सोमवार, १ नोव्हेंबर, २०२१

पुस्तकांचा सुकाळ वाचकांचा दुष्काळ : भाग एक

 

-      डॉ. सुधीर रा. देवरे

 

     वाचकांच्या तीन पायर्‍या असतात- जे उपलब्ध होईल ते वाचणारे भाबडे वाचक, अभिरुचिसंपन्न वाचक आणि उच्च अभिरुचिसंपन्न वाचक. पहिल्या पायरीवरील वाचक प्रगती करत तिसर्‍या पायरीवर जाऊ शकतो. पैकी उच्च अभिरुचिसंपन्न वाचक हा, बाहेर कितीही करमणुकीच्या साधनात उत्क्रांती- क्रांती वा स्फोट झाले तरी त्याची वाचनसाधना सोडत नाही. ती त्याची गरज बनलेली असते. त्याला प्रपंचासाठीची नोकरी वा व्यवसाय यांतून वाचण्यासाठी वेळ मिळत नसला तरी वेळ नाही असे त्याला वाटत नाही. तो त्यातल्या त्यात फट काढतोच काढतो व तो वेळ वाचण्यास देतो. अभिरुचिसंपन्न वाचक हा एकतर उच्च अभिरुचीसंपन्न वाचक बनतो अथवा त्याच पायरीवर अधूनमधून वाचन करत राहतो. अथवा व्यवहारी तडजोड करून छंदाला व्यवसायाशी जोड देऊन प्रपंचाचे साधन करू पाहतो. मग त्या खटपटीत वाचनाचा छंद तो अन्य छंदात बदलून घेऊ शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या कथेचा चित्रपट तयार करणे, नाटक सादर करणे, दिग्दर्शन करणे, निर्माता होणे, पटकथाकार होणे, संवाद लेखक होणे, जाहिराती तयार करणे, नाटककार होणे, एकांकिका लिहिणे, प्रकाशक होणे, कवितांचा व्यावसायिक प्रयोग करणे, रंगमंचीय कविता सादर करणे, साहित्य संमेलने भरवणे, साहित्यिकांना छोटे छोटे पुरस्कार देणे, व्याख्याने आयोजित करणे, कॅसेट काढणे, सीडी तयार करणे, यु ट्युबचा वापर करणे वगैरे.

       पहिल्या पायरीवरील वाचक जो केवळ उपलब्ध होईल ते वाचणारा भाबडा रसिक असतो. त्याने अभिरुचिसंपन्न वाचक होऊन पुढे उच्च अभिरुचिसंपन्न वाचक होणे अशा पायर्‍या क्रमाक्रमाने गाठायच्या असतात, पण त्यांपैकी बहुतेक वाचक प्रपंचासाठी अन्य व्यवसाय, रोजगार, नोकरी, दुकानदारी, एजंट, कंपनी, कंत्राटदार, शिक्षक आदी नोकर्‍या- व्यवसायांत अडकतात (फक्त लिखाण करून पोट भरता येत नाही). अशा व्यवसायात राहूनही पैशांसाठी अल्पसंतुष्ट असलेला माणूस सर्वसाधारण वाचकाकडून उच्च‍ अभिरुचिसंपन्न वाचकाकडे प्रवास करू शकतो. पण तो प्रपंच-हव्यासात गुरफटला की वाचनातून बाद होतो. प्रापंचिक तत्कालीन सुख त्याला खरे सुख वाटू लागते. मग तो कुटुंबासाठी पैसे कमावल्यानंतर विरंगुळ्यासाठी स्वस्त करमणुकीचा आश्रय घेत राहतो. उदाहरणार्थ टीव्ही, चालू मसालेदार सिनेमा, बुवा, सत्संग, साहित्य वा सांस्कृतिक मंडळातील सत्ता- प्रसिद्धी वगैरे.

       सर्वसाधारण वाचक आणि अभिरुचिसंपन्न वाचक या वर्गाकडून वाचण्यास वेळ कुठे आहे?’ असे प्रश्नात्मक शेरे ऐकू येत राहतात. पण त्याच वेळी तो क्षुद्र गोष्टींसाठी वणवण भटकत असतो. तो ज्या दै‍नंदिन गोष्टींना अपरिहार्य समजतो तितका तो वाचनाच्या छंदाला अपरिहार्य समजत नाही. तो दैनंदिन कष्टाच्या तासांनंतर करमणुकीसाठी वा जगणे सुसह्य करण्यासाठी ज्या धावपळीत अडकतो त्याच त्याच्या गरजा होऊन बसतात. मात्र तो त्याचा वेळ जसा काही क्षुल्लक गोष्टींसाठी काढू शकतो तसा तो वाचनालाही काढू शकतो हे त्याच्या लक्षात येत नाही. उदाहरणार्थ, अनेकांना चहाची चव घेत नुसते बसून राहण्यास वेळ आहे, पण वाचण्यास वेळ नाही. गरज नसताना दुपारी झोपण्यास वेळ आहे, पत्ते कुटण्यास वेळ आहे, निंदा-नालस्ती-चकाट्या यांच्यासाठी वेळ आहे, चालू मसालेदार सिनेमे-सिरियल्स-क्रिकेट यांसाठी वेळ आहे, बाबा-बुवांकडे जाण्यासाठी वेळ आहे, टाइमपास म्हणून मंदिरात जाण्यासही वेळ आहे, सत्संग करण्यास वेळ आहे, दारु पिण्यास वेळ आहे, पार्ट्या-बार यांसाठी वेळ आहे, सहलींना वेळ आहे, लग्नाला-बारशाला-मौतीला जाण्यासाठी वेळ आहे, विविध मंडळांतील सत्तास्पर्धेसाठी वेळ आहे, राजकारण खेळण्यासाठी वेळ आहे, पण वाचण्यासाठी वेळ नाही! माणूस इतर सगळ्या गोष्टी जर आयुष्यात अपरिहार्य म्हणून करत असतो, वेळ नसतानाही वेळात वेळ काढून वरील सर्व कर्मे रोज निपटत असतो, तर तसाच वेळात वेळ काढून तो थोडेसे का होईना वाचन नक्की करू शकतो.

            (दिनांक 16-10-2021 ला थिंक महाराष्ट्र डॉट कॉम वर प्रकाशित झालेल्या लेखाचा पूर्वार्ध. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह संदर्भ द्यावा ही विनंती.)

 

© डॉ. सुधीर रा. देवरे

          ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा