- डॉ. सुधीर रा. देवरे
प्रस्तावना : मराठीची अहिराणी ही एक बोली आहे. ही बोली नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या ४ जिल्ह्यात प्रामुख्यानं बोलली जाते. जवळ जवळ दोन कोटी लोकांची ही मातृभाषा असून अमूक एका जात- जमातीची ही भाषा नाही. ही लोकभाषा आहे. अहिराणी भाषेचा इतिहास तसा मराठीच्याही आधी असल्याचं शिलालेखांवरून (पाटण) व भाषिक अभ्यासावरून लक्षात येतं. तरीही इसवी सनाच्या तिसर्या शतकापासून अहिराणीचं अस्तित्व ठळकपणे दिसून येतं. या प्रदेशात अभीर नावाच्या लोकांची वस्ती होती. अभिरांचा अपभ्रंश कालांतरानं अहीर झाला. या अहिरांमध्ये सगळ्याच जातींचा समावेश होता. अहीर लोकांची भाषा ती अहिराणी भाषा असा या भाषेचा संक्षिप्त इतिहास सांगता येईल.
या संक्षिप्त इतिहासानंतर अहिराणीतील अंगाईगीताबद्दल... प्रथम मी माझ्या आईकडून प्रत्यक्ष ऐकलेलं अंगाईगीत देतो. आईकडून ऐकल्यावर तेव्हाच म्हणजे डिसेंबर १९८९ मध्ये मी हे गीत लिहून ठेवलं होतं. आता शोधून काढलं :
अंगाई गीत (अहिराणी)
ये वं ये वं गायी
बाळ मन्ह निजी जायी
हाड हाड रे कुतरा
धर बाळना झितरा
हाड हाड रे कुतरा
कुतराले हानू काठी
हानू कुतराले काठी
झु झु बाळले दुधु रोटी
हाड हाड रे कुतरा
कुतराले हानू खडा
झु झु बाळले दुधु पेढा
ये वं ये वं गायी
मन्हा बाळले दुधु देई
बाळ मन्ह निजी जायी
बाळले दुधु दे वं गायी
ये वं ये वं गायी
तुले खुटीले बांधं कोनी
खुटीले बांधं कोनी
झु झु बाळले दुधु लोनी
ये वं ये वं गायी
बाळ मन्ह निजी जायी
(कै. बाबुबाई राजाराम देवरे, माझ्या आईकडून प्रत्यक्ष ऐकलेलं. पूर्वी - डिसेंबर १९८९ ला - गीत लिहून ठेवलं होतं. आता शोधून काढलं.) संग्राहक : सुधीर राजाराम देवरे
***
मराठी अनुवाद :
ये वं ये वं गायी
बाळ माझं झोपून जाई
हाड हाड रे कुत्रा
धर बाळाचे झित्रा
हाड हाड रे कुत्रा
कुत्र्याला हाणू काठी
हाणू कुत्र्याला काठी
झु झु बाळाला दूध रोटी
हाड हाड रे कुत्रा
कुत्र्याला हाणू खडा
झु झु बाळाला दूध पेढा
ये वं ये वं गायी
माझ्या बाळाला दूध देई
बाळ माझं झोपून जाई
बाळाला दूध दे वं गायी
ये वं ये वं गायी
तुला खुंटीला बांधलं कोणी
खुंटीला बांधलं कोणी
झु झु बाळाला दूध लोणी
ये वं ये वं गायी
बाळ माझं झोपून जाई
(मराठी अनुवाद आणि संग्राहक : सुधीर राजाराम देवरे)
या अंगाई गीताविषयी :
माझ्या लहानपणी माझी आई आमच्या अहिराणी भाषेतील हे पारंपरिक अंगाई गीत माझ्यासाठी गायची हे मला खूप अस्पष्ट आठवतंय. कदाचित आज आठवलंही नसतं. कारण आता हे अंगाई गीत ग्रामीण अहिराणी पट्ट्यात कुठंही ऐकू येत नाही. आता बाळाला लुगड्याच्या वा गोधडीच्या झोळीऐवजी बाजारात मिळणार्या रेडीमेड पाळण्यात झोपवलं जातं. आणि पारंपरिक अहिराणी अंगाई गीतांऐवजी मोबाईलवर आधुनिक (आणि प्रमाणभाषेतील) गाणी लाऊन बाळाला झोपवलं जातं. म्हणजे अंगाई गीतांची जागा आज अन्य आधुनिक गाण्यांनी घेतली तरी ती गाणी बाळाची आई वा आजी गात नाही. मोबाईल गातो. (या गोड गळ्याच्या आणि गोड संगीताच्या गाण्यांमुळं खडबडीत- ओबडधोबड आवाजाची असूनही काळजातून पाझरलेल्या वात्सल्याची पारंपरिक लोकगीतं आज नष्ट झाली आहेत.)
पण हे अंगाई गीत जतन होण्याचं आजचं कारण मला सांगावं लागेल : १९८९ साली माझ्या मुलीला (प्रज्ञाला) पारंपरिक लुगड्याच्या झोळीतच झोपवताना माझी आई हेच अंगाईगीत गायची. या तिच्या गाण्यामुळं लहानपणी तिच्या तोंडून ऐकलेलं गाणं मला टहाळबन आठवू लागलं. त्या गाण्याची माझ्या मनात उजळणी झाली. मला खूप लहानपणापासूनच लोकसाहित्य- लोकगीतांसह काहीबाही स्वत:चंही लिहीत राहण्याचं व्यसन असल्यामुळं मी हे गाणं त्यावेळी (डिसेंबर १९८९ ला) एका वहीत, आई गात असताना तिच्या शब्दांसहीत तिला नकळत जसंच्या तसं लिहून ठेवलं होतं.
परवा डॉ. अरुण प्रभुणे फोनवर बोलता बोलता ‘अंगाई गीतांविषयी’ बराच वेळ बोलत राहिले. त्यावेळी मला हलकसं असं काही आतून हे गाणं चालीसह चाटून गेलं. पण या गीताचे शब्द काही तोंडात येत नव्हते. ‘अहिराणीत काही अंगाई गीतं असतील तर बघा आणि त्यांच्यावर तुमचा लेख हवा’ असं ते म्हणाले. फोन बंद केल्यावर मी आठवून पाहिलं. ‘ये वं ये वं गायी, मन्हा भाऊ निजी जायी’ अशा दोन ओळी आठवल्यासुध्दा. पण हे गाणं पुढं काही सरकत नव्हतं. गाण्यातले ते ठसकेबाज नैसर्गिक यमकातले शब्द ओठांवर येत नव्हते. या दोन ओळी मी व्हॉटसअॅपवरुन गावाकडच्या मित्रांना- वडीलधार्यांना मुद्दाम फिरवल्या आणि पुढचं संपूर्ण गीत मिळतं का वगैरे आवाहन करत कानोसा घेत राहिलो. पण सगळीकडून सामसुम. एकानंही प्रतिसाद दिला नाही. हाती काही लागलं नाही. हे गाणं मी पूर्वी कधीतरी लिहून ठेवलं आहे की नाही याची शाश्वती मला नव्हती. कारण अशी लोकगीतं वा अन्य काही कुठून कुठून लिहिता लिहिता ऐकून रोज बरंच काही सुटून गेलेलं असतं.
तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून घराच्या पडदीवर ठेवलेली जुनी लोखंडी ट्रंक खाली काढली. (असं काही हवं असलं की या ट्रंकसह अजून दोन सुटकेस- बॅगा मी खाली काढून त्यात कधीकाळी काहीबाही कोंबलेल्यांपैकी एकेक तपासत असतो.) ट्रंकेतल्या अनेक जुन्या जपून ठेवलेल्या वह्या चाळू लागलो. आणि काय आश्चर्य! कागदांचे तुकडे तुकडे झालेल्या एका वहीत हे गाणं मीच लिहून ठेवलेलं जसंच्या तसं हाती लागलं. ‘युरेका’ म्हणत त्या तुकडे झालेल्या कागदावरुन पुन्हा हे लिहून घेतलं.
अहिराणीत आतापर्यंत तरी फक्त हे एकच अंगाई गीत मिळालं. दुसरं मिळणं तर दुरच, पण पूर्वी आईनं म्हटलेलं जे गीत शोधून काढलं ते जसंच्या तसंही कोणाकडून ऐकून वा लिहून मिळालं नाही. अहिराणीत हे एकच अंगाई गीत असेल तर अजून इतर कुठूनतरी का होईना ते पुन्हा मिळायला हवं होतं. पण तसं झालं नाही. ‘ये वं ये वं गायी, बाळ मन्ह निजी जायी’ या पहिल्या दोन ओळींचा अपवाद सोडला तर अगदी म्हातार्या आजींकडूनसुध्दा हे गाणं पूर्ण - जसंच्यातसं आज ऐकायला मिळालं नाही. म्हणजेच आजच्या आज्यांनीही अशी गाणी म्हणायचं खूप पूर्वीच बंद केलेलं आहे.
पूर्वी मानवी आया चूल आणि मूल पुरत्याच मर्यादीत कामात पुरुषप्रधान संस्कृतीनं गुंतवून ठेवलेल्या होत्या. त्या नोकर्या करत नव्हत्या. (आदिवासी कष्टकरी समाजातल्या स्त्रिया मात्र परंपरेनं पुरुषाच्या खांद्याला खांदा लाऊन चरितार्थासाठी बाहेर पडत. नुसत्या पुरुषांच्या कष्टानं त्यांना दोन वेळचं जेवण मिळणं शक्य नव्हतं.) तसंच एकत्र कुटुंब पध्दतीमुळं प्रत्येक घरात आज्यांचा वावर असायचा. या आज्यांना वयोमानामुळं खूप काही कामं नसायची. म्हणून नातवांना झोळीत टाकून, एका जागी बसून झोक्याला बांधलेल्या दोरीनं झोका देत निवांतपणे अंगाईगीतं म्हणायच्या.
आज कुटुंब पध्दत नष्ट झाली. घर तिथं आजी उरली नाही. (म्हणजे आजोबा आजी हयात असले तरी ते एकत्र कुटुंबाचे सदस्य नाहीत. वेगळे राहतात.) म्हणून अंगाई गीतं म्हणायलाही आजी घरात दिसत नाही. आजच्या बहुतांश आया व्यवसाय आणि नोकर्यांमध्ये व्यस्त असतात. त्यांना अशी गीतं म्हणायलाच काय मुलाला घटकाभर प्रेमानं जवळ घ्यायलाही वेळ नाही. आणि मुख्य म्हणजे मोबाईलवर संगीत वा गाणी लाऊन बाळाला झोपवता येत असेल तर त्यांना ही पारंपरिक गीतं शिकून गळा नसलेल्या आवाजात गात बसण्यात काय रस असणार?
पारंपरिक गीतं म्हणणं कमीपणाचं वाटणं, आपला आवाज अमूक एका गायीकेसारखा नसणं अशी न्यूनगंड मनात बाळगणं वगैरे काही कारणंही सहज आठवतात. तरीही काही महिला लोकप्रिय गायिकांनी गायलेली गीतं स्वत: गायचं पसंत करतात, पण पारंपरिक गाणं चुकूनही गात नाहीत असंही दिसून येतं. म्हणून आपला गळा अमूक एका गायिकेसारखा नाही या न्यूनगंडापेक्षा पारंपरिक म्हणजे या गीताला आपण स्वत:च ‘गावंढळ’ संबोधणं आणि अशी अडगळीत टाकलेली गीतं म्हणणं टाळणं, हा या वागण्यातला न्यूनगंड स्पष्टपणे दिसून येतो. अमूक एका गायिकेचं गीत वा चांगल्या आवाजाचं सुरेल गीत म्हणूनच फक्त अनुकरण करत म्हणण्याचा मोह आजच्या महिलांना होत असावा.
पूर्वीच्या अडाणी स्त्रियांना अनुकरणासाठी फक्त पारंपरिक अंगाई गीतांसह अन्य लोकगीतंच उपलब्ध होती आणि याच गीतांचं अनुकरण करत त्या आपल्या बोलीतली पारंपरिक गीतं म्हणायच्या. पण आजच्या सुशिक्षित स्त्रियांपुढं अनुकरणासाठी इतर आधुनिक गीतं उपलब्ध आहेत, ती गीतं त्या आपल्या वकुबानुसार गुणगुणतात- गातातसुद्दा. ज्या अर्थी आधुनिक पध्दतीनं रचलेली सिनेमा - सिरियल्स मधली अंगाई गीतं आजच्या महिला गातात, त्याअर्थी अंगाई गीतांपासून या महिला दूर गेल्या असं नाही, तर फक्त पारंपरिक मौखिक अंगाई गीतं म्हणणं त्यांना मागासलेपणाचं लक्षण वाटतं. म्हणजे आपल्याला कोणी मागास- अडाणी- अशिक्षित ठरवेल की काय, असा त्यांच्या मनात न्यूनगंड तयार होत असल्याचं या काळात जास्त अधोरेखित होत राहतं.
अंगाई गीतं ही लोकगीतांचा- लोकसाहित्याच्या दालनातलाच एक भाग असूनही इतर लोकगीतांच्या तुलनेनं ती आज लगेच उपलब्ध होत नाहीत. ही रड प्रत्येक भाषेत दिसून येते. याचं कारण कोणत्याही भाषेत मुळात अंगाई गीतंच कमी असल्याचं लक्षात येतं. पण भाषेत वा लोकजीवनात अंगाई गीतं कमी असण्याचं कारणही नक्की काय असावं? याचाही शोध घ्यावा लागेल.
कमी असलीत तरी हरकत नाही, पण ही अंगाई गीतं आज सहज उपलब्ध का होत नाहीत? घरातून जातं लुप्त झाल्यानं जात्यावरच्या ओव्या लोप पावल्या, असं म्हणणं हे काही प्रमाणात खरं असलं तरी लोकगीतांमध्ये विविधता आणि नाट्य असेल तरच ती जनमानसात तग धरतात. उदा. समाजातून जातं नष्ट झालं तशी लग्न होणं तर बंद झालेली नाहीत. ती कायम होतच असतात. तरीही लग्नातली गाणीसुध्दा आज नष्ट झाली आहेत. तसंच शेतात कापणीच्या वेळी म्हटली जाणारी लोकगीतंही आज ग्रामीण भागातसुध्दा कुठं कोणी म्हणताना ऐकू येत नाहीत. मात्र पिकांच्या कापण्या तर आजही होत असतात. मग असं होण्याचं कारण काय असावं?
या लोकगीतांत नाट्यमयता नसणं, गीतांत नाविन्य न आढळणं, इथून तिथून एकचएक चाल असणं, चालीत विविधता नसणं की वळणं नसणं. त्यातल्या उपमांचा तोचतोचपणा, घराच्या ओट्यावर, ओसरीत, शेतात, खळ्यात आणि आपल्या स्थानिक बोलीभाषेत गाणं म्हणणं कमीपणाचं वाटू लागणं, म्हणजेच मनात आपल्या भाषेतल्या गाण्याची अस्मिता नसणं, अंगाई गीतांत खूप कल्पनेच्या भरार्या न दिसणं, अगदी सहज सोपं भाबडं वर्णन दिसून येणं, सहजतेपेक्षा भाबडेपणा अधिक जाणवणं, अंगाई गीतांत कोणत्याही देव- देवता- देवींचं वर्णन नसणं, म्हणून या गीतांना धार्मिक अधिष्ठानही अजिबात न मिळणं, गेय कहाण्यांचं महत्व प्राप्त न होणं, गीतांतून विशिष्ट काव्यात्मक कथा सांगितली न जाणं, गीत एखाद्या विधीशी संबधीत नसणं, गीतांत एखाद्या लोकश्रध्देला न कुरवाळणं, त्यात करुण, वीर वगैरे रस दिसून न येणं आदी घटकांच्या न्यूनतेमुळं ही गीतं आज शिल्लक राहिली नाहीत की काय? अशी गीतं म्हटली नाहीत तर एखाद्या देवाचा कोप होणंही कोणी कुठं मांडलेलं दिसत नाही. ज्या कहाण्यांना - गीतांना असा दैवीक श्रध्देचा- पाप पुण्याचा आशीर्वाद मिळतो ती जनमानसात टिकतात, त्यांची घरादारांसहीत देवळात पारायणंही होतात. अशा अनेक बारीक सारीक गोष्टींसह ही कारणं अंगाई गीतांची गायन प्रथा नष्ट- लुप्त होण्यामागे सांगता येऊ शकतात.
अंगाई गीतात गाय, कुत्रा, कावळा, मांजर असे इन मिन तीन वा चार जीव सोडले तर अजून काही सखोल सृष्टीतत्वही दिसून येत नाही. आधुनिक वाद्यात (बँड, डिजेसह आधुनिक जाहिरातींना बळी पडलेली - ती ही पारंपरिक नव्हे, मोबाईल रेकॉर्डिंग) हे सर्व आल्यानं लोकगीतं मागं पडलीत असं म्हणायला प्रबळ आणि मुख्य कारण आहे. ‘कालाय तस्मै नम:’ वा काळाचा महिमा म्हणा पण अशा आणि तत्सम अनेक बाबी लक्षात घेता ही गीतं नामशेष होण्यात वर चर्चा केलेले उपोद् बलक पुरावे निर्णायक ठरतात. आधी टेप, रेडीओने अशा गाण्यांची समांतर जागा घेतली, नंतर टिव्ही, मोबाईलनं त्यावर मात केली. आणि न्यूनगंडानं पारंपरिक मौखिक गीतं मानवी मनांतून हद्दपार झाली.
मी संपादित केलेल्या अहिराणी ‘ढोल’ मध्येही त्यावेळी अंगाई गीतं येऊ शकली नाहीत. याचं कारण ती त्या वेळी उपलब्धच झाली नाहीत. लोकगीतांसोबत अशी विविध अंगाई गीतं आढळली असती तर ती ‘ढोल’मध्येही नक्कीच प्रकाशित केली असती. पण तसं झालं नाही.
लोकगीतं कितीही भाबडी वा ढोबळ वाटत असली तरी त्यांत सूक्ष्म सौंदर्य दडलेलं असतं, ते उलगडून दाखवता यायला हवं. त्यातलं सौंदर्य पारंपरिक लोकांना सांगता येत नाही म्हणून शिक्षितांना ते जपताना अवघडलंपण येत असावं. लोकगीतांत काव्य नसतं. म्हणजे कवितेसारखा खूप खोल अर्थ त्यांत दडलेला नसतो. जे सांगायचं ते वाक वळणं घेऊन नव्हे, तर वाच्यार्थानं - सरळ अर्थानं सांगितलं जातं. लोकगीतांतल्या दालनातील अंगाई गीतं ही अतिशय लहान मुलांसाठी असल्यानं ती भाबडी व बडबडगीतांसारखी भासतात. त्यांतून अर्थ निघालाच तर ती जशी म्हटली जातात- जसे त्यांच्यातले शब्द तसेच त्यांचे ढोबळ अर्थ असतात. (अंगाई गीतं अर्थहीन समजली जातात. मात्र अंगाई गीतांसह कोणतीच पारंपरिक मौखिक गीतं अर्थहीन नसतात, तशी असलीच तर ती अपवादात्मक ठरतील.) प्रत्येक अंगाई गीतांत अगदी नैसर्गिक यमकं आणि हेलावणारी चाल बांधली गेल्याचं दिसून येतं.
मुलगा बाळासाठी वेगळी अंगाई गीतं आणि मुलगी बाळासाठी वेगळी अशी ती लिंगप्रधान नसतात. कोणत्याही लिंग असलेल्या बाळासाठी पारंपरिक उपलब्ध गीतं गायली जातात, मग त्या गीतांत बाळाचा उल्लेख ‘तो’ म्हणजे पुल्लींगी होत असला तरी ती गाणी ‘तिच्या’साठीही (मुलीसाठीही) असतात. या अंगाई गीतात जसे, ‘ये वं ये वं गायी, बाळ मन्ह निजी जायी’ हे ध्रृपद आहे, तशी प्रत्येक भाषेत वेगवेगळी ध्रृपदे गीतांत विशिष्ट अंतराने आवृत्त होत राहतात.
या गीतात गायी, जायी, कुत्रा, झित्रा, काठी, रोटी, खडा, पेढा, कोणी, लोणी आदी नेमकीच यमकं गीताला नैसर्गिक आवाजाचा ताल व आकार देतात. बाळ झोपलं नाही तर कुत्रा त्याचे झित्रा (केस) धरेल, अशी बाळाला गोड धमकीही या गीतातून दिली जाते आणि उर्वरीत ओळींत बाळाला विविध अमिषं दाखवली जातात. बाळ झोपला तर कुत्र्याला काठी हाणून त्याला मी (आई वा आजी) दूर हाकलेल म्हणजे तो (कुत्रा) बाळाचे झित्रे धरणार नाही. आणि बाळ झोप घेऊन ताजातवानं होऊन जागं झाल्यावर मी त्याला दूध रोटी देईन. बाळाजवळ येणार्या कुत्र्याला मी खडा मारेल आणि बाळाला पेढा देईन. गायी तू जवळ ये आणि माझ्या बाळाला दूध दे. गायीनं दूध दिलं की त्या दुधाची मी लोणी बनवेल आणि बाळाला देईल आदी गोड गोड अमिषं दाखवत बाळाला झोळीत झोपवलं जातं.
सारांश, वर वर पाहता या गाण्यांतून खूप खोल अर्थ निघत नसला तरी प्रत्येक गाण्यातल्या दोन ओळीच्या मधल्या कोर्या जागेतून (बिटवीन द लाईन्स) असे अर्थ ध्वनीत होत राहतात. हे अध्याहृत अर्थ आपण समजून घेतले तर लुप्त होत चाललेल्या अंगाई गीतांचं जतन करणं लोकसंस्कृती- लोकजीवनाच्या दृष्टीनं कसं महत्वाचं काम आहे हे आपल्याला कळून येईल.
(‘अक्षर वाड्.मय’ नियतकालिक, संपादक डॉ. अरुण प्रभुणे, जुलै २०२३ ते मार्च २०२४ च्या ‘भारतीय आणि जागतिक अंगाईगीत विशेषांका’त हा संपूर्ण दोन भागातील लेख English Summary (Translation by Rajeev Kulkarni) सह- Akshar Wangmay Special Issue Lullabies : Indian & International, July 2023 to March 2024 मध्ये प्रकाशित झाला आहे, त्या लेखाचा काही अंश. या लेखाचा पहिला भाग ‘साहित्य : जाणिवा, मीमांसा आणि समीक्षा’ या २५ जून २०२४ ला प्रकाशित झालेल्या पुस्तकात आला आहे.)
© डॉ. सुधीर राजाराम देवरे
ब्लॉगचा पत्ता : http://sudhirdeore29.blogspot.com/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा