गुरुवार, ३० जून, २०१६

Sanskritik Maharashtra



सांस्कृतिक महाराष्ट्र

- डॉ. सुधीर रा. देवरे

      महाराष्ट्रात इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 225 पर्यंत सातवाहनांचे राज्य होते. त्यांनीच महाराष्ट्राची स्थापना केल्याचे ऐतिहासिक दाखले मिळतात. याच काळात साक्षरता संस्कृती व कला या क्षेत्रात चांगली प्रगती केल्याचे पुरातत्व पुरावे मिळतात. शैक्षणिक, धार्मिक व कलेच्या क्षेत्रात महाराष्ट्राची प्रगती झाली. अजिंठा येथील लेणी प्रसिध्द आहेच. वाकाटक राजवटीनंतर काही काळ कलाचुरी घराण्याचे राज्य होते. नंतर चालुक्य, राष्ट्रकुट आणि यादव व शिलाहारांचे राज्य होते. काही काळ बहामणी साम्राज्य सुध्दा. छत्रपती शिवाजींकडून एकसंध महाराष्ट्राचा उदय झाला. नंतर पेशवाई येऊन गेली आणि पेशवाई संपून ब्रिटीश साम्राज्य. महाराष्ट्रातच स्वातंत्र्यपूर्व कॉंग्रेसची स्थापना झाली. लोकमान्य टिळक व म. गांधी यांच्या नेतृत्वाखाली अनेक नेत्यांचा चळवळीत सहभाग होता. सेवाग्राम व महाराष्ट्र ही गांधींजीच्या चळवळीची प्रमुख केंद्रे बनली.
      स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्याची अधिकृत मराठी भाषिक स्थापना 1 मे 1960 या दिवशी झाली असून महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. आता महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या 112,372,972 इतकी आहे. तसेच महाराष्ट्राचे क्षेत्रफळ: 307713 चौरस किमी आहे. छत्तीसगड, अरबी समुद्र, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दादरा व नगरहवेली, गुजरात, मध्यप्रदेश यांना महाराष्ट्राच्या सीमा लागून आहेत.
      महाराष्ट्रात संत परंपरा मोठी असून संत ज्ञानेश्वर हे संत परंपरेतील थोर संतश्रेष्ठ समजले जातात. 1188 साली लिहिला गेलेला मुकुंदराजांचा विवेकसिंधू हा मराठीतला पहिला पद्यग्रंथ तर 1278 मध्ये म्हाइंभटांनी संकलित केलेला लीळाचरित्र हा मराठीतला पहिला गद्यग्रंथ आहे. संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ यांच्यासह त्यांच्या शिष्यवर्गाचा विचार केला तर महाराष्ट्राने अनेक संतांना जन्म दिला आहे. ही संतपरंपरा पंढरपूर येथील विठोबा या लोकदैवताला भजताना निर्माण झाली म्हणून महाराष्ट्रात विठोबा या दैवताचे स्थान अनन्यसाधारण ठरते. या संत परंपरेतल्या सर्वच संतांनी ‍अभिजात काव्य निर्मिती केली आहे. (पंढरपूरसाठी आषाढी कार्तिकी एकादशीला दरवर्षी महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणांहून भक्‍तांची पायी वारी निघते.) ही वारी परंपरा सुमारे आठशे वर्षांपासून टिकून आहे. या संतपरपरेंचा वारसा अजूनही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दिसून येतो. महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातल्या संत कवींना केवळ धार्मिक वा अध्यात्मिक महत्व नाही तर आजचे थोर साहित्यिकही स्वत:ला या संतपरंपरेचा पाईक समजतात हे उल्लेखनिय उदाहरण आहे.
      संतकवी, पंतकवी आणि आधुनिक साहित्य अशा तीन प्रकारात महाराष्ट्रातील साहित्यनिर्मितीकडे पाहिले जाते. वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि आता भालचंद्र नेमाडे या साहित्यिकांना मराठीतला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्रात आज प्रंचड प्रमाणात मराठी लेखन होत असून त्यातून उत्तम दर्जाची साहित्यनिर्मिती उदयास येतांना दिसते.
      भारतात साजरे होणारे अनेक सण महाराष्ट्रांतही साजरे केले जात असले तरी फक्‍त महाराष्ट्रात साजरे केले जाणारेही काही सण आहेत. उदाहरणार्थ, अक्षय तृतीया, पोळा, गणपती उत्सव (गणेश चतुर्थी), अनंत चतुर्दशी, भाऊबीज, गुडी पाडवा, हळदी कुंकू, मकर संक्रांत, नाग पंचमी, हनुमान जयंती, राखी पौर्णिमा, मंगळागौर, गौराई, कानबाई, होळी, चंपाषष्ठी आदी सणांचा ठळक नामनिर्देश करता येईल.
      छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व गड, किल्ले हे महाराष्ट्राचे पुरातत्वीय वैभव म्हणता येईल. यात शंभरेक गड व किल्ल्यांचा समावेश करता येईल. या व्यतिरिक्‍त अजिंठा, वेरूळ, एलिफंटा, कान्हेरी, कारला गुफा, महाबळेश्वर, माथेरान, पाचगणी, मालशेघाट, अंबोली, चिखलदरा, पन्हाळा, तोरणमाळ ही हिलस्टेशन; पंढरपूर, नाशिक, शिर्डी, नांदेड, ओंढा नागनाथ, त्र्यंबकेश्वर, तुळजापूर, गणपतीपुळे, भीमाशंकर, हरिहरेश्वर, शेगाव ही धार्मिक स्थळे आहेत. पुण्याचा शनिवार वाडा, लोणार सरोवर, रंकाळा तलाव, अनेक धबधबे, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प, संग्रहालये, धार्मिक क्षेत्रे, अष्टविनायक गणपती मंदिरे, देवीची साडेतीन पीठे, ज्योतिर्लिंगाची स्थाने, खंडोबाची स्थाने, थंड हवेची ठिकाणे, गरम पाण्याचे झरे असलेली स्थाने, नद्यांच्या काठांवरील महत्वपूर्ण गावे यांचा पर्यटनात समावेश होईल.
      गोदावरी आणि कृष्णा या महाराष्ट्रातल्या दोन महत्वाच्या नद्या आहेत. त्या सह्याद्रीत उगम पावतात. वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, गिरणा, भीमा- चंद्रभागा, नर्मदा, तापी या नद्याही महाराष्ट्रातून वाहतात आणि त्यांच्या अनेक उपनद्या आहेत. कोकणपट्टीला समांतर असलेली सह्याद्री पर्वतश्रेणी थेट केरळ पर्यंत गेलेली दिसते. महाबळेश्वर सारखे विस्तृत पठारी प्रदेश असलेल्या सह्याद्रीत कळसूबाई (1646 मीटर) सर्वात उंच शिखर आहे. सातपुडा पर्वताचे पठारी प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तरेला आहेत. या पर्वतांतून तापी, नर्मदा नद्या उगम पावून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात.
            सह्याद्रीच्या पूर्वेला पसरलेल्या पठारी भागात काळी माती आहे. तिला मृदाही म्हणतात. या मातीत भारी काळी आणि मध्यम काळी असे दोन भाग पडतात. 65 टक्के लोक शेती, कामगार आणि शेतीसंबधीच्या व्यवहारावर अवलंबून आहेत. महाराष्ट्रात कोळसा, मँगनीज, बॉक्साईट, लोह, चूनखडी, डोलोमाईट, सिलीमनाईट, सिलिका सॅड, फ्लोराईट आदी प्रकारचे खनिजांचे साठे आढळतात. पूर्व भागातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर येथील जंगले घनदाट आहेत. त्यांत सागवान लागडाचा समावेश होतो. पश्चिमेला सह्याद्रीच्या काही भागातही दाट जंगले आहेत. महाराष्ट्रात एकूण वनक्षेत्रांची नोंद 63842 वर्ग किमी असून जंगलांची टक्केवारी 21 टक्के आहे.
             छत्रपती शिवाजी, छत्रपती शाहू, महात्मा फुले, आगरकर, आण्णासाहेब कर्वे, विनोबा भावे, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे,  पंजाबराव देशमुख, बाबासाहेब आंबेडकर, गाडगे बाबा, यशवंतराव चव्हाण आदी कर्तृत्ववान महान लोक महाराष्ट्रातून घडलेत.
      महाराष्ट्रात ाहणारा तो मराठी माणूस. राज्यशासनाची अधिकृत भाषा आणि प्रमाणभाषा म्हणून प्रामुख्याने मराठी ओळखली जात असली तरी मराठीच्या अनेक स्थानिक घटकबोली आढळतात. अशा घटकबोलींची संख्या जवळपास पासष्ट इतकी आहे. त्यात आदिवासी आणि भटक्या विमुक्‍तांच्या भाषांचाही समावेश आहे. अहिराणी, आगरी, कोहळी, खानदेशी लेवा, चंदगडी, झाडी, वैदर्भी, तावडी, पोवारी, मालवणी, वर्‍हाडी, वाडवळी, सामवेदी, संगमेश्वरी या विशिष्ट भौगोलिक प्रदेशातल्या लोकभाषा असून कातकरी, कोकणा, कोरकू, कोलामी, गोंडी, गोंडी-थाट्या, गोंडी माडिया, ठाकरी, ठाकूर क, ठाकूर म, ढोरकोळी, निमाडी, निहाली, परधानी, पावरी, भिल्ली/भिलोरी/देहवाली, मथवाडी, मल्हारकोळी, मावची, मांगेली, राठ्या (बारेला), वारली, हलबी या आदिवासी बोलीभाषा आहेत. या व्यतिरिक्‍त कुंची कोरवा, कैकाडी, कोल्हाटी, गोरमाटी, गोल्ला, गोसावी, घिसाडी, चितोडीया, छप्परबंद, डोंबारी, नंदीवाले, पारधी, पारूशी- नाथपंथी डौरी, पारूशी-मांग, पारूशी-मांग गारूडी, बेलदार, वडारी, वैदू या भटक्या विमुक्‍तांच्या बोलीभाषा बोलल्या जातात. ब्राम्ही, देवनागरी, मोडी, महानुभावाच्या सांकेतिक लिपी आणि गोंडी लिपी अशा पाच लिपी राज्यात प्रचलित आहेत.     
      महाराष्ट्रात अनेक आदिवासी आणि भटक्या विमुक्‍त जनजाती आढळतात. भील, गोंड, माडीया, कातकरी, कोळी, ओरान, वारली हे इतर आदिवासींपेक्षा संखेने जास्तदिवासी रहिवासी आहेत. या नंतर कोकणा, मावची भील, गावीत, पावरा, राठवा, धनगर, वंजारा, गोंधळी, आंध, छत्तीसगडी, कोलामी, कोरकू, मावची. भील, तडवी भील, वसावे भील, कवार/ कानवार, गोंड/ राजगोंड, गोंडडोरला, गोंडझारे, गोंडमुरिया, गोंडथाटीया, परधान, कोकणा, कोलम, गामित आदी आदिवासी वास्तव्य करून राहतात; तर पारधी, राजपूत भामटा, वडारी, नंदीबैलवाले, बहुरूपी, गारूडी, पाथरवट, पंचाळ, जोशी, कैकाडी, बंजारा, थोटी, कातकरी/काथोडी, कोरकी, नाहल आदी भटके विमुक्‍त आदिवासी आढळतात.
      मराठी भाषेसह अनेक घटक बोलींतून प्रचंड प्रमाणात लोकसाहित्य विखुरलेले आहे. मराठी लोकसंस्कृतीच्या काही घटकांगांचे खालील प्रमाणे वर्गीकरण करता येईल:
      व्रत घेणे, चक्र भरणे, तोंड पाहण्याचा कार्यक्रम, सुखगाडी (सुखदेवता), मुलामुलींची नावे ठेवण्याची पध्दत, पाऊस यावा म्हणून वरूण देवाला प्रसन्न करून घेण्यासाटी धोंड्या काढणे, तुळशीचे लग्न लावणे, जावळ काढणे, घरभरणी करणे, लग्नाच्या पध्दती आदी विधी.
      भोवाडा, खंडोबा आढीजागरण, लळित, लोकनाट्य, तमाशा, भील आणि कोकणा यांचा डोंगर्‍या देव उत्सव, कोकणा आदिवासी बांधवांची कन्सरा माली, एखाद्या पारंपरिक वैद्याने रोग्याची पटोळी पाहणे, लग्नाच्या विविध परंपरा, मंत्रांनी पान उतरवणे (सापाचा दंश उतरवणे), विंचू उतरवणे, मंत्र-तंत्र आदी विधी- नाट्य.
      कानबाई रानबाई बसवणे, महालक्ष्मी बसवणे, भालदेव बसवणे, गौराई बसवणे, चिरा बसवणे, काठीकवाडी काढणे, खांबदेव पुजणे (नागदेव, वाघदेव), लोकदेवांची पालखी काढणे, वीर काढणे, म्हसोबा, आया, डोंगरदेव, मुंजोबा, कन्सरा माऊली, आदी लोकदेव- देवता. आखाजीचा बार, झोका, गोफण, गलोल, आदी खेळ.
      बारातल्या शिव्या, झोक्यावरची गाणी, भलरी गीते, कापणीची गीते, मोटेवरची गाणी, जात्यावरची गाणी, कापणी गीते, खंडोबाची गाणी, झोक्यावरची गाणी, कुटुंबात कोणाचा तरी मृत्यू झाल्याने स्त्रियांचे शोकग्रस्त पण गेय स्वरूपात शब्दबध्द रडणे, लोकगीतातला तीनशे साठ- नऊ लाख अशा लोकपरिमाणातील संज्ञा, उखाणे, आन्हे, म्हणी, गप-गफाडा, लोककथा, आख्यायिका, भारूडे, लळित, ओव्या, लोकगीते आदी लोकसाहित्य, विविध प्रकारचे ग्रामीण खाद्य पदार्थ, सटीचा टाक विधी, दुख टाकायला आणणे, दारावर जाणे, विवाह परंपरा, बाळाला घुगरावणे आदी रूढी-रिती. खंजिरी, डफ, तुणतुणे, ढोल, ढोलकी, किंगरी आदी वाद्य. फेरा नाच, दबक्या नाच, शिमगा नाच, भिलावू नाच आदींसह सांस्कृतिक गीतांत लावणी, पोवाडे आढळतात. या व्यतिरिक्‍त अनेक लोकगीते त्या त्या परिवेशात दिसून येतात. विविध लोकसंस्कृती, लोकपरंपरा, लोककला, लोकसंगीत, लोकनृत्य, लोकनाट्य, लोकवाद्य महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात दिसून येतात.
      तमाशा हा एक लोकनाट्याचा प्रकार महाराष्ट्रात परंपरेने प्रचंड लोकप्रिय असून त्यातली लावणीगायन आणि लावणीनृत्य विशेष लोकप्रिय आहेत. तमाशातले महत्वाची वाद्य म्हणजे ढोलकी आणि तुणतुणे. भारूड, गोंधळ, पोवाडा (13 व्या शतकात होऊन गेलेला शारंग देव याने प्रथम पोवाड्याची बांधणी केली होती.) सारंगी, बासरी अशीही काही वाद्य महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. अशी अनेक मराठी लोकसंस्कृतीची भरजरी रूपे महाराष्ट्रात पहायला मिळतात.    मृदंग, वीणा, तंबोरा, झांज हे वारकरी लोकपरंपरेतले वाद्य असून सनई, चौघडा, तुतारी हे राजकीय परंपरेतले वाद्य आहेत. ढोल, तुणतुणे, पावरी, खंजिरी, सांबळ, थाळी, किंगरी आदी आदिवासी परंपरेतून आलेले आहेत.
      महाराष्ट्रातल्या लोकजीवनात मुख्य पाच विभाग पडतात. खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण असे हे प्रमुख विभाग दिसून येतात. त्या त्या विभागातल्या सांस्कृतिक जडणघडणीत थोडाफार फरक पडतो. शेती, व्यवसाय, भाषा, राहणीमान, वेशभुषा, वास्तु- घर, खाद्यपदार्थ, विधी आदीं लोकजीवनात त्या त्या भौगोलिक क्षेत्रात थोड्याफार प्रमाणात बदल दिसून येतात.               
      (या व्यतिरिक्‍त अजून काही महत्वपूर्ण नोंदी अनावधानाने राहून गेल्या असतील तर अभ्यासकांनी लक्षात आणून द्याव्यात ही विनंती. महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज या वेबसाईटवर महाभ्रमंती या विभागात सांस्कृतिक भारत या नावाचे माझे साप्ताहीक सदर सुरू झाले आहे. दिनांक 23 व 24-6-2016 ला दोन भागात प्रसिध्द झालेला हा लेख.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
संदर्भ सूची:
1) मराठी विश्वकोश, वार्षिकी 2005, प्रमुख संपादक: डॉ. श्रीकांत जिचकार,
   प्रकाशक: सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
2. आंतरजालावरून (Internet) शोधलेली माहिती.
3. ढोल नियतकालिक, (अहिराणी, अंक क्रमांक 1, 2, 3, 4, 5 आणि मराठी वार्षिकांक, दिवाळी 2002), संपादक: डॉ. सुधीर रा. देवरे
4. संदर्भ शोध सहाय्य: दर्शना कोलगे.
5. अहिराणीच्या निमित्ताने: भाषा- डॉ. सुधीर रा. देवरे, पद्मगंधा प्रकाशन, पुणे.

