सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

पुस्तकांचा सुकाळ वाचकांचा दुष्काळ : भाग दोन

 

-      डॉ. सुधीर रा. देवरे

 

       डिजिटल वाचन जगात सुरू झाले आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे लोकांना वेब पोर्टलचे - ईबुक्सचे महत्त्व कळू लागले आहे. मात्र अनेक साहित्यिक (ज्येष्ठ साहि‍त्यिकसुद्धा) ईमेल वापरत असूनही, सोशल मिडियावर वावरताना दिसत असूनही वाचण्यास त्यांना पुस्तकाची हार्ड कॉपीच हवी असते! काही पुस्तके संगणकावर वाचण्यास हरकत नसते, पण ते वाचत नाहीत. अनेक प्रकाशकांनाही प्रकाशनासाठी लेखकाकडून पुस्तकाची हार्ड कॉपी हवी असते. ते काळानुसार बदलण्यास तयार नाहीत. उलट, त्यांच्या लक्षात येत नाही, की लेखकाकडून (प्रकाशनार्थ) पुस्तकाची सॉफ्ट कॉपी ईमेलने प्राप्त झाली तर पुस्तक पुन्हा टाईप करावे लागत नाही. हवे त्या फॉण्टमध्ये त्याचे लगेच अवस्थांतर करता येते.

       साहित्य संमेलन असले की अनेक वाचकमित्र विचारत असतात, साहित्य संमेलनाला जाणार आहात का? संमेलनाला गेले होते का? ‘नाहीअसे सांगितले तर का नाही जाणार?’ ‘का नव्हते गेले?’ असल्या विचारणा होत असतात. साहित्यिक असले म्हणजे साहित्य संमेलनांना हजेरी लावलीच पाहिजे असे अनेकांना वाटते. वाचकांत साहित्य म्हणजेच साहित्य संमेलन असे समजले जाते की काय? साहित्य संमेलनांच्या व्यासपीठांवर वावरणारा वा साहित्य संमेलनांना जाणारा तो साहित्यिक असाही समज दृढ होत चालला आहे. साहित्य संमेलनांकडे एक वारी म्हणून पाहणार्‍यांसाठी अथवा पर्यटन म्हणून साजरे करणार्‍यांसाठी अथवा दरवर्षी साहित्य संमेलनातील कुठल्या तरी मंचावर हजेरी लावणार्‍यांसाठी साहित्य संमेलन ही पर्वणी नक्की असते.

       मराठी माणूस उत्सवप्रिय आहे. फोटोप्रिय आहे. प्रसिद्धीप्रिय आहे. फेसबुक- व्हॉटस्अॅपप्रियही आहे. म्हणून काही साहित्यिक संमेलनांच्या दिंडीत नाचतानाचे फोटोही अपलोड करतात. सर्वसामान्य माणूसच नव्हे, तर साहित्यिक असलेले लोकही फेसबुकवर लिखाणापेक्षा फोटो जास्त अपलोड करत राहतात आणि लिखाणापेक्षा फोटोंना लाईक वाढत राहतात. अनेक साहित्यिक संमेलने, सेमिनार-वेबिनार, भाषणे, काव्यवाचन आदी कार्यक्रमांत रमतात, पण तोच वेळ ते चांगले वाचन करण्यासाठी खर्च करत नाहीत.

       लेखन, सार्वजनिक वाचन आणि सार्वजनिक ऐकणे हे कवितेच्या बाबतीत मात्र प्रचंड प्रमाणात घडत असते. कविता कशी आस्वादावी यावर विंदा करंदीकर एकदा मुलाखतीत म्हणाले होते, ‘कविता आस्वादायची नसते, भोगायची असते आणि तीही अगदी कपडे काढून’. त्याचा अर्थ कविता ही सार्वजनिक जागेत आनंद घेता येईल अशी कलाकृती नाही. ती सोवळेओवळे पाळून, मखरात बसवून पूजाअर्चना करण्याची आकृती नाही. कविता ही ‍एकांतात समाधी लावून, व्रत घेऊन, म्हणजेच अभ्यास करून मेंदू आणि हृदय यांनी जगण्याची-लिहिण्याची-समजून घेण्याची कला आहे असा त्या उद्‍गाराचा ध्वन्यार्थ काढता येईल.

       करंदीकर यांचे ते म्हणणे कवितेच्या ठिकाणी पुस्तक हा शब्द घालून वाचावे. पुस्तक कोणाचे आहे यापेक्षा त्याची काय ताकद आहे ते समजून वाचावे. मग लेखक ओळखीचा असो वा नसो! सारांश, कोणत्याही कलेचा, साहित्याचा उत्सव व्हायला नको. कला, साहित्य हे कोपर्‍यात उदयास येऊन कोपर्‍यातच त्याचा आस्वाद घेण्याचा असतो. त्यानंतर त्याचा सार्वजनिक बोलबाला व्हावा.

       पुस्तके प्रचंड प्रमाणात प्रकाशित होत आहेत. अगदी तालुक्याच्या ठिकाणी आणि गावागावातही प्रका‍शन संस्था स्थापन होत आहेत, अनेक लेखक (लिहिणारा तो लेखक या अर्थाने) स्वखर्चाने आणि स्वत: पुस्तके प्रकाशित करत आहेत. महाराष्ट्रात रोज कमीत कमी पंचवीस पुस्तके प्रकाशित होत असावीत. त्या हिशोबाने महिन्याला साडेसातशे व वर्षाला नऊ हजार पुस्तके प्रकाशित होत असावीत. इतकी सारी पुस्तके प्रकाशित होत असूनही महाराष्ट्रात सांस्कृतिक दुष्काळ वाढत आहे. माणसांचा वै‍चारिक दृष्टिकोन वाढत आहे असे दिसून येत नाही. अशा प्रचंड प्रमाणात साहित्य छापले जात असेल तर मग वाचकाने काय करावे? कोणती पुस्तके वाचावीत आणि कोणती वाचू नयेत हे त्याने कसे ठरवावे? म्हणून मी स्वत:ला एक शिस्त लावून घेतली आहे. मी पुस्तक वाचण्याची एक प्राधान्यसूची तयार केली आहे. ती अशी -  एक: वाचलीच पाहिजेत अशी पुस्तके, दोन: एकदा वाचण्यास हरकत नाही अशी पुस्तके व तीन: वाचली नाहीत तरी चालेल अशी पुस्तके.

      अशा पद्धतीने, मी एक आणि दोन क्रमांकाची पुस्तके वाचत असतो. पुस्तकांची अशी यादी केली की वाचन सोपे होईल हे खरे असले तरी त्यासाठी निकष कोणता लावावा हा यक्षप्रश्न राहतोच आणि कोणती पुस्तके वाचावीत व कोणती वाचू नयेत हे कोणाला विचारावे हे त्यापेक्षा कठीण!

               (दिनांक 16-10-2021 ला थिंक महाराष्ट्र डॉट कॉम वर प्रकाशित झालेल्या लेखाचा उत्तरार्ध. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह संदर्भ द्यावा ही विनंती.)

 

      © डॉ. सुधीर रा. देवरे

          ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/

1 टिप्पणी: