- डॉ. सुधीर रा. देवरे
(१ सप्टेंबरच्या लेखाचा पुढील भाग...)
‘कित्येक वेळा या संबंधांचे अर्थ लोकपरंपरेपेक्षा अभिजात परंपरेने वेगळ्या पातळीवर लावले आहेत. त्यांना दिव्यत्वाचा, उदात्ततेचा स्पर्श घडवला आहे. साध्या साध्या लौकीक घटनांना तिथे प्रतिकात्मकता लाभली आहे आणि सर्वसामान्य वस्तुस्थिती ही मूल्यनिष्ठांमध्ये आणि जीवनश्रद्धांमध्ये परिवर्तित झाली आहे.’ (पृ. २७) असं असलं तरी वरवरचे शेंदूर- मुलाम्याचे पापुद्रे काढून, खरडून खरी मुर्ती पहायची झाली तर अभिजाततेकडून लोकपरंपरेकडे असं उलटं जाणं भाग आहे. लोकपरंपरेत वस्तुनिष्ठ आविष्कार आहेत तर अभिजाततेच प्रतिभा- म्हणजे काल्पनिकता.
लोकसंस्कृतीत केवळ स्त्री रूपी गंगा नदीच नव्हे, तर सगळेच देव-देवता माणसासारखं वावरतात. माणसांसारखंच त्यांना काम- क्रोधांनी वेढलेलं आहे. कामाने घायाळ झालेले अनेक देव जनमानसात वास्तव्य करतात. देव माणसाळतात, माणसांसारखं रागावतात, संतापतात, कोपतात, भांडतात आणि प्रेमही करतात. असे संतापाने क्रोधीत झालेले देव रागातून शाप देतात आणि त्यांची मनधरणी केली तर त्यांच्याकडे उ:शापही तयार असतात. (जशी रागावलेल्या माणसाची मनधरणी केली की तो पाघळतो.) ही देवरूपं उघड उघड षड्रीपू असलेल्या इथल्या भूप्रदेशातल्या लोकांचीच खरीखुरी रूपं आहेत.
पारंपरिक समाजात हातात बांगड्या भरणाऱ्या कासारणीला किंवा अंगावर गोंदणाऱ्या कैकाडणीला स्त्रियांच्या भावजीवनात थेट प्रवेश मिळतो. केवळ सर्वसाधारण महिलांच्या भावजीवनातच नव्हे तर राजांच्या राण्यांमुळे या फिरस्त्या महिला, क्वचित वैराळ पुरूषही राजमहालात सहज प्रवेश मिळवू शकतात. द. ग. गोडसे यांच्या ‘लोकधाटी’ ग्रथांमधील ‘कौसाळाचा चुडा’ ही खानदेशी लोकगीतातील वैराळाची कथा इथं अरूणा ढेरे यांनी पुन्हा उपयोजित केली आहे. श्रीकृष्णाने वैराळाचं (कासाराचं) रूप घेऊन कंसाचा कसा सूड घेतला, असं सुरेख नाट्यचित्रण या लोकगीतात आलं आहे. गोडश्यांचं या काव्यावरील विश्लेषण वाचताना आपण एखाद्या कवितेची आस्वादात्मक समीक्षा वाचत असल्याचं जाणवत राहतं. डॉ. अरूणा ढेरे यांनी या लोकगीताच्या निमित्ताने ग्रामीण स्त्री आपल्या शरीरावर गोंदून घेण्यासाठी अथवा हातात बांगड्या भरण्यासाठी कैकाडणींची वा वैराळाची कशी वाट पहात असतात, यावर अनायासे भाष्य केलं आहे. लोकप्रतिभेतील स्त्री धिटाई यातून दिसून येते, जी उत्तरोत्तर अभिजाततेत मात्र लज्जा धारण करू लागली.
‘सीतेला विवाहमंडपातच नाकारून दुसरं लग्न करायला निघालेला हा (लोकगीतातला) राजा राम आपल्या बालपणीच्या गोष्टीतल्या राजाहून फारसा वेगळा नक्कीच नाही.’ (पृ. ६२). लोककथा नेहमी खऱ्या बोलत असतात. त्यांच्यातलं कथानक इतिहास नसला तरी त्या आपल्या प्रवृत्तीशी वस्तुनिष्ठ असतात. जनमानस ऐतिहासिक व्यक्तींवर जाणूनबुजून आदर्श पुटं चढवत नाही. हाडामांसाची माणसं ती आपल्या समोर मौखिक परंपरेतून साक्षात उभी करतात. लोककथा- लोकपरंपरा या मानवी आहेत. या कथा जेव्हा अभिजात रूप धारण करू लागल्या तेव्हा या कथेतली साधी सुधी माणसं, एकतर आदर्श महामानव अथवा एकदम देव- देवता होऊन बसली.
आपल्या लहानपणी अनेक लोककथा ऐकताना राजाची धाकटी मुलगी आपल्यातील प्रत्येकाला भेटलेली असते. राजा तिन्ही मुलींना विचारतो, ‘तू कोणाच्या नशिबाने जगतेस?’ थोरल्या दोन्ही मुली ‘बापाच्या नशिबाने’ म्हणत असल्या तरी तिसरी मुलगी म्हणते, ‘मी माझ्याच नशिबाने जगते.’ हे ऐकून राजाला नुसता राग येत नाही, तर राजा तिला मुद्दाम अडचणीत आणतो. तरीही ती मुलगी आपल्या बुध्दीने प्रगती करते. शेवटी एक दिवस राजा कंगाल होत स्वत: तिच्याच आश्रयाला येतो. अशा अनेक कथा आपण ऐकलेल्या असतात. ज्या लोकजीवनाचं दर्शन घडवीत असतात.
जन्माला आल्यानंतर आणि बालपणीचे काही संगोपनाचे दिवस वजा जाता, प्रत्येक जीवाला इथं आपला संघर्ष स्वत:लाच करायचा असतो. नात्यांचं, जीवाभावाचं वा प्रेमाचं असं कोणीही आपला जीवन संघर्ष वाटून घेऊ शकत नाही- कोणीही उसना घेऊ शकत नाही. आपलं जीवन आपल्याला जगावं लागतं आणि आपलं मरणही आपल्याला- स्वत:लाच मरावं लागतं. (अपत्याच्या अपंगत्वाच्या वेदना अपत्यालाच भोगाव्या लागतात. आई वडलांची इच्छा असूनही अपत्याचं अपंगत्व ते स्वत:कडे घेऊ शकत नाहीत.) अशा या गोष्टींचा मतितार्थ असतो. तो आपल्याला लोकसाहित्यातून जगण्याचं- संघर्षाचं बळ देत असतो. प्रेरणास्त्रोत होतो.
‘पुरुषजातीला अचूक ओळखून निर्भयपणे सत्व राखणाऱ्या त्या सामान्य स्त्रीची ती लोकपरंपरेतली ओळख (तेलीन आणि राजपुत्र लोककथा) किती ठसठशीत आहे! किती अस्मितासंपन्न आणि प्रेरक आहे!’ (पृ. ९२). खडा टाकून पहाणं आणि एखादी स्त्री गळाला लागते का याची एखाद्या पुरूषानं चाचपून पहात चाहूल घेणं ही लोकवृत्ती लोकपरंपरेने आपल्याला फार वर्षांपासून शिकवून ठेवली आहे. आणि आज जग कितीही सुशिक्षित- सुरक्षित- आधुनिक वाटत असलं तरी एकट्या स्त्रीला असा अनुभव जगात पावलोपावली कोणत्याही प्रवासात, शेतात, निर्जन जागी येत असतो. म्हणून ही तेलीन म्हणजे आपल्या आतल्या आवाजाने- अतंर्नादाने परंपरेतून जागी झालेली स्त्री प्रतिमा आहे.
‘ना राजे हो, येणे कारणे आमुचेया कविकुळा बोलू लागेल. नाही राजे, यामुळं माझ्या कविकुळालाच बट्टा लागेल. असं होणं नाही.’ (पृ. ९६). हा कवी नरेंद्र यांचा सुप्रसिध्द उद्गार! कवी नरेंद्राच्या वागण्यातून- त्याच्या कृतीतून नेहमी कलावंताला संदेश मिळत आला की, बाबा तू विकला जाऊ नकोस, भणंग रहा पण स्वत:च्या पाठीच्या कण्यानं ताठ उभा रहा. कला ही कोणाच्या- राजाच्या- सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधण्याची मूर्त वस्तू नव्हे! वा कलावंत म्हणजे कोणाचा भाट नव्हे! हा विचार लोकपरंपरेसारखाच साहित्य परंपरेतील कवी नरेंद्राच्या रूपाने दूर दिपस्तंभासारखा आजच्या कोणत्याही कलावंताला दिसला पाहिजे. विशेषत: जो कोणी कलावंत- साहित्यिक सत्ताकारणासाठी आपली लेखणी झिजवू पाहत असेल!
‘पार्वतीची अमर प्रियकर मिळवण्याची इच्छा या बाईच्या (गाण्यातल्या) अहेव मरणाच्या इच्छेत मिसळून गेली.’ (पृ. १२३). देवी वा सती होण्याच्या आशेने अनेक स्त्रियांनी आपल्या आशा आकांक्षा जीवंतपणी दफन केल्याचं (वा सती म्हणून जाळून घेतल्याचं) अलीकडच्या थोड्या आधीच्या काळी पावलोपावली आढळून येतं, याचं कारण इथल्या लोकपरंपरेच्या गीतेने (पुरूषी संस्कारांनी) त्यांच्यावर केलेले पुरूषस्वाधीन होण्याचे उत्तरकालीन पेशवाईचे लोकसंस्कार. स्त्री प्रमुख असण्याच्या कुटुंब व्यवस्थेत, मुलांच्या संगोपनात गुंतून ती कधी पुरूषस्वाधीन लोकपरंपरेत विसावली हे तिलाही आपल्या परिवारात अशा कहाण्यांच्या सांगीवांगीत लक्षातच आलं नाही. म्हणून एकेकाळी स्त्री प्रधान असलेली लोकसंस्कृती ‘अहेव मरण मागणारी’ पोथी-पुराणातली पतिव्रता कधी झाली हे तिलाही नीट कळलं नाही.
‘त्यांनी (राजांनी) देवसत्तेशी युद्ध नाही मांडलं, संघर्ष नाही पुकारला. उलट ईश्वरी सत्तेच्या प्रसादाने ही सत्ता मला प्राप्त झाली आहे, असं सतत प्रतिपादन केलं. लोकमनाला राजसत्तेशी बांधून घेण्याचा तो यशस्वी प्रयत्नच होता.’ (पृ. १६६). राजेशाहीच्या सुरूवातीला काही राजांनी देवांनाच आव्हान दिलं असावं की काय. राजा हाच देव, असं ब्रीद मिरवण्याचा क्वचित प्रयत्न झाला असावा का. पण लोकभावनेतल्या देवाला ते कधी हद्दपार करू शकले नाहीत. अशी टोकाची भूमिका घेणारे अनेक राजे आयुष्यातून उठले, बरबाद झाले. लोकक्षोभाला बळी पडले. हळू हळू राजवंशांनी लोकमानस ओळखलं. लोकश्रध्देला कुरवाळलं. धर्ममार्तंडांच्या सोबतीने राजे मागच्या ठेचा आठवून पाताळयंत्री बनत लोकमानसातल्या देवरूपाला उत्सवी करून सत्तास्थानाकडे वळवत राहिले. म्हणजे ‘हे जे सत्तेचे सिंहासन आहे, ते देवाच्या आशीर्वादानंच राजाला मिळालं’, असं लोकांना अप्रत्यक्षपणे सांगत- सवरत त्यांच्या मनावर बिंबवत राजसत्ता पुन्हा देवाचाच अंश, वंश वा अवतार होऊ लागली. यातल्या काही चांगल्या राजवटींनी देवादिकांसारखा पोथीत वर्णनिय काल्पनिक स्वर्ग पृथ्वीवर निर्माण करण्याचा प्रयत्न केला खरा; परंतु काही राक्षसी सत्ताकांक्षी राजांनी आपली सत्ता-सिंहासन टिकून राहण्यासाठी देव धर्माला आपल्या कह्यात आणलं. देवधर्माला आपली खाजगी मालमत्ता बनवलं, बटीक बनवलं. हा फक्त राजेशाहीचा काल्पनिक इतिहास नसून उपोद्बलक पुराव्यांनिशी ही आजच्या लोकशाहीचीही जगभर ढळढळीत वास्तविकता दिसून येईल.
‘रामकथा केवळ वाल्मीकीची थोडीच आहे? त्यानंतर शतकानुशतकं ती इथल्या समाजाची होऊन गेली आहे.’ (पृ. १७३). ह्या अवतरणाचा केवळ एका शब्दामुळे तोल ढासळला. ‘त्यानंतर’ या एका शब्दामुळे हे महत्वाचं अवतरण उणं वाटू लागलं. ‘त्यानंतर’ ऐवजी ‘त्याआधी’ असा हा शब्द हवा. एका शब्दाची या अवतरणात अशी दुरूस्ती झाली तर हे वाक्य ऐतिहासिक ठरेल. वाल्मीकी रामायण हे महाकाव्य लिहिलं जाण्याआधी रामाच्या (सीतेच्याही) अनेक पारंपरिक लोककथा जनमानसात रूढ होत्या. त्या अजूनही आदिवासी लोकमानसात ऐकू येतात. पण या लोकपरंपरांच्या तुलनेने अलीकडील महाकाव्याने (आर्ष असलं तरी) जो आदर्श राजा निर्माण केला तो देवपणात न्हाऊन अभिजात झाला; आणि लोकमानसातल्या मानवी राम प्रतिमेचा, नागरी लोकमानसात सपशेल पराभव झाला. तरीही आदिम आर्ष लोकपरंपरेचा वेध घेता, आदिवासी लोकसंस्कृती अजूनही (सीतेवर संशय घेतला म्हणून) त्याला आदर्श मानत नाही, तर ग्रामीण ओवीतून त्याचा उल्लेख ‘हलक्या मनाचा’ वा ‘हलक्या कानाचा’ असा होतो.
(अपूर्ण. ‘साहित्य : जाणिवा, मीमांसा आणि समीक्षा’ या ग्रंथातल्या दीर्घ लेखाचा दुसरा भाग. इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर राजाराम देवरे
ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा