- डॉ. सुधीर रा. देवरे
‘चित्रपटात पुरूष नाचत नाहीत. बायाही नाचत नाहीत आता. फक्त अवयव नाचतात.’
‘अपेक्षा वाढल्या की नात्यातल्या नात्यात तेढ उत्पन्न होते. मग माणूस म्हणतो, 'कोणीही कोणाचं नसतं.' नात्यांच्या अपेक्षांच्या कोषातून बाहेर पडलं की कळतं माणूस माणसांसाठी आहे.’
‘असुरक्षिततेच्या भावनेतून साठेबाजी होत असेल का?’
‘तब्येत दाखवायला डॉक्टरांकडे जाण्यासाठीसुद्धा स्वाभिमान आडवा येतो.’
‘घराला कोणता पैसा लागला, हे घराच्या रचनेवरून सहज लक्षात येतं.’
‘विचारांपेक्षा पदाला अधिक महत्व असतं. पद असलं की लोकांना आपण सांगितलं नाही तरी लोक 'हो' म्हणतात.’
‘आपल्याला खुशमस्करे आवडतात. आपणही खुशमस्करी करत राहतो.’
‘आपणच आपली सोबत करत चांगलं जगायला का नये शिकू?’
‘I am victim of the system of Religion and Politics of India.’
‘देवा, अशी जागा दे लिहायला. तेथे माणूस यायला नको. माणसासाठी लिहायचं आहे. माणूस लिहू देत नाही.’
‘कोणतं पुस्तक 'उभं' करायचं आणि कोणतं 'आडवं' याचा खेळ काही काळ समीक्षक करू शकतो.’
‘अस्सल कलावंत अस्सल माणूस असेलच असं नाही. कदाचित तो विकृतही असेल. दुसर्या कलावंतांचा द्वेष करेल... कदाचित तो महामानवही असेल.’
‘फ्लॅटमध्ये दार आतून बंद करून लेखक वैश्विक साहित्याची निर्मिती करू शकतो!’
‘मित्र रंधा मारलेली प्रमाण भाषा बोलतो.’
‘गुन्हेगार लोक धार्मिक - अध्यात्मिक असतातच!’
‘निसर्गाचे नियम पाळायचे तर धर्माचे करायचे काय?’
‘एक प्लॉट अंटार्टिकात घेऊन ठेवायचा आहे. एक प्लॉट चंद्रावर आणि एक मंगळावर, मागे - पुढे असू द्यावं. आपण आज आहोत, उद्या नाहीत. प्लॉट कुठं जाणार आहे?’
‘ओढीला वय नसते. ओढीला संस्कृती नसते. ओढीला धर्म नसतो. खानदान, शील, काळ, वेळ काहीही नसते ओढीला. ओढ फक्त ओढीत राहते शरीर विरुद्ध शरीराकडे... दगडातून... फुफाट्यातून... काट्याकुट्यातून ओढीला. ओढाओढीत माणूस माणसात राहात नाही.’
‘माणसांना भाषा बोलता आली नसती तर किती लोकांची हत्या टळली असती!’
‘माणसाला लिंग नसल्यावर मनुष्य प्रगती करू शकेल का!’
‘कोणत्याही ऋतूत मंदिराचा बाजार तेजीतच असतो. दुष्काळ असो की सुकाळ. तुम्हाला धंदा चालवायचा आहे ना, देवाचा टाका. भांडवलसुद्धा वर्गणीने सहज उभारता येते.’
‘झाडाच्या आळ्यात रोज पाणी पडण्याच्या सवयीला अवकाश मिळाला की झाड दुसर्या झाडाच्या सावलीत शांत व्हायला कचरत नाही. आळ्यात पाणी पडले की पाने टवटवीत दिसू लागतात... भर उन्हात...’
‘जाणिवेला ओव्हरटेक करीत जाणारा आविष्कार धावनानुसारी आकृती होत राहतो आणि भावनानुसारी मरूनही पडतो तात्काळ प्रसिद्धीत... कलेचा टाहो घशातल्या घशात विरून जातो.’
‘माणसं भितात माणसांनाच खुर्चीवरच्या!’
‘निसर्ग वाया जाऊ देणं तत्वात बसत नाही.’
‘संघर्ष हा अस्तित्वाचा स्थायीभाव आहे.’
‘जिंकलेल्या टीमचा न खेळलेला गडीही विजयीच असतो.’
‘दारं खिडक्या बंद करून जिवंत समाधी घेऊन बसावं आपल्या घरात. सुरक्षित. इज्जतदार.’
‘याला तुम्ही साहित्य म्हणा, तत्वज्ञान म्हणा, काव्य म्हणा, कला वा हवे तर काहीही म्हणा. पण हा आविष्कार तुमच्या माथी मारणार म्हणजे मारणारच.’
‘संस्कृत भाषा बोलणारा सुसंस्कृत असेलच असे नाही. अथवा इंग्रजी भाषा बोलणारा ज्ञानी असेलच असेही नाही. संस्कृती सापेक्ष असते!’
‘माणूस माणसाला नमस्कार करायला घाबरतो. म्हणून माणसाने दुरुत्तरे न करणार्या देवाला निर्माण केलं!’
‘कोणत्याही घराची कितीही केली शांती, तरी माणसाची भूते नाचल्याशिवाय राहत नाहीत... जीवन कोणत्याच सुविचारात मावत नाही!’
‘थडग्यात का होईना जीवंत आहोत, याची शाश्वती काय कमी मोलाची आहे आपल्यासाठी? थडग्यात असून सर्व चवी चाखू शकतो...’
‘शोष खड्डा कोणालाच दिसत नाही वरून. शोषत राहतो आतल्या आत... लोकशाही पुरस्कृत मतदारासारखा...’
‘आपल्या देशात आपल्यापेक्षा अनेक वस्तूंचे वय खूप मोठे आहे.’
‘विकास दारावर धडका मारत राहतो, तो कितीही रोखला तरी रोखता येत नाही.’
‘भाषणासाठी फिजिकल फिटनेसची आवश्यकता असते की काय?’
‘संस्कृती थोर असते. तिचे गोडवे गायचे असतात. इतर देशांना नाही अशी उज्ज्वल संस्कृती आमच्या देशाला आहे. इतिहास आहे. अशी स्वप्ने उबवत आम्ही झोपी जातो. जाग येताच संस्कृतीचे स्वप्न तुटतात, असे लक्षात येताच आम्ही पुन्हा जाणून बुजून झोपण्याचा प्रयत्न करतो.’
‘कशाचा नाहीतर कशाचा आधार घेत माणूस जीवन घालवत राहतो. माणूस माणसासारखा समग्र जगतच नाही. माणसाला देव कळतो पण माणूस कळत नाही.’
‘या खुर्चीत वाघाऐवजी उंदीर बसला तरी तो वाघासारखाच वागेल आणि माणूस, उंदीर खुर्चीत बसला म्हणून त्याचे पाय चाटेल.’
‘गाय खाते एकाचे झाड आणि पुण्य लाभते शेजार्यांना. झाड खाऊ देणे पुण्य समजले जाते.’
‘नोकरी गोचडी सारखी चिटकून बसते अंगाला.’
‘उपदेश ही एक फार चांगली गोष्ट आहे. कोणत्याही विद्वानाला एखादा उपदेशक भेटला तर उपदेशक धर्मात्मा आणि ऐकणारा गाढव.’
‘कीर्तन करणे आणि कीर्तनासारखे वागणे यात फरक आहे. व्याख्यान देणे आणि व्याख्यानासारखे वागणे यात फरक आहे. देव मानणे आणि देवासारखे वागणे यात फरक आहे. माणूस असणे आणि माणसासारखे वागणे यात फरक आहे. 'वेळ मारणे' ही एकच एक गोष्ट आपल्या सगळ्यांना चांगल्यापैकी जमते.’
‘मानवी अस्तित्वामागे अशी काही खरोखरच ईश्वरी प्रेरणा वगैरे असती तर एकाच ग्रहावर धर्म-पंथाची इतकी बजबजपुरी नक्कीच माजली नसती.’
‘एक देवभोळा मित्र ज्याला अतिसामान्य आचरण पाळणेही शक्य होत नाही, तो श्लोक म्हणायला लागला की नेहमी त्याला म्हणतो, "तू ज्याची प्रार्थना करतो तो अस्तित्वात नाही म्हणून बरे नाहीतर त्याने पहिल्यांदा तुझ्याच मुस्कटीत मारली असती." ’
‘लेखक कितीही मोठे असले तरी बायका संसारीच असतात.’
‘गोष्ट म्हणजे सुभाषितं नसतात!’
‘कोणी आपल्यावर प्रेम करू लागलं की आपण तेवढ्यास तेवढं प्रेम परत करतो... आपण उसनं घेतलेलं परत करतो तसं... कोणी आपला द्वेष केला की आपण तेवढ्यास तेवढा द्वेष करतो... उसनं परत करावं तसं...’
‘आपण डोके चालवतो तसे डोळे चालवायला पाहिजे. म्हणजे स्पष्ट दिसेल.’