मंगळवार, १४ जून, २०१६

शैक्षणिक बाजारहाट





- डॉ. सुधीर रा. देवरे

      आजचा जमाना शिक्षणाचा आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण घेणं वाईट आहे, असं आज एखादा अशिक्षित माणूसही म्हणणार नाही. सर्व जगाने शिक्षण घेतलं पाहिजे. सर्व जग सुशिक्षित व्हायला हवं. मात्र शिक्षण आज ज्ञान मिळवण्यासाठी घेतलं जातं का, हा खरा प्रश्न आहे. म्हणजे माणूस सुशिक्षित होणं लांबची गोष्ट झाली, तो शिक्षित तरी नीट होतोय का अशी शंका घ्यायला जागा आहे. शिक्षण म्हणजे पदवी, पदवी म्हणजे नोकरी, अशा व्याख्या तयार होऊन आज शिक्षणाचा पायाच खचला आहे. कसेही करून पदवी मिळायला हवी. पदवीचे प्रमाणपत्र हातात मिळालं की गंगेत घोडं न्हालं. ज्ञान मिळवण्यासाठी शिक्षण घ्यायचं आणि पोटापाण्यासाठी नोकरी- व्यवसाय करून घेतलेल्या शिक्षणावर आयुष्यानंद घ्यायचा असं होताना दिसत नाही.
      शिक्षण फक्‍त शाळा कॉलेजांमध्ये मिळतं असा कोणाचा ग्रह असेल तर तोही चुकीचा आहे. शिक्षण हे गल्ली, गाव, प्रवास, पर्यटन, बाजार, यात्रा, रस्ता, अनुभव, निसर्ग, घर, शेती, समाज, मित्र, विधी, व्वयहार, अनेक प्रकारच्या कला आदी सर्व ठिकाणी मिळत असतं. पण ते शिक्षण आहे याचं भान ठेऊन सजगपणे घेता आलं पाहिजे. आणि अशा नैसर्गिक शिक्षणाला योग्य आणि शिस्तबध्द वळण देण्यासाठी शाळा महाविद्यालयांची गरज असते. शाळा महाविद्यालये स्वत: शिक्षणाची व्याख्या विसरल्याने पाहता पाहता शिक्षणाची केंद्र केव्हा मार्केट झालीत हे आपल्या लक्षातच आलं नाही.
      ‍शासनाने कितीही जाहिराती करत बढाया मारल्या तरी शासकीय शिक्षणही स्वस्त राहीलं नाही आणि मोफत तर अजिबात नाही. अशा चढाओढीत आज शिक्षणाचा पूर्णपणे बाजार झाला आहे. शिक्षण आता ज्ञान मिळवण्यासाठी घेतलं जातं असं म्हणणं धारिष्ट्याचं ठरेल. आज प्रत्येकाला इंजिनिअर अथवा डॉक्टरच व्हायचं आहे. इतर क्षेत्र आहेत. पण एकतर ते कोणाला माहीत नाहीत आणि माहीत झालेत तर आता इलाज नाही म्हणून अशा शिक्षणाकडे विद्यार्थी वळताना दिसतात. प्रश्न असा आहे की मेडीकलचे विद्यार्थी असोत की इंजिनिअर, इतर क्षेत्रातले त्यांना ज्ञान असणं ही लांबची गोष्ट झाली, पण त्यांच्या क्षेत्रातलेही त्यांना पूर्ण ज्ञान घेता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. याचे कारण विशिष्ट शिक्षण घेताना त्या शिक्षणातले मर्म समजून ज्ञान घेण्याऐवजी, परीक्षेसाठी म्हणजेच जास्त गुण मिळवण्यासाठी आयएमपी काय आहे यावर जास्त भर दिला जातो. म्हणून शाळा महाविद्यालये आज ज्ञानदानाचं काम करतात असं म्हणावं तर हा मोठा विनोद होऊ शकतो. पूर्वी शाळा महाविद्यालये काढणारे द्रष्टे ज्ञानमहर्षी होते, कर्मवीर होते, ज्ञानयोगी होते, त्यांना दूरदृष्टी होती हे खरे असले तरी आजचे शाळा महाविद्यालये काढणारे लोक उद्योजक झाले आहेत. ऊसांचा कारखाना काढण्यापेक्षा कॉलेजचा कारखाना काढला तर या उद्योगाला कधीही मंदी येत नाही. दिवसेंदिवस हा उद्योग भरभराटीला येत असतो. शाळा महाविद्यालये काढण्यासाठी शासनाकडून फुकट वा अल्प किमतीत भुखंड मिळवायचे आणि शाळा कॉलेजच्या नावाने भरमसाठ उत्पन्न देणारे उद्योग थाटायचे. छुप्या देणग्या, छुपी फी, मॅनेजमेंट कोटा (व्यवस्थापकीय राखीव जागा) यातून खोर्‍याने पैसा ओढत हे उद्योग अगदी प्रतिष्ठेने सुरू आहेत. (सोबतीला खाजगी क्लासेस आल्याने महाविद्यालयांची ‍शैक्षणिक जबाबदारी अजून कमी झाली. महाविद्यालये शु्ल्क गोळा करत परीक्षा आयोजित करणे इतकेच त्यांचे काम राहिले.)
      या उद्योगात पालकही मागे नाहीत. आपला मुलगा शिकला पाहिजे. मग काहीही होवो. कसेही होवो. कितीही पैसे ओतावे लागले तरी चालेल पण त्याला डॉक्टर नाहीतर इंजिनिअर करायचं. मग मुलाची गुणवत्ता काहीही असो. त्याचा कल कुठेही असो. डॉक्टर- इंजिनिअर म्हणजे प्रतिष्ठा. काल एक शिक्षक मित्र भेटला. तो म्हणाला, मुलाला पस्तीस लाख रूपये डोनेशन भरलं. (पाच वर्षाची प्रचंड फी वेगळी) पण एमबीबीएस करायचंच. हा मित्र नोकरी करतो. मी विचारलं, पण पस्तीस लाख आणले कुठून? मित्र गडबडला. नोकरी करणारा मनुष्य सेवानिवृत्त होताना आज कदाचित पस्तीस लाख शिलकी असू शकतो. पण ती आयुष्यभर नोकरी करून मागे ठेवलेली कमाई असते. ती कमाई अशा पध्दतीने कोणालाही देणगी देऊन कशी उडवता येईल? या वर्षी सीईटी फेर्‍यांतून इंजिनिअरींगला प्रवेश घेतला तरी किमान साठ हजारच्या खाली वार्षिक फी दिसून येत नाही. (कमाल फी दीड लाखापर्यंत. मॅनेजमेंट कोट्याचे डोनेशन फार लांबची गोष्ट झाली.) अशा परिस्थितीत सर्वच हुशार विद्यार्थ्यांना ही फी परवडणार नाही. म्हणून राऊंड पध्दतीने प्रवेश मिळाला तरी ते एवढी फी भरू शकत नसल्याने आपल्या ध्येयापासून लांब राहतील. आज इंजिनिअरींग आणि डी.एड. कॉलेजेस् संख्येने सारखीच दिसतात. अगदी बालवाडीत म्हणजे आजच्या भाषेत माँटेसरीत प्रवेश घ्यायलाही लाखो रूपये लागतात.  
      बिहार मध्ये बारावीतले टॉपर फरार होतात. कालच्या स्टींग ऑपरेशनमध्ये अनेक प्राचार्य आणि शिक्षक उघडे पडलेत. उत्तरपत्रिकेत अगदी गाणी लिहिली तरी चालतील पण एका लाखात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करून आणू असे स्वत: प्राचार्य सांगत होते. यापैकी काही प्राचार्य इंटर झाल्यानंतर तेरा महिण्यात पोष्ट ग्रॅज्युएट होऊन प्राचार्य पदावर बसलेले होते. आज कोणत्याही पध्दतीने मुलं पास करून आणता येतात. गुणवत्ता यादीत झळकतात. मोठमोठ्या पदव्या पैशांच्या बळावर बळकावता येतात. आणि त्या पदव्यांच्या बळावर शिक्षणाचा गोरखधंदा चालतो. ज्यांनी कायदे करायचे अशा राजकारणी लोकांकडेच बोगस पदव्या असतील तर देशातल्या नागरिकांकडून अजून काय अपेक्षा करता येतील.
      परीक्षेत उतारा (कॉपी) करणारा विद्यार्थी फक्‍त पास होऊ शकतो. गुणवत्ता यादीत झळकू शकत नाही, असा आपला आतापर्यंतचा भाबडा समज होता. पैशाने बाजारात सर्व काही विकत घेता येत असलं तरी शिक्षणाला बुध्दीच लागते असाही आपला आतापर्यंत भोळा समज होता. पण आता खिशात पैसे असले तर कोणीही बुध्दीवंतापेक्षा जास्त गुण मिळवून गुणवत्ता यादीत आणि संपूर्ण राज्यातही उंच्चांक गुणांनी झळकू शकतो, हे पहिल्यांदाच लक्षात आलं. म्हणून अशा शिक्षणाच्या बाजारहाटाला जाऊन स्पर्धेत टिकणं हे सर्वसामान्य माणसांचं काम राहीलं नाही.          
      (या लेखातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

मंगळवार, ३१ मे, २०१६

पळता येणार नाही राजकारणापासून दूर



- डॉ. सुधीर रा. देवरे

मला खुणवायचं नाही कोणत्याही दोन माणसांत
सुरू होणार्‍या राजकारणाबद्दल
मला बोलायचं नाही एखाद्या कार्यालयात
डूक धरणार्‍या सूडकारणाबद्दल
आणि मला टोचायचं नाही एखाद्या गावात
काटा काढणार्‍या राजकारणाबद्दलही.

आत्मप्रौढीने सांगतात लोक, 
राजकारणाबद्दल बोलत नाहीत आपण
आवडत नाहीत राजकारणी आणि
राजकारणात जाणारही नाही चुकून कधी...
अशा तमाम तटस्थ प्रवृत्तीबद्दल बोलायचंय इथं.

कोणाकोणाला आवडतं म्हणे 
राजकारणाविषयी व्देषाचं बोलणं आणि ऐकणंही
तरी अशा तथाकथित कुपमंडूक राजकारणापासून 
राहता येईल का आपल्याला
कायम दोन हात तरी दूर?

तसं असायलाच हवं दूर व्यक्‍तीगत चिखलफेकीपासून
आणि डबक्यात उड्या घेणार्‍या राजकारणापासूनही
पण आता नाही बोलता येत राजकारण गेलं चुलीत
देशाच्या राजनितीपासून दूर झालोत तर
वाढणार आहे शक्यता देशाबद्दल बेफिकीर होण्याची 
काय करतोय माझा देश आणि कायहे त्याची दशा दिशा
याबद्दलही असू शकतो आपण कायम अनभिज्ञ 
माहीतच नाही व्यापक मुळातून समाजव्यवस्था
तर आपण करू शकणार नाही सकारात्मक मतदान.
नेत्याची राजकीय प्रणाली- वृत्ती- प्रवृती 
मुळातून माहीत नसणार आपल्याला
मतदान न करणं यालाही म्हणूनच
काही लोक मानतात आज प्रतिष्ठेचं काम.
महागात पडेल आपल्याला दिवसेंदिवस असं
राजकारणाकडे पाठ फिरवून डोळेझाक करणं.
          
आपण कितीही स्वीकारला आपल्यापुरता अराज्यवाद
तरी या राजकीय बेड्या तोडणं शक्य आहे काय?
आपण गावातील पंचाला निवडून देणार नसू
नगरसेवकाला निवडून देणार नसू
परिषद- पंचायत सभासद निवडून देणार नसू
आमदार-खासदार निवडून देणार नसू
तर अराज्यवाद पाळतो म्हणून पावलापावलांवरच्या
करांपासून मिळेल का मुक्‍ती आपल्याला कधी?
कोणाकडून करून घेणार आपण
आपल्या गावदेशाची भौतिक प्रगती
सरकारची गुंतवळ नाकारून आपल्याला
कसं राहता येईल शासनात कायद्यात नियमात?
        
राजकारण करणं आपलं काम नाही
भल्या माणसाचा तो प्रांत नाही
असं म्हणत आपण राजकारणापासून लांब राहायचं
आणि जातांधळ्या धर्मांधळ्या कामांधळ्या
पैशांधळ्या कायद्यांधळ्या देशांधळ्या व्यसनांधळ्या
ऑफिसांधळ्या लुटारू आतंकींचे उतलेले प्रताप पहात 
त्यानांच मुकाट्याने मतदान करत परतायचं 
नामदारांकडून चांगली कामं होण्याची 
अपेक्षा करत रहायची पाच वर्ष मुकाट्यानं मनातल्यामनात
असा हा सगळा तिढा कोणाशी वैर नको म्हणून.
        
अब्राहम लिंकन, चर्चिल, मंडेला, गोर्बाचेव्हसह...
आंतरराष्ट्रीयच नव्हे नुसत्या देशात होऊन गेलेल्या
नेत्यांच्या नावावरूनही फिरवली नजर
तर नाही दिसत असं समीकरण कुठं
फक्‍त राजकारणी आणि राजकारण
विविध पैलूदार लोक भेटतात इतिहासात-
गांधी, टिळक, बोस, रानडे, नेहरू, 
राजेंद्र प्रसाद, योगी अरविंद, आंबेडकर, 
शास्त्री, पीव्ही नरसिंहराव, व्हीपी सिंग,
अटलबिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण,
शरद पवार, ग प्र प्रधान, एस एम जोशी, डांगे आदींनी
राजकारण नाही केलं फक्‍त सत्तेचं तथाकथित 
पेक्षा ती अजून आहेत कोणीतरी महान 
कोणी कवी, कोणी साहित्यिक, गणिती,
तत्वज्ञ, विचारवंत, समाजिक कार्यकर्ता,
संशोधक, समाजसुधारक अशा विविध क्षेत्रातून
घडत जातात राजकीय व्यक्‍तिमत्वं
आणि इतिहासही घडवत राहतात
विविध स्तरातून राजनितीत येणारे इसम
दुर्गा भागवत अलिप्त राहिल्या असत्या
अशा राजकारणापासून तर लादलेल्या आणीबाणीला
करता आला नसता त्यांना बंडखोर बेडर विरोध.
        
- तात्पर्य,
आपल्याला पहायचे असतील बेरजेच्या राजनितीत
विचारवंत, साहित्यिक, तत्वज्ञ, सुधारक, शास्त्रज्ञ, संशोधक
तर आपण सक्रीय राजकारणातून राहिलोत दूर तरी
एकूण शतरंजच्या खिलाडी कुरघोड्या घडामोडींपासून
पळता येणार नाही आपल्याला खूप लांब
किमान आपल्याला करावं लागेल जागल्या होऊन
वजाच्या राजकारणावर वाजवी टीका करायचं चोख काम. 

      (या वेळी पहिल्यांदा मुद्दाम कवितेच्या फॉर्ममध्ये ब्लॉग लिहायचा प्रयत्न केला. तो कितपत यशस्वी झाला ते माहीत नाही. ब्लॉग कविता म्हणून न वाचता लेख म्हणूनच वाचावा. या लेखातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

शनिवार, १४ मे, २०१६

जलसाक्षरता : पाण्याच्या देशात!



-         डॉ. सुधीर रा. देवरे

      मला एका संपादक मित्राने विचारलं, लोकसंस्कृतीतील ओव्यांमध्ये वा लोकगीतांमध्ये पाणी वाचवण्यासंदर्भात काही मौखिक परंपरा असतील तर त्या उपयोजित करत लेख लिहाल का? 
मी म्हणालो, नाही.
मी पटकन दिलेल्या नाही उत्तराने त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, का?
      कारण आपल्या लोकसंस्कृतीच्या परंपरेत इथं पाणीच पाणी आहे. भारत हा पर्वतांचा आणि नद्यांचा देश आहे. पूर्वीपार नदीच्या काठांवरच गावं वसलेली होती. इथं भरपूर जंगलं होती. म्हणून पाऊसही भरपूर कोसळायचा. पावसाच्या झड्या लागायच्या. पाण्याचे महत्व कळण्याचे दिवस नव्हतेच पूर्वी. उलट पाण्यासारखा पैसा खर्च करणे हा वाक्‍प्रचार आपल्याकडे सुरू झाला. म्हणजे पाण्याला किमंत शून्य. पूर्वी पाणी फुकट आणि जिकडे तिकडे मुबलक उपलब्‍ध असल्याने पाण्याची महात्मता वा काटकसर मौखिक वाड्‍.मयात दिसून येत नाही. मात्र लोकसंख्येच्या प्रचंड स्फोटाने आणि जंगल तोड- वृक्ष तोड झाल्याने पाण्याची निकड आता उत्पन्न होत आहे.
      संपादक महाशयांचे शंका निरसन झाले. पण पाणी हा आज सगळीकडे चिंतनाचा विषय झाला याचं कारण काय? पश्चिम आशिया खंडातल्या देशांत वाळवंट आहे. पाण्याची कमतरता पूर्वीपार आहे. म्हणून तिथले लोक आठवड्यातून एक दिवस अंघोळ करतात. त्या मानाने भारतासारख्या देशात पाण्याची उपलब्‍धता परंपरेने विपुल असल्याने आपण रोज अंघोळ करतो. (आणि आपल्या वाहनांनाही- गाड्यांनाही रोज अंघोळ घालतो. रोज घराच्या फरश्या धुतो. अर्धा ग्लास पाणी पिऊन अर्धा ग्लास फेकतो. गल्लीतून- गटारातून पाणी वाहू देतो, पण आपण नळाच्या तोट्या बंद करत नाही. बोअरवेल स्वत:च्या पैशांनी केली असली तरी त्यातून येणारे पाणी हे नैसर्गिक आणि सामाजिक आहे याचे भान आपण ठेवत नाही.) पाणी वाचवण्याचे दाखले भारतात मिळत नाहीत. भरपूर पाऊस आणि दु्‍थड्या भरून वाहणार्‍या नद्या आपण टिकवून ठेवल्या नाहीत. तात्पुरत्या स्वार्थाने त्या प्रदुषित केल्या आणि जंगलेही गरजेपेक्षा झपाटयाने नष्ट केलीत. ब्रिटीश राजवटीत दूरदृष्टीने काही नद्यांवर धरणं बांधली गेलीत. त्याचे फायदे आपल्या लक्षात आल्याने आपणही स्वतंत्र भारतात धरणं बांधू लागलो. धरणांचे फायदे आता आता आपल्याला दिसू लागली आहेत.
      पाणी, पाऊस, भूजल पातळी म्हणजे जमिनीतली पाणी पातळी यांचा खूप जवळचा संबध झाडांशी आहे, डोंगरांशी- पर्वतांशी आहे आणि त्यांच्यावर उभ्या असलेल्या जंगलावरही पाण्याचा संबंध आहे. म्हणून जलसाक्षरता राबवतानाच्या प्रचारात झाडांना विसरून चालणार नाही. फुकट मिळणारा अमर्याद प्राणवायू झाडांपासून मिळतो आणि आपल्याला प्रदुषणापासून वाचवते ते ही झाडच. म्हणून फळ न देणारी झाडं असलीत तरी ती आपण जपली पाहिजेत! आपल्याला झाडं लावता येत नसतील तर किमान तोडू तरी नये वा तोडायला कोणी उद्युक्‍त होईल अशी कृती टाळायला हवी. झाडांपासून म्हणजे लाकडांपासून बनवलेल्या वस्तू वापरण्याचं थांबवायला हवं. आपल्या प्रत्येक वाढ दिवशी आपण एकेक झाडं लावून ते वाढवायला हवं- जगवायला हवं.
      आतापर्यंत आपण पाण्यासारखा पैसा खर्च करतो, असं फुशारकीने म्हणत होतो. यापुढे मात्र आपल्याला पैशांसारखे पाणी खर्च करता येणार नाही. पैसे छापता येतात, म्हणून कमवता येतात! पाणी छापता येत नाही. म्हणून कमवताही येणार नाही! हे लक्षात घेऊन यापुढे आपण पाणी अडवलं पाहिजे. साचवलं पाहिजे. जिरवलं पाहिजे. पाण्याची काटकसर करणार्‍या कोणालाच कंजुष म्हणता येणार नाही.
      या पारंपरिक पाण्याच्या देशात पाणी वाचवायचं कसं? जलसाक्षरता आपल्या समाजात रूजता रूजत नाही. पाणी आपण स्वत: वाचवावंच पण कसं वाचवावं याबाबत दुसर्‍यालाही सुचना कराव्यात. मार्गदर्शक करावं. जशी आपण गावपातळीवर वर्गण्या काढून आतापर्यंत सार्वजनिक मंदिरे बांधत आलो, तशी पाणी अडवा, पाणी जिरवा ही योजना गावागावात श्रमदान करून सामुहीक पध्दतीने राबवायला हवी. भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रातल्या काही भागात पिण्याच्या पाण्याचा प्रचंड दुष्काळ आहे. अशा वातावरणात ओठांवर गाणं आलंच तर ते असं येतं:
      पानी रे पानी तेरा रंग कैसा ।
सुखे मे मिला हुआ घडा जैसा ।।

      (महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज या संकेतस्थळावर शुक्रवार,  दिनांक २९ एप्रिल, २०१६ ला प्रकाशित झालेला माझा लेख. या लेखातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

शनिवार, ३० एप्रिल, २०१६

ब्लॉग लिखाणाला चार वर्ष पूर्ण





-         डॉ. सुधीर रा. देवरे

         बरोबर चार वर्षांपूर्वी दिनांक 29 एप्रिल 2012 पासून मी दर शनिवारी साप्ताहीक ब्लॉग लिहायला सुरूवात केली होती. 27 एप्रिल 2014 पर्यंत दोन वर्ष  एकही शनिवार ब्लॉगशिवाय टळला नाही. म्हणजेच एकाही आठवड्याचा खंड पडू न देता आणि शनिवार सायंकाळ ही वेळही न टाळता नियमितपणे ब्लॉग लिहीत होतो. मात्र प्रत्येक आठ दिवसांनी ब्लॉग लेखनाने माझ्या अन्य लिखाणावर प्र‍तिकूल परिणाम होतो असे लक्षात आल्याने दोन वर्षापासून- एप्रिल 2014 पासून प्रत्येक महिण्याच्या 1 आणि 15 तारखेला ब्लॉग लिहीत असतो. प्रत्येक पंधरा दिवसाला एक ब्लॉग. या चार वर्षात एकही खंड जाऊ दिला नाही. खूप लांबलचक लेख लिहिण्यापेक्षा विचारांची थोडक्यात व संपृक्‍त मांडणी करायची शिस्त स्वत:ला लावून घेतली आणि ती शिस्त आजपर्यंत पाळत आलो. 
         या सर्व छोटेखानी लेखांत साहित्यिक, सांस्कृतिक, भाषिक, कला, लोकजीवन, सामाजिक, धर्मकारण, राजकारण, शैक्षणिक, सुधारक, प्रबोधनात्मक, पर्यावरण, वैश्वीक, आंतकविरोध, शेती, पाणी, चरित्र, व्यक्‍तीविशेष, बोलीभाषा, अहिराणी भाषा, विविध पडसाद आदी विषय येत गेले. काही लेख देशात (वा विदेशात) त्या त्या वेळेला घडलेल्या घटनांवर ‍प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया वा भाष्य अशा स्वरूपाचे असलेत तरी असे लेख केवळ प्रा‍संगिक आहेत असे म्हणता येणार नाही. हे लेख केव्हाही वाचताना विशिष्ट संदर्भात कालाय ठरावेत असा दृष्टीकोन ठेऊन मी लिहीत गेलो. म्हणजे घटना विशिष्ट काळातली असली तरी तिचा परिप्रेक्ष आजच्या अन्य घटना- प्रसंगांकडे नक्कीच निर्देश करेल याचा विचार लिखाण होताना केला आहे. चार वर्षातील लेखांवरून नजर फिरवली तर त्यातल्या विषयांची विविधता लक्षात येईल. एखादा विषय पुन्हा चर्चेला आला तरी त्याचा आशय पूर्णपणे वेगळा असतो.
         या ब्लॉगचे आंतरजालावर स्वतंत्र संकेतस्थळ तर आहेच पण हेच ब्लॉग मी तात्काळ त्या त्या दिवशीच ग्लोबल मराठी, व्टिटर, मिसळपाव या संकेतस्थळासह फेसबुकवरही टाकतो. फेसबुकच्या भिंतीसोबतच जवळ जवळ पन्नास गटांवर हे लेख मी टाकत असतो. आता (1 नोव्हेंबर 2014 पासून) व्हॉटस् अॅपवरही माय ब्लॉग्स् नावाचा ग्रुप सुरू केला. अनेक लोक ब्लॉग आवडला म्हणून परस्पर इतरांना फॉरवर्ड करत असतात. त्यामुळे आंतरजालावरील ब्लॉग साइट, ग्लोबल मराठी, व्टिटर, मिसळपाव, फेसबुक आणि व्हॉटस् अॅप या सर्वांवर प्रत्येक लेख जवळपास साडेतीन हजार ते चार हजार वाचक वाचतात हे वाचक खुणांवरून लक्षात येते. तरीही या ब्लॉगला प्रायोजक मिळविण्याच्या खटाटोपात मी अजूनही पडलो नाही. काहीतरी आतून सांगायचे असते. भारताच्या संविधानाने दिलेल्या अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याला अनुसरून व्यक्‍त होणे आणि अप्रत्यक्षपणे झालेच तर प्रबोधन एवढ्याच ध्येयाने प्रेरित होऊन हे लिखाण मी करतो. प्रपंचासाठी करावी लागणारी नोकरी सांभाळत, (नोकरीत सर्वात जास्त वेळ खर्च होतो.) माझे इतर लेखन आणि ब्लॉग लिहिणे यासाठी वेळ सांभाळणे खूप कठीण जाते. ब्लॉगमुळे माझ्या इतर लिखाणावरही विपरीत परिणाम होतो, हे ही लक्षात आलंय. पण ब्लॉग लिखाण सातत्यातून मला जो आनंद मिळतो त्याचे वर्णन मी इथे शब्दात मांडू शकत नाही.
         चार वर्षातील या छोट्या लेखांची जवळपास जाणारी संख्याच सांगायची झाली तर ती 160 (एकशे साठ) इतकी झाली आहे. पैकी काही निखळ प्रासंगिक स्वरूपाचे लेख वगळून या ब्लॉगचे पुस्तक प्रकाशित व्हावे असे मला वाटते. बघूया. या पुढेही मी ब्लॉग लिहीत राहीन. दर महिण्याच्या एक आणि पंधरा तारखेला ब्लॉग देण्याचा दिवस कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न करीन. कला, साहित्य, भाषा, लोकसंस्कृती, लोकजीवन, वैचारिक ‍लेखन अशा स्वतंत्र लेखनाबरोबरच माझे इतरत्र प्रकाशित झालेले लिखानही ब्लॉग मधून देत असतो- देत राहील. माझ्या ब्लॉग लिखाणाला चार वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जर आपण माझे याआधीचे इतर ब्लॉग वाचून त्यांच्या संदर्भातही काही सुचना केल्या वा प्रतिक्रिया दिल्या तर मला आनंद वाटेल. आधीचे ब्लॉग वाचण्यासाठी या ब्लॉगच्या शेवटी लिंक दिली आहे, त्या लिंकवर आतापर्यंतचे माझे सर्व लेख वाचता येतील. आपल्या सर्वांच्या ‍अभिप्रायांमुळे, प्रतिक्रियांमुळे, टिपण्यांमुळे आणि विशेषत: आपल्या प्रेमामुळे मला लिखाण करण्याची ऊर्जा मिळत गेली, म्हणून ब्लॉगचे लेखन सातत्य मी आतापर्यंत तरी टिकवून आहे. ब्लॉगच्या लेखांवरील आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया (प्रतिकूल प्रतिक्रिया सुध्दा) वाचून मला खूप आनंद मिळतो. हा आनंद आपण सर्व मिळून यापुढेही घेत रहायचा का? या ब्लॉग्सवरील लेखांमधून आपल्याला काही नवीन माहिती वा नवीन ज्ञान मिळते का? प्रबोधन होते का? वा तसे होत नसेल तर किमान सांस्कृतिक- सामाजिक उजळणी तरी होते का? अशा प्रश्नांचे मंथन जरूर व्हावे ही विनंती. यापुढेही सर्व वाचकांचे असेच प्रेम मिळत राहील अशी आशा बाळगतो. धन्यवाद.

   - डॉ. सुधीर रा. देवरे            
       इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/