- डॉ. सुधीर रा. देवरे
आजचा
जमाना शिक्षणाचा आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण घेणं वाईट आहे, असं आज
एखादा अशिक्षित माणूसही म्हणणार नाही. सर्व जगाने शिक्षण घेतलं पाहिजे. सर्व जग
सुशिक्षित व्हायला हवं. मात्र शिक्षण आज ज्ञान मिळवण्यासाठी घेतलं जातं का, हा खरा
प्रश्न आहे. म्हणजे माणूस सुशिक्षित होणं लांबची गोष्ट झाली, तो शिक्षित तरी नीट
होतोय का अशी शंका घ्यायला जागा आहे. शिक्षण म्हणजे पदवी, पदवी म्हणजे नोकरी, अशा
व्याख्या तयार होऊन आज शिक्षणाचा पायाच खचला आहे. कसेही करून पदवी मिळायला हवी.
पदवीचे प्रमाणपत्र हातात मिळालं की गंगेत घोडं न्हालं. ज्ञान मिळवण्यासाठी शिक्षण
घ्यायचं आणि पोटापाण्यासाठी नोकरी- व्यवसाय करून घेतलेल्या शिक्षणावर आयुष्यानंद
घ्यायचा असं होताना दिसत नाही.
शिक्षण
फक्त शाळा कॉलेजांमध्ये मिळतं असा कोणाचा ग्रह असेल तर तोही चुकीचा आहे. शिक्षण हे
गल्ली, गाव, प्रवास, पर्यटन, बाजार, यात्रा, रस्ता, अनुभव, निसर्ग, घर, शेती, समाज,
मित्र, विधी, व्वयहार, अनेक प्रकारच्या कला आदी सर्व ठिकाणी मिळत असतं. पण ते
शिक्षण आहे याचं भान ठेऊन सजगपणे घेता आलं पाहिजे. आणि अशा नैसर्गिक शिक्षणाला
योग्य आणि शिस्तबध्द वळण देण्यासाठी शाळा महाविद्यालयांची गरज असते. शाळा
महाविद्यालये स्वत: शिक्षणाची व्याख्या विसरल्याने पाहता पाहता शिक्षणाची केंद्र
केव्हा मार्केट झालीत हे आपल्या लक्षातच आलं नाही.
शासनाने कितीही जाहिराती करत बढाया मारल्या तरी शासकीय शिक्षणही
स्वस्त राहीलं नाही आणि मोफत तर अजिबात नाही. अशा चढाओढीत आज शिक्षणाचा पूर्णपणे बाजार
झाला आहे. शिक्षण आता ज्ञान मिळवण्यासाठी घेतलं जातं असं म्हणणं धारिष्ट्याचं
ठरेल. आज प्रत्येकाला इंजिनिअर अथवा डॉक्टरच व्हायचं आहे. इतर क्षेत्र आहेत. पण
एकतर ते कोणाला माहीत नाहीत आणि माहीत झालेत तर आता इलाज नाही म्हणून अशा
शिक्षणाकडे विद्यार्थी वळताना दिसतात. प्रश्न असा आहे की मेडीकलचे विद्यार्थी असोत
की इंजिनिअर, इतर क्षेत्रातले त्यांना ज्ञान असणं ही लांबची गोष्ट झाली, पण
त्यांच्या क्षेत्रातलेही त्यांना पूर्ण ज्ञान घेता येत नाही ही वस्तुस्थिती आहे.
याचे कारण विशिष्ट शिक्षण घेताना त्या शिक्षणातले मर्म समजून ज्ञान घेण्याऐवजी,
परीक्षेसाठी म्हणजेच जास्त गुण मिळवण्यासाठी आयएमपी काय आहे यावर जास्त भर दिला
जातो. म्हणून शाळा महाविद्यालये आज ज्ञानदानाचं काम करतात असं म्हणावं तर हा मोठा
विनोद होऊ शकतो. पूर्वी शाळा महाविद्यालये काढणारे द्रष्टे ज्ञानमहर्षी होते, कर्मवीर
होते, ज्ञानयोगी होते, त्यांना दूरदृष्टी होती हे खरे असले तरी आजचे शाळा
महाविद्यालये काढणारे लोक उद्योजक झाले आहेत. ऊसांचा कारखाना काढण्यापेक्षा
कॉलेजचा कारखाना काढला तर या उद्योगाला कधीही मंदी येत नाही. दिवसेंदिवस हा उद्योग
भरभराटीला येत असतो. शाळा महाविद्यालये काढण्यासाठी शासनाकडून फुकट वा अल्प किमतीत
भुखंड मिळवायचे आणि शाळा कॉलेजच्या नावाने भरमसाठ उत्पन्न देणारे उद्योग थाटायचे.
छुप्या देणग्या, छुपी फी, मॅनेजमेंट कोटा (व्यवस्थापकीय राखीव जागा) यातून खोर्याने
पैसा ओढत हे उद्योग अगदी प्रतिष्ठेने सुरू आहेत. (सोबतीला खाजगी क्लासेस आल्याने
महाविद्यालयांची शैक्षणिक जबाबदारी अजून कमी झाली. महाविद्यालये शु्ल्क गोळा करत
परीक्षा आयोजित करणे इतकेच त्यांचे काम राहिले.)
या
उद्योगात पालकही मागे नाहीत. आपला मुलगा शिकला पाहिजे. मग काहीही होवो. कसेही
होवो. कितीही पैसे ओतावे लागले तरी चालेल पण त्याला डॉक्टर नाहीतर इंजिनिअर
करायचं. मग मुलाची गुणवत्ता काहीही असो. त्याचा कल कुठेही असो. डॉक्टर- इंजिनिअर
म्हणजे प्रतिष्ठा. काल एक शिक्षक मित्र भेटला. तो म्हणाला, ‘मुलाला पस्तीस लाख रूपये डोनेशन भरलं. (पाच वर्षाची प्रचंड
फी वेगळी) पण एमबीबीएस करायचंच.’ हा
मित्र नोकरी करतो. मी विचारलं, ‘पण
पस्तीस लाख आणले कुठून?’ मित्र
गडबडला. नोकरी करणारा मनुष्य सेवानिवृत्त होताना आज कदाचित पस्तीस लाख शिलकी असू
शकतो. पण ती आयुष्यभर नोकरी करून मागे ठेवलेली कमाई असते. ती कमाई अशा पध्दतीने
कोणालाही देणगी देऊन कशी उडवता येईल? या वर्षी सीईटी फेर्यांतून इंजिनिअरींगला
प्रवेश घेतला तरी किमान साठ हजारच्या खाली वार्षिक फी दिसून येत नाही. (कमाल फी
दीड लाखापर्यंत. मॅनेजमेंट कोट्याचे डोनेशन फार लांबची गोष्ट झाली.) अशा
परिस्थितीत सर्वच हुशार विद्यार्थ्यांना ही फी परवडणार नाही. म्हणून राऊंड
पध्दतीने प्रवेश मिळाला तरी ते एवढी फी भरू शकत नसल्याने आपल्या ध्येयापासून लांब
राहतील. आज इंजिनिअरींग आणि डी.एड. कॉलेजेस् संख्येने सारखीच दिसतात. अगदी
बालवाडीत म्हणजे आजच्या भाषेत माँटेसरीत प्रवेश घ्यायलाही लाखो रूपये लागतात.
बिहार
मध्ये बारावीतले टॉपर फरार होतात. कालच्या स्टींग ऑपरेशनमध्ये अनेक प्राचार्य आणि
शिक्षक उघडे पडलेत. उत्तरपत्रिकेत अगदी गाणी लिहिली तरी चालतील पण एका लाखात प्रथम
श्रेणीत उत्तीर्ण करून आणू असे स्वत: प्राचार्य सांगत होते. यापैकी काही प्राचार्य
इंटर झाल्यानंतर तेरा महिण्यात पोष्ट ग्रॅज्युएट होऊन प्राचार्य पदावर बसलेले
होते. आज कोणत्याही पध्दतीने मुलं पास करून आणता येतात. गुणवत्ता यादीत झळकतात.
मोठमोठ्या पदव्या पैशांच्या बळावर बळकावता येतात. आणि त्या पदव्यांच्या बळावर
शिक्षणाचा गोरखधंदा चालतो. ज्यांनी कायदे करायचे अशा राजकारणी लोकांकडेच बोगस
पदव्या असतील तर देशातल्या नागरिकांकडून अजून काय अपेक्षा करता येतील.
परीक्षेत
उतारा (कॉपी) करणारा विद्यार्थी फक्त पास होऊ शकतो. गुणवत्ता यादीत झळकू शकत नाही,
असा आपला आतापर्यंतचा भाबडा समज होता. पैशाने बाजारात सर्व काही विकत घेता येत
असलं तरी शिक्षणाला बुध्दीच लागते असाही आपला आतापर्यंत भोळा समज होता. पण आता
खिशात पैसे असले तर कोणीही बुध्दीवंतापेक्षा जास्त गुण मिळवून गुणवत्ता यादीत आणि
संपूर्ण राज्यातही उंच्चांक गुणांनी झळकू शकतो, हे पहिल्यांदाच लक्षात आलं. म्हणून
अशा शिक्षणाच्या बाजारहाटाला जाऊन स्पर्धेत टिकणं हे सर्वसामान्य माणसांचं काम
राहीलं नाही.
(या लेखातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर
संदर्भ द्यावा ही विनंती.)
– डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
या तर सर्व टिपण्या काढल्या सारक्या आहेत . सर्वाना माहित असलेल्या गोष्टी . तुम्हीसुद्धा प्राध्यापक असल्याने याच यंत्रणेचा येक भाग आहात . मग उपाय का सुचवत नाहीत ?
उत्तर द्याहटवा