गुरुवार, ३० जून, २०१६

Sanskritik Maharashtra



सांस्कृतिक महाराष्ट्र

- डॉ. सुधीर रा. देवरे

      महाराष्ट्रात इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 225 पर्यंत सातवाहनांचे राज्य होते. त्यांनीच महाराष्ट्राची स्थापना केल्याचे ऐतिहासिक दाखले मिळतात. याच काळात साक्षरता संस्कृती व कला या क्षेत्रात चांगली प्रगती केल्याचे पुरातत्व पुरावे मिळतात. शैक्षणिक, धार्मिक व कलेच्या क्षेत्रात महाराष्ट्राची प्रगती झाली. अजिंठा येथील लेणी प्रसिध्द आहेच. वाकाटक राजवटीनंतर काही काळ कलाचुरी घराण्याचे राज्य होते. नंतर चालुक्य, राष्ट्रकुट आणि यादव व शिलाहारांचे राज्य होते. काही काळ बहामणी साम्राज्य सुध्दा. छत्रपती शिवाजींकडून एकसंध महाराष्ट्राचा उदय झाला. नंतर पेशवाई येऊन गेली आणि पेशवाई संपून ब्रिटीश साम्राज्य. महाराष्ट्रातच स्वातंत्र्यपूर्व कॉंग्रेसची स्थापना झाली. लोकमान्य टिळक व म. गांधी यांच्या नेतृत्वाखाली अनेक नेत्यांचा चळवळीत सहभाग होता. सेवाग्राम व महाराष्ट्र ही गांधींजीच्या चळवळीची प्रमुख केंद्रे बनली.
      स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्याची अधिकृत मराठी भाषिक स्थापना 1 मे 1960 या दिवशी झाली असून महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. आता महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या 112,372,972 इतकी आहे. तसेच महाराष्ट्राचे क्षेत्रफळ: 307713 चौरस किमी आहे. छत्तीसगड, अरबी समुद्र, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दादरा व नगरहवेली, गुजरात, मध्यप्रदेश यांना महाराष्ट्राच्या सीमा लागून आहेत.
      महाराष्ट्रात संत परंपरा मोठी असून संत ज्ञानेश्वर हे संत परंपरेतील थोर संतश्रेष्ठ समजले जातात. 1188 साली लिहिला गेलेला मुकुंदराजांचा विवेकसिंधू हा मराठीतला पहिला पद्यग्रंथ तर 1278 मध्ये म्हाइंभटांनी संकलित केलेला लीळाचरित्र हा मराठीतला पहिला गद्यग्रंथ आहे. संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ यांच्यासह त्यांच्या शिष्यवर्गाचा विचार केला तर महाराष्ट्राने अनेक संतांना जन्म दिला आहे. ही संतपरंपरा पंढरपूर येथील विठोबा या लोकदैवताला भजताना निर्माण झाली म्हणून महाराष्ट्रात विठोबा या दैवताचे स्थान अनन्यसाधारण ठरते. या संत परंपरेतल्या सर्वच संतांनी ‍अभिजात काव्य निर्मिती केली आहे. (पंढरपूरसाठी आषाढी कार्तिकी एकादशीला दरवर्षी महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणांहून भक्‍तांची पायी वारी निघते.) ही वारी परंपरा सुमारे आठशे वर्षांपासून टिकून आहे. या संतपरपरेंचा वारसा अजूनही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दिसून येतो. महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातल्या संत कवींना केवळ धार्मिक वा अध्यात्मिक महत्व नाही तर आजचे थोर साहित्यिकही स्वत:ला या संतपरंपरेचा पाईक समजतात हे उल्लेखनिय उदाहरण आहे.
      संतकवी, पंतकवी आणि आधुनिक साहित्य अशा तीन प्रकारात महाराष्ट्रातील साहित्यनिर्मितीकडे पाहिले जाते. वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि आता भालचंद्र नेमाडे या साहित्यिकांना मराठीतला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्रात आज प्रंचड प्रमाणात मराठी लेखन होत असून त्यातून उत्तम दर्जाची साहित्यनिर्मिती उदयास येतांना दिसते.
      भारतात साजरे होणारे अनेक सण महाराष्ट्रांतही साजरे केले जात असले तरी फक्‍त महाराष्ट्रात साजरे केले जाणारेही काही सण आहेत. उदाहरणार्थ, अक्षय तृतीया, पोळा, गणपती उत्सव (गणेश चतुर्थी), अनंत चतुर्दशी, भाऊबीज, गुडी पाडवा, हळदी कुंकू, मकर संक्रांत, नाग पंचमी, हनुमान जयंती, राखी पौर्णिमा, मंगळागौर, गौराई, कानबाई, होळी, चंपाषष्ठी आदी सणांचा ठळक नामनिर्देश करता येईल.
      छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व गड, किल्ले हे महाराष्ट्राचे पुरातत्वीय वैभव म्हणता येईल. यात शंभरेक गड व किल्ल्यांचा समावेश करता येईल. या व्यतिरिक्‍त अजिंठा, वेरूळ, एलिफंटा, कान्हेरी, कारला गुफा, महाबळेश्वर, माथेरान, पाचगणी, मालशेघाट, अंबोली, चिखलदरा, पन्हाळा, तोरणमाळ ही हिलस्टेशन; पंढरपूर, नाशिक, शिर्डी, नांदेड, ओंढा नागनाथ, त्र्यंबकेश्वर, तुळजापूर, गणपतीपुळे, भीमाशंकर, हरिहरेश्वर, शेगाव ही धार्मिक स्थळे आहेत. पुण्याचा शनिवार वाडा, लोणार सरोवर, रंकाळा तलाव, अनेक धबधबे, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प, संग्रहालये, धार्मिक क्षेत्रे, अष्टविनायक गणपती मंदिरे, देवीची साडेतीन पीठे, ज्योतिर्लिंगाची स्थाने, खंडोबाची स्थाने, थंड हवेची ठिकाणे, गरम पाण्याचे झरे असलेली स्थाने, नद्यांच्या काठांवरील महत्वपूर्ण गावे यांचा पर्यटनात समावेश होईल.
      गोदावरी आणि कृष्णा या महाराष्ट्रातल्या दोन महत्वाच्या नद्या आहेत. त्या सह्याद्रीत उगम पावतात. वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, गिरणा, भीमा- चंद्रभागा, नर्मदा, तापी या नद्याही महाराष्ट्रातून वाहतात आणि त्यांच्या अनेक उपनद्या आहेत. कोकणपट्टीला समांतर असलेली सह्याद्री पर्वतश्रेणी थेट केरळ पर्यंत गेलेली दिसते. महाबळेश्वर सारखे विस्तृत पठारी प्रदेश असलेल्या सह्याद्रीत कळसूबाई (1646 मीटर) सर्वात उंच शिखर आहे. सातपुडा पर्वताचे पठारी प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तरेला आहेत. या पर्वतांतून तापी, नर्मदा नद्या उगम पावून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात.
            सह्याद्रीच्या पूर्वेला पसरलेल्या पठारी भागात काळी माती आहे. तिला मृदाही म्हणतात. या मातीत भारी काळी आणि मध्यम काळी असे दोन भाग पडतात. 65 टक्के लोक शेती, कामगार आणि शेतीसंबधीच्या व्यवहारावर अवलंबून आहेत. महाराष्ट्रात कोळसा, मँगनीज, बॉक्साईट, लोह, चूनखडी, डोलोमाईट, सिलीमनाईट, सिलिका सॅड, फ्लोराईट आदी प्रकारचे खनिजांचे साठे आढळतात. पूर्व भागातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर येथील जंगले घनदाट आहेत. त्यांत सागवान लागडाचा समावेश होतो. पश्चिमेला सह्याद्रीच्या काही भागातही दाट जंगले आहेत. महाराष्ट्रात एकूण वनक्षेत्रांची नोंद 63842 वर्ग किमी असून जंगलांची टक्केवारी 21 टक्के आहे.
             छत्रपती शिवाजी, छत्रपती शाहू, महात्मा फुले, आगरकर, आण्णासाहेब कर्वे, विनोबा भावे, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे,  पंजाबराव देशमुख, बाबासाहेब आंबेडकर, गाडगे बाबा, यशवंतराव चव्हाण आदी कर्तृत्ववान महान लोक महाराष्ट्रातून घडलेत.
      महाराष्ट्रात ाहणारा तो मराठी माणूस. राज्यशासनाची अधिकृत भाषा आणि प्रमाणभाषा म्हणून प्रामुख्याने मराठी ओळखली जात असली तरी मराठीच्या अनेक स्थानिक घटकबोली आढळतात. अशा घटकबोलींची संख्या जवळपास पासष्ट इतकी आहे. त्यात आदिवासी आणि भटक्या विमुक्‍तांच्या भाषांचाही समावेश आहे. अहिराणी, आगरी, कोहळी, खानदेशी लेवा, चंदगडी, झाडी, वैदर्भी, तावडी, पोवारी, मालवणी, वर्‍हाडी, वाडवळी, सामवेदी, संगमेश्वरी या विशिष्ट भौगोलिक प्रदेशातल्या लोकभाषा असून कातकरी, कोकणा, कोरकू, कोलामी, गोंडी, गोंडी-थाट्या, गोंडी माडिया, ठाकरी, ठाकूर क, ठाकूर म, ढोरकोळी, निमाडी, निहाली, परधानी, पावरी, भिल्ली/भिलोरी/देहवाली, मथवाडी, मल्हारकोळी, मावची, मांगेली, राठ्या (बारेला), वारली, हलबी या आदिवासी बोलीभाषा आहेत. या व्यतिरिक्‍त कुंची कोरवा, कैकाडी, कोल्हाटी, गोरमाटी, गोल्ला, गोसावी, घिसाडी, चितोडीया, छप्परबंद, डोंबारी, नंदीवाले, पारधी, पारूशी- नाथपंथी डौरी, पारूशी-मांग, पारूशी-मांग गारूडी, बेलदार, वडारी, वैदू या भटक्या विमुक्‍तांच्या बोलीभाषा बोलल्या जातात. ब्राम्ही, देवनागरी, मोडी, महानुभावाच्या सांकेतिक लिपी आणि गोंडी लिपी अशा पाच लिपी राज्यात प्रचलित आहेत.     
      महाराष्ट्रात अनेक आदिवासी आणि भटक्या विमुक्‍त जनजाती आढळतात. भील, गोंड, माडीया, कातकरी, कोळी, ओरान, वारली हे इतर आदिवासींपेक्षा संखेने जास्तदिवासी रहिवासी आहेत. या नंतर कोकणा, मावची भील, गावीत, पावरा, राठवा, धनगर, वंजारा, गोंधळी, आंध, छत्तीसगडी, कोलामी, कोरकू, मावची. भील, तडवी भील, वसावे भील, कवार/ कानवार, गोंड/ राजगोंड, गोंडडोरला, गोंडझारे, गोंडमुरिया, गोंडथाटीया, परधान, कोकणा, कोलम, गामित आदी आदिवासी वास्तव्य करून राहतात; तर पारधी, राजपूत भामटा, वडारी, नंदीबैलवाले, बहुरूपी, गारूडी, पाथरवट, पंचाळ, जोशी, कैकाडी, बंजारा, थोटी, कातकरी/काथोडी, कोरकी, नाहल आदी भटके विमुक्‍त आदिवासी आढळतात.
      मराठी भाषेसह अनेक घटक बोलींतून प्रचंड प्रमाणात लोकसाहित्य विखुरलेले आहे. मराठी लोकसंस्कृतीच्या काही घटकांगांचे खालील प्रमाणे वर्गीकरण करता येईल:
      व्रत घेणे, चक्र भरणे, तोंड पाहण्याचा कार्यक्रम, सुखगाडी (सुखदेवता), मुलामुलींची नावे ठेवण्याची पध्दत, पाऊस यावा म्हणून वरूण देवाला प्रसन्न करून घेण्यासाटी धोंड्या काढणे, तुळशीचे लग्न लावणे, जावळ काढणे, घरभरणी करणे, लग्नाच्या पध्दती आदी विधी.
      भोवाडा, खंडोबा आढीजागरण, लळित, लोकनाट्य, तमाशा, भील आणि कोकणा यांचा डोंगर्‍या देव उत्सव, कोकणा आदिवासी बांधवांची कन्सरा माली, एखाद्या पारंपरिक वैद्याने रोग्याची पटोळी पाहणे, लग्नाच्या विविध परंपरा, मंत्रांनी पान उतरवणे (सापाचा दंश उतरवणे), विंचू उतरवणे, मंत्र-तंत्र आदी विधी- नाट्य.
      कानबाई रानबाई बसवणे, महालक्ष्मी बसवणे, भालदेव बसवणे, गौराई बसवणे, चिरा बसवणे, काठीकवाडी काढणे, खांबदेव पुजणे (नागदेव, वाघदेव), लोकदेवांची पालखी काढणे, वीर काढणे, म्हसोबा, आया, डोंगरदेव, मुंजोबा, कन्सरा माऊली, आदी लोकदेव- देवता. आखाजीचा बार, झोका, गोफण, गलोल, आदी खेळ.
      बारातल्या शिव्या, झोक्यावरची गाणी, भलरी गीते, कापणीची गीते, मोटेवरची गाणी, जात्यावरची गाणी, कापणी गीते, खंडोबाची गाणी, झोक्यावरची गाणी, कुटुंबात कोणाचा तरी मृत्यू झाल्याने स्त्रियांचे शोकग्रस्त पण गेय स्वरूपात शब्दबध्द रडणे, लोकगीतातला तीनशे साठ- नऊ लाख अशा लोकपरिमाणातील संज्ञा, उखाणे, आन्हे, म्हणी, गप-गफाडा, लोककथा, आख्यायिका, भारूडे, लळित, ओव्या, लोकगीते आदी लोकसाहित्य, विविध प्रकारचे ग्रामीण खाद्य पदार्थ, सटीचा टाक विधी, दुख टाकायला आणणे, दारावर जाणे, विवाह परंपरा, बाळाला घुगरावणे आदी रूढी-रिती. खंजिरी, डफ, तुणतुणे, ढोल, ढोलकी, किंगरी आदी वाद्य. फेरा नाच, दबक्या नाच, शिमगा नाच, भिलावू नाच आदींसह सांस्कृतिक गीतांत लावणी, पोवाडे आढळतात. या व्यतिरिक्‍त अनेक लोकगीते त्या त्या परिवेशात दिसून येतात. विविध लोकसंस्कृती, लोकपरंपरा, लोककला, लोकसंगीत, लोकनृत्य, लोकनाट्य, लोकवाद्य महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात दिसून येतात.
      तमाशा हा एक लोकनाट्याचा प्रकार महाराष्ट्रात परंपरेने प्रचंड लोकप्रिय असून त्यातली लावणीगायन आणि लावणीनृत्य विशेष लोकप्रिय आहेत. तमाशातले महत्वाची वाद्य म्हणजे ढोलकी आणि तुणतुणे. भारूड, गोंधळ, पोवाडा (13 व्या शतकात होऊन गेलेला शारंग देव याने प्रथम पोवाड्याची बांधणी केली होती.) सारंगी, बासरी अशीही काही वाद्य महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. अशी अनेक मराठी लोकसंस्कृतीची भरजरी रूपे महाराष्ट्रात पहायला मिळतात.    मृदंग, वीणा, तंबोरा, झांज हे वारकरी लोकपरंपरेतले वाद्य असून सनई, चौघडा, तुतारी हे राजकीय परंपरेतले वाद्य आहेत. ढोल, तुणतुणे, पावरी, खंजिरी, सांबळ, थाळी, किंगरी आदी आदिवासी परंपरेतून आलेले आहेत.
      महाराष्ट्रातल्या लोकजीवनात मुख्य पाच विभाग पडतात. खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण असे हे प्रमुख विभाग दिसून येतात. त्या त्या विभागातल्या सांस्कृतिक जडणघडणीत थोडाफार फरक पडतो. शेती, व्यवसाय, भाषा, राहणीमान, वेशभुषा, वास्तु- घर, खाद्यपदार्थ, विधी आदीं लोकजीवनात त्या त्या भौगोलिक क्षेत्रात थोड्याफार प्रमाणात बदल दिसून येतात.               
      (या व्यतिरिक्‍त अजून काही महत्वपूर्ण नोंदी अनावधानाने राहून गेल्या असतील तर अभ्यासकांनी लक्षात आणून द्याव्यात ही विनंती. महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज या वेबसाईटवर महाभ्रमंती या विभागात सांस्कृतिक भारत या नावाचे माझे साप्ताहीक सदर सुरू झाले आहे. दिनांक 23 व 24-6-2016 ला दोन भागात प्रसिध्द झालेला हा लेख.)

  डॉ. सुधीर रा. देवरे
    इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
संदर्भ सूची:
1) मराठी विश्वकोश, वार्षिकी 2005, प्रमुख संपादक: डॉ. श्रीकांत जिचकार,
   प्रकाशक: सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
2. आंतरजालावरून (Internet) शोधलेली माहिती.
3. ढोल नियतकालिक, (अहिराणी, अंक क्रमांक 1, 2, 3, 4, 5 आणि मराठी वार्षिकांक, दिवाळी 2002), संपादक: डॉ. सुधीर रा. देवरे
4. संदर्भ शोध सहाय्य: दर्शना कोलगे.
5. अहिराणीच्या निमित्ताने: भाषा- डॉ. सुधीर रा. देवरे, पद्मगंधा प्रकाशन, पुणे.

1 टिप्पणी:

  1. डॉक्टर मी काल लिहिलेली टिप्पणी कोठे आहे ? आपल्या लीकानावर कोणीच टिप्पणी करीत नाही काय ?

    उत्तर द्याहटवा