‘चांगल्या माणसाच्या जवळपास अनेक अर्धवट खुजे लोक राहतात... म्हणून चांगल्या माणसाला उदास वाटतं...’
‘नोट सरकवली की आज्ञा पाळली जाते. मुलाला हाक मारावं तसं कुत्र्याला लाडात वाढवलं जातं. कुत्र्याला हकलावं तसं माणसाला हाकललं जातं...’
‘वारा बरोबर जिरवून देतो सगळ्यांचा माज. इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे करून...’
‘नाहीतरी कोणते लोक कोणाला चांगले म्हणतात?’
‘लोकांच्या भावना इतक्या कशा प्रबळ आहेत. का कमकुवत आहेत. त्या कशानेही दुःखू लागतात.’
‘भावना दुखल्या की समाज खडबडून जागा होतो. समाजाच्या भावना रोज दुखतील अशी व्यवस्था सरकारी पातळीवर राबवायला पाहिजे. म्हणजे समाज जीवंत राहील.’
‘समजा बकर्यांच्या मेंदूचा विकास झाला असता... म्हशींच्या मेंदूचा विकास झाला असता... बैलांच्या मेंदूचा विकास झाला असता... माणसांऐवजी... तर त्यांनीही लावले असते शोध, त्यांच्याचसाठी उपयुक्त असे...’
‘प्राण्यांनीही पाळले असते कदाचित माणसं... गळ्यात कुत्र्यासारखा पट्टा बांधून... त्यांनीही सांगितली असती मग एखाद्या पुराणातली कथा. या जन्मात पाप केलं की माणसांचा जन्म मिळतो...’
‘काही लोकांनी लोकांच्या नावावर केलेल्या भ्रष्टाचाराला लौकीकदृष्ट्या लोकशाही असे का म्हटले जाते?’
‘सर्व मानवजात नष्ट झाली आणि कविता उरली तर कवितेचा काय उपयोग... म्हणून मानवजात नष्ट होणे थांबवले पाहिजे. त्यासाठी राजकारण थांबवले पाहिजे. त्यासाठी यादवी थांबवली पाहिजे. त्यासाठी युद्धे थांबवायला पाहिजे. लढाया थांबवायला पाहिजेत.’
‘शस्त्रास्त्रे नष्ट केली पाहिजेत. बॉम्ब नष्ट केले पाहिजेत. म्हणजे मानवी आयुष्य वाढेल. आणि मानवी आयुष्य वाढले तर मानव कोणाच्याही का होईना पण कविता वाचेल... मानव झिंदाबाद आणि मग कविता झिंदाबाद...’
‘कायम एखाद्याच माणसाला ठेचा का लागत राहतात.’
‘एक बैल दुसर्या बैलाला जीवानिशी ठार मारत नाही... एक हत्ती दुसर्या हत्तीला जीवानिशी ठार मारत नाही... एक म्हैस... एक वाघ... एक सिंह... एक मेंढी... एक बकरी... दुसर्या म्हैस... कुत्रा... वाघ... सिंह... मेंढी... बकरीला ठार मारत नाही... एक माणूस दुसर्या माणसाला शांतचित्तपणे ठार मारू शकतो...’
‘माणूस माणसाच्या जीवावर उठायला भाषा कारणीभूत ठरत असेल तर माणसाची भाषा नष्ट करायला हवी का!’
‘काँम्प्युटर मानवी भाषेत बोलू लागला तर मला ग्रंथांप्रमाणे काँम्प्युटर हा अजून एक सोबती मिळेल... मग मला माणसाची गरजच उरणार नाही.’
‘वेदना म्हणजे काय... ठणका म्हणजे काय... हे फक्त भोगणार्यालाच कळतं का!...’
‘पाठीमागे कोणाविषयीच चांगलं बोलायचं नाही अशी लोकपरंपरा आहे!’
‘आपल्या एका मढ्याची व्यवस्था नीट लागावी म्हणून आयुष्यभर अनेक मढ्यांसाठी सर्वसामान्य माणूस धावाधाव करत राहतो.’
‘मेल्यानंतरच्या काल्पनिक स्वर्गीय सुखासाठीच्या लालसेने वास्तव जीवनात माणूस नरक भोगत असतो.’
‘देवाची गाणी सिनेमाच्या गाण्यांवर आधारीत गावी लागावीत यातच देवाचा सपशेल पराभव आहे.’
(‘मी गोष्टीत मावत नाही’ या कादंबरीतील काही निवडक सुभाषितं. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह संदर्भ द्यावा ही विनंती.)
© डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा