवनात- लोकसंस्कृतीत
वाढतो. तिथली माती म्हणजेच समज, परंपरा, जीवन घेऊन आपले भावन (भावना नव्हे)
आविष्कृत करत राहतो. मग हे भावन उपयोजित झालेली कलाकृती कोणत्याही
स्वरूपाची असो. कोणत्याही चौकटीत बसणारी असो. अभिजात कलाकृतीत तत्कालीन
लोकजीवन उपयोजित झालेलं असतंच. थोडक्यात, कलावंत ज्या परीवेशात बालपण
व्यतीत करतो- आणि आजही वास्तव्य करतो तिथल्या जीवन जाणिवा त्याच्या अभिजात
कलाकृतीत समूळ दृगोचर होत असतात, हे सत्य जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात
अधोरेखित होईल.
‘लोक
आणि अभिजात’ या ग्रंथात डॉ. अरूणा ढेरे यांच्याकडून लोकवाड.मय, लोकगीत,
लोकसमज, लोकसंस्कृती, लोकश्रद्धा यांचा अभिजात कलेशी संबंध जोडून पाहण्याचा
प्रयत्न झाला असून अशा तुलनेचं स्वागत करावं लागेल. लोकजीवनाचे विविध पदर
यात तपासून पाहण्यात आले, आणि त्यावरचं त्यांचं अर्थगर्भ भाष्य, वाचकाला
नवा दृष्टीकोन देणारं ठरतं. कलाजीवनात लोकसंस्कृतीचे धागे कसे एकमेकांमध्ये
गुंतलेले असतात हे या विवेचनातून स्पष्ट होतं.
‘आपण
वाचणाऱ्या जातीचे बहुतेक लोक अभिजात किंवा शिष्ट साहित्याच्या संस्कारात
मोठे होतो.’ (प्रास्ताविक पृ. सहा) लेखिकेच्या या वाक्याशी मी पूर्णत: सहमत
नाही. या पुस्तकातील लोकजीवनासंदर्भात केलेलं विवेचन वाचून स्वत: लेखिकाही
या वाक्याशी सहमत नसाव्यात, असंच लक्षात येईल. कारण वाचणाऱ्या जातीचे आपले
लोक लहानपणापासून सांगितल्या जाणाऱ्या कहाण्या, आजूबाजूला लोकसंस्कृतीत
प्रत्यक्ष घडणाऱ्या असंख्य विधी- घटना पहात मोठे होतात. लोकसंस्कार रूजवत
नंतर आपल्याला वाचनाचा नाद लागतो. वाचनाचा नाद लागलेले लोक हे आधी मौखिक वा
श्रवण परंपरेतूनच वाचनाकडे वळलेले असतात. म्हणून आपण फक्त अभिजात वा
शिष्ट साहित्याच्या संस्कारात मोठे होतो असं म्हणता येणार नाही.
‘प्रमाण
भाषा आणि बोली भाषा यांच्या संबंधात लागू होणारी भाषावैज्ञानिक सत्य लोक
आणि अभिजात यांच्या संदर्भातील सामाजिक सत्याशी नातं सांगणारी आहेत.
बोलीकडून प्रमाण भाषेला जे मिळतं, ते जिवंतपण, लवचिकपण लोकपरंपराही अभिजात
परंपरेला देत असते आणि लोकपरंपरेतील कित्येक घटकांचं उन्नयन अभिजात
परंपरेकडून होत असतं.’ (प्रास्ताविक पृ. सात) हे महत्वाचं अवतरण
प्रास्ताविकात आलं आहे. हे अवतरण इतकं दृढ आहे की यावर अजून काही वेगळं
भाष्य करता येणार नाही.
पृथ्वीच्या लग्नाच्या लोकगीतापासून प्रेरणा घेत ‘फुलराणी’ सारखं अभिजात
काव्य बालकवींनी निर्माण केलं असावं, या कल्पनेचा लेखिकेचा अवकाश शोध
कोणालाही सहज भावेल असाच म्हणावा लागेल. ‘वशीकरणरहस्य’ नावाच्या
पुस्तकाच्या निमित्तानंसुध्दा लोकधारणेतून अभिजात विचार कसे उदृत होतात
याचं विवेचन महत्वाचं ठरतं. काळी जादू, मंत्र, तंत्र, जादूटोणा म्हणजे यातु
विद्या हासुध्दा परंपरेनं चालत आलेला लोक आविष्कारच आहे असं मला वाटतं.
आजही दुर्गम आदिवासी जीवनातील विविध विधींच्या वेळी म्हटल्या जाणाऱ्या
मंत्रांचं दस्ताऐवजीकरण करणं हे मोठं आव्हानात्मक काम होऊन बसलं आहे. केवळ
अंधश्रध्दा दिसते म्हणून याकडं दुर्लक्ष करून चालणार नाही. ही लोकविद्या,
लोकश्रध्दा म्हणून तिचा अभ्यास करणं अगत्याचं ठरतं.
लोकपरंपरेत
रूढ असलेली रामायण कथा ही खरी रामकथा आहे. लोकश्र्दध्देतली कथा अभिजात
काव्यात गुंफली गेली, हे त्यानंतरचं रामायण आहे. म्हणून लोकपरंपरेतल्या
मौखिक रामायणातूनच खरा हाडामांसाचा- विकारांचा राम भेटतो. लोकांच्या
पारंपरिक राम कथेत सीता ही वनवासी आणि अन्याय सहन करणारी भूमीकन्या- भुईची
लेक म्हणजे इथली आदिवासी कन्या आहे. म्हणूनच ती मानवी आणि थोर स्त्री ठरते.
लोकगीतात
आलेला लक्ष्मण हा रामायण काव्यातल्या लक्ष्मणापेक्षा अधिक खराखुरा माणूस
वाटतो. काव्यातला आदर्श राम आणि आदर्श लक्ष्मण लोकगीतांत मात्र प्रकर्षाने
आढळून येत नाहीत. हे दोन्हीही भाऊ लोकगीतात देव नाहीत, हाडामांसाचे माणूस
आहेत. सीता मात्र अशा मौखिक गीतात माणूस असूनही आदर्श आणि अन्यायग्रस्त
सोशीक स्त्री म्हणून प्रतिबिंबीत झालेली दिसते. हे इथल्या लोकगीतांनी
परंपरेच्या मौखिक स्त्रोतांतून आधीच सांगून ठेवलं आहे. म्हणून रामायण हे
अभिजात महाकाव्य आर्ष असलं तरी, मूळ अतिआर्ष लोककथेला आपल्याला हवं तसं
पुरूष प्रधान वळण देऊन सजवलेलं प्रक्षेप महाकाव्य ठरतं. म्हणूनच मूळ सोशीक
सीता सोडली तर रामाचं आणि लक्ष्मणाचंही दैवती उदात्तीकरण पारंपरिक
लोकगीतांमध्ये दिसून येत नाही, हे लक्षणीय आहे.
गोरक्षनाथाचा
जन्म हा प्रत्येकाला माहीत असणारा असा नवनाथांच्या पोथीतून आलेला भाग. ही
पोथी लोकतत्व आधारावर आहे हे नक्की. उकीरडा खोदून त्यातून उकरून काढलेला
म्हणून त्याचं नाव गोरक्षनाथ. गो-रक्षेतून जो तयार झाला तो गोरक्षनाथ.
(लोकपरंपरेत अशीच नावं ठेवण्याची रीत आहे. उदा. दगडासारखा तो दगडू, काळ्या
रंगाचा तो काळू, लहान आकाराचा तो उलश्या, सुपात ठेवलेला तो सुपड्या,
सोमवारी जन्म झाला म्हणून सोम्या आदी.) बैरागी, साधू, गोसावी, योगी आदींचं
लोकांना पूर्वापार आकर्षण असलं तरी लोक अशांपासून कायम दोन हात दूर रहात
आले आहेत. त्यांच्याकडे काळी विद्या वा संमोहीत करण्याची शक्ती असते असं
लोकमानस मानतं. आणि या लोकोक्तीचा उपयोग करत अशा कल्पना अभिजात ग्रंथातून
उपयोजित झालेल्या पहायला मिळतात. सीतेला रावणानं बैरागी वेश धारण करून
पळवून नेलं होतं. अर्जुनानं संन्यासाचं रूप घेऊन सुभद्राहरण केलं. अशा अनेक
लोकोक्तींमुळं मच्छिंद्रनाथांकडे पाहण्याची तत्कालीन ग्रामीण महिलेची
दृष्टी साहजिकच शंका घेणारी ठरली आणि त्यांनी दिलेली रक्षा महिलेनं
उकीरड्यात फेकून दिली.
नवनाथाची पोथी आमच्या
घरात माझ्या लहानपणी श्रावण महिण्यात घरात लावली जायची. ‘लावली जाणे’
म्हणजे रोज रात्री नवनाथ पोथीचा एकेक अध्याय वाचून घरातल्या ओसरीत जमलेल्या
लोकांना त्या त्या अध्यायाची गोष्ट सांगणे. वडील प्रत्येक श्रावण
महिण्यात घरात ही पोथी लावत. पोथी वाचण्यासाठी एका ब्राह्मणाला बोलवलं
जायचं. पोथी लावली असताना गावातले अनेक लोक (म्हणजे बायाही) पोथी ऐकायला
यायचे. यावेळी पिंगलाची अध्यायकथा सुरू असताना ‘हाय पिंगला’ म्हणून
भर्तृहरी राजा जो शोक व्यक्त करतो, ती गोष्ट लोक कान देऊन ऐकत, स्वत:
शोकमग्न होत. ही लहानपणीची आठवण या लेखानं जागी झाली.
पारधी परंपरेतली प्रथा पाहून आपल्या प्रेमिकेची परीक्षा घेणं भर्तृहरी
राजाला चांगलंच महागात पडलं. नाथांमुळं प्रेमिका पुन्हा मिळाली खरी पण
राजानं शेवटी नाथपंथ स्वीकारला. अशी लोक आणि अभिजात यांची सरमिसळ कायम होत
आली आहे. लोकपरंपरेतून उचलून आपल्या प्रतिभेने वेगळाच झळाळ मूळ कथेला
देण्याचं काम इथल्या काही प्रतिभावंतांनी केलं आहे; तर दुसरीकडे अशा
लोककथांना धर्म- पंथांचा मुलामा चढवून त्यांना प्रचारार्थही राबवलं
गेल्याचं दिसून येतं.
(अपूर्ण. ‘साहित्य : जाणिवा, मीमांसा आणि समीक्षा’ या ग्रंथातल्या दीर्घ
लेखाचा पहिला भाग. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ
द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर राजाराम देवरे
ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot. com/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा