शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०२१

भिंगना आवाज


- डॉ. सुधीर रा. देवरे      

 

                    आमच्या लहानपणी अनेक मुलं भिंग पाळायचे. भिंग नावाचा एक मोठा उडणारा किडा असतो. जंगलात बोर, बाभूळ, हेंकळ अशा काट्यांच्या झाडावर तो सापडतो. भिंगाचे पंख लाल, हिरवे, पिवळे असे वेगवेगळ्या रंगांचे असतात. अंगही रंगीत आणि चकचकीत असतं.  डोकं सोनेरी रंगाचं असतं. भिंगाची मान आणि बाकी अंग याच्यात एक बारीक फट तयार होते. तिथं बोट ठेवला की बोटाला चिमटी बसते. भिंग आपल्या संरक्षणासाठ‍ी मान मागे करत तिथं केलेल्या स्पर्शाला लगेच झटकून टाकतो. काही मुलं शाळेतही दफ्तरात- पाटी पुस्तकांच्या पिशवीत भिंग घेऊन यायचे. जास्त भिंग असले तर शाळेतल्या पाटीवर लिहायच्या पेनींच्या बदल्यात ते इतर मुलांना विकायचे. असाच पाच पेनींवर मी एक भिंग विकत घेतला होता.

                    भिंगाला इजा होणार नाही अशा पध्दतीनं हळूच दफ्तरात ठेवून घरी आणलं. पिशवीतून काढून ओट्यावर ठेवलं. तुरूतुरू चालायला लागला. काही समजण्याच्या आत पंख लांब करून एकदम उडालाच. थोडा वेळ तो समोरच्या पिंपळाच्या झाडावर बसला आणि तिथून दूर उडून गेला. मी पाठलाग केला. ओरडलो. पण काहीच उपयोग झाला नाही. मला खूप रडू आलं. पाच पेनींवर घेतलेला भिंग डोळ्यादेखत भुरकन उडून गेला. ज्याच्याकडून तो भिंग घेतला होता त्या थोराड श्यामला दुसर्‍या दिवशी हे सांगितल. तो म्हणाला, ‘भिंग आशा काय उघडावर ठेवतंस का?’  म्हटलं, ‘मंग कसकाय  ठेवतंस?’  तो म्हणाला, ‘काडीनी पेटी घेवानी. मोकळी बरका. तिनामा बाजरीनं पिठ टाकनं. जरासंच बरका. त्या पिठमा भिंगले ठिसन काडीपेटी लायी घेनी. भिंगले पिठ खावाले मिळस. म्हनीसन तो मरत नही. मादी र्‍हायनी ना मंग ती आंडाबी दे.’

          त्या आंडास्न काय करनं?

श्याम म्हणे, काहीच  करनं नही. काही याळमा त्यास्नातून भिंगस्ना पिल्ला बाहेर येतंस. मग आपलाजोडे आखो भिंगच भिंग व्हयी जातंस.’

           पन तुनाकडथाइन घियेल भिंग उडी गया ना कालदिस, सकाळ माले दुसरा दे.’

           बरं. जरासी कळ काढ. दुसरा सापडना ते तुले दिसू उकाव.’  श्यामने असं सांगितलतरीही तो आता कशाला दुसरा भिंग देईल म्हणून भिंगाचा विषय डोक्यातून काढून टाकला. दोन तीन दिवसांनी श्यामने खरंच मला दुसरा भिंग आणून दिला. वाटलं होतं कशाला आणेल तो. पण त्याने शब्द पाळला. हा भिंग छोटासाच होता. त्याचा रंग पोपटासारखा हिरवागार होता. श्यामजवळ अजून बरेच भिंग होते. मधल्या सुट्टीत त्याने सर्व मित्रांना शाळेच्या बाहेर पटांगणात बोलवल. सर्वांच्या समक्ष एका भिंगाच्या पोटात काटा टोचला. (काहीजन भिंगाचा एक पाय कापून तिथंही काटा टोचायचे.) काटकोनातल्या दुसर्‍या काट्याचं टोक सरमटच्या काडीला टोचून श्यामने टरंगघाणी तयार केली. भिंग उडायला लागला. पण रहाटगाडग्यासारखा सरमटच्या काडीच्या भोवती जिथल्यातिथं गोल गोल फिरायला लागला. जशी भिंगरीच. सर्व मुलं आनंदानं चेकाळली. पण भिंगाच्या पोटाला टोचलेल्या काट्यामुळं कसंतरीच वाटू लागलं. त्याच्या एवढ्याच्या पोटाला- एवढ्याश्या पायाला काटा टोचणं किती भयंकर! भिंगाची अशी सर्कस पाहून अजिबात मजा वाटत नव्हती. बरीच मुलं भिंगाला असे काटे टोचून भिंगरी तयार करायचे. अशा खेळात भिंग गोल गोल फिरून मरून जायचे. काही मुलं भिंगाच्या मानेला दोरा बांधून त्यांना पतंगासारखं उडवायचे. भिंगाला वाटायचं आपल्याला आता मोकळं सोडलं. म्हणून तो उडायचा. पण मानेला बांधलेल्या दोर्‍यामुळं तो दोराच्या लांबीइतक्या अंतरावरच गोल उडत रहायचा. उडून थकला की खाली कोसळायचा. यात आनंद वाटण्यासारखं काही नव्हतं. असं उडताना भिंगाच्या मानेला किती फाशी लागत असेल! पण भिंगाच्या पोटात नाहीतर त्याचा पाय मोडून- काटा खुपसण्यापेक्षा मानेला दोरा बांधून उडवणं त्यातल्यात्यात बरं. काटा टोचणं म्हणजे पोटात सुरी खुपसल्यासारखंच!

                    घरी येऊन मी मोकळी आगपेटी घेतली. तिच्यात थोडं बाजरीचं पिठ टाकलं. पिठात भिंग ठेवला आणि काडीपेटी (आत हवा जाईल अशी फट ठेऊन) बंद करून माझ्या पुस्तकांच्या सान्यात ठेऊन दिली.

                    दिवसभर थोड्या थोड्या वेळानं पुन्हा पुन्हा मी आगपेटी उघडून भिंग पाहून घेत होतो. आता माझ्याजवळसुध्दा भिंग आहे याचा मला खूप आनंद होत होता. हा भिंग आधीच्या भिंगासारखा उडून जाऊ नये म्हणून मी त्याला आगपेटीतून बाहेर काढत नव्हतो. बाकीच्या सोबतींनाही मी माझ्याजवळ भिंग असल्याचदाखवल. भिंगाच्या गळ्याला दोरा बांधायचा नव्हता म्हणून त्याला काडीपेटीतच राहू दिल.

                    संध्याकाळी गृहपाठ, रात्री जेवण करून झोपलो. केव्हातरी कसलीतरी चाहूल लागून जाग आली. पाहिलं तर आण्णा (वडील) कंदिलाची वात मोठी करून इकडं तिकडं काहीतरी शोधत होते. कानेकोपरे पाहत होते. डोळे चोळून मला पूर्ण जाग आली. कंदिलाच्या उजेडात काय शोधताहेत म्हणून कुतुहलानं मी ही अंथरुनातून उठलो. जवळ जाऊन आईला हळूच विचारलं, काय जयं.

आई म्हणे, ‘कसाना तरी आवाज आयकू यी र्‍हायना.’

कसाना आवाज?’

कुटूरकुटूर आशा कुरतडाना आवाज यी र्‍हायना.’

मंग?’

किडूकनाबी आशाच आवाज आयकू येस. म्हनीसन पाही राहिनूत.’ अहिराणीत सापाला किडूक म्हणतात, हे गावातील नेहमीच्या चावळमुळं लगेच ध्यानात आलं. मी कान देऊन तो आवाज नीट ऐकला. कटर कटर. आवाज माझ्या पुस्तकांच्या सान्याजवळ येत होता, हे आण्णांच्याही लक्षात आलं होतं. पण तिथं पुस्तकांच्या खाचाखोचात काहीही नव्हतं. तरीही आण्णांनी मी झोपेतून जागं होईपर्यंत सानं- पुस्तकं उलटंपालटं करून ठेवलेलं होतं. माझी पाटी- पुस्तकं अस्ताव्यस्त विचकटली होती. मलाही सान्याजवळच तो आवाज आला आणि पटकन सगळी गोष्ट माझ्या ध्यानात येऊन गेली. हा आवाज काडीपेटील्या भिंगाचा होता. ‘आण्णा, हाऊ त्ये मन्हा भिंगना आवाज शे.’  असं म्हणत मी ती काडीपेटी काढून दाखवली. मला वाटलं मी त्या आवाजाचा शोध लावल्यामुळं आण्णांकडून शाब्बासकी मिळेल. पण झालं उलटंच.

                    आण्णा माझ्यावर असे भडकले कनी. कतावून माझ्या अंगावर धावले. शिव्याही दिल्या. ‘काय जातवान शे हाऊ! बिनवायकारना उजगरा करी दिधा.’  असं म्हणत ताबडतोब निम्याशिम्या रात्री आण्णांनी घराचं दार उघडून तो भिंग बाहेर फेकून दिला. मला बोलताच आलं नाही काही. आणि हा भिंगही डोळ्यासमक्ष माझ्या हातातून निसटून गेला.

                    या अनुभवातूनही शिकायला मिळालं : भिंगासारखा किडा असो की ज्याला उडता येतअसा कोणताही पक्षी असो. झाडांवर बागडताना वा आकाशात पंखांनी उडतानाच ते डोळ्यांत भरतात. भिंग जसा दोरा बांधून उडवायचा किडा नाही, तशी काडीपेटीत बंद करून ठेवायचीही निर्जीव गोष्ट नाही. ज्याला निसर्गानं पंख दिलेत, त्यांनी आकाशातच विहार केला पाहिजे. म्हणून आपण उडता येणार्‍याला पिंजर्‍यात कोंडणं बरं नाही.

                    जसे पाय म्हणजे आपले पंखच. पायांनीच आपण स्थलांतर करू शकतो. पर्वत चढू शकतो. म्हणून उडणार्‍यांच्या पंखांसहीत माणसाच्या पायांनाही हयाती राहो!

                    (सहज उडत राहिलो या पुस्तकातला मजकूर. लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

          © डॉ. सुधीर रा. देवरे

          ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.com/

२ टिप्पण्या